अण्णा कडलासकर - 9270020621
13 सप्टेंबर 2020 च्या मध्यरात्री वयाच्या 78 व्या वर्षी माझे वडील पांडुरंग दिनकर कडलासकर यांचे कर्करोगाच्या तडाख्याने निधन झाले. आयुष्याच्या 50 वर्षांत 3 क्विंटलभर तंबाखूचे सेवन करण्याची सवय त्यांना नडली. त्यांच्या व्यसनमुक्तीसाठी मी खूप प्रयत्न केले; पण त्यांच्या हट्टी आणि रांगड्या स्वभावापुढे आमची हार झाली.वडिलांच्या निधनानंतर गावाकडे होणारी विविध कर्मकांडे टाळूया, हा विचार मी कुटुंबातील भाऊ, बहिणी, आई यांना बोलून दाखवला; तसेच स्मशानभूमीऐवजी शेतातच अंतिम संस्कार करण्याचा विचार सांगितला. व्यवस्थित चर्चा झाली. राख सावडणे, अस्थिविसर्जनाचा दिवस उजाडला. जवळचे नातेवाईक कावळ्याचा-पिंडाचा घास कुठे आहे? गोमूत्र आणले का, याची चौकशी करू लागले. सर्वांनी माझ्याकडे बोट दाखवायला सुरुवात केली. भाऊ म्हणाला, “आता तूच सांभाळ सगळं!”
मी घराबाहेर जमलेल्या मंडळींना, गोमूत्र शिंपडले की शुध्दी होणार नाही, तर आपण ीरपळींळूशी आणलं आहे. आपण फक्त फुले (गुलाल, बुक्का, अगरबत्तीही न ठेवता) ठेवून वडिलांना आदरांजली देणार असल्याचे सांगीतले. भावकीने नाके मुरडायला सुरुवात केली. मी त्या दिवशी पहाटेच एका कागदावर अस्थिविसर्जन करताना काय निवेदन करायचे, याचे टिपण काढले होते. जमलेल्या लोकांपैकी काहींनी ‘अस्थि चंद्रभागेत कोण घेऊन जाणार? व्यवस्था काय?’ म्हणताच दोघेजण तयार झालेच. मी त्यांना थांबा म्हणालो.
जमलेल्या स्त्री-पुरुष, नातेवाईक या सर्वांना उद्देशून मी आणलेले निवेदन खड्या आवाजात आमच्या कुटुंबाचा सामूहिक निर्णय म्हणून वाचून दाखवले – “वडिलांची रक्षा आम्ही शेतातच विसर्जित करणार असून आजच्याच दिवशी आंबा, नारळ अशा पाच झाडांची लागवड शेतात करणार आहोत. सर्व अस्थि नदीत न टाकता त्या नव्या झाडांभोवती टाकणार आहोत. सुतक पाळणे, मुंडण करणे हा प्रकार कोणीही करणार नाही. भावकीने तसे करण्याची आवश्यकता नाही. ‘आत्मा’ या संकल्पनेवर आमचा विश्वास नसल्याने आम्ही यापुढे दहावा, बारावा, मासिक, वर्ष श्राद्ध हा कसलाही प्रकारचा विधी करणार नाही.” गावातील प्राथमिक शाळेला काही आर्थिक मदत शैक्षणिक वर्ष सुरू होताच करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यानंतर सर्वांनी ‘पसायदान’ म्हणत आदरांजली वाहण्यात आली. मोजके नातेवाईक, स्नेही यांना पाचव्या दिवशी स्नेहभोजन दिले. 8000 लोकसंख्या असलेल्या आमच्या गावात हे प्रथमच घडल्याने चर्चा झाली. दुपारी आई, बहिणी, भाऊ यांच्यासह नातेवाईकांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. सोशल मीडियावर फोटो गेले अन् लगेच स्थानिक पत्रकारांनी बातमी देणार असल्याचे सांगितले. दै. ‘पुढारी’, ‘सकाळ’, ‘पुण्यनगरी’सह स्थानिक पेपरमध्ये फोटोसह बातमी आल्यावर अनेक नाराज नातेवाईकांचे चेहरे उजळले. त्यांनाही ‘परिवर्तनीय पाऊल तुमच्या कुटुंबीयांनी उचलले, खूप चांगले झाले,’ असे कुणीतरी निर्भीडपणे पुढे होऊन करायला हवे, असे मेसेज आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माझ्या 22 वर्षांच्या कामाचा कृतिशील वसा मी सोलापूर जिल्ह्यातील रुढीबद्ध गावात पोचवू शकल्याचे समाधान आम्हाला लाभले.