डॉ. जगदीश नाईक -
मी ससून हॉस्पिटलमध्ये मानसोपचार विभागात ज्युनिअर रेसिडेंट म्हणून रुजू होऊन तीन चार दिवसच झाले होते. डॉ. अमोल देशमुख सरांनी मला एक पेशंट पाहावयास सांगितला. प्राजक्ता नावाची ती वीस वर्षांची मुलगी दहा-पंधरा मिनिटे व्यवस्थित बोलत होती. अचानकच ती खूप जोरजोरात फिरायला लागली आणि पुरुषी आवाजात मला बोलू लागली, ” मी पीर बाबा बोलतेय “. मी पार गोंधळून व घाबरून गेलो होतो तेवढ्यात अमोल सर तेथे आले व परिस्थिती सांभाळून घेतली. मी त्यांना विचारायला लागलो हे असे काय झाले ते हसून म्हणाले, “अनुभव घे आणि नंतर सांग तूच मला…”पुढे शिक्षण घेत असताना असे अनेक पेशंट पाहिले .
मी २०१३ ला परभणीमध्ये वैद्यकीय सेवेस सुरुवात केली. ओपीडीमध्ये पेशंट जसा यायचा तशी नजर सहजच त्याच्या गळ्यातील गंडेदोरे, ताईत, कमरेला लटकलेले अनेक रंगांचे धागे यांच्यावर जायची. पेशंट बद्दल माहिती घेण्यासाठी जसा नातेवाईकांची संवाद साधला सुरवात करायचो तसे ते सांगायचे, “डॉक्टर आमच्या पेशंटला कोणीतरी करणी भानामती केली आहे त्यामुळेच तो बडबड करतोय, वेड्यासारखा वागतोय, कोणीतरी मारेल अशा भीतीत राहतोय, त्याच्या कानात कसले तरी आवाज येत आहेत असं सांगत आहे. त्यासाठी मागील तीन-चार महिन्यांपासून आम्ही अनेक बाबा बुवांना दाखवले परंतु बडबड वाढतच आहे.” अश्या अनेक पेशंटचा रोजचाच अनुभव.. कोणी करणी उतरण्यासाठी महाराजांच्या, सैलानी गडाच्या अनेक वार्या करत आहे तर कोणास अनेक अघोरी प्रथेस सामोरे जावे लागते. सुरुवातीस असे वाटे हे असे प्रकार फक्त खेडोपाडी चालत असावे परंतु शहरातील उच्चशिक्षित घरातील पेशंटलाही बाबा बुवांकडे दाखवल्या जात असे. विशेष करून मराठवाड्यामध्ये अनेक प्रकारचे करणी, भानामती, अंगात येणे ई मानसिक आजाराचे रुग्ण पाहावयास मिळतात. परंतु अंधश्रद्धेमुळे बहुतांश अशा व्यक्तीस योग्य तो मानसिक उपचार मिळत नाही.
थोडे खोलात जाऊन विचार केल्यास या करणी, भानामती, अंगात येणे यामागील मानसिकता काय असते ती कळू लागते, ती अशी..
१) अंगात येणे : आपल्याकडे अनेक वेळा स्त्रियांच्या, काही पुरुषांच्या अंगात देवी दैवतांचा संचार होतो व त्या वेगळ्या भाषेत, आवाजात बोलायला लागतात. बर्याचवेळा आपण पाहतो अनेक धार्मिक स्थळी काही देवऋषी, महाराज, फकीरबाबा इत्यादींच्या अंगामध्ये दैवी संचार होतो व तो इतरांच्या दुःखाचे निवारण करतात. यालाच कडाडून टीका करताना तुकोबाराय म्हणतात “देव्हारा बैसोनी हालविती सुपे! ऐसी पापी पापे लिंपताती!!” म्हणजेच अज्ञानी, गोरगरिबांना हे भोंदूबाबा त्यांच्या अज्ञानाचा, भीतीचा फायदा घेऊन फसवतात. असे भोंदू बहुतेक वेळा मानसिकतेने खचलेल्या, उदासिनतेने, स्क्विझोफ्रेनियाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींचे व त्यांच्या नातेवाईकांच्या आर्थिक व मानसिक शोषण करतात. एके ठिकाणी तुकोबाराय म्हणतात “अंगी दैवत संचरे ! मग तेने काय उरे !!” म्हणजेच अंगात कोणतेही दैवत संचार होऊच शकत नाही असे ठामपणे तुकाराम महाराज म्हणतात.
दुसरा अंगात येण्याचा प्रकार म्हणजे स्त्रियांच्या अंगात येणे. अश्या स्त्रिया अचानकपणे कुणीतरी अंगात आले आहे असे बोलायला लागतात . ज्यास वैज्ञानिक दृष्टिकोनातून हिस्टेरिया असे म्हणतात. काही स्त्रियांना मनातील ताणतणाव व्यक्त करता न आल्यामुळे त्या आपल्या सुप्त अवस्थेतील भावना दातखिळी बसणे, अंगात येणे अशाप्रकारच्या मनोकायिक मानसिक आजारातून व्यक्त करतात.
२) भानामती : या प्रकारामध्ये अचानक कपडे पेट घेणे, घरातील वस्तू आपोआप हालणे, घरावर दगड धोंडे पडणे, घरात लिंबू, चिंदी, भावल्या पडणे, अंगावर फुल्या किंवा भावल्या उमटणे असे भानामती ज्यास काहीजण चेटूक, करणी, काळी जादू ,भुताटकी असेही म्हणतात. असे प्रकारही मराठवाड्यात अनेक ठिकाणी पहावयास मिळतात. अश्या घटना एखाद्या गावात घडायला लागल्या की एक भीतीचे वातावरण निर्माण होते त्यामागील मूळ कारण म्हणजे अज्ञान.
आपण म्हणतो आपण प्रगत होत आहोत परंतु आजुबाजूस पाहिल्यास कळते की अनेक लोकांचे मानसिक , आर्थिक व शारिरीक शोषण हे बाबा बुवां , फकीर करत असतात. यासाठीच म्हणून आम्ही परभणी शहरामध्ये करणी भानामती , अंगात येणे ई मानसिक आजार उपचार व संशोधन केंद्र ची सुरवात दि १६ डिसेंबर २०२२ रोजी डॉ . हमीद दाभोलकर यांच्या उपस्थितीत केली. या केंद्राचे मूळ उद्दिष्ट म्हणजे ..
१) मानसिक आजार उपचार व समुपदेशन : मुळात करणी भानामती, अंगात येणे ही सर्व मानसिक आजाराची लक्षणे आहेत. अश्या रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळाल्यास हे रुग्ण पूर्णपणे बरे होतात. असे आजार होण्याचे मूळ कारण म्हणजे ताणतणाव, मेंदूतील रासायनिक बदल होय. योग्य तो औषधोपचार आणि समुपदेशनाने हे लक्षणे दूर करत येतात. हा या केंद्रामागील प्रमुख उद्देश जेणेकरून रुग्णांची व नातेवाईकांची फसवणूक बंद करू शकू.
२) वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणे : जगाचे वस्तुनिष्ठ , निश्चितज्ञान मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन. प्रत्येक गोष्टीची चिकित्सा केल्यास कळते की त्यामागे काहीतरी विज्ञान आहे. भोंदूबाबा ज्यावेळी कुंकू काळे व हळद लाल करून दाखवतात त्यामागे आम्ल व अल्कलीची प्रक्रिया आली, नारळाची शेंडी जाळतात त्यावेळी सोडियमचा पाण्याशी संपर्क आला, लिंबातून रक्त काढतात त्यावेळी रासायनिक प्रक्रिया आली. हे सर्व विज्ञानाचे प्रयोग. अमावस्या ,पौर्णिमा ,ग्रहण ही सर्व खगोलीय घटना ज्या सूर्य, चंद्र व पृथ्वी यांच्या परिवलन व परिभ्रमण गतीमुळे होतात.अंगात येणे ,करणीचा भास, भ्रम होण हे सर्व मानसिक आजार जसे सिझोफ्रेनिया, फिट्स, बायपोलर डीसऑर्डर इ. हे समजून घेण्यासाठी हवी ती वैज्ञानिक दृष्टी व हाच वैज्ञानिक दृष्टीकोन समाजामध्ये रुजवणे हे एक या केंद्राचे उद्दिष्ट आहे .
३) कर्मकांडविरोधी समाज चळवळ : आपल्याला आपल्या पुढच्या पिढीस कर्मकांडापासून दूर ठेवायचे व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवायचा असेल तर प्रत्येकाने याविरुद्ध पाऊल उचलणे गरजेचे आहे. त्यासाठी सुरुवात हवी स्व: पासून.. प्रत्येक समाजघटक जसे शिक्षक, डॉक्टर , ऑफिसर, सामाजिक संघटना, समाज प्रबोधन करणारे – समाज प्रबोधक, किर्तनकार इत्यादींनी याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे.
अशीच काही उद्दिष्टे ठेऊन परभणी येथे डॉ. हमीद दाभोलकर, डॉ. रवींद्र मानवतकर, नंदिनी जाधव यांच्या उपस्थितीत मन हॉस्पिटल या ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग चालू केला आहे. या केंद्राचे काम डॉ. जगदीश नाईक मनोविकारतज्ञ , डॉ. नवनाथ सिंगापूरे, श्री माणिक लिंगायत समुपदेशक, श्री मुंजाजी कांबळे पाहणार आहेत. त्यांनी परभणी शहरात कोठेही करणी भानामती असा प्रकार आढळल्यास मदतीसाठी ९४२२१०९२०० या नंबर वर कॉल करण्याचे आव्हान केले आहे.
चला तर करणी भानामतीस दूर करूया, विवेकाचा आवाज बुलंद करूया..
– डॉ. जगदीश नाईक, मानसोपचार तज्ज्ञ, परभणी
संपर्क : ९४२२१०९२००