प्रा. दिनेश पाटील -
९९ वर्षापूर्वी महाराज सयाजीराव यांनी प्रकाशित केलेले पुस्तक
–प्रा. दिनेश पाटील
भारत सरकारच्या केंद्रीय संस्थेच्या ‘घड्याळाचे काटे’उलटे फिरवण्याच्या या उत्क्रांती विरोधी निर्णयाचे दूरगामी ‘नकारात्मक’ परिणाम होणार आहेत. या पार्श्वभूमीवर बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी ९९ वर्षांपूर्वी १९२४ मध्ये प्रकाशित केलेल्या उत्क्रांतीवादावरील मराठी भाषेतील पहिल्या ग्रंथाचे मोल प्रकर्षाने जाणवते. सयाजीरावांनी हा ग्रंथ योगायोगाने प्रकाशित केला नव्हता तर अव्वल दर्जाचा विवेकवादी समाज निर्माण करण्याच्या ५८ वर्षांच्या त्यांच्या समग्र कार्याचा तो एक छोटासा आविष्कार होता. आपला देश ज्ञान–विज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक दर्जाचा व्हावा या ध्यासातून धर्म, जात, विज्ञान, शेती, उद्योग, साहित्य, संस्कृती, प्राच्यविद्या, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात आज अखेरच्या भारताच्या आधुनिक इतिहासातील सर्वोत्तम काम त्यांनी निर्माण केले.
‘नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’ (एनसीईआरटी) ने इ. ९ वी आणि १० वी च्या एनसीईआरटीच्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातून डार्विनचा जैविक उत्क्रांतीचा सिद्धांत काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी ‘ब्रेकथ्रू सायन्स सोसायटी’ने २० एप्रिल २०२३ रोजी ‘An Appeal Against Exclusion of Evolution from Curriculum’ अशा शीर्षकाचे पत्र प्रसिद्ध केले. भारतातील १,८०० हून अधिक शास्त्रज्ञ, शिक्षक आणि विज्ञानप्रेमींनी या पत्रावर स्वाक्षरी करून एनसीईआरटीच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यासारख्या उल्लेखनीय वैज्ञानिक संस्थांचा समावेश आहे. कोरोना महामारीच्या काळात अभ्यासक्रम कमी करण्यासाठी अंतरिम उपाय म्हणून ‘जैविक उत्क्रांतीचा सिद्धांत’ तात्पुरता वगळण्यात आला होता. परंतु एनसीईआरटीने प्रसिद्ध केलेल्या १० वी च्या सुधारित अभ्यासक्रमात हा सिद्धांत कायमस्वरूपी वगळल्याचे आढळते.
१८७५ मध्ये वयाच्या बाराव्या वर्षी साधे अक्षर ओळख नसणारा नाशिक जिल्ह्यातील कवळाणा गावातील साध्या शेतकर्याचा गोपाळ नावाचा मुलगा बडोद्याचा राजा म्हणून योगायोगाने दत्तक गेला. १८७५ ते १८८१ अशी फक्त सहा वर्षे शिक्षण घेऊन १८८१ मध्ये वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी राज्यकारभार हाती घेतो. पुढच्याच वर्षी म्हणजे १८८२ ला आपल्या आदिवासी व अस्पृश्य प्रजेच्या सक्तीच्या व मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा करतो. पुढे टप्प्याटप्प्याने १९०६ मध्ये संपूर्ण संस्थानात सक्तीच्या व मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा लागू करतो. असा कायदा करणारे बडोदा हे भारतातील ब्रिटीश प्रांत आणि ५६५ संस्थानिकांमधील पहिले संस्थान ठरते. आज हे सर्व अविश्वसनीय वाटते. प्रजेला साक्षर केल्यानंतर तिला ज्ञानी करण्यासाठी हा राजा १९१० मध्ये संपूर्ण भारतातील क्रांतिकारक अशी ग्रंथालय चळवळ सुरू करून आपल्या प्रत्येक प्रजाजनापर्यंत ग्रंथ पोहोचवतो. गुजराती व मराठी भाषेत शास्त्रीय पद्धतीने लिहिलेले सर्व विषयांवरील हजारो ग्रंथ प्रकाशित करतो. या सर्व प्रयत्नातून भारताला विवेकवादी करण्याच्या महाअभियानाची जणू मुहूर्तमेढच रोवतो. आज भारत सरकारने घेतलेल्या एका अत्यंत चुकीच्या निर्णयाच्या निमित्ताने व उत्क्रांतीवादावरील ९९ वर्षांपूर्वी त्यांनी प्रकाशित केलेल्या ग्रंथाचे स्मरण करत असताना त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन, अस्पृश्यता निर्मूलन, धर्म साक्षरता, शेती, आरोग्य, उद्योग अशा सर्व क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रगती व्हावी म्हणून निर्माण केलेले ग्रंथ, राबवलेले उपक्रम आणि स्वीकारलेले धोरण यांची उजळणी दीपस्तंभासारखी प्रेरक आणि मार्गदर्शक ठरते.
बडोद्याचे राजे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी १९२४ मध्ये त्यांच्या सयाजी साहित्यामालेत ‘सजीवसृष्टीची उत्क्रांती’ हा अहमदाबाद कॉलेजमधील प्रा. सदाशिव नारायण दातार यांनी लिहिलेला २४७ पानांचा ग्रंथ प्रकाशित केला होता. या ग्रंथात डार्विनच्या उत्क्रांतीवादी सिद्धांताच्या विकासाचा अतिशय उत्कृष्ट आढावा घेतला आहे. मराठी भाषेतील आणि बहुदा कोणत्याही भारतीय भाषेतील उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतावरील हा पहिला ग्रंथ होता. या एकाच उदाहरणातून सयाजीरावांच्या विवेकवादी भूमिकेची क्रांतीदृष्टी लक्षात येते. या ग्रंथाच्या उपद्घोषात ग्रंथकाराने व्यक्त केलेल्या भूमिकेतून ग्रंथ निर्मितीची प्रेरणा अधोरेखित होते. लेखक म्हणतो, ‘उत्क्रांती अथवा विकासवाद या विषयावर आंग्लभाषेमध्ये इतकी ग्रंथसमृद्धी आहे की, आपल्या मराठी भाषेमध्ये केवळ या विषयावर लिहिलेले असे एकही पुस्तक असू नये याचे आश्चर्य वाटते. पाश्चात्य देशांमध्ये उत्क्रांती हा विषय इतका महत्वाचा समजला जातो की, त्याचा समावेश तिकडे दुय्यम शाळांतील अभ्यासक्रमात करतात व या शाळेतील शिक्षण पुरे झालेल्या मुलांना या विषयाची थोडीबहुत माहिती असते. आपल्याकडे, शाळांची गोष्ट तर सोडूनच दिली पण कॉलेजमधील उच्च शिक्षण घेतलेल्या पदवीधरांना सुद्धा या विषयाची कितपत माहिती असते याचा संशयच आहे. फार काय, पण प्राणिशास्त्र घेऊन पास झालेल्या पदवीधरांना सुद्धा याबद्दलची माहिती बेताचीच असते. ही माहिती सामान्य वाचकवर्गाला सुलभ रीतीने व्हावी हाच प्रस्तुत पुस्तक लिहिण्याचा मुख्य उद्देश आहे.’
तर सदर ग्रंथाच्या अल्पाक्षरी प्रस्तावनेत दातारांनी उत्क्रांतीवादाच्या ऐतिहासिक सिद्धांताचे महत्व पुढीलप्रमाणे विषद केले आहे. ‘एकोणिसाव्या शतकात उत्क्रांतीवादाची स्थापना डार्विन यांनी केली. या कल्पनेचा परिणाम सर्व शास्त्रांवर झाला. उत्क्रांतीवादामुळे युरोपात एक प्रकारची क्रांतीच घडून आली. उत्क्रांतीवादाच्या लाटेने धर्मशास्त्र, नीतीशास्त्र, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास, भाषाशास्त्र ह्या सर्वांवर आपला ठसा उमटविला. आधुनिक समाजशास्त्र उत्क्रांतीवादाच्या पायावरच उभारले गेले. उत्क्रांतीवादाने मानवजातीच्या स्वतःसंबंधी असलेल्या कल्पना बदलवून टाकल्या. माणसाला पूर्वी वाटत असे की ह्या सृष्टीचा तो राजा आहे. पण, सृष्टीतील इतर प्राण्यांपैकीच मानव हा एक प्राणी आहे. हे त्याला उत्क्रांतीवादाने शिकवले. ‘निसर्गनियम, माणसाला व इतर प्राण्यांना सारखेच आहेत’ हे उत्क्रांतीवादाने सिद्ध केले. ‘आपण सर्व प्राण्यात ‘श्रेष्ठ’असा मानवाला अहंकार झाला होता. त्याचा हा अहंकार उत्क्रांतीवादाने समूळ नाहीसा केला. त्याची दृष्टी शुद्ध झाली आणि सर्व सृष्टी त्याला यथार्थ स्वरूपात दिसू लागली. त्याचा ‘सत्याच्या शोधाचा’मार्ग खुला झाला.’ आज ९९ वर्षांनंतरही मराठी भाषेत या विषयावर एवढा दर्जेदार ग्रंथ अपवादानेच सापडेल.
१८८८ ला सयाजीराव महाराज यांनी शास्त्रीय विषयांवरील ग्रंथ निर्मितीसाठी ५० हजार रुपये निधी मंजूर केला. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम १६० कोटीहून अधिक भरते. या निधीतून कलाभवनचे पहिले संचालक प्रो. टी. के. गज्जर यांच्या नेतृत्वाखाली ‘सयाजी ज्ञानमंजुषा’ या ग्रंथमालेचा आरंभ झाला. या मालेत १८९७ मध्ये प्रकाशित झालेले ‘कृषीकर्मविद्या’ हे ७४० पानाचे शास्त्रीय शेती संदर्भात मार्गदर्शन करणारे मराठीतील पहिले विस्तृत पुस्तक होय. १९०९ च्या बडोदा येथील मराठी साहित्य संमेलनावेळी साहित्य प्रकाशनाकरिता सयाजीरावांनी दिलेल्या २ लाख रु. च्या स्वतंत्र निधीच्या व्याजातून बडोद्याच्या विद्याखात्यातर्फे ‘श्रीसयाजी साहित्यमाला’ आणि ‘सयाजी बालज्ञानमाला’ या ग्रंथमाला चालवल्या जात होत्या. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही २ लाख रुपयाची रक्कम ६४० कोटीहून अधिक भरते. या‘श्रीसयाजी साहित्यमालेतील एक लक्षणीय पुस्तक म्हणजे ‘जीवरसायनशास्त्राच्या मूलतत्वाचे संपूर्ण वर्णन’हा ग्रंथ होय. हा ग्रंथ १९११ मध्ये म्हणजेच आजपासून ११२ वर्षापूर्वी प्रकाशित झाला होता. ‘बायोकेमिस्ट्री’ हा विषय गेल्या १०-१५ वर्षात आपल्या महाविद्यालयांमध्ये प्रविष्ठ झाला यावरून महाराजांची दूरदृष्टी स्पष्ट होते.
सयाजीरावांनी प्रकाशित केलेले सर्व ग्रंथ विचारात घेतले असता आपला समाज वैज्ञानिक ज्ञानाच्या अधिष्ठानावर पुनर्प्रस्थापित करण्याचा भारतातील अपूर्व महाप्रयोग होता. आधुनिक जगाच्या इतिहासात असे काम करणारा राज्यकर्ता अपवादात्मक म्हणावा लागेल.
सयाजीरावांनी प्रकाशित केलेले सर्व ग्रंथ विवेकी विचारधारेचे होते. त्यातील शुद्ध वैज्ञानिक विषयांवरील ग्रंथांची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे : हिंदुस्थानातील सर्प (१८९३), गृहशास्त्र (१८९४), बटन (१८९६), न्यायशास्त्र भाग-१ (१८९६), गुन्हा व त्याची कारणे (१८९७), कृषीकर्मविद्या (१८९७), व्यापारी भूगोल (१८९७), अर्थशास्त्र (१८९७), साबू(१८९८), आहारमीमांसा (१८९८), आरोग्यशास्त्र (१८९९), सृष्टीशास्त्र भाग-१ व २, रोग्यांची शुश्रुषा (१९०१), न्यायशास्त्र भाग-२ (१९०२), वैद्यराज अथवा रोगनिवारण (१९०३), हत्तीच्या प्रजननासंबंधी माहितीचा रिपोर्ट (१९०७), हस्तीविज्ञान (१९१०), जीवरसायनशास्त्राच्या मूलतत्वांचे संपूर्ण वर्णन (१९११), मराठा समाजातील काही घातुक चाली (१९११), भूपृष्ठ विचार (१९१७), देहधर्मविद्या (१९१८), बालोद्यान पद्धतीचे गृहशिक्षण (१९१८), विज्ञान प्रवेशिका (१९१८), वनस्पतीशास्त्र: वनस्पतींचा आधुनिक अभ्यास (१९१८), प्राणीशास्त्र (१९१८), मानववंशशास्त्र (१९१८), कोळी (१९१९), तुलनात्मक धर्मविचार (१९१९), धर्माची मूलतत्वे (१९१९), जीवविद्या (१९२०), तुलनात्मक भाषाशास्त्र (१९२०), मिथकशास्त्र (१९२०), समाजशास्त्र प्रवेशिका (१९२०), शरीररचनाशास्त्र (१९२१), प्राणीसृष्टी (१९२१), रसायन प्रवेशिका (१९२१), सुप्रजननशास्त्र (१९२३), रचनात्मक भूमिती (१९२३), शरीरशास्त्र व आरोग्यशास्त्र (१९२४), सजीव सृष्टीची उत्क्रांती (१९२४), यामिक प्रदीप (१९२४), मानसशास्त्राची मूलतत्वे (१९२५), स्पर्शास्पर्श अथवा चारही वर्णांचा परस्पर व्यवहार (१९२५), समुद्र शक्ती (१९२८), मुंबई ईलाख्यातील जाती (१९२८), मुक्या मुलांचे गृहशिक्षण (१९२८), गर्भविद्या (१९२८), मधुमक्षिका (१९२८), भूरचना (१९२९), मातीचा इतिहास (१९२९), रोग आणि आरोग्य (१९२९), सामाजिक उत्क्रांती (१९२९), ताराशास्त्र (१९२९), वैद्यकीय कायदाशास्त्र (१९२९), बालक प्रकृती व संवर्धन (१९३१), विषशास्त्र (१९३२), सुलभ नीतीशास्त्र (१९३३), विद्युत (१९३३), मज्जातंतूचे बळ (१९३४), जगातील विद्यमान धर्म (१९३४), जगातील काही धर्मप्रवर्तक (१९३६), आधुनिक विज्ञानाचे निर्माते (१९३७), धर्म, उगम आणि विकास (१९३७), भाषाविज्ञान प्रवेशिका (१९३९), जीवन आणि विज्ञान (१९३९), मुद्रणकला (१९४७), भारतीय समाजशास्त्र (१९५१), आहारविज्ञान (१९५४), आपले विश्व (१९६०).
महाराजा सयाजीराव यांनी त्यांच्या सयाजी साहित्य मालेत १९२४ मध्ये सदाशिव नारायण दातार लिखित ‘सजीव सृष्टीची उत्क्रांती’हा ग्रंथ प्रकाशित केला. यापाठीमागे सजीव सृष्टीच्या उत्क्रांतीच्या डार्विनच्या क्रांतिकारक सिद्धांताचा आपल्या प्रजेला परिचय व्हावा हा विवेकी उद्देश होता. परंतु हा ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर ९९ वर्षांनी भारतीय शिक्षणातून या मुलभूत सिद्धांताला हद्दपार करण्याची भूमिका आपले केंद्र सरकार घेत आहे. या पार्श्वभूमीवर १०० वर्षापूर्वी सयाजीरावांनी गुजराती, मराठी आणि हिंदी या देशी भाषांमध्ये प्रकाशित केलेले हजारो ग्रंथ म्हणजे भारतीय समाजाला विवेकी करण्यासाठीचा पहिला प्रयत्न होता. म्हणूनच त्यांना ‘विवेक अग्रणी’ राज्यकर्ते म्हणणे योग्य ठरेल. आज पुन्हा एकदा विवेकाच्या या सयाजी सृष्टीशी आपला परिचय व्हावा आणि त्यातून पुन्हा एकदा विवेकवादी चळवळींना ‘बळ’ आणि ‘दिशा’ मिळावी हाच या लेखामागील प्रांजळ हेतू.
लेखक संपर्क : ९६२३८ ५८१०४