नागनाथ कोत्तापल्ले - 8805770888

कोरोनासारख्या साथी आल्या की, माणसाच्या अंगातील जुने ‘आजार’ उफाळून येतात. मग ते माणसाला संपवूनच शांत होतात! हे माणसाबद्दल जेवढे खरे आहे, तेवढेच राष्ट्राबद्दलही. कोरोना आला आणि आपल्या राष्ट्राचे मूळ ‘आजार’ उफाळून येऊ लागले आहेत. विशेष म्हणजे आमच्या देशातल्या लोकांना हे दुर्धर आजार आहेत, असे वाटत नाही, यासारखी दु:खाची आणि आश्चर्याची गोष्ट दुसरी कोणती असू शकते? त्यामुळे जग ‘विश्वगुरू’कडे पाहून हसत आहे. त्याचेही आम्हाला काही वाटत नाही. लाज नावाची गोष्ट तर आमच्या शब्दकोशातच नाही. मग कुजबुजत्या आवाजात चर्चा सुरू झाली, ‘पाहा, कोरोनामुळे एकमेकांना स्पर्श करायचा नाही.’ कधी काळी आपल्या देशात काही लोक अस्पृश्य होते. स्वातंत्र्यानंतर अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला; पण मुळात काही लोकांना अस्पृश्य का मानले गेले असेल? त्यामागे अशीच काही आरोग्यविषयक कारणे असणार. उगीचच काही लोक अस्पृश्य कसे ठरविले जातील? आरोग्यासाठीच लोक एकमेकांना स्पर्श करीत नसणार. विशेषत: अस्पृश्य लोकांना. वेद, उपनिषदांचे लेखन करणारे लोक जाणते होते. बुद्धिमान होते…
कोरोना नावाचा विषाणू आला आणि पाहता-पाहता सारे जग थांबले. हा विषाणू फार भयप्रद आहे. माणसे परस्परांच्या निकट आली की तो पसरतो, म्हणून जवळ येऊ नका, रस्त्यावर फिरू नका. ‘घरातच राहा, सुरक्षित राहा’ असं सरकार सांगू लागलं. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस फिरू लागले. पोलिसांना सर्व अधिकार मिळाले. पुष्कळदा ते अतिरेक करू लागले. बेदम मारू लागले. कधी-कधी लोकही नको ती गर्दी करू लागले.. मग सर्व कारखाने, उद्योग, व्यवसाय, कार्यालये बंद करण्यात आली. वाहतुकीची साधने थांबविण्यात आली. बसेस, रेल्वे, रिक्षा, कार अशी सारी वाहने थांबली. भारतामध्ये अधिकृतरित्या 24 मार्चपासून हे सारे थांबले. थांबूनही तीन महिने झाले; पण कोरोना वाढतोच आहे. तो मात्र थांबत नाही. माणसं हतबल झाली, घरात बसू लागली. टी. व्ही.वर बातम्या पाहू लागली. मरणार्या माणसांची संख्या मोजू लागली. ती वाढतच चालली. मग एक दिलासा देणारी बातमी आली की, ज्यांना आधीपासूनच काही जीवघेणे आजार आहेत, त्यांच्यावर कोरोना चटकन आक्रमण करतो आणि त्यांना घेऊनच जातो, म्हणजे एरव्ही जे आज ना उद्या मरणार होते, ते कोरोनामुळे आजच मरत आहेत. खरंच ही ‘दिलासा’ देणारी बातमी आहे का? तर नाही. कुणाही माणसाचे जाणे दु:खकारकच असते, तरी नैसर्गिक मरण जरा दु:ख कमी करणारे असते. इथले मरण नैसर्गिक नाही. कसल्या तरी न दिसणार्या शस्त्राने शांतपणे शिरच्छेद करावा, असे आहे!
याचा एक अर्थ असा की, कोरोनासारख्या साथी आल्या की, माणसाच्या अंगातील जुने आजार उफाळून येतात. मग ते माणसाला संपवूनच शांत होतात! हे माणसाबद्दल जेवढे खरे आहे, तेवढेच राष्ट्राबद्दलही. कोरोना आला आणि आपल्या राष्ट्राचे मूळ आजार उफाळून येऊ लागले आहेत. विशेष म्हणजे आमच्या देशातल्या लोकांना हे दुर्धर आजार आहेत, असे वाटत नाही, यासारखी दु:खाची आणि आश्चर्याची गोष्ट दुसरी कोणती असू शकते? त्यामुळे जग ‘विश्वगुरू’कडे पाहून हसत आहे. त्याचेही आम्हाला काही वाटत नाही. लाज नावाची गोष्ट तर आमच्या शब्दकोशातच नाही.
मग कुजबुजत्या आवाजात चर्चा सुरू झाली.. ‘पाहा, कोरोनामुळे एकमेकांना स्पर्श करायचा नाही.’ कधी काळी आपल्या देशात काही लोक अस्पृश्य होते. स्वातंत्र्यानंतर अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला; पण मुळात काही लोकांना अस्पृश्य का मानले गेले असेल? त्यामागे अशीच काही आरोग्यविषयक कारणे असणार. उगीचच काही लोक अस्पृश्य कसे ठरविले जातील? आरोग्यासाठीच लोक एकमेकांना स्पर्श करीत नसणार. विशेषत: अस्पृश्य लोकांना. वेद, उपनिषदांचे लेखन करणारे लोक जाणते होते, बुद्धिमान होते… अशी हलक्या आवाजात ‘कुजबूज’ मोहीम सुरू झाली. ‘कुजबूज’ मोहीम किती प्रभावी असते, याचा अनुभव आपण 2014 ला प्रथमत:च घेतला. आज रोज घेत आहोत. सत्ता आल्यामुळे आता ‘कुजबूज’ मोहिमेने काहीसे प्रकट रूप घेतले आहे. सोशल मीडिया नामक चव्हाट्यावर ‘कुजबूज’ मोहिमावाले जे पसरवीत आहेत, ते पाहिले की, सत्याचे रूपांतर असत्यात होऊ शकते, हे लक्षात येते. सध्या तेच सुरू आहे…
एकूण, ‘कुजबूज’ मोहीम प्रभावी असते. तिला आमच्या दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील अनेक माध्यमांनी मोठा ‘हातभार’ लावला. सर्वत्र भीतीचे साम्राज्य निर्माण झाले. याचे परिणाम दिसू लागले. सफाई कर्मचारी फाटकासमोर आल्याबरोबर ‘दूर व्हा,’ असे न सांगता, ‘दृष्टीच्या टप्प्यात येणार नाही, अशा ठिकाणी उभे राहा,’ असे सांगणार्या बंगळुरूच्या (जेथे मोठा ‘आयटी हब’ आहे) एका गृहिणीचे चित्र मध्यंतरी पाहावयास मिळाले. खरे म्हणजे दुरून बोलायला हरकत नाही, म्हणजे शिंक आपल्या अंगावर येणार नाही, अशा अंतरावर उभे राहून छान गप्पा मारता येतील की! पण नाही. एकेकाळी अंगावर सावली पडू न देणार्यांचे हे वंशज असणार! त्यांच्या सुप्त मनातल्या पूर्वस्मृती जागृत झाल्या असतील का?
1 जून 2020 पासून क्रमाने टाळेबंदी उठविण्यात आली. (टाळेबंदीचा टाळ्या-थाळ्या वाजविण्याचा, दिवे घालविण्याचा, पुष्पवृष्टी करण्याचा काय उपयोग झाला, तो हे सारे करणार्यांनाच माहीत.)
पुढच्या पाच-सहा दिवसांत हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले. रस्त्यावर लोक दिसू लागले. बंद पडलेले कारखाने सुरू होऊ लागले. सरकारनेही तशी परवानगी दिली. कामगार कामावर जाऊ लागले. परंतु शहरांमधील अनेक कॉलन्यांमधून नियम करण्यात आले, ‘सरकारने काहीही म्हटले तरी आमच्या कॉलनीत आम्ही कोणाला येऊ देणार नाही.’ मार्चपूर्वी कॉलन्यांमधील अनेक घरांत अनेक स्त्रिया भांडी-कुंडी, झाडणे-पुसणे आणि स्वयंपाक अशी कामे करायच्या. या गोरगरीब स्त्रिया दिवसभर राबून कसेतरी पोट भरायच्या. टाळेबंदीनंतर या स्त्रियांचे काम बंद झाले. काही इलाज नव्हता म्हणून बंद झाले, असे आपण समजून घेऊ. परंतु टाळेबंदी उठल्यानंतर शासनाने अशा सर्व कामगारांना कॉलन्यांमधून प्रवेश द्या, असे आदेश काढले, तरीही 25 जूनपर्यंत अनेक कॉलन्यांमध्ये घरकामगार स्त्रियांना, गाड्या पुसण्याचा व्यवसाय करणार्यांना आणि चालकांना प्रवेश मिळत नव्हता. गेटवरच्या सिक्युरिटीच्या लोकांना तसे सांगून ठेवण्यात आले होते. त्यामुळे अनेक कॉलन्यांच्या दरवानावर सकाळ, संध्याकाळ अनेक स्त्रिया जमताना दिसत होत्या. सिक्युरिटीचे लोक त्यांना अडवत होते. रडवेला चेहरा करून अशा स्त्रिया आणि कामगार परत जात होते. शेवटी 25 जून 2020 रोजी महाराष्ट्र शासनाला पुन्हा पत्रक काढावे लागले. कदाचित इथून पुढे काही फरक पडेल. (तरीही या स्त्रिया आणि पुरुष कंटोनमेंट झोेनमधल्या असतील, तर त्यांना प्रवेश नाहीच.)
पाहू पुढे काय होते ते; पण प्रश्न असा की, शासनाने आदेश काढूनही कॉलनीचे पदाधिकारी ऐकत नाहीत? कदाचित कॉलन्यांमधील काही लोकांचाही पाठिंबा असेल… वस्तुत: हे कामगार मास्क लावून आपल्या घरी आल्यावर हात स्वच्छ धुऊन, कपड्यांवर सॅनिटायझर मारून काम करू शकतील. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होणार नाही. हे सगळे माहीत असूनही आणि स्वत: कामावर जात असूनही या घरकामगारांना प्रवेश न देण्याचे कारण काय? एक तर्क करता येतो. हे सारे घर कामगार (स्त्रिया आणि पुरुष) गरीब असतात. चार-सहा घरी काम केल्याशिवाय त्यांना जगताच येत नाही. अशा घरकामगारांमधील जातींची गिणती कुणी केली की नाही, मला माहीत नाही. परंतु एक अंदाज मात्र असा आहे की, बहुसंख्य घरकामगार स्त्रिया आणि पुरुष; तसेच इतर कामे करणारे लोक हे प्रामुख्याने पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातींमधून येतात. खेड्यापाड्यांमध्ये पोट भरत नाही म्हणून शहरात येतात. कुठे-कुठे काम करून पोट भरतात. त्यात काही ओबीसी गटातील असतात. मराठा स्त्री-पुरुषही असतात; पण मुख्यत: मागासवर्गीय असतात. लॉकडाऊनपूर्वी नाईलाज म्हणून या लोकांना जातींचा विचार न करता काम दिले गेलेले होते. पती-पत्नी नोकरी करतात म्हणून किंवा अशाच कुठल्या ना कुठल्या कारणांनी काम दिले गेले होते. मध्ये अडीच-तीन महिने गेले. कॉलन्यांमध्ये राहणारे, उत्तम स्थिती आर्थिक स्थिती असणारे तर असतातच; पण बहुसंख्य उच्चवर्णीय असतात किंवा ज्यांना आपण व्यापारी वर्गातील म्हणतो, असे लोक असतात. तेव्हा या उच्चवर्णीय व उच्च आर्थिक गटातील लोकांना हे सारे निम्नस्तरीय घरकामगार जेवढे दूर राहतील, तेवढे हवे आहेत की काय, अशी शंका मनात येते… खरोखर जातीय मनोवृत्तीचा हा ‘रोग’ पुन्हा उफाळून आला असेल का? प्रकट मनात नाही; पण सुप्त मनातील संस्कार जागे झाले असतील का?
असू शकेल. कारण हा आजार आमच्या अंगात तीन हजार वर्षांपासून भिनलेला आहे आणि तो कोरोनाच्या निमित्ताने उफाळून आला असेल का?
टाळेबंदी सुरू झाली. सगळे रस्ते बंद करण्यात आले. रस्तोरस्ती नाके उभे करण्यात आले. अशा काळात दोन धार्मिक वेषातले महाराज पोलिसांना चुकवून आडमार्गाने पालघरच्या परिसरात पोचले. या परिसरात आधीपासून अशी अफवा पसरली होती (म्हणे!) की, मुलांना पळवून नेणारी एक टोळी फिरते आहे; परिणामी रात्रीच्या वेळी या दोन साधूंना आणि त्यांच्या गाडीच्या चालकाला लोकांनी बेमूर्वतखोरपणे मारून टाकले. मारणारे बहुधा सारे आदिवासी असावेत. (तसेच त्या भागात भाजपचे प्रस्थ आहे, असे कळते.) आता असे समूहाने कोणालाही मारून टाकणे अत्यंत दु:खदच होय; परंतु साधूंना मारले म्हणून दुसर्या दिवसापासून गदारोळ सुरू झाला. सामान्य माणसांना मारले असते, तर असा गदारोळ झाला असता का? मुळात पोलिसांना चुकवून आडमार्गाने हे साधू प्रवास करीत निघाले होते, हे चुकीचे होते. त्याबद्दल मात्र कुणी बोलायला तयार नाही. मग म्हटले जाऊ लागले की, हिंदू साधूंची हत्या झाली. यातही हास्यास्पद गोष्ट अशी की, अर्णव गोस्वामी नावाचा आरडाओरड करणारा पत्रकार सोनियाबाईंना या घटनेचा ‘जबाब’ मागत होता. ‘हिंदू साधूंची हत्या झाल्यामुळे तुम्हाला आनंद झाला असेल, तुम्ही आता आनंदाने ही बातमी इटलीला कळविली असेल.’ याच्यासारखा मूर्ख आरडाओरडा क्वचितच कुणी करेल. या प्रकरणी सोनिया गांधींचा संबंध काय? त्यांना आनंद का होईल? तर ‘हिंदू साधू, हिंदू साधू’ असा आरडाओरडा अनेक चॅनल्सवर सुरू होता. त्याच दरम्यान ‘तबलिगी जमात’च्या लोकांनी कोरोना पसरविला, अशी ‘कुजबूज’ मोहीम सुरू केली. मग ती सोशल मीडियावर आली. पुढे दूरचित्रवाहिन्यांच्या अनेक चॅनल्सवर आली; म्हणजे मुस्लिमांनी हा रोग पसरविला, असे ठसविले जाऊ लागले. मग त्याच वेळी हिंदू देवतांची अनेक स्थाने खुली होती. तेथे गर्दी होत होती; एवढेच नाही, तर योगी आदित्यनाथ राममूर्ती घेऊन अयोध्येला पोचले होते; पण या सार्यांबद्दल एका शब्दानेही कोठे चर्चा नव्हती. सर्वत्र फक्त ‘तबलिगी जमात..’ मग काही खोटे व्हिडिओ प्रसारित केले गेले, ज्यामध्ये मुस्लिम विक्रेते फुलांना थुंकी लावून फुले विकताहेत किंवा डिलिव्हरी करणारी मुस्लिम मुले थुंकी लावून पिझ्झा वगैरे देत आहेत… त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे अलिकडेच सुफी संत मोईनोद्दिन चिस्ती यांच्याबद्दल अत्यंत गलिच्छ विधाने एका चॅनलवरून प्रसारित करण्यात आली.
देशभरात कोरोनाचे रुग्ण प्रतिदिवशी वेगाने वाढत आहेत, मृत्यूचा आकडा वाढतो आहे आणि आमच्या देशातील हा डिजिटल मीडिया काय करतो आहे? तर हिंदू-मुस्लिम दरी कशी वाढेल, यासाठी प्रयत्न करीत आहे. वस्तुत: ही वेळ परस्परांनी जवळ येण्याची, परस्परसहकार्य करण्याची आहे; परंतु अशा आणीबाणीच्या प्रसंगीसुद्धा भारतीय माणूस ‘हिंदू-मुस्लिम, हिंदू-मुस्लिम’ करण्यात धन्यता मानतो आहे. असे करणार्यांच्या मागे कोण आहे, हे लोकांना कळते आहे; पण त्याची त्यांना पर्वा नाही. कारण असे करूनच सत्ता हस्तगत करता येते, हे त्यांनी अनुभवलेले आहे…
तर याप्रसंगी हिंदू-मुस्लिम का? तर त्याचे उत्तर असे की, येत्या शंभर वर्षांत हिंदू-मुस्लिम द्वेषाचा ‘विषाणू’ भारतीयांच्या शरीरात घुसला. त्यामुळे भारतीय माणूस ‘आजारी’च झाला. अधून-मधून हा ‘आजार’ उफाळून येतो आणि बाबरी मशीद उद्ध्वस्त केली जाते. अधून-मधून मुस्लिमांना पकडून ‘मॉब लिचिंग’ केले जाते, म्हणजे एखाद्या रोग्याचा ताप जसा अधून-मधून चढतो, तसे आपले होते. आता हा ‘आजार’ आपल्या शरीरात बराच खोलवर मुरला आहे. (अनेकांना या आजाराचा अभिमानही वाटतो!) तो इतक्या सहजासहजी दूर होईल, असे वाटत नाही.
अशा भयानक महामारीच्या प्रसंगी जुने ‘आजार’ उफाळून येतात, हा जो सिद्धांतवजा अनुभव आहे, त्याचा प्रत्यय या कोरोना काळात फार तीव्रतेने येतो आहे, एवढे मात्र खरे.
आपला देश म्हणजे विषमतांचे आगर आहे. त्यातली एक म्हणजे सामाजिक विषमता होय; पण त्यासारखीच वेदनादायी बाब म्हणजे आर्थिक विषमता होय. पण त्याबद्दल कधी आपण बोलत नाही. आपण बोलू नये म्हणून आपल्याला हिंदू-मुस्लिम आणि जातीय अस्मितांमध्ये गुंतवून ठेवण्यात येते. खूप खोटे प्रश्न निर्माण करून त्यावर रात्रंदिवस चर्चा केल्या जातात. या सार्यांचा मूळ हेतू आर्थिक विषमतेकडे, म्हणजे भांडवलदारांच्या वाढत्या संपत्तीकडे आपले लक्ष जाऊ नये!
तर मूळ मुद्दा आर्थिक विषमतेचा… पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर झाले, म्हणजे अचानक जाहीर झाले. (सध्या सगळ्या गोष्टी अचानक होतात) कसली सूचना नाही, कसली पूर्वतयारी नाही. सारे उद्योग ठप्प झाले. सारे जग जिथल्या तिथे थांबले. आपला देशही थांबला… लोक आपापल्या घरात बंदिस्त झाले. बंदिस्त होणे सोपे होते; पण खायचे काय? कसा तरी महिना काढला. इकडून-तिकडून काही तरी गोळा करून खाल्ले. लेकरा-बाळांना खाऊ घातले अन् पुन्हा एक महिन्याने लॉकडाऊन वाढला, असे अचानक काहीबाही घोषित करणार्यांच्या गावी हे गरीब, दीन-दुबळे नव्हतेच. अर्थात ते कधीच नसतात म्हणा! मागे नोटाबंदीच्या वेळीही नव्हते. तेव्हा बँकांच्या रांगांमध्ये दीड-दोनशे लोक मेले. कुणाच्या डोळ्यात अश्रू आले नाहीत. मरणार्यांच्या कुटुंबाला कुणी भरपाई दिली नाही. हा अनुभव गाठी होताच. घरात कोंडून भुकेल्यापोटी मरायचे, तर गावाकडे जाऊन मरू, असा विचार करून लाखो लोक घराबाहेर पडले. रेल्वे स्टेशनवर गर्दी करू लागले. (मुंबईला ही गर्दी मशिदीपुढे जमली असा नीच प्रकारही झाला.) रेल्वे नाहीत, तर पायी निघाले. मुंबई, सुरत, दिल्ली, जालना, औरंगाबाद, बंगळुरू, गुडगाव अशा ठिकाणाहून लोक पायी निघाले. सायकलवर निघाले. (मिळेल त्या वाहनाने निघाले, असे म्हणण्याची सोय नाहीच.) सामान ओढत निघाले. सामानावर मुलं झोपलेली… उन्हाचा कहर, रस्त्यावर सावली नाही. (‘झाडे लावा’ ही आपली संस्कृती विसरून गेलो.) लोक चालताहेत. घामाच्या धारा, खायला काही नाही, प्यायला पाणी नाही. रस्त्यातच किती माणसे मेली कुणास ठाऊक! औरंगाबाद-जालना रेल्वे रुळावर नऊ माणसे मालगाडीखाली चिरडून मेली. कुणाच्या डोळ्यात पाण्याचा ठिपूस आला नाही! मग कुणी म्हणाले की, ‘थोड्या रेल्वे सुरू करा. या लोकांना गावी नेऊन सोडा…’ मग रेल्वेच्या भाड्याचे काय करायचे, असा प्रश्न काही दिवस चालत राहिला. तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. थोड्या रेल्वे सुरू झाल्या. त्यांचे मार्ग चुकले. दीड दिवसांत पोचणारी रेल्वे, पाच-सहा दिवस नुसती रूळांंवरून फिरत राहिली. (हा नवा विकसित देश!) थोडे लोक रेल्वेने, थोडे बसने; पण बहुसंख्य पायी गावी जाऊन पोचले. एक मुलगी तर आपल्या आजारी बापाला सायकलवर मागे बसवून गावी पोचली. असे सारे लोक गावी पोचले, तर त्यांना गावात प्रवेश मिळेना. सारी माणुसकी आटून गेलेली. त्यांचेच भाऊबंद हातात दांडके घेऊन उभे केले. राज्य सरकारांनीच या लोकांना यायला बंदी केली!
… उन्हातान्हात उपाशीपोटी चालणार्या माणसांची संख्या किती? काही लाखांच्या घरात. हे लोक रोजच्या रोज कमावतात आणि खातात. कोण आहेत हे लोक… कारखान्यातून काम करणारे जसे आहेत, तसे बांधकामावर काम करणारेही लोक आहेत. इतरही खूप आहेत. हॉटेलमधील वेटर, रिक्षा-टॅक्सी चालवणारे, पान-सिगारेट विकणारे, रस्त्यावर अन्न विकणारे, न्हावी, मजूर अड्ड्यावर रोज जाऊन उभे राहणारे, वेगवेगळ्या दुकानांमधून काम करणारे, छापखान्यात छोटे-मोठे काम करणारे, घरगुती काम करणारे स्त्री-पुरुष… किती छोट्या-छोट्या व्यवसायाची नावे घ्यावीत?
पहिल्यांदाच अशी सारी माणसे डोळ्यांपुढे येऊ लागली. पूर्वी कधी यांची आपण नोंदही करीत नव्हतो. सारे सुरक्षित चालले आहे, असेच गृहीत धरीत होते. कोरोना नावाची महामारी आली आणि आपल्या समाजाला लागलेल्या या आर्थिक रोगाची लक्षणे अशी ठळकपणे जाणवायला लागली… नुसती जाणवायला लागली, असे नाही तर हा रोग आता सार्या देशाला वणव्याप्रमाणे पेटवतो की काय, असे वाटायला लागले.
पण असे आपल्या देशात कधीच होणार नाही. शतकानुशतकांपासून अध्यात्माचे मचूळ पाणी पिऊन-पिऊन सारी संवेदनशीलताच मरून गेेली आहे! या अध्यात्माचे पाणी भारी कडक. ‘मंदिरे, मशिदी उघडा,’ असे सुरू झाले. जगन्नाथाच्या रथयात्रेला प्रारंभी सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. मग अंतर पाळण्याच्या अटीवर रथयात्रेला परवानगी दिली! हे अध्यात्माचे पाणी इतके कडक की, कोरोनादेवीची निर्मिती झाली! तिकडे, उत्तर प्रदेशात महिला सामूहिकरित्या कोरोनादेवीची पूजा करू लागल्या. (पूर्वी महाराष्ट्रात कॉलरा आला की, मरिआई, शीतलाआईची पूजा केली जाई.) पण या सार्यांवर कडी म्हणजे इंदौरच्या कलेक्टरने कुठल्या तरी देवीला दारू पाजून कोरोना पळवून लावायची प्रार्थना केली! या सार्याच्या जोडीला गोमूत्र, गोशेण होतेच! तर असा आपला देश. मुळात आजारी! कित्येक शतकांपासून महामारी आली आणि सारे आजार उफाळून आले. आपले शहरीकरणाचे वेड (‘स्मार्ट सिटी’ हो!) आणि खेडी उद्ध्वस्त करण्याचे धोरण किती वेडेपणाचे ते सांगून गेले! तसेच प्रादेशिक असमतोल किती वाढलेला आहे, हेही लक्षात येते. पण हे अनुषंगिक मुद्दे झाले. खरा आजार प्रचंड दारिद्य्राचा आणि आध्यात्मिक मचूळ पाणी शतकानुशतके पिण्याचा आहे… महामारी आली आणि हे रोग उफाळून आले.
आणखी एक रोग आमच्या देशाच्या अंगात मुरलेला आहे, शतकानुशतके… तो म्हणजे स्वत:पुरता पाहण्याचा. सामाजिक पातळीवर जाऊन सार्या समाजासाठी काही तरी करावे, असे आम्हाला कधी वाटले नाही. स्वातंत्र्यानंतर जे थोडेबहुत सार्वजनिक भान आम्हाला आले होते, ते 1990 मध्ये खाजगीकरणाच्या वावटळीत उडून गेले. मग सुरू झाले खाजगीकरण. प्रत्येक गोष्ट खाजगी उद्योगपतींच्या ताब्यात द्यायची; एवढेच नाही, तर चांगले चाललेले सरकारी उद्योगही सरकार उद्योगपतींना विकत आहे. तेथे ना कामगार कायदे, ना समाजाच्या सर्व स्तरांचे समावेशन. आमचे लोकही ‘हिंदू-मुस्लिम’ करीत, अध्यात्माचे मचूळ पाणी पिऊन बधिर होऊन गेलेले; परिणामी आमच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था होऊन गेलेली. अनेक दवाखान्यांमध्ये सोयी-सुविधाच नाहीत. सोयी-सुविधा नाहीत, असे म्हटले की, डॉक्टरांना जेलमध्ये टाकण्याचे प्रकार झाले! असे प्रकार म्हणजे आमच्या सामूहिक निर्लज्जपणाचा कळसच होय. हा निर्लज्जपणाही शतकानुशतके आपल्या शरीरात भिनलेला. बलात्कार करणार्यांच्या बाजूने मोर्चे काढणार्यांचा देश आपला! डॉक्टर मंडळी जेलमध्ये जातात तेव्हा गप्प बसणारच!!
एकीकडे, अशा सार्वजनिक सुविधा, तर दुसरीकडे खाजगी डॉक्टर दवाखाने बंद करून बसलेले. आमचे कविमित्र किशोर घोरपडे यांना हार्ट अटॅक आला; ते जालन्याचे. जालना तसे मोठे गाव. जिल्ह्याचे ठिकाण… दोन तास त्यांचे कुटुंबीय त्यांना घेऊन फिरत होते. एकही डॉक्टर उपलब्ध नव्हता. जो उपलब्ध झाला, तो म्हणत होता, “सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जा..” सिव्हिल हॉस्पिटल सारे कोरोनात गुंतलेले. शेवटी उपचार न मिळाल्याने ते गेले. मग अशा रस्तोरस्ती दवाखाने थाटून बसलेल्या डॉक्टरांचा उपयोग काय? आमच्या किशोर घोरपडे यांच्यासारखे असंख्य लोक उपचारांअभावी कोरोनाशिवायही गेले; म्हणजे लॉकडाऊनमुळे मरा किंवा वाचण्यासाठी गावाकडे जाण्यासाठी निघून रस्त्यात मरा; कोरोनामुळे मरा किंवा कोरोनाशिवायही मरा… सामान्य माणसे मरतच असतात, हा इथला समज आजचा नाही; शतकानुशतकांचा, तरीही… ठेविले अनंते तैसेचि राहावे!
मुळातच सहानुभूतिशून्यतेचा रोग; पण तो या महामारीच्या काळात अधिकच उफाळून आला. एक सार्वत्रिक भीती सर्वदूर पसरली… ती कशी पसरली? तर या रोगाची नीट माहिती न दिली गेल्यामुळे. शासन जे काही सांगते, ‘ते अंतर पाळा, घरी राहा’ हेच पुनःपुन्हा; पण ते हे नाही सांगत की, हा रोग म्हणजे माणसांना दूर लोटणे नव्हे. ज्याला कुठलाही साथीचा आजार होतो, तो म्हणजे गुन्हेगार नव्हे. आमची टी.व्ही. चॅनल्स तर कमाल करतात. एखाद्या वसाहतीत कोरोनाबाधित रुग्ण सापडला म्हणजे एखादा दहशतवादी सापडला, असा आरडाओरडा करतात. खरे म्हणजे अशा जागतिक आपत्तीच्या वेळी कशा बातम्या सांगाव्यात, याचे प्रशिक्षण भारतीय लोकांना देण्याची गरज आहे. असल्या लोकांमुळे भीती अधिक पसरली. ती अधिक दाट झाली… वर्तमानपत्रांनी आणि ‘व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी’ने त्यामध्ये मोठीच ‘भर’ घातली.
अशा भीतीमुळे आमच्या जीवनातील सहजता तर हरवून गेलीच, जी थोडीबहुत उरलीसुरली मूल्यात्मकताही वाहून गेली.
अशा राष्ट्रीय जागतिक आपत्तीच्या काळात शासन कसे असावे? तर सामान्यांना धीर देणारे. सर्वतोपरी मदत करणारे असावे, अशी अपेक्षा असते. कारण लोकच उरले नाहीत, तर राज्य तरी कोणावर करणार? उत्तरेतल्या प्रचंड थंडीत राजा किंवा राणी रस्त्यावर थंडीत कुडकुडणार्या लोकांना गरम कपडे वाटत फिरत असत, असे दाखले इतिहासात मिळतात. छत्रपती शिवाजीराजे तर हरप्रकारे शेतकरी जगवावा, असे म्हणत असत… कारण सामान्यांच्या श्रीमंतीमधून राज्ये, राष्ट्रे उभे राहतात; पण अशी जाण आज उरली आहे का? उरली असती, तर मजुरांचे लोंढे असे रस्त्याने उपाशी-तापाशी निघाले नसते. शेकडो लोक रस्त्याने मेले नसते. याउलट या लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन आपल्या विरोधकांना कुठल्याही कलमाखाली जेलमध्ये टाकण्याचे प्रकार सुरू झालेले दिसतात.
आता हे सिद्धच झाले आहे की, पोलीस यंत्रणा स्वतंत्र नाही. सरकार सांगेल त्याप्रमाणे ती वागते; म्हणजे कायदेशीर बाबींमध्ये कसे अडकवायचे, याचे ‘कौशल्य’ पोलिसांकडे असते. सरकारने; अगदी तालुक्याच्या आमदारानेही इशारा करावा आणि पोलिसांनी कोणालाही गुंतवावे, जेलमध्ये टाकावे असे सुरू आहे, निर्धास्तपणे…! कारण कोरोनाच्या भीतीमुळे लोक रस्त्यावर येत नाहीत! केवढे हे चातुर्य! मुळात भारतीय माणसाच्या मनात लोकशाही अजून नीट रुजलीच नाही. म्हणून राज्यकर्तेही मध्ययुगीन राजासारखे वागतात आणि प्रजाही त्यांचे गुणगाण करते. मग जुने सारे ‘रोग’ उफाळून येतात. महामारीच्या काळात ते अधिकच भडकतात; जीवघेणेही होतात!
नागनाथ कोत्तापल्ले संपर्क : 8805770888