सम्राट हटकर -
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला 20 ऑगस्ट, 2022 रोजी नऊ वर्षेपूर्ण झाली. 19 ऑगस्ट, 2022 रोजी ‘अंनिस’च्या नांदेड शाखेच्या पुढाकाराने दिलेल्या तक्रारीवरून जनतेची फसवणूक करणार्या भोकर येथील माधव सखाराम पवार या भोंदूबाबाविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा 2013 कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
हा बाबा भोकर शहराच्या हद्दीत भोकर-उमरी रस्त्यावरील जकापूर फाट्याजवळील एका शेतात उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये देवीची स्थापना करून आलेल्या लोकांचे संकट निवारण (!) करत असे. दररोज त्याच्याकडे नडलेले लोक येत असत. मात्र गुरुवार, शुक्रवार व रविवारी त्याचा ‘दरबार’ भरत असे. आलेल्या व्यक्तीकडून नारळासाठी 50 रुपये, दानपेटीत टाकण्यासाठी 50 रुपये व तोडग्यासाठी 400 रुपये असे एकूण 500 रुपये तो आकारत असे. तसेच त्या व्यक्तीला आठ वार्या करायला लावी. असे एकूण 4000 रुपये त्या व्यक्तीला बाबाच्या ‘दरबारी’ द्यावे लागत. बाहेरगावाहून येणार्या व्यक्तीचा व तिच्या सोबत येणार्या व्यक्तीचा बुडालेला रोजगार व येण्या-जाण्याचा खर्च हा भुर्दंड वेगळा.
बाबा मागचा जन्म, सध्याचा जन्म आणि पुढील येणारा जन्म याबाबतचे भाकीत सांगून भक्तांची आर्थिक लुबाडणूक करायचा. त्याचे भाऊ आणि इतर नातेवाईक त्याचे प्रचारक म्हणून काम करायचे. बाबाचे गुणगान गाऊन त्याचा प्रचार करायचे. त्यामुळे ही भोंदूगिरी बरीच फोफावली होती.
घटनेदिवशी, बिलोली येथील ‘अंनिस’चे हितचिंतक, सामाजिक कार्यकर्तेराहुल जिगळेकर हे बाहेर जात असताना त्यांना जवळपास चारशे लोकांचा जमाव दिसल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी थांबून बघितलं, तर या बाबाच्या अंगात देवी आलेली होती. समोर बसलेल्या बाईचं डोकं स्वतःच्या मांडीवर टेकवून बाबा तिला तिन्ही जन्मांबद्दल सांगून उपदेश करत होता. जिगळेकर त्या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रिकरण करत असताना अंगात आलेला महाराज चित्रिकरण करू नका, असं बोलत होता.
हा अंधश्रद्धेचा प्रकार असल्यामुळे जिगळेकर यांनी पुढील कार्यवाहीसाठी ‘अंनिस’चे कमलाकर जमदाडे, जिल्हा प्रधान सचिव भोकर, ‘अंनिस’चे शाखाप्रमुख लक्ष्मण हिरे व राज्य कार्यकारिणी सदस्य सम्राट हटकर यांच्याशी संपर्क साधला. चर्चेअंती त्यांनी स्वतः पोलिस स्टेशनला जाऊन लेखी तक्रार दिली. ‘अंनिस’चे कार्यकर्तेसतत पोलिस प्रशासनाच्या संपर्कात होते. याबाबतीत स्वतः पोलिस निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक भोंडवे मॅडम व त्यांच्या कर्मचार्यांनी सहकार्य केले आणि या भोंदू बाबाच्या विरोधात एफ आयआर नंबर 287 अन्वये गुन्हा दाखल केला.
या भोंदूबाबाचा इतिहास बघितला तर त्याच्या विरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्याखाली तत्काळ गुन्हा दाखल होणे का गरजेचे असते, हे लक्षात येईल. मूळचा गणीपूर (ता. उमरी) येथील रहिवासी असलेला हा बाबा उच्चशिक्षित असून त्याने काही स्पर्धा परीक्षा दिलेल्या आहेत व आणखीही स्पर्धा परीक्षेची तो तयारी करतो आहे. सम्राट हटकर आणि प्रा. सुलोचना मुखेडकर उमरीला ‘अंनिस’ शाखा नूतनीकरणासाठी गेले असता बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालयातील काही प्राध्यापकांनी गणीपूर मधील एका बाबाविषयी चर्चा केली होती. ‘अंनिस’चे जिल्हा प्रधान सचिव कमलाकर जमदाडे यांनी तेथे जाऊन चमत्कार सादरीकरण केले. तेव्हापासून त्या बाबाने बुवाबाजी बंद केली होती. परंतु असं निदर्शनास आलं की हा तोच बाबा आहे, ज्याने गणीपूर सोडलं आणि भोकर येथे येऊन बाबागिरी सुरू केली होती.
– सम्राट हटकर, नांदेड