डॉ. हमीद दाभोलकर -
सध्याच्या काळी सर्वधर्मीय भोंदू बाबाबुवा यांना अगदी सुगीचे दिवस आल्याची परिस्थिती आहे. सर्वसाधारणपणे अंधश्रद्धा म्हटले की, लिंबू-मिरची, मांजर आडवी जाणे, करणी-भानामती अशा गोष्टी डोळ्यांच्या समोर येतात. सध्या हे चित्र झपाट्याने बदलते आहे. खरात प्रकरण आणि त्या नंतर महाराष्ट्रात ज्या पन्नासपेक्षा अधिक भोंदू बाबाबुवांच्यावर कारवाई झाली त्यावरून भोंदूगिरीची बदलती भाषा सहज लक्षात येऊ शकेल. सध्याच्या कालखंडात आधुनिक विज्ञानाची परिभाषा वापरून लोकांना फसवणार्या भोंदू बाबाबुवांची मोठी बजबजपुरी माजलेली आहे. खरात बाबा हा स्वत: ‘ओशनोग्राफी’ नावाच्या गोष्टीतला तज्ज्ञ असल्याची बतावणी करायचा! लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी जे पेय तो द्यायचा त्याला देखील ‘ओशनोजल’ असे नाव होते! समुद्राचा अभ्यास करणार्या ‘ओशनोलॉजी’ या ज्ञानशाखेशी, नामसाधर्म्य सोडले तर याचा काडीमात्र संबंध नाही. विज्ञानाचे नाव घेऊन तद्दन अवैज्ञानिक गोष्टी या प्रभावी मार्केटिंगद्वारे लोकांच्या गळी उतरवण्याची एक मोठी इंडस्ट्री सध्या उभी राहिली आहे! त्या मध्ये ओशनोग्राफी प्रमाणे मिड ब्रेन अॅटिव्हेशन (Mid Brain Activation), डकटीलोग्राफी (Dactylography), न्युमरॉलॉजी, वास्तुशास्त्र, ऑराफार्मिंग, क्वांटम हिलिंग (Quantum Healing), टॅरो कार्ड ‘हो पोनो पोनो’ अशा अजबगजब नावाच्या असंख्य गोष्टी आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था आणि त्याचे प्रणेते श्री श्री रवी शंकर यांनी सुरु केलेला ‘इंट्युशन’ नावाचा कोर्स हा देखील त्याचाच उत्तम पुरावा आहे असे खेदाने म्हणावे लागते!
छोट्या छोट्या गोष्टींनी भावना दुखावल्या जाण्याच्या कालखंडात ज्यांना लक्षावधी लोक follow करतात अशा ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ आणि श्री श्री रवी शंकर यांच्याविषयी चिकित्सा करणे हे अनेक लोकांना आवडणार नाही; पण या ‘इंट्युशन’ नावाच्या कोर्सच्या नावाने केलेला दावा हा इतका अवैज्ञानिक आहे की त्या विषयी बोलणे आवश्यक आहे असे वाटते.
स्वत: श्री श्री रवी शंकर हे त्यांच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाउंटवर याविषयी सांगतात की, या कोर्समुळे मनाची चेतना जागृत (Consciousness) होते. हा कोर्स केल्याने मुले डोळ्यावर पट्टी बांधून वाचू शकतात, डोळ्यावर पट्टी बांधून सायकल चालवू शकतात, तसेच क्रिकेट देखील खेळू शकतात! केवळ एवढेच नाही, तर मनाच्या सामर्थ्याने हातातल्या चमच्याकडे बघून आणि त्याच्याशी बोलून तो चमचा वाकवू शकतात! ह्याच्या दुसर्या टप्प्यावरील कोर्स केल्याने सफरचंदावर नजर स्थिर केली की, सफरचंद अपोआप कापले जाते! आजअखेर काही लाख मुलांनी हा कोर्स केला आहे असा देखील त्यांचा दावा आहे! इंद्रियजन्य ज्ञानाच्या पलीकडे जाऊन देखील अंतर्मनाची ताकद वाढवून अनेक अशक्य गोष्टी करता येऊ शकतात, असा या मागचा साधारण दावा आहे.
गमतीचा भाग असा की, या स्वरूपाच्या कोर्ससाठी मुलांना पाठवणारे बहुतांश पालक हे बर्यापैकी शिक्षण झालेले आणि समाजाच्या ‘आहे रे’ वर्गातून येणारे आहेत! शिक्षणाचा अभाव असल्याने, अज्ञानातून किंवा टोकाच्या अभावग्रस्त परिस्थितीमधून हताश होऊन व्यक्ती अंधश्रद्धेला बळी पडली तर आपण ते समजून घेऊ शकतो, पण या सुशिक्षित मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीय पालकांची अंधश्रद्धाळू मानसिकता ही वेगळी गोष्ट आहे. ‘ये दिल मांगे मोअर’ किंवा कितीही मिळाले तरी पुरे नाही अशी काहीशी ही मानसिकता आहे! या मधल्या बहुतांश पालकांना आपल्या मुलांना ‘सुपरमॅन’ किंवा ‘सुपरवुमन’ करायचे आहे. ज्या मुलांना डोळ्याने नीट वाचता येते त्यांना डोळ्यावर पट्टी बांधून वाचायची काय गरज आहे? किंवा नजरेने चमचा वाकवणे याचा माणसाला काय उपयोग? आपल्या मुलाला डोळ्याचे शक्तीने सफरचंद कापायला येण्याने काय सध्या होणार आहे? असे साधे साधे प्रश्न त्यांना पडत नाहीत. आपल्या मुलांकडे काही तरी इतरांपेक्षा वेगळी आणि भारी क्षमता आहे, एवढ्याच गोष्टीवर समाधानी असलेले हे पालक आहेत, असे खेदाने म्हणावे लागते.
हेमामालिनी, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, प्राजक्ता माळी यांच्यासारखे लोक याची भोंदूगिरीची जाहिरात करत आहेत. अनेक राज्यांचे मंत्री देखील या इंट्युशन प्रोग्रामची भलामण करताना दिसतात, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. या सर्वांनी मुलांना आणि पालकांना फसवण्याच्या ह्या धंद्यात सहभागी होणे तातडीने थांबवणे आवश्यक आहे.
‘इंट्युशन’ कोर्समधील दाव्यांची उपलब्ध वैद्यकीय ज्ञानाच्या प्रकाशात तपासणी केले दिसून येते की, डोळ्याला मिळणारा प्रकाश हा अगदी नीट पद्धतीने बंद केला तर समोर असलेली वस्तू दिसणे अशक्य आहे. महाराष्ट्र अंनिस कार्यकर्त्यांनी हे अनेक वेळा अनेक ठिकाणी सिद्ध करून दाखवले आहे. जर अंतर्ज्ञानामुळे त्यांना दिसते असा दावा कोणी करत असेल तर एक साधी टेस्ट करता येते. ज्या वस्तूची तपासणी करायची आहे ती वस्तू जिथे नजर जाणार नाही अशा डोक्याच्या मागच्या बाजूला धरावी किंवा शेजारच्या खोलीत ठेवून ओळखायला लावली तर ती वस्तू ओळखणे अशक्य आहे. कोणताही मेंदू विकारतज्ज्ञ किंवा नेत्ररोगतज्ज्ञ हे सहज सांगू शकतो! इंडियन मेडिकल असोसिएशन, मेंदू विकार तज्ज्ञांची राष्ट्रीय संघटना नेत्रविकार तज्ज्ञांची राष्ट्रीय संघटना यांनी अशा भोंदूगिरी विषयी भूमिका घेणे आवश्यक आहे.
प्रत्यक्षात यामध्ये चमचा वाकवणे किंवा डोळ्यांवर पट्टी बांधून गोष्टी ओळखणे हा दावा करणारे आर्ट ऑफ लिव्हिंग आणि श्री श्री रवी शंकर हे काही पहिले नाहीत! इंटरनेटवर थोडी जरी माहिती घेतली आणि अभ्यास केला तर ‘युरी गेलर,’ ‘जेम्स रँडी’ या जादूगारांनी अशी हातचलाखी करणार्या अनेक लोकांची पोलखोल केली आहे. डोळ्यावर पट्टी बांधली असताना नाक आणि डोळे यांचेमध्ये जी जागा राहते त्यामधून बघून गोष्टी ओळखल्या जातात. जर हाताने दाब देऊन डोळे घट्ट बंद केले अथवा डोळ्यांवर आतून काळा रंग दिलेला आणि घट्ट बसणारा पोहण्याचा चष्मा लावला तर या गोष्टी ओळखता येत नाहीत. आजूबाजूला पूर्ण अंधार करून तसेच संपूर्ण अंध मुलांना देखील कितीही प्रशिक्षण दिले तरी अशा प्रकारे वस्तू ओळखता येत नाही. यामध्ये वाकवले जाणारे चमचे हे आधीच कमकुवत करून ठेवलेले असतात आणि हाताचा थोडा दाब टाकून ते सहज वाकवता येतात. महा. अंनिसचे अनेक कार्यकर्ते या ट्रिक्स करून दाखवतात.
केवळ महाराष्ट्रातील अनेक जिल्हे तसेच केरळ, गुजरात, कर्नाटकसारख्या राज्यांमधून असे प्रशिक्षण वर्ग भरमसाठ मोबदला घेऊन चालू आहेत. या वर्गांमधून विद्यार्थी आणि पालक यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. बाल हक आयोगाने देखील यामध्ये लक्ष घालणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका कोणत्याही विशिष्ट धर्म, पंथ किंवा संस्थेविरोधात नाही. आमचा विरोध हा केवळ अवैज्ञानिक, अप्रमाणित आणि लोकांची दिशाभूल करणार्या दाव्यांना आहे. एखादा दावा करणार्याने तो वैज्ञानिक कसोटीवर सिद्ध करावा, हीच आमची भूमिका आहे. विज्ञानाला प्रश्न विचारण्याची भीती नसते; उलट विज्ञान प्रश्न विचारण्यालाच प्रोत्साहन देते. श्री श्री रवी शंकर आणि त्यांची ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्था ज्या अध्यात्माच्या विषयी बोलतात त्यामध्ये सत्यशोधनाला खूप महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे या ‘इंट्युशन’ कोर्सचे सत्य समजून तो कोर्स मागे घ्यावा अथवा महाराष्ट्र अंनिसमार्फत अशा दाव्यांसाठी असलेले ५१ लाखांचे आव्हान तरी स्वीकारावे असे वाटते. समाजाने प्रगतीसाठी व्यतिपूजा किंवा संस्थाभक्ती सोडून पुराव्याला महत्त्व देणे अत्यंत आवश्यक आहे.
सोशल मीडियामधून अंधश्रद्धा पसरवणार्या गोष्टींचा जो जोरदार प्रचार चालू आहे त्या विषयी जादूटोणा विरोधी कायदा लावून कारवाई करण्याची यंत्रणा उभी करावी, असा आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देऊन जवळजवळ सहा वर्षे झाली आहेत. याविषयी शासनाने काहीही केलेले नाही. अशी यंत्रणा तातडीने उभी केली, तर अशा गोष्टींना आळा घालता येऊ शकेल.
डोळ्यांवर पट्टी बांधून वाचन, ही गोष्ट जर खरोखरच शक्य असेल, तर ती मानवजातीच्या विज्ञानातील एक क्रांतिकारी शोध ठरेल. पण तोपर्यंत अशा दाव्यांकडे चिकित्सक दृष्टीने पाहणे, पुराव्याची मागणी करणे आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे ही प्रत्येक सजग नागरिकाची जबाबदारी आहे. हाच भारतीय राज्यघटनेच्या कलम ५१(अ)(ह) मध्ये नमूद केलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि चिकित्सक वृत्ती जोपासण्याच्या घटनात्मक कर्तव्याचा खरा अर्थ आहे.
