ह.भ.प. देवदत्त परुळेकर -
ख्यातनाम समाजशास्त्रज्ञ इरावती कर्वे यांनी असं म्हटलंय,”वारीला येणार्या लोकांचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र.” महाराष्ट्रातील समाजाचे एकत्र दर्शन घ्यायचे असेल तर वारीसारखे साधन नाही. साने गुरुजींनी पंढरीला ‘महाराष्ट्राचे हृदय’ म्हटले आहे. महाराष्ट्राच्या समाजसंस्कृतीत पंढरीच्या वारीचे असे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
प्रतिवर्षी आषाढ महिन्यात लाखो लोक पंढरीची पायी वारी करतात. विविध पातळ्यांवरील अनेक लोक पंढरीच्या वारीचे अवलोकन करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी वारीत सहभागी होत असतात. उदाहरणार्थ – अगदी परदेशातील विद्यापीठातील काही विद्यार्थीही पंढरीच्या वारीची मॅनेजमेंट कशी चालते, याचा अभ्यास करण्यासाठी वारीत सहभागी होतात. इरावतीबाईंना आलेला अनुभव व्यक्त करताना त्या एका ठिकाणी म्हणतात –
“एक बाई मला म्हणाल्या, अहो, ही युनिव्हर्सिटी आहे. तुमच्या विद्यार्थ्यांना तरी हे शिक्षण व ही शिस्त आहे का?” त्यांचे बोलणे मला कबूल नव्हते. पण युनिव्हर्सिटी नाही तरी पारंपरिक ज्ञानाची जोपासना, संवर्धन व पुढच्या पिढीत संक्रांती ही शिक्षणाची तीन अंगे प्रकर्षाने त्यात होती, यात संशयच नाही. हे शिक्षणसुद्धा अनेकविध होते. धर्म व तत्त्वज्ञान याखेरीज गायन, नर्तन व नाट्य या तिन्ही कलांचा समावेश त्यात होता; शिवाय सर्व समाजाचे एकत्र जीवनही त्यात होते.
हा प्रचंड जनसमुदाय पाहून काही लोक मात्र नाके मुरडतात. लाखो लोकांचे किती श्रमाचे तास इथे फुकट जातात, असे काहींना वाटत असते. रिकामटेकड्या टाळकुट्यांचा हा उपद्रवी उद्योग आहे, असे त्यांना वाटते. या संदर्भात डॉ. नरेंद्र दाभोलकर काय म्हणतात पाहू. ‘वारीचं सामर्थ्य समता संगराला लाभावं’ या लेखात डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणतात –
“वारीला काही शतकांची परंपरा आहे. वारीच्या माध्यमातून विराट जनसमुदाय संपूर्ण महाराष्ट्रातून पंढरपूरला चालत जातो. दरवर्षी यात भर पडते. तरुणांची आणि महिलांची संख्या लक्षणीय वाढतेय. अशा सामाजिक शक्ती विधायकतेकडे अधिकाधिक कशा वळतील, हे समाजचिंतन सर्व समाजाला पुढे नेणारं ठरेल. लाखो लोकांनी तीन आठवडे अडचणी सोसत कामधाम सोडून असंच चालत जाण्यानं काय साधतं? हा प्रश्न उपस्थित करणार्यांना परंपरा आणि आधुनिकता यांचं सामर्थ्य कळलेलं नाही, असं म्हणावं लागेल. कोणतीही अपेक्षा न ठेवता, नवस फेडण्याशी संबंध नसताना लाखोंचा जनसमूह विशिष्ट प्रकारचे वर्तन करतो, त्यावेळी ती त्याची जीवन जगण्याची रीत आहे, म्हणूनच समजावून घ्यावी लागते. आधुनिक पद्धतीने विचार केला, तरी प्रत्येकाला आपल्या आयुष्यात काही गोष्टी प्राधान्यक्रमाच्या वाटतात. कोणासाठी ते गिर्यारोहण असेल, कोणासाठी ते वनभ्रमण असेल, तर आणखी कोणाला संगीताची मैफल, चित्रकलेची संग्रहालयं पाहण्यात आनंद मिळेल. त्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्याकडचा श्रम, वेळ, पैसा यांची शक्यतेनुसार गुंतवणूक करत असते.”
बहुसंख्य वारकरी हे शेतकरी आहेत. त्यामुळे वारीचे वेळापत्रक हे कृषिसंस्कृतीशी जोडलेले आहे. आषाढ महिन्यात पेरण्या झाल्यानंतर शेतकर्याला महिनाभर सुट्टी असते, शेतात विशेष काम नसते. अशावेळी शेतकरी आपल्या परिवारासह सवंगड्यांसह संतसहवासात भजन-कीर्तनाचा आनंद लुटत विठूरायाला भेटण्यासाठी पायी पंढरीला जातो. आषाढीखेरीज दुसरी मोठी वारी कार्तिकीची. पिकाची कापणी होऊन धान्य घरात येते. त्यावेळी सृजनाचा आनंद व्यक्त करण्यासाठी कार्तिकीची पायी वारी वारकरी, शेतकरी करतो. पाऊस-पाणी वेळेवर झाले नाही, पेरण्या वेळेवर झाल्या नाहीत तर आषाढीला गर्दी होत नाही, हा नियमितपणे वारी पाहणार्यांचा अनुभव आहे. यात कुठेही मानवी श्रमाचा अपव्यय नाही. आपल्याला कृषिसंस्कृतीचे वेळापत्रक माहीत नसते. त्यामुळे आपले असे गैरसमज होतात.
पंढरीचा विठ्ठल हे वारकर्यांचे आराध्य दैवत आहे आणि वारी ही त्यांची उपासना पद्धती आहे. एखादी गोष्ट वारंवार करणे ही वारी. प्रतिवर्षी न चुकता, विठूरायाला भेटायला नियमितपणे जाणे, ही वारीची उपासना पद्धत. वारी ही पायीच करायची असते, संतांच्या संगतीत करायची असते, वारीतून चालताना मुखी नामाचा गजर करत भजन करायचे असते. हसत-खेळत, नाचत-गात ही वाट चालायची असते. ही सामुदायिक उपासना पद्धती आहे. इतर कर्मकांडात्मक उपासना पद्धतीला संतांनी दिलेला हा उत्कृष्ट पर्याय आहे. संत एकनाथ महाराज वर्णन करतात –
साधन तें सार पंढरीची वारी |
आन तुं न करी सायासाचें ॥१॥
वेद तो घोकितां चढे अभिमान |
नाडेल तेणें जाण साधन तें ॥२॥
शास्त्रमतवाद कासया पसार |
करी सारासार वारी एक ॥३॥
पुराण सांगतां मन वेडावलें |
निंदुं जें लागलें आणिकांसी ॥४॥
ग्रंथ पाहावें तरी आयुष्य क्षणीक |
व्यर्थ खटपट करुनी काई ॥५॥
एका जनार्दनीं सारांचे पैं सार |
विठ्ठल त्रिअक्षर जप करी ॥६॥
तुकाराम महाराज म्हणतात –
होयें होयें वारकरी |
पांहे पांहे रे पंढरी ॥
काय करावीं साधनें |
फळ अवघेंचि येणें ॥
पंढरीची वारी केल्यानंतर अन्य कोणतीही पारमार्थिक साधना करावी लागत नाही, असे संतांचे स्पष्ट सांगणे आहे. त्यामुळेच तुकाराम महाराजांनी अन्य एका ठिकाणी सांगितले आहे –
पंढरीची वारी आहे माझे घरी |
आणिक न करी तीर्थव्रत ॥
पंढरीची वारी आणि वारी करणारा वारकरी याबद्दल संतांना विलक्षण प्रेम आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात –
माझ्या जीवीची आवडी |
पंढरपुरा नेईन गुढी ॥
खांद्यावर पताका घेऊन पंढरीला नाचत जाणे ही माझ्या मनाची आवड आहे, असे माऊलींचे सांगणे आहे.
पंढरीच्या वारीत अध्यात्माचे स्वरूप कसे असते? डॉ. नरेंद्र दाभोलकर या संदर्भात म्हणतात –
“वारकरी संप्रदायात जात, धर्म आणि भेदाभेद मानले जात नाहीत. वारकरी संप्रदायाचं हे वर्तन आध्यात्मिकतेच्या अंगानं जाणारं आहे. अध्यात्म या शब्दाच्या चर्चेत जाण्यात अर्थ नाही. पण खरी आध्यात्मिकता असं मानते की, भौतिक सुखाच्या पलिकडे जीवनाचं एक श्रेयस आहे. ते भौतिक सुखापेक्षा अनंत पटींनी मोलाचं आहे. ही जाणीव अंतरंगात उमगलेली व्यक्ती संयमी असते. ती मानवसन्मुख कृती करते. त्याद्वारे तिच्या जीवनात शूचिता आणि पावित्र्य येतं.
वारीच्या सोहळ्याचा मूलभूत संदेश
या मार्गावरून जाण्याच्या साधनेचा प्रारंभ वारीच्या मार्गावरून चालण्याने होतो, असं अनेक वारकर्यांना वाटतं. उत्तम खाणं, निवास, विश्रांती या सुविधा भौतिक सुखाच्या गोष्टी आहेत. याउलट वारीच्या काळात वारकरी रोज २०-२० किलोमीटर चालतात. प्रवासात जे मिळेल ते खाणं, निवास आणि पावसाचं झोडपणं, चिखल तुडवणं आनंदाने स्वीकारतात. वारकरी तुळशीमाळ धारण करतात. एका अर्थाने व्रतस्थ होतात. मांस, धूम्रपान आपोआप व्यर्ज होतं.
ज्या गोष्टी करायच्यात, त्यात नामस्मरण, भगवद्गीता, पुण्यकर्म, शुद्ध आचार यांचा समावेश होतो. वारीच्या सोहळ्याचा मूलभूत संदेश प्रेम, भक्ती, शांती आणि मानवतेची समानता हा असतो. म्हणून आचार, विचार आणि उच्चार यातली शुद्धता, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा यांचं प्रतीक म्हणून वारकर्यांकडे बघितलं जातं.”
वारी आणि वारकरी यांच्या संदर्भातील डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे वर नमूद केलेले हे विवेचन अत्यंत महत्त्वाचे आहे.
पंढरीचा वारकरी कसा असतो? किंबहुना संतांच्या कसोटीत तो कसा असायला हवा? संत चोखोबा काय म्हणतात पाहा –
वारी पंढरीची तोचि वारकरी |
दया क्षमा बरी वसे तेथें ॥
तोचि माझा जीव प्राणाचाहि प्राण |
जीव वोवाळीन तयावरी ॥
ज्याच्याजवळ दया, क्षमा आहेत तोच खरा पंढरीचा वारकरी, त्याच्यावरून मी माझा जीव ओवाळून टाकेन, असे चोखोबांचे सांगणे आहे.
–ह.भ.प. देवदत्त परुळेकर
लेखक संपर्क : ९४२२०५५२२१