चमत्काराच्या अफवेबाबत गावभर बोर्ड लिहिले

अनिल चव्हाण - 9764147483

21सप्टेंबर 1995 : मु. पो. कोल्हापूर

‘अंनिस’ कोल्हापूर शाखेच्या दृष्टीने 1995 हे वर्ष खूपच महत्त्वाचे आणि उत्साहवर्धक गेले. ‘निर्माल्य पाण्यात टाकू नका’ आणि ‘पाणी प्रदूषण टाळा’ मोहीम चांगलेच बाळसे धरत होती. कोल्हापुरातल्या बहुतेक शाळा प्रचार फेर्‍या काढत होत्या. राजे संभाजी तरुण मंडळाने रंकाळ्याच्या काठावर निर्माल्याबरोबर गणेशमूर्तीही दान घेण्याची सोय केली होती. त्याला हाताच्या बोटांवर मोजता येईल, एवढ्याच मूर्ती दान स्वरुपात मिळत; पण कार्यकर्त्यांनी चिकाटी सोडली नव्हती. याच वर्षी आमच्या विद्यापीठ हायस्कूलमधले कर्मचारी महादेव खानविलकर हे कळंबा ग्रामपंचायतीचे सरपंच झाले. त्यांच्या मदतीने ‘अंनिस’ने निर्माल्य पाण्यात टाकू नका, अशी मोहीम तलावाकाठी राबवली; तर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पाचशेच्या वर गणेशमूर्ती कळंबा तलावाच्या पाण्याबाहेर ठेवून प्रदूषण टाळले.

ते हेच वर्ष

तीन वर्षांपूर्वी विद्यापीठ हायस्कूलमध्ये कोल्हापूरच्या जिल्हा शाखेची स्थापना झाली होती. मुख्याध्यापक बी. एम. पाटील अध्यक्ष, उपाध्यक्ष के.डी. खुर्द आणि मी सेक्रेटरी!

दर आठवड्याला शाळेतच मीटिंग होत असे. 21 सप्टेंबर रोजी अशीच मीटिंग सुरू होती आणि कोणीतरी बातमी आणली – गणपतीची मूर्ती दूध पिऊ लागली आहे आणि कोल्हापुरात हा चमत्कार पाहायला मिळतो आहे. ताबडतोब आम्ही काही जण बाहेर पडलो. गणपती मंदिरासमोर लोक जमत होते; पण दूध पिण्याचा चमत्कार काही होत नव्हता. गंगावेशमधील एका घरात असा ‘चमत्कार’ सुरू असल्याचे कानावर आले. आम्ही तिकडे वळलो. महाद्वारकडे जाणार्‍या रस्त्यावर एका घरासमोर लोकांनी शिस्तीत रांग लावली होती. त्यांच्या हातात दुधाची वाटी आणि चमचा होता. काहीजण रिकामे होते. कपड्यावरून काही मध्यमवर्गीय, तर बहुसंख्य कनिष्ठ मध्यमवर्गीय व असंघटित कामगार दिसत होते. एकाच्याही चेहर्‍यावर रया नव्हती. दाढीचे खुंट वाढलेले आणि मळलेले कपडे. हातावर पोट असलेली ही माणसं काहीतरी चमत्कार व्हावा, या अपेक्षेने उभी होती. आपल्या हलाखीची मूळ कारणे इथल्या समाजव्यवस्थेत आहेत, हे समजत नसेल तेव्हा दुसरा पर्याय काय?

आम्हीही त्यात सामील झालो. रांगेत सगळी चर्चा चमत्काराची. काहीजणांनी यापूर्वी विविध चमत्कार अनुभवल्याची वर्णने ऐकायला मिळाली. भाविक श्रद्धेने ऐकत आणि कुवतीप्रमाणे त्यात भर घालत. आम्हाला अंगार्‍याचा पेढा करणारे, कौल देणारे, हळदीचे कुंकू आणि कुंकवाचा बुक्का करणारे असे अनेक ‘चमत्कारी’ देव कोल्हापुरात असल्याची माहिती मिळाली. मीना चव्हाण आणि सुशीला खांडेकर यांच्या मागोमाग आम्हीही दरवाजातून घरात गेलो. समोर एका टेबलावर ताम्हनात एक ते दीड इंच उंचीची चांदीची मूर्ती ठेवलेली होती. चांदीच्या पत्र्यावर छाप उमटवून म्हणजे प्रेस करून अशा मूर्ती केल्या जातात. मूर्तीचे सर्व अवयव उंचवटे रुपाने दिसतात. सोंडेचा उंचवटा शरीरापासून नखभर पुढे होता. भाविक दुधाने काठोकाठ भरलेला चमचा सोंडेच्या जवळ नेऊन टोकाला टेकवत. दूध झरझर ओढले जाई.

पण तोपर्यंत हा साधा केशाकर्षण प्रयोग असल्याचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे निवेदन टीव्हीवरून प्रसिद्ध होऊ लागले. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी सपत्नीक मूर्तीला दूध पाजत होते; तर उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे हे चमत्कार खरे नसतात, असे सांगत होते.

आम्ही चर्चा केली आणि गावात ठिकठिकाणी काही बोर्ड लिहिण्याचा निर्णय घेतला. त्या काळी प्रत्येक गल्लीच्या तोंडाला तरुण मंडळाने बोर्ड केलेले असत. त्यावर जत्रा-यात्रा, वर्गणीचे आवाहन आणि श्रद्धांजलीच्या बातम्या असत. त्यावरच या चमत्काराचे स्पष्टीकरण करणारा तपशील लिहिला.

मूर्ती दूध पिते, हा केशाकर्षणाचा वैज्ञानिक प्रयोग आहे; त्यात चमत्कार काही नाही. अंधश्रद्धावर विश्वास ठेवू नका, अशा दोन ओळी आम्ही दहा फलकांवर लिहिल्या. याप्रसंगी टीव्हीने लोकांना फार झटकन शहाणे केले. कार्यकर्त्यांना त्रास घ्यावा लागला नाही.

या बेचव आयुष्यात काहीतरी चमत्कार व्हावा, असे प्रत्येकाला वाटत असते. त्याचा गैरफायदा काही बुवा घेतात; पण भाविकांची भावना वाईट नाही. त्याची टिंगल न करता त्यांना समजून घेणे आवश्यक आहे. यादृष्टीने छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनातील प्रसंग कार्यकर्त्यांनी अभ्यासावेत. सामान्य माणसांच्या भावनांची कदर कशी करावी आणि त्याला न दुखावता सत्य उघड कसे करावे, हे महाराजांकडूनच शिकावे.