मोहसीन शेख -
दिनांक २६ जून २०२६ रोजी सकल मुस्लीम समाज रहिमतपूर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा रहिमतपूर, संविधान जागर टीम यांच्या वतीने मोहरम आणि छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करत शिबिराची सुरुवात झाली. मोहरम हा इस्लाम धर्मातील त्याग, समता, सत्य आणि प्रेमाचा संदेश देणारा महिना आहे. मोहरमचा संदेश केवळ शोकाचा नसून अन्याय विरुद्ध लढण्याचा, त्यागाचा आहे. करबला येथे हजरत इमाम हुसेन (र. अ.) आणि त्यांच्या सहकार्यांनी सत्य, न्याय आणि मानवतेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. हजरत इमाम हुसेन (र. अ.) यांचेकडून मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा मिळते. त्यांच्या या सर्वोच्च त्यागाच्या स्मरणार्थ आणि मानवतेच्या सेवेसाठी उचललेले हे पाऊल आहे आणि याच त्यागाच्या प्रेरणेतून हे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. ७२ रक्तदात्यांनी उदात्त हेतूने या शिबिरात रक्तदान केले. प्रत्येक धार्मिक सण अधिकाधिक समाजाभिमूख, पर्यावरण व मानवताभिमूख होऊन समाजात विज्ञाननिष्ठ संस्कृती रुजावी हा यामागील हेतू आहे. मोहरम निमित्त सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता तसेच विज्ञाननिष्ठ मानवतावाद जपावा, असे आवाहन या माध्यमातून आम्ही अशा उपक्रमातून करत असतो.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन रमेश उबाळे पश्चिम महाराष्ट्र रिपब्लिक सेना अध्यक्ष यांच्या हस्ते झाले. उबाळे साहेबांनी या मानवताभिमूख उपक्रम आयोजित केल्याबद्दल मुस्लीम समाज आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाचे भरभरून कौतुक केले. या वेळी रहिमतपूर नगरीच्या नगराध्यक्ष वैशाली माने, उपनगराध्यक्ष केतन माने, सुनील माने भैया, वासुदेव माने काका, पोलीस पाटील दीपक नाईक साहेब, रहिमतपूर पोलीस स्टेशनचे अझख विनोद नेवसे साहेब आणि स्टाफ तसेच सर्व आजी माजी नगरसेवक उपस्थित होते. रक्तदानासाठी मुस्लीम समाजाचे अध्यक्ष फिरोज मुल्ला आणि म.अंनिस कार्यकर्ते मोहसीन शेख यांच्या आवाहनाला तरुणांनी चांगली दाद दिली. हे सर्व शिबिर यशस्वी करण्यासाठी जावेद मुल्ला, सैफ डांगे, अर्शद डांगे, इम्रान डांगे, प्रवीण माने, शंकर कणसे, मधुकर माने, राजू सय्यद सर, आबिद डांगे, सोहेल आतार, असीम मुल्ला, बबलू शेख यांनी परिश्रम घेतले.
– मोहसीन शेख
