प्रकाशबीजे रुजविणारे डॉक्टर

वल्लभ वणजू - 8275271471

मी दहावीत असताना माझे वडील हार्ट अ‍ॅटॅकने गेले आणि लगेच तीन वर्षांनी माझ्या आईला कॅन्सर झाला. वैद्यकीय उपचार सुरू होतेच; परंतु नातेवाईक, मित्र इत्यादी सद्भावनेने स्वामी, बुवा, मांत्रिकांकडे जाण्याविषयी सुचवत होते, सोबत घेऊन जात होते. माझं वय अवघं सतरा वर्षांचं. आईचा जीव वाचावा, या वेड्या आशेने ती माणसं जे-जे करायला सांगतील, ते-ते मी करत होतो; पण ती गेलीच; किंबहुना तेव्हापासून मनात विचारांची लढाई सुरू झाली.

एकत्र कुटुंब होतं. घरात समाजवादी विचारांचं वातावरण होतं. माझ्या लहानपणापासून बॅ. नाथ पै, एस. एम. जोशी, मधू दंडवते, प्रमिलाताई दंडवते, जॉर्ज फर्नांडिस, मृणालताई गोरे, भाई वैद्य यांच्यासारखी खरीखुरी माणसं घरी आलेली मी स्वत: पाहिली; पण त्यांच्याकडून काय ऐकावं, शिकावं, असं माझं वयही नव्हतं आणि समजही. साधारण 1998-99 च्या दरम्यानची गोष्ट. मी डॉ. दाभोलकरांबद्दल आणि ‘मअंनिस’च्या कामाबद्दल ऐकून होतो. रत्नागिरीतल्या स्थानिक वृत्तपत्रात ‘मअंनिस’च्या कामासंदर्भात एकत्र जमण्याविषयी बातमी छापून आली. मी त्या मीटिंगला हजर राहिलो. हळूहळू कार्यकर्तेवाढू लागले आणि ‘मअंनिस’ची रत्नागिरी शाखा सुरू झाली. शाखेच्या साप्ताहिक मीटिंगला आम्ही डॉक्टरांच्या पुस्तकातील वाचन करायचो, त्यावर चर्चा करायचो. हळूहळू मनातली विचारांची लढाई संपू लागली. मी पक्का विज्ञानवादी आणि नास्तिकही झालो. आई-वडिलांच्या अकाली जाण्याने मनाला आलेल्या भरकटलेपणाला एक ठाम दिशा डॉक्टरांच्या विचारांमुळेच मिळाली.

मी ‘मअंनिस’च्या मीटिंगना जात होतो. तिथे चालणार्‍या विषयांबाबत बोलणे माझी पत्नी – राधाशी होत होते. पण ती तिच्या देवपूजा, उपवास इत्यादी गोष्टींबद्दल ठाम होती. डॉक्टर पहिल्यांदाच आमच्या घरी येणार होते. दुपारची वेळ होती. डॉक्टरांसह आम्ही जेवायला बसलो आणि समोर राधाचा ‘नवटलेला’ देव्हारा पाहून मला अवघडल्यासारखं वाटलं. मी डॉक्टरांना म्हणालो, “राधाला मी यातून अजून बाहेर काढू शकलो नाही.” त्यावर डॉक्टर म्हणाले, “तू तशी जबरदस्तीसुद्धा करू नकोस. आपल्या कितीतरी कार्यकर्त्यांबाबत अशीच परिस्थिती आहे. ‘अंनिस’च्या चळवळीत काम करताना नास्तिक असणं गरजेचं नाही. भविष्यात कधी तिला हा मानसिक आधार सोडावासा वाटला, तर ती तो सोडेल किंवा आयुष्यभर सोडणारदेखील नाही.” परंतु नंतरच्या फार थोड्या कालावधीत राधाही ‘मअंनिस’च्या कामाशी माझ्याइतकीच जोडली गेली, नास्तिकही झाली. डॉक्टरांच्या पुस्तकांचं वाचन, त्यावर होणारा आम्हा दोघांमधील संवाद यानंच ते घडू शकलं.

शाखा सुरू झल्यानंतर लागोपाठच नरेंद्र महाराज प्रकरण, सर्प आव्हान प्रक्रिया इत्यादींसारख्या प्रकरणांच्या निमित्ताने डॉक्टरांना बर्‍याचदा प्रत्यक्षात भेटता आलं. तसं तर डॉक्टरांचा प्रत्येक कार्यकर्त्याशी थेट संपर्क असे. नरेंद्र महाराज प्रकरणात रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये खूप सभा झाल्या. सभेला हजर माणसांमध्ये महाराजांचे भक्त असायचेच. कित्येकदा या भक्तांमध्ये ओळखीची माणसंही असायची. डॉक्टरांशी ‘अरे-तुरे’च्या भाषेत बोलायची, शिव्या द्यायची. मला त्याक्षणी भयंकर राग यायचा. समोरच्या माणसाला जाऊन तुडवावेसे वाटायचे आणि डॉक्टर मात्र त्या माणसांशी बोलताना अत्यंत शांतपणे, “हे बघा साहेब,……” अशी सुरुवात करायचे. रागानं नुकसान होतं, संवाद संपतो. त्यापेक्षा गोष्टी शांतपणे हाताळल्या, तर सर्वांसाठी सोयीचं असतं. त्यामुळे ‘मनं’ मोडत नाहीत, हे मी डॉक्टरांकडूनच शिकलो.

त्याच दरम्यान एकदा सिंधुदुर्गात दिवसभर सभा झाल्या. रात्रीचे आठ वाजले होते. दिवसभराचा थकवा आणि प्रचंड भूक. आम्ही अनिषला म्हटलं, “छानसं हॉटेल बघ. मस्त फिशथाळी जेवायचीय.” पाचव्या मिनिटाला डॉक्टरांनी अनिषला हाक मारली, ‘अरे, बसमध्ये टू बाय टू सीट मिळतेय का बघ. सोबत वडापाव बांधून दे. मी पुण्याला निघालोय, ‘साधना’चा अग्रलेख पूर्ण करायचाय.” आम्ही अवाक्. पुण्याला जाणार्‍या बसमध्ये सर्वांत शेवटच्या सीटवर बसून डॉक्टर पुण्याला गेलेसुद्धा.

असंच एकदा कार्यक्रमाच्या दुसर्‍या दिवसाच्या प्लॅनिंगसाठी भेटायचं होतं. जेवण झालं, रात्रीचे अकरा वाजले हाते. प्रचंड झोप येत होती. आम्ही मुक्ताला पुढं केलं, “बाबा, उद्या सकाळी लवकर बसूया का? सर्वांनाच खूप झोप येतेय.” “मी आजचं काम कधीही उद्यावर सोडत नाही. ज्यांना झोप आलीय, त्यांनी झोपा. बाकीचे चला रे, आपण काम पूर्ण करू.” – इति डॉक्टर. आजही जेव्हा-जेव्हा आळसामुळे आजचं काम उद्यावर सोडायचा मी विचार करतो, तेव्हा हे डॉक्टरांचं वाक्य मी स्वत:लाच ऐकवतो आणि आजचं काम आजच पूर्ण करतो, त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट अनुभवतो.

रत्नागिरीत कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टरांसोबत डॉ. लागू, निळूभाऊ आणि सदाशिव अमरापूरकर यांना भेटता आले. त्यांच्याशी बोलता आलं. डॉक्टरांसोबत वावरताना ‘नेता-कार्यकर्ता’ असा ‘फील’ कधीच आला नाही. त्यामुळेच की काय, त्यांनी सांगावं आणि त्यांचा शब्द कार्यकर्त्यांनी स्वत: मनापासून झेलावा, असं वातावरण होतं. एकदा सातार्‍याला कार्यक्रम होता. डॉ. वसंत गोवारीकरांना त्यांच्याच गाडीतून हॉटेलपर्यंत सोडायचं होतं. त्यांच्या ड्रायव्हरला सातार्‍यातले रस्ते माहीत नव्हते. डॉक्टर मला म्हणाले, “वल्लभ जा रे.” खरं तर मला कुठे सातार्‍यातले रस्ते पाठ होते? मी तसं सांगितलं असतं तर डॉक्टरांनी दुसर्‍या कुणालाही पाठवलं असतं; पण डॉक्टरांनी विश्वासाने सांगितलेली गोष्ट मी करणारच होतो आणि केलीही. कार्यकर्ता जोडण्याचं एक अफलातून कसब त्यांच्याकडे होतं. त्यामुळंच कार्यकर्त्यांचं अख्खं कुटुंब चळवळीशी जोडलं जायचं.

एकदा रत्नागिरी भेटीत डॉक्टर आमच्या घरी पहिल्यांदा राहणार होते. एकीकडे, डॉक्टर आपल्या घरी राहायला येणार, याचा आनंद आणि दुसरीकडे आपलं घर जुनं, लहान-लहान खोल्या, यामुळे अवघडलेपण; पण डॉक्टर आले. आमच्या घरातल्या त्या छोट्याशा खोलीत चटईवर झोपले. सकाळी लवकर उठून योगासन करून, नाश्ता करून बरोबर वेळेत कार्यक्रमासाठी जायला तयार. आम्हाला लांजाजवळच्या ओणी गावापासून आत एका खेड्यात कार्यक्रमासाठी जायचं होतं. येऊन-जाऊन अंतर सव्वाशे किलोमीटर मी अस्वस्थ. तेव्हा माझ्याकडे चारचाकी वाहन नव्हतं. कोणाकडे मागायचा प्रश्न नव्हता. ऊन तर मी म्हणत होतं. माझ्या चेहर्‍यावरची अस्वस्थता डॉक्टरांनी ओळखली, मला म्हणाले, “हे वाहन कोणाचं? चल, यावरूनच जाऊया.” आम्ही माझ्या लहानशा दुचाकीवरून भर उन्हात कार्यक्रमाला जाऊन आलो.

दरवर्षी मी वार्षिकांकाच्या निधी संकलनासाठी बाहेर पडतो. ‘अंनिस’च्या विरोधी विचारांची माणसेही पैसे देतात. म्हणतात, ‘आम्ही देव-धर्म मानणारी माणसं आहोत, अंधश्रद्धांच्या विरोधी काम हे झालंच पाहिजे, असं आम्हाला पण वाटतं. तुमच्या डॉक्टरांचं काम हे शंभर टक्के खरेपणाचं काम आहे. आमचे पैसे सत्कारणीच लागणार, याची खात्री आहे.”

खरंच, पैसा हेच सर्वस्व मानणार्‍या जगात स्वत:चे चांगले चालणारे दवाखाने बंद करून स्वत:सह कुटुंबाच्या सुखवस्तू राहण्याच्या सर्व गोष्टी आणि कुटुंबासोबतचे सहवासाचे अनमोल क्षण ‘अंनिस’च्या सामाजिक चळवळीसाठी द्यायला, समोरच्या गर्दीतून एक गोळी कधीही येऊन आपला वेध घेऊ शकते, याची जाणीव असतानासुद्धा त्या गर्दीला शांतपणे सामोरं जाण्यासाठी किती नि:स्वार्थ आणि निर्भय असावं लागतं, त्याला तोड नाही.

20 ऑगस्ट 2013. सकाळी साडेसात वाजले असतील. आम्ही राहतो त्या आळीतील समोरच्या घरातील माझी ताई खूप जोराने घाबरलेल्या आवाजात ओरडली, “भैय्या, डॉक्टरांना कुणीतरी मारलंय रे.” तिच्या आवाजाने आळीतल्या प्रत्येक घरातली माणसं आमच्या घराच्या दिशेने धावली. आळीत सगळ्यांनाच आमचं आणि डॉक्टरांचं नातं माहीत होतं. मला माझ्या आई-वडिलांचा सहवास खूप कमी लाभला. मला न कळत्या वयात ती दोघंही गेली; पण ज्या वयात मी घडत गेलो, विचार परिपक्व झाले, त्या वयातले माझे पालक डॉक्टरच आहेत.

‘लाख मावळे मारले तरी चालतील; पण लाखांचा पोशिंदा जाता नये.’ त्या भेकडांनी लाखो लोकांच्या मनात प्रकाशबीजे रोवणार्‍या, लाखो मनांच्या पोशिंद्याला अचूक मारलंय. Doctor, We miss you a lot….!


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]