डॉ. दीपक माने -
लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे सहजीवन जगण्यासाठी करावयाचे एक सोपस्कार. काही समाजात तो करार असतो तर काहींच्या मते, ती एक जीवनशैली असते. या मध्ये भविष्यातील कालखंड सुखी, आनंदी जाण्याच्या अपेक्षा ठेवून जुळवाजुळवी, तडजोडीची मानसिकता ठेवून डोळसपणे करावयाची कृती आहे. सध्या याकरिता पारंपरिक पद्धती, आधुनिक पद्धती, शासकीय नोंदणी पद्धती अशा विविध गोष्टी उपलब्ध आहेत. याबाबतचा मोठा उद्योग सभोवती उभा राहिलेला दिसतो.
लग्नपत्रिका जुळणे /गुण मिलन हा एक पुरातन, पारंपारिक ते संगणकीय वापर करत अनेक भल्या-बुर्या मार्गांनी मॅचिंगचा व्यवसाय जोमात सुरू आहे.
या ‘मॅचिंग’च्या काही मूलभूत गृहितकांवर चिकित्सकपणे पाहिल्यास गुणमिलन किंवा पत्रिका जुळणे म्हणजे मुला-मुलींच्या कुंडलीच्या आधारे दोघांचे भविष्यातील आयुष्याबाबत केलेली ढोबळ भाकिते किंवा भाष्ये होत. याकरिता पाच अंगांचा विचार केलेली पुस्तिका वापरून अनेक वर्षांपासूनची एक प्रचलित पद्धत आहे. गुण मिलनासाठी एकूण ३६ गुणांचा ताळमेळ आकडेमोडीने मांडलेला असतो. यामध्ये ५०% म्हणजे १८ गुण मिळाल्यास पासिंग म्हणजेच सकारात्मक गोष्ट असते. जेवढे जास्त गुण तेवढे भावी आयुष्य छान, सुंदर अशी भाबडी मांडणी आहे. ज्योतिष म्हणजे आकाशातील ज्योती / चांदण्या यांचा अभ्यास. सूर्य-चंद्र-ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे जातात त्या भासमान मार्गावरील चांदण्यांचे समूह (नक्षत्र/राशी) नावाने ओळखले जातात हे आपण जाणतोच. गुण मिलन हा राशी-नक्षत्रांचा अंकाचा खेळ आहे. असा आकड्यांचा खेळ सामान्य जणांनी केल्यास त्यास ‘जुगार’ म्हणतात पण हा सांस्कृतिक खेळ अंकशास्त्राचा ताळमेळ करत खेळला जात आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून याकडे पाहिल्यास जन्मपत्रिकेतील त्या व्यक्तीची जन्मरास, जन्मनक्षत्र घेऊन केलेली जुळवाजुळव आहे. नक्षत्र २७ व राशी १२ म्हणजे २७/१२ केलेस २-३ नक्षत्रांची एक रास असे गणित आहे.
यातील राशी या परकीय आहेत, तरीही इथल्या सांस्कृतिक मांडणीत स्थानापन्न आहेत. गुण मिलन करताना एकूण आठ प्रकार केलेले आहेत. प्रत्येकास वेगळे महत्त्व दिले आहे. त्यानुसार ढोबळपणे गुण दिले आहेत. प्रत्येकी आठ गुण ते एक गुण दिलेले आहेत. सर्व प्रकारांमध्ये गुण देताना वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, स्त्री- पुरुष भेदाभेद, यांचा समावेश आहे. सर्व समाजातील लोक कधी अपरिहार्यता, कधी संधी साधूपणा (नकार देण्यास कारण), कधी परंपरेचे दडपण, कधी प्रतिष्ठेचा बुरखा म्हणून या गुण मीलनाच्या/ पत्रिका जुळवण्याच्या प्रकारात सहभागी होतात.
एका एका प्रकाराचा मागोवा घेऊ.
१) वर्ण गुण चक्र (१ गुण) – चार वर्णांतील उच्च वर्णातील मुलाने इतर वर्णातील क्षत्रिय, वैश्य, शूद्र मुलीशी लग्न केल्यास १ गुण मात्र त्याच वर्णातील मुलीने तसे केल्यास शून्य गुण. स्वतःचे वर्णातच लग्न केलेस एक गुण किंवा खालचे वर्णात केल्यास १ गुण अन्यथा शून्य गुण. यामध्ये जात व्यवस्था, वर्णव्यवस्था बळकट करण्याचा विचार दिसतो, परंतु यात नक्षत्र राशीचा काडीमात्र विचार नाही. असे का? विचारायचे नाही.
२) नाडी गुण चक्र (८ गुण) – सर्वांत जास्त मार्क चा प्रकार… यात आद्यनाड,मध्यनाड, अंतनाड हे प्रकार असतात. यातच २७ नक्षत्रे विभागून प्रत्येकी ९ नक्षत्र असतात. यांची गणना बोटांचे पेर्यावर करतात, वधु-वरांचे नक्षत्र क्रमांक मोजतात हे करंगळी चे वरच्या पेर्यास १ क्रमांक, मधल्यास २, तळाच्या ३, तर दुसर्या बोटाचे तळाच्या पेर्यास ४, मधल्या ५, वरचे ६ पुढील बोट वरचे ७ मधले ८ तळास ९ प्रमाणे क्रमांक असतात. एकाच फेर्यावर क्रमांक आल्यास एक नाड अर्थात नाडी दोष शून्य गुण. त्याचा परिणाम सांगतात की, साक्षात मृत्यू. एक नाड नसल्यास पैकीच्या पैकी ८ गुण.
नक्षत्र, बोटांची पेरी आणि नाड यांचा परस्पर संबंध अप्रस्तुत आहे. त्याबाबत विज्ञानमान्य स्पष्टीकरण हे लोक देत नाहीत म्हणून याला सुडो सायन्स का म्हणू नये?
३) राशी कूटगुण चक्र (७ गुण)-
जास्त गुणांचा द्वितीय प्रकार. यात वधू-वरांचे राशीच्या क्रमांका नुसार तुलना करतात. उदा. वधूची रास वराच्या राशीपासून मोजून कोणत्या क्रमांकावर अंक येतो यावर ठरवतात. यात १, ३, ७, ११, ४, १० हे अंक आल्यास शून्य गुण, इतर क्रमांकास सात गुण देतात.
यामध्ये एक भीतिदायक योग सांगतात. मृत्यू षडाष्टक योग म्हणजे वधू-वराची रास परस्परांपासून सहा किंवा आठ क्रमांकावर आल्यास हा योग असे मानतात. यामध्ये दोघांचाही मृत्यू अटळ आहे, असे सांगून शांती केल्यास तो टाळता येतो हे बिंबवले आहे.
४) ग्रह मैत्री गुणचक्र (५ गुण) –
राशींमध्ये शत्रुत्व किंवा मैत्री असते, हे गृहीत धरून या प्रकारात गुण दिले जातात. उदा. सिंह राशीचे शत्रुत्व – कुंभ, तूळ ,वृषभ, मकर राशीबरोबर तर इतर राशींबरोबर मैत्री असते अशी कल्पना मांडून गुण देतात. आता हे कोणत्या आधारे ठरवले ते न सांगताच शत्रुत्व असल्यास शून्य गुण, मैत्री असल्यास पाच गुण दिले जातात. राशी मधील तारे हे अनेक प्रकाशवर्षे दूर आहेत. त्यांचे मध्ये अवकाशात मैत्री-शत्रुत्वाची सुतराम शक्यता नाही.
५) गण गुण चक्र (६ गुण) –
या प्रकारात तीन गण. मनुष्य, देव, राक्षस मानून सर्व २७ नक्षत्र तीन गणात, प्रत्येकी ९ अशी विभागली आहेत. अशीच विभागणी का? याचेही उत्तर ही व्यवस्था देत नाही. वधू-वराचे सारखेच गण असल्यास १००% मार्क – ६ गुण अन्यथा ५, १, ० असे गुण.
उदा. मनुष्य-मनुष्य ६ गुण, मनुष्य- राक्षस ० गुण, मात्र देव – राक्षस १ गुण.
अनेक चोर, डाकू, दहशतवादी यांचे गण देव असूनही ते राक्षसी कृत्य करतात हे वास्तव आहे.
६) वश्य गुण चक्र (२ गुण)-
यात पाच विभाग – चतुश्पाद, मानव, जलचर, वनचर, कीटक असे करून त्यामध्ये बारा राशी विभागून टाकलेल्या आहेत. उदा. मीन, मकर, कर्क-जलचर,
वृश्चिक-कीटक. विज्ञानाने आपण जाणतोच की राशींची नावे चांदण्याच्या समूहांना दिलेली आहेत. मग काही चांदण्या कीटक तर काही चांदण्या जलचर का ? खरे तर राशीतील तार्यांपासून प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास अनेक वर्ष लागतात. आपणास सध्या दिसणार्या राशीतील तारे अनेक वर्षांपूर्वीच्या असतात.
यात गुण देताना मानव-मानव २ गुण, मानव – जनावर १/२ गुण, अशी व्यवस्था आहे. हे सर्व वास्तवाशी विसंगत आहे.
७) तारा गुण चक्र (३ गुण) – वधू-वराचे जन्म नक्षत्र क्रमांकावर हे अवलंबून आहे. वधूचे वरापासून कितवे नक्षत्र ती संख्या भागिले ९. जर बाकी ३, ५, ७ अशी उरली तर अशुभ, शून्य गुण. अन्यथा ३ गुण. जर वराची बाकी शुभ व वधूची अशुभ आल्यास १/२ गुण. हा तर “अंकांचा खेळ त्याचा लागेना काहीही मेळ.”
८) योनी गुणचक्र (४ गुण) –
सर्व नक्षत्रांना १४ भागामध्ये विभागून म्हणजे त्यांना १४ योनीमध्ये टाकून प्राचीन काळचे त्यांना माहितीतीलच प्राण्यांची नावे दिली. उदा. अश्व (अश्विनी, शततारका), गज (भरणी, रेवती) यातील प्राण्यांची नावे आणि नक्षत्रे यांचा ताळमेळच लागत नाही. रँडम/अंदाजे विभागणी केल्यासारखे दिसत आहे. ज्याप्रमाणे संगणकीय कोडिंग भाषा असते तसेच काही तरी गूढ, गौडबंगाल मांडणी केल्याचे दिसते. यामध्ये कोणताही एक नियम दिसत नाही.
काही प्रकारात ८ पैकी ८ गुण किंवा शून्य असे गुण दिसतात. मधले गुण नाहीतच. हा सर्व प्रकार सुज्ञ लोकांना अजबच वाटावा असा आहे, पण त्याची स्पष्ट माहिती सामान्यांना नसल्यामुळे हे उद्योग जोमात आहेत.
दोन व्यक्तींनी एकत्र जीवन जगण्यासाठी जोडीदार निवडताना या ढोबळ, अशास्त्रीय गोष्टी पहाव्यात की, शिक्षण, अनुरूपता, स्वभाव, आवडीनिवडी, आरोग्य, व्यवसाय, नोकरीची अनुकूलता, त्याग, तडजोड, समजूतदारपणा, विवेक यांचा विचार करायचा हा खरा प्रश्न आहे.
– डॉ.दीपक माने
