डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेटले नसते तर…

अलका धुपकर -

अलका धुपकर या धडाडीच्या पत्रकार असून दाभोलकरांच्या खुनानंतर त्यांनी सनातनबाबत केलेले वार्तांकन खूपच गाजलेले होते. त्यासंदर्भात त्यांना सनातन्यांनी धमक्याही दिल्या होत्या. सध्या त्या ‘टाईम्स इंटरनेट लिमिटेड’च्या असिस्टंट एडिटर आहेत. त्या आधी अलका धुपकर ‘आयबीएन लोकमत’ या वृत्तवाहिनीत होत्या. त्यांना चामलीदेवी जैन, लाडली आणि रामनाथ गोयंका पुरस्कारांनी गौरवले गेले आहे. त्यांना ‘एशिया जर्नालिझम फेलोशिप’ मिळाली आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची माझी भेट झाली नसती, तर आयुष्याची वाटच मी कदाचित कायमची चुकले असते. ‘ती’ भेट त्यांच्या कामातून-विचारांतून-लेखनातून झाली. मला तर ते आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ठायी-ठायी भेटतात, भावतात आणि ते समजायला अजून काही वर्षे जातीलच. त्यामुळे मुक्ता आणि राहुल यांनी या विषयावर लिहायला सांगितलं, तेव्हा उत्साहाने लगेच होकार कळवला. बाबासाहेबांचं लेखन, व्यासंग आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व यावर अनेकांचा गाढा अभ्यास आहे. अनेक जण त्यावर लिहितील; पण मी आज जे लिहिणार आहे, ते या तुलनेत खूप साधं आहे; सोपं मात्र नक्कीच नाही. मला बाबासाहेब भेटले आणि माझं आयुष्य आतून-बाहेरून बदललं. व्यक्ती म्हणून आणि माझ्या कुटुंबासाठी ही गोष्ट पचवायला कठीण अशी होती; पण मी कसं जगायचं, हा माझा निश्चय ठाम होता. पत्रकारांनी इतरांविषयी लिहावं. पत्रकाराचा ‘मी’ लेखात उतरू नये, या नियमाला अपवाद असणारा हा लेख माझा एक अनुभव म्हणून वाचावा. बाबासाहेबांनी केलेल्या समुद्राएवढ्या कामातला तो एक ठिपका आहे. माझे गुरुवर्य मित्र डॉ. चिं. मो. पंडित नेहमी सांगायचे, एका व्यक्तीच्या आयुष्यात जेवढ्या वेगाने बदल होऊ शकतात, त्यापेक्षा सामाजिक बदलांचा वेग कमी असतो. सामाजिक बदलांना वेळ लागतो. मी ज्या समाजात वाढले, तो समाज बदलला आहे, असं मी खात्रीने म्हणणार नाही; पण बाबासाहेबांमुळं माझं जगच बदलून गेलं, हे खरंय. त्याचीच ही गोष्ट…

मी कोकणातल्या एका मध्यमवर्गीय घरातली. बी. ए. होईपर्यंत मी ज्या कुटुंबात राहिले, जिथे जातीय उतरंड हा दैनंदिन जगण्याचा अविभाज्य भागच आहे. आमच्या पिंगुळी गावातील परशुराम गंगावणे यांच्या ‘कला अंगण म्युझियम’ आणि आर्ट गॅलरीच्या कामासाठी त्यांचा नुकताच ‘पद्म’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ठाकर समाजाच्या चित्रकथीसाठी प्रसिद्ध असलेल्या गुढीपूरच्या जवळचं माझं घर. पण लहानपणापासून या ठाकर किंवा इतर काही समाजातील महिला घरी टोपल्या किंवा बांबूच्या गोष्टी विक्रीसाठी घेऊन यायच्या, तेव्हा त्यांना अंगणाबाहेर किंवा मुख्य घराबाहेरच उभं केलं जायचं. त्यांनी आणलेल्या बांबूच्या गोष्टींवर पाणी टाकून त्या घेतल्या जायच्या. या ठाकर समाजातले काही समवयस्क मित्र असूनही कधी त्यांच्या घरी गेलेय लहानपणी, हे मला आठवतही नाही. कारण कधी गेलेच नव्हते त्यांच्या घरी. आमचं कुटुंब ज्या जातीला मानतं, त्या जातीव्यतिरिक्तच्या इतर जातींना कमी लेखणं, ‘आपल्यात’ -‘त्यांच्यात’ करणं, कुणाला कमी लेखायचं आहे, तर ठराविक जातींचा उल्लेख करून ‘त्यांच्यासारखं काय करतेस,’ हे बोलणं यात काही गैर आहे, हे देखील कळत नव्हतं. कारण गावातील एका टोकावर असलेल्या आमच्या घराचं-शेताचं कुंपण हेच त्या काळात एक प्रकारे विश्व होतं. शाळेत जायचं, चांगले गुणं मिळवायचे. जातीमुळे वडील जे धार्मिक कार्य करत, त्यामुळे कधी कुणी अपमान केला, वाईट वागवलं, असं घडलंच नाही. हे सगळे ‘प्रिव्हिलेजस’ होते, हे नंतर कळलं. ते वय कळण्याचं नव्हतं. शाळेत इतिहास शिकवणारे शिक्षकही अशा जातीचे, जे स्वत:च्या जातीला उच्च जात मानतात. ते महात्मा गांधीजी यांना टकलू म्हणायचे. टकलूमुळे फाळणी झाली, असं सांगायचे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला मानणारे होते, हे नंतर यथावकाश कळलंच. राममंदिर वगैरे त्यांची स्वप्नं होती, हे आठवतंय. आता त्यांच्या स्वप्नपूर्तीचा आनंद मिरवत असतील. असो. शालेय वयात इतिहास संघाच्या विचारसरणीच्या लोकांनी शिकवल्यामुळे पिढीच्या पिढी ‘बायस्ड’ झाली आहे, हे आता पाहतोच आहोत आपण; पण मी वाचले त्यांच्या प्रभावातून.

माझ्या वडिलांची पर्सनॅलिटी खूप कॉम्प्लेक्स होती. घरात जात पाळायची; पण नोकरीच्या ठिकाणी आणि समाजात त्यांची सर्व जाती-वर्गातील लोकांशी असलेली स्नेहपूर्ण वर्तणुक, मैत्र हे माझ्या नजरेतून सुटलं नव्हतं. घरी चहासाठी कुणाला वेगळी भांडी दिली जातात, कुणाला घराच्या स्वयंपाकघरापर्यंत प्रवेश असतो, कुणाला पडवीपर्यंत आणि कुणाला प्रवेशच नाही. हे सगळं ती व्यक्ती कुठल्या जातीत जन्माला आली आहे, यावर अवलंबून असायचं. मी दहावीला 65 टक्के मार्क्सनी पास झाले. मला सोरायसिस हा स्किन डिसीज असल्यामुळे मी खूप डिस्टर्ब होते. अगदी शाळा सोडेन, अशा रडकुंडीला आले होते. माझे आई-बाबा-भावंडं-काकी आजी- या सगळ्यांनी माझं एवढं काही केलंय की, त्यांच्यामुळेच मी अकरावीला अ‍ॅडमिशन घेतली अखेर. सोशल सायन्सचे टीचर खूप बोअर शिकवत होते. माझ्या ताईच्या मैत्रिणीसोबत-स्वप्ना जडये-सोबत त्याच दिवशी बोलले. तिनं सुचवलं की, टोपले सरांच्या पॉलिटिकल सायन्स वर्गाला जा. तुला आवडेल. तेव्हा ज्युनिअर कॉलेजची अ‍ॅडमिशन ऑनलाईन नव्हती; आणि बरीच ‘फ्लेक्सिबल’ होती. मी एका दिवसात राज्यशास्त्र विषयाला शिफ्ट झाले. टोपले सर (जे आता आपल्यात नाहीत) शारीरिक उंचीने बुटके होते; पण त्यांची वैचारिक उंची कमालीची होती. त्यांनी भारतीय राज्य घटना, भारतीय लोकशाही, भारतीय स्वातंत्र्य लढा, सध्याच्या (तेव्हाच्या) लोकशाहीपुढची आव्हानं, लोकशाहीचे चार स्तंभ हे सगळं इतक्या जोषात शिकवलं की, मी जणू काही खडबडून जागी झाले. माझ्या घरच्या अंगणापलिकडचं मोठ्ठं जग तेव्हा दिसलं मला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तोंडओळख झाली अकरावी – बारावीच्या राजकीय अभ्यासक्रमातून. नंतर मी पानवळ (ता. बांदा) येथे बी. ए. प्रथम वर्षासाठी अ‍ॅडमिशन घेतली आणि मला जग कळलं. डॉ. बाबासाहेब आंबडेकरांचे हिंदू धर्माबद्दलचे आक्षेप, भारतीय राज्य घटनेतील समानतेची त्यांनी दिलेली मूल्यं, महिलांना दिलेले समान अधिकार, त्या आधीचा ‘पुणे करार’ हे सगळं परीक्षेतल्या मार्क्सपुरतं नव्हे, तर आपल्या जगण्यासाठी समजावून घेणं आपली जवाबदारी आहे, अशी ओढ लागली. मग नलिनी पंडितांच्या पुस्तकापासून सुरुवात केली. बरंच वाचलं. मी पानवळमध्ये ज्या नातलगांच्या घरी राहत होते, त्यांची विचारसरणी ही देखील शाखाधार्जिणी होती. माझ्या घरी बाकीचं वातावरण लिबरल असलं, तरी जातीय अस्पृश्यता, धर्म, कर्मकांड यांचं अवडंबर होतंच. मी जे वाचत होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भारावून टाकणारी भाषणं माझ्या विचारांना जी दिशा देत होती, ती दिशा माझ्या कौटुंबिक वातावरणाच्या विरुद्ध टोकाला घेऊन जाणारी होती. विचारांच्या आणि जगण्याच्या एका टोकावरून दुसर्‍या टोकाला जाताना जी फरफट व्हावी, ती माझ्या मनाची झालीच; म्हणजे गंमत सांगते, माझा भाऊ मित्राच्या आईने दिलेला लाडू न खाता घरी घेऊन यायचा. कारण ती वेगळ्या जातीची होती आणि मी माझ्या मैत्रिणीने आणलेले पोहे आवडीने खायचे. या मैत्रिणीला माझ्या घरात नक्कीच परकेपणाची वागणूक मिळाली असती- तिच्या जातीमुळे; पण मला तोपर्यंत कळलं होतं की, जात ही एक अंधश्रद्धा आहे. मी माझ्या नवबौद्ध मैत्रिणीच्या हातचं बिनधास्त खायला लागले, त्या दिवशी मी किती बदललेय हे कळलं. बी. ए.च्या दुसर्‍या वर्षाला वेंगुर्लेयेथील खर्डेकर कॉलेजला प्रवेश घेतला होता. भारतातील राजकीय विचारवंत, सामाजिक विचारवंत हा अभ्यासक्रमाचा भाग होताच; पण खर्डेकर कॉलेजच्या लायब्ररीमधून बेसिक पुस्तकं घरी आणून मी अधाशासारखी वाचली. आमच्या घरी अशी काही खास वाचनसंस्कृती नव्हती; म्हणजे आता मी ऐकते, माझी समवयस्क लोकं सांगतात, त्यांच्या लहानपणी त्यांनी केवढं काय-काय वाचलं होतं..! मी खरं सांगू, मी तर कॉलेजजीवनामुळे वाचनाकडे वळले. आंबेडकरांचा विचार मला क्रांतिकारी आणि शूर वाटला. त्यांची स्वत:ची कहाणी, त्यांची शिस्त, त्यांची चिकाटी, निर्भीडपणा आणि त्यांची दूरदृष्टी याने मी कॉलेजजीवनात अचंबित झाले.

कौटुंबिक जीवनात माझ्या बहिणी, माझे नातलग यांच्या घरी महालक्ष्मी, सत्यनारायण पूजा, मंगळागौरी आणि या सार्‍या सणसमारंभांसोबत येणारी महिलांवरची कामाची जवाबदारी आणि बंधनं मी पाहत होते. मला त्याचं यत्किंचितही आकर्षण नव्हतं. खर्डेकर कॉलेजमधून मी सोलापूर, पश्चिम महाराष्ट्र इथे वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घ्यायचे. तिकडे जी तरुण मुलं-मुली भेटल्या, त्यांच्यासोबत कितीतरी गप्पा व्हायच्या. नवी पुस्तकं, नवा विचार कळायचा. बाबासाहेबांचा मंत्र मानून ‘शिका-संघटित व्हा-संघर्ष करा’ असं जगणारी मित्रमंडळी भेटली. भारी वाटलं. सच्चेपणा वाटला या विचारांत. माणूस म्हणून कुणी कुठल्या जातीत जन्माला आला, यावरून भेदाभेद करणं भयंकर क्रूरपणाचं वाटू लागलं. मी कुणालाही वाकून नमस्कार करणं बंद केलं. पानवळ आणि कुडाळला ‘सकाळ’ला विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम करताना तळागाळातील लोकं, जातीय उतरंड, पंचायत राजचं महत्त्व, शिमगा-जत्रा वगैरेंमधली संस्कृती हे सगळं अनुभवलं. जे बघायचे तिथे आंबेडकरांचे विचार लावून विचार करायचे. ही खूप सटल प्रक्रिया होती. मला आठवतंय, ग्रामदैवतांच्या मंदिरात दलितांनी प्रवेश करावा की नाही, यावरून झालेले रुसवे-फुगवे आणि राजकारण. मग ‘चवदार तळं’ आणि सगळे लढे का लढले गेले, हे चांगलंच कळलं. त्या काळातही एवढा विरोध होता जातीय अस्पृश्यता मोडून काढायला, तर आंबेडकरांच्या काळात परिस्थिती किती कठीण असेल, या विचारानेही अंगावर काटा यायचा.

पुढे, पुण्याला रानडे इन्स्टिट्यूटला पत्रकारितेचं शिक्षण घेताना अण्णा भाऊ साठे, नामदेव ढसाळ, बाबूराव बागूल, दलित साहित्य या सगळ्यांशी पहिल्यांदाच ओळख झाली. ‘पुणे सकाळ’मध्ये काम केलं, कॉलेज पूर्ण केलं आणि मुंबईला आले. मुंंबईमध्ये सतरा वर्षे पत्रकार म्हणून काम करतेय. शहरांची ही ‘कॉस्मोपोलिटन’ क्वालिटी म्हणून आपण जीवापाड टिकवली पाहिजे. मी घरी देवघरात जाणं बंद केलं, देवाला नमस्कार करणं बंद केलं. माझ्या पालकांना आणि भावंडांना यांचा त्रास झाला; पण मी कुणाला वाईट वाटेल, म्हणून जात-पात पाळणं सुरू ठेवलं नाही आणि कर्मकांडंही केली नाहीत. कोकणातील गणेशोत्सव हा एक सांस्कृतिक मेळा असतो. धार्मिक-राजकीय रंग चढण्याआधी मला शक्य तेव्हा, मी त्या सांस्कृतिक मेळ्याला नक्की हजेरी लावली – भविष्यातही लावेन.

एक आठवण सांगते. ‘परिवर्तनाचा वाटसरू’मध्ये मी निनावी किंवा वेगळ्या नावाने लेखही लिहिला होता. तेव्हा राजीव कालेलकर यांच्याशी मी खूप बोलायचे या द्वंद्वाबद्दल. मी ज्या कुटुंबात आले ते जात, कर्मकांड मानणारं; आणि मी व्यक्तिगत पुरोगामी विचार मानणारी, भारतीय राज्य घटना मानणारी, तुकाराम-फुले-शाहू-आंबेडकर यांची परंपरा मानणारी. मग जर मी माझ्या कुटुंबाला बदलू शकत नाही, तर हे सगळं लिहायचा मला अधिकार आहे का, हा दुटप्पीपणा आहे, असं माझं द्वंद होतं. मी मुंबईत नवीन आले होते, तेव्हा तो लेख लिहिला होता. आता जेवढ्या स्पष्टपणे व्यक्तिगत अनुभव लिहितेय, तेवढं बळ तेव्हा नव्हतं. मी ज्या कुटुंबात जन्माला आले, ते निवडण्याचं स्वातंत्र्य निसर्गानं मला दिलं नव्हतं; पण मी कसं जगायचं, हे ठरवायचं स्वातंत्र्य मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे भारतीय राज्य घटनेनं दिलंय, याबद्दल मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सदैव ऋणी राहीन. पुण्यामध्ये एका कौटुंबिक परिचितांच्या घरी मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक घेऊन गेले, तर ‘आमची वास्तू अपवित्र झाली,’ असा टोमणा मी ऐकला होता. आज वळून मागे बघते, तेव्हा डॉक्टरांना महामानव का म्हणतात, ते कळतं आणि मी निश:ब्द होते.

दरवर्षी सहा डिसेंबरला चैत्यभूमीला जे आंबेडकरांचे अनुयायी येतात, त्यांच्याशी किती गप्पा मारल्या आहेत. किती गोष्टी आहेत. बाबासाहेबांनी जगायची केवढी ताकद दिली, अन्यायकर्त्यांना संधी दिली समानतेचं पाऊल टाकायची, सोबत चालायची. गोरगरीब, वंचित, बहुजन, तरुण, वृद्ध, महिला, कष्टकरी, विद्यार्थी हे संपूर्ण देशांतून इथे येतात. मृत्यूनंतर ज्यांचे ‘फॉलोअर्स’ वाढतच आहेत, अशा दुर्मिळ व्यक्तिमत्त्वांपैकी एक आपले बाबासाहेब आंबेडकर.

आपण केलेली चूक स्वीकारण्याऐवजी बाबासाहेबांना दोष देणारी जमातही त्याच वेगात फोफावत आहे, हे या सगळ्यांमध्ये विसरता येणार नाही. त्यांच्याशी सातत्याने संवाद ठेवायचा मी प्रयत्न करते. वाद होतातच, काहीवेळा समोरच्या व्यक्तीला दुखावणारे निर्णय मागे न हटता तुम्हाला घ्यावे लागतात. व्यक्तिगत निर्णय घेण्याच्या कसोटीत पळून जाऊन उपयोग नसतो. एकच आयुष्य आहे. त्यात सगळ्यांना खूष करणं, हे माझं काम नसून होत असलेला अन्याय मांडणं, न्यायाच्या-लोकशाहीच्या बाजूने उभं राहणं, हे माझं कर्तव्य आहे. टिळकांचं राज्य असतं तर कोणत्या वयात आमची लग्नं लागली असती; पण बाबासाहेबांनी आम्हा महिलांचा या देशात सन्मानाने, बरोबरीने विचार केला. बाबासाहेब हे केवळ दलित नेते नाहीत, ते आपल्या देशाच्या राज्य घटनेचे शिल्पकार आहेत. तेव्हा आंबेडकरांच्या विरोधकांना एकच प्रश्न विचारते, ‘तुम्ही आंबेडकरांचं लेखन वाचलंय का़य, त्याचं काम समजावून घेतलंय का; का फक्त आरक्षणाला आक्षेप आहे, म्हणून अर्धवट माहितीच्या आधारे बोलताय. वाचा आणि मग त्यावर टीका करा, एवढं साधं सजेशन असतं माझं, कधी-कधी कामी येतं ते.’ बाबासाहेबांचा विचार पुढे नेणं, हे बाबासाहेबांसाठी नव्हे, तर आपल्या देशाच्या एकात्मतेसाठी गरजेची गोष्ट आहे; नाही तर ‘फॅसिझम’च्या आहारी जाऊन आपला बळी जाणार, हे निश्चित आहे.

एक खेदाची गोष्ट जरूर मांडेन, ती म्हणजे आज मी आणि माझ्यासारखे काही लोक हे दलित, बहुजन घरात जन्माला आलेलो नाही; म्हणजे आम्ही कसे जातीयवादी, असंही लेबलिंग केलं जातं. बाबासाहेबांचा विचार इतका संकुचित नको करूया; संकल्प करूया, तथागताचं तत्त्वज्ञान आणि डॉ. आंबेडकरांची विचारसरणी छोट्या-मोठ्या गोष्टींतून पुढे नेण्याचा.

मंदिरांमध्ये प्रवेशावरून वाद होतात, तेव्हाही माझी हीच भूमिका असते. मंदिरात न जाण्याचा निर्णय महिलांचा असेल किंवा दलितांचा; पण जर जात आणि जेंडरवरून बंधन येत असेल तर आवाज उठवलाच पाहिजे. आज अनेक जण, ‘अमकी जात खालची, अमकी जात वरची,’ असं लिहितात. असं लिहून मनुच्या जातीयवादी सिद्धांतालाच आपण पुढे रेटत असतो, असं मला वाटतं. त्याऐवजी कटाक्षानं मी वेगळी जात असा शब्द वापरते. जेव्हा जातीय अत्याचारांच्या बातम्या लिहायच्या असतात, त्याच्या संदर्भासाठी उतरंड मांडायची; पण जनरली कुणालाही खालची जात म्हणणंही बंदच केलं पाहिजे. असं केलं तरच एक दिवस जातींच्या निर्मूलनाच्या आंबेडकरांच्या स्वप्नापर्यंत आपण पोचू शकतो. ‘फॅसिझम’ने देशाभोवती जी रिंगण टाकलेय, त्याच्या आत नाचत राहू, तोपर्यंत मात्र हे स्वप्न, स्वप्नच राहील.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]