देवळात जाऊन चमत्काराचा फोलपणा सांगितला

नवनाथ लोंढे - 9970803510

21सप्टेंबर 1995 : मु. पो. राजगुरुनगर

21 सप्टेंबर म्हटले की, मला ‘गणपती दूध पिल्याच्या’ आंतरराष्ट्रीय अफवेची आठवण होते. तेव्हा मोबाईल नसताना फक्त दूरध्वनीवरून दूरदूरच्या नातेवाईकांना, मित्रांना सांगत-सांगत आंतरराष्ट्रीय स्तरावर अफवा पोचली आणि भारतात वैज्ञानिक शोध लागला नसला तरी विज्ञानयुगात एक अंधश्रद्धा जन्माला येऊन ‘अंनिस’ कार्यकर्त्यांना ‘गणपती दूध पितो’ हा एक नवीन प्रयोग करायला मिळाला. त्याला आज बघता-बघता 25 वर्षेपूर्ण झाली, ही अंधश्रद्धा नसून, वास्तव आहे.

21 सप्टेंबर 1995 रोजी दुपारी 2 वाजता राजगुरू नगरमधील ऑफिसमध्ये काम करीत असताना एक युवक आला आणि विचारले, ‘तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करता का?’ मी त्याला होकार दिला.

‘चास गावांत गणपती दूध पिण्याचा चमत्कार झालाय, तुम्हाला बघायला बोलवलंय,’ तो युवक म्हणाला.

‘गणपती दूध पिण्याचा चमत्कार’ हे वाक्य ऐकताच माझ्या मन:चक्षुपुढे चित्र तरळून गेलं – अनेकदा दुधाची मागणी करूनसुद्धा कोणीच दूध न दिल्याने नाराज होऊन, फोटोतील गणपती फोटोतून बाहेर येऊन किंवा मूर्ती ठेवलेल्या जागेवरून उठून दुधाचं पातेलं शोधून, ते पातेलं तोंडाला लावून घटाघटा दूध प्याली, असं चित्र दिसलं; पण प्रत्यक्षात असं घडणं अशक्य असल्याने मी त्याला विचारले,

‘गणपती दूध पिण्याचा चमत्कार कोठे व कसा घडला? ते कोणी पाहिले?’

‘ते मला माहीत नाही; पण गावच्या लोकांनी तुम्हाला बोलावले आहे’ – युवक.

‘ऑफीस संपल्यानंतर येतो,’ म्हणालो व कामात गुंतलो.

परत सायंकाळी 5 वाजता डॉ. सुधीर भालेराव, स्वत:ची पॅथॉलॉजीची प्रयोगशाळा चालविणारा मित्र आला आणि म्हणाला,

‘नवनाथ, गणपती दूध पितोय, हे पाहायला तुला मंदिरात बोलवलंय.’

आम्ही दोघे मंदिरात गेलो, तर तेथे 45-50 स्त्री-पुरुष, लहान मुलांची गर्दी दिसली. प्रत्येकाच्या हातात दुधाच्या वाट्या, ग्लास होते. माझ्या मित्राने दुधाची वाटी घेऊन गणपतीच्या सोंडेचं तोंड सोडून, पोटाजवळ सोंड वक्र झालेल्या ठिकाणी दुधाची वाटी लावली. त्याच्या खाली मी माझ्या हाताची चार बोटं उलटी गणपतीच्या पोटावर ठेवली. वाटीतील दूध मित्र पाजू लागला. वाटीतील दूध कमी होऊ लागलं. तसा गणपती मित्राच्या हाताने दूध पितोय म्हणून मित्र हसू लागला, मीपण हसलो.

‘नवनाथ का हसतोस?’- मित्र.

‘तू का हसतोस?’- मी.

‘गणपतीने दूध माझ्या हाताने पिले म्हणून मी हसतोय.’ – मित्र.

‘गणपती दूध बिलकूल पित नाही म्हणून मी हसतोय.’ – मीय

‘बघ, वाटीतलं दूध संपलं, गणपती दूध पिला.’ – मित्र.

‘गणपती दूध पिला नाही, ते त्याच्या पोटावरून खाली ओघळून माझी बोटं भिजून हे बघ खाली सांडलंय,’ मी गर्दीला उद्देशून व दाखवून मोठ्यानं म्हणालो. गर्दी शांतपणे ऐकत होती. ‘खरंच गणपती दूध पिला नाही?’ गर्दीतील एक आवाज.

‘गणपती दूध पिला नाही आणि पिऊ शकणार नाही. त्याचं कारण मूर्ती, फोटो हे निर्जीव असतात. आपण माणसं तोंडात पाणी घेतो; पण ते पिले, असे म्हणता येत नाही. कारण तोंडातील पाणी आपण मुकळीच्या सहाय्याने बाहेर टाकू शकतो. पिण्याची प्रक्रिया होण्यासाठी घशातील स्नायूचं आकुंचन व प्रसरण होतं, त्याला ‘गिळणे’ म्हणतात. ही गिळण्याची प्रक्रिया फक्त सजीवच करू शकतात, म्हणून गणपती दूध पिला, असे म्हणता येत नाही.’ पिण्याचं मी स्पष्टीकरण केलं. एव्हाना मंदिरातील गर्दी वाढली होती, चर्चेला उधाण आलं होतं.

‘पुण्यातील सर्व गणपती मंदिरांत दूध पाजण्यासाठी रांगाच्या रांगा लागल्या आहेत.’ – पुण्याहून आलेला एक युवक.

‘सर्व देशभर व देशाबाहेरसुद्धा गणपती दूध पिल्याच्या बातम्या टी. व्ही.वर दाखवित आहेत.’ – दुसरा आवाज.

‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी व त्यांच्या पत्नीनं गणपतीला दूध पाजलं, अशीही बातमी टी. व्ही.वर पाहिली.’ – तिसरा आवाज.

‘उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे म्हणतात, ‘गणपती दूध पितो,’ ही अफवा आहे.’ – चौथा आवाज.

पण एका लोकप्रतिनिधीचे कुटुंब गणपती दूध पितो, या चमत्काराचं कृतीने समर्थन करतात; तर दुसरे लोकप्रतिनिधी ही अफवा ठरवून गणपतीला दूध पाजण्याला विरोध करतात. तमाम जनता मात्र कामधंदे सोडून, महागडे दूध घेऊन, गणपतीला दूध पाजण्यासाठी रांगेत उभे राहते.

त्या दिवशी संध्याकाळी सगळीकडे एकच चर्चा – ‘गणपती माझ्या हातानं दूध पिला!’, ‘माझ्या हातानं दूध नाही पिला राव!’

रात्री घरी जाताना एका मित्राने आग्रहानं त्याच्या घरी नेले. गणपती दूध पिल्याचं तोंड फाटेपर्यंत कौतुक करीत असतानाच त्याने वहिनीला आवाज दिला, ‘अगं ऐकलं का? वाटीभर दूध आणि गणपतीचा फोटो आण. आपण गणपतीला दूध पाजू.’

मित्र गणपतीचा फोटो आणि दुधाचं पातेलं घेऊन माझ्या शेजारी पलंगावर बसून दूध पाजू लागला. जेवढं दूध फोटोवर ओतलं ते सर्व गादीवर सांडलं. नवरा-बायकोची जोरदार चकमक झाली. मला वहिनीचं कौतुक वाटलं. मित्राची व त्याच्या उच्च शिक्षणाची कीव आली. त्यांना दूध पिण्याची क्रिया समजावून सांगितली.

समाज भोळाभाबडा व अंधश्रद्धाळू आहे. त्याला अज्ञानात ठेवूनच त्याचा गैरफायदा समाजव्यवस्था व शासनसंस्था उठविते. विज्ञानयुगात, विज्ञानाच्या प्रखर प्रकाशात चमत्काराची दुकानं राजरोसपणे चालतात, याचं आश्चर्य वाटून मला बिरबल व अकबर बादशहाची एक गोष्ट आठवली. ती अशी – एकदा बादशहाने बिरबलला प्रश्न विचारला, ‘आपल्या राज्यात डोळस आणि आंधळी लोकं किती?’ बिरबलाने त्याचे उत्तर दिले की, ‘एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी लोकं डोळस असून, बाकी सर्व आंधळी आहेत.’ हे कृतीने सिद्ध करून दाखविताना बिरबलाने एकदा दरबाराच्या वेळी भरचौकात बाज (कॉट) विणण्याचा प्रयोग केला. तेव्हा बिरबलला बहुसंख्य लोकांनी प्रश्न विचारले, ‘काय बिरबल, काय करताय तुम्ही?’ बिरबल काय करताहेत हे दिसत असूनसुद्धा ‘काय करताय तुम्ही?’ असे विचारणार्‍या बहुसंख्येने लोकांच्या नोंदी ‘आंधळ्या’ रकान्यात केल्या. मोजक्या लोकांनीच बिरबलला नेमका प्रश्न विचारला की, ‘आज दरबारात न जाता, भरचौकात बाज विणायचं काम का करताय?’ या लोकांच्या नोंदी ‘डोळस’ रकान्यात केल्या. या गोष्टीची तंतोतंत प्रचिती आज आली. संपूर्ण देशभर ही अंधश्रद्धा वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून पसरली, त्याचा क्लेष मनाला झाला. रात्री झोप नाही आली. मग हा चमत्कार व बिरबलच्या ‘डोळस’, ‘आंधळा’ गोष्ट याच्यावर लेख लिहिला. दुसर्‍या दिवशी सकाळीच दै. ‘सकाळ’चे पत्रकार, राजगुरूनगर शाखेचे माजी अध्यक्ष एकनाथ सांडभोर घरी आले. त्यांनी ‘अंनिस’ची भूमिका विचारली. मी भूमिका सांगून रात्री लिहिलेला लेख दिला. सांडभोर पत्रकारांनी ‘गणपती दूध पित नाही,’ असे भेटेल त्याला व जिथं चर्चा चालू होते, तेथे जाऊन ठामपणे अनेकांना सांगितले.

खरं तर या विज्ञानयुगात वैज्ञानिक दृष्टिकोन हा प्रत्येक नागरिकाचा स्थायीभाव झाला पाहिजे. कारण दैनंदिन जीवन जगताना, विचार करताना, निर्णय घेताना, व्यवहार करताना वैज्ञानिक दृष्टिकोनाची मदत घेतली, तर आपले विचार, निर्णय व व्यवहार आपल्या मनासारखे होतील; आपण त्यात नक्कीच यशस्वी होऊ. मानवी जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोनाचं असं अनन्यसाधारण महत्त्व आहे. असा अत्यावश्यक वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आणि प्रचार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अव्याहतपणे तन-मन-धनाने करीत आहे. त्याला नागरिकांचा उदंड व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पाहिजे; पण अनावश्यक, निरुपयोगी, खर्चिक, वेळखाऊ अंधश्रद्धेला लाखोंनी लोक एकाच वेळी बळी पडतात, याचे वाईट वाटते. 21 सप्टेंबर 1995 रोजी तमाम नागरिकांनी गणपतीला आनंदानं, श्रद्धेनं दूध पाजलं. कालांतराने ते दूध पिणे नसून ‘पृष्ठीय ताणामुळे’ तसे घडतेय, असं वैज्ञानिकांनी स्पष्टीकरण दिलं आणि गणपती दूध पितो, ही आज अफवाच ठरते.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ]