रवी सांगोलकर -
अंधश्रद्धेपोटी मागील दहा वर्षांपासून जटा वाढवलेल्या ७५ वर्षीय आजीची आज स्वेच्छेने जटा कापण्यात आली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा मंगळवेढा यांच्या ‘जटा निर्मूलन’ अभियानांतर्गत रड्डे (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथे हा उपक्रम पार पडला. या कृतीतून साने गुरुजी यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
रड्डे येथील वृद्धेच्या डोक्यात दहा वर्षांपासून यल्लम्मादेवीच्या नावाने जटा आली होती. त्यामुळे त्यांना शारीरिक वेदना होत होत्या. डोके जड झाल्याने मणका सारखा दुखायचा. समाजामध्ये मनमोकळेपणाने वावरता येत नव्हते व दररोजची घरातील कामे करता येत नव्हती. अंनिस कार्यकर्ते जट काढण्यासाठी अनेक महिने त्यांचे समुपदेशन करत होते. अखेर शुक्रवारी जट निर्मूलन करण्याचे ठरले.
जट निर्मूलनासाठी सामाजिक कार्यकर्ते रवी सांगोलकर, विनायक माळी, सक्षम घोडके व दादा गंगधरे यांनी वृद्धेच्या घरी जाऊन चार फूट लांब जटा कापली. जटेचे डोक्यावरील ओझे कमी झाल्याने त्या महिलेच्या चेहर्यावर हसू फुलले व समाधान दिसून आले.
आजीची प्रतिक्रिया : “वर्षानुवर्षांची जटा आज काढली, खूप हलके वाटत आहे. दहा वर्षे डोके जड झाले होते, मणका सारखा दुखायचा, आता खूप बरं वाटतंय,” अशी भावना आजीने व्यक्त केली.
कार्यकर्त्यांचे आवाहन : “जटा ठेवल्याने केसांच्या समस्या वाढतात. समाजात विज्ञानवादी दृष्टिकोन रुजावा हा या अभियानाचा हेतू आहे. नागरिकांनी अंधश्रद्धा सोडून आरोग्याला प्राधान्य द्यावे”, असे आवाहन रवी सांगोलकर यांनी केले. या वेळी बिरा कांबळे, दादा गंगधरे यांचे सहकार्य लाभले.
