-

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस कॉ. सीताराम येचुरी यांचे १२ सप्टेंबर २०२४ रोजी नवी दिल्लीतील ऑल इंडिया मेडिकल सायन्सेसमध्ये निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ७२ वर्षे होते. सीताराम येचुरी हे डाव्या चळवळीचे असाधारण नेते आणि एक नामवंत मार्क्सवादी विचारवंत होते. अतिशय बुद्धिमान विद्यार्थी असलेल्या सीताराम येचुरी यांनी अर्थशास्त्राच्या पदवी आणि पदव्युत्तर या दोन्ही परीक्षांत प्रथम वर्ग संपादन केला होता. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिकत असताना १९७४ मध्ये त्यांनी विद्यार्थी चळवळीत प्रवेश केला आणि ते ‘स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’चे राष्ट्रीय नेते बनले. जेएनयूच्या विद्यार्थी संसदेचे ते दोन वर्षांच्या कालावधीत तीन वेळा अध्यक्ष म्हणून निवडून आले. १९८४ ते १९८६ च्या दरम्यान ‘स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली. सीताराम येचुुरी यांनी १९७५ मध्ये माकपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या राजकीय कार्याबद्दल त्यांना आणीबाणीत अटक करण्यात आली होती. त्यांची २०१५ मध्ये झालेल्या माकपच्या २१ व्या काँग्रेसमध्ये (महाअधिवेशनात) सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली आणि ते पद त्यांनी आजपर्यंत सांभाळले. पक्षाच्या राष्ट्रीय केंद्रातील सामुहिक नेतृत्वाचे एक सदस्य म्हणून तीन दशके कार्यरत राहून त्यांनी वेळोवेळी पक्षाची भूमिका घडवण्यात महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्यांचे विशेष योगदान होते वैचारिक क्षेत्रात. पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘पीपल्स डेमॉक्रसी’ या साप्ताहिकाचे वीस वर्षांहून अधिक काळ ते संपादक होते. त्यांनी विपुल लेखनही केले आहे. ‘व्हॉट इज धिस हिंदु राष्ट्र?’ आणि ‘कम्युनॅलिझम अॅण्ड सेक्युलॅरिझम’ या पुस्तकांतून त्यांनी केलेली हिंदुत्ववादाची सर्वंकष समीक्षा हे त्यांचे विशेष वैचारिक योगदान म्हणून वैचारिक जगात ओळखले जाते.
माकपच्या केंद्रीय कमिटीच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट आणि प्रागतिक व्यासपीठांच्या कामकाजात सहभाग घेतला आणि जगातील समाजवादी देश आणि साम्राज्यवादविरोधी चळवळींशी बंधुभाव वृध्दिंगत केला. २००५ ते २०१७ च्या दरम्यान दोन वेळा त्यांनी राज्य सभेचे सदस्य म्हणून केलेली प्रभावी कामगिरी भारतीयांच्या सदैव लक्षात राहील. अलिकडच्या काही काळात सीताराम येचुरी धर्मनिरपेक्ष विरोधी पक्षांची एकजूट बांधण्यासाठी आपला काळ आणि ऊर्जा विशेष प्रमाणात व्यतीत करत राहिले आणि त्या प्रयत्नांतून ‘इंडिया’ गटाची स्थापना झाली.
खेळकर मनोवृत्ती असल्याने स्नेह्यांचा मोठा समुदाय त्यांच्या भवती असे आणि सर्व प्रकारच्या राजकीय वर्तुळात आणि जीवनाच्या सर्वच क्षेत्रात त्यांचे असंख्य सुहृद आहेत. त्यांची राजकीय निष्ठा आणि बांधिलकी यांचा सर्वच मोठा आदर करीत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अनेक कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेले आहे. आजचे धर्मांध आणि बाजारू राजकारण एका अतिशय जोखमीच्या अवस्थेतून जात असताना कॉ. सिताराम येचुरी यांच्यासारख्या प्रखर विज्ञानवादी मार्गदर्शकाची नितांत गरज होती. त्यांच्या अकाली निधनाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाबरोबरच डाव्या, लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष आणि विवेकी विज्ञानवादी शक्तींचे मोठे नुकसान झाले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक मंडळ आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व कार्यकर्ते कॉ. सीताराम येचुरी भावपूर्ण आदरांजली वाहत अखेरचा लाल सलाम करत आहेत.
– महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती