डॉ. जी. पी. माळी -
कॉ. गोविंदराव पानसरे यांनी १९८८ मध्ये ‘शिवाजी कोण होता?’ हे छोटेखानी पुस्तक लिहिलं आणि शिवाजी महाराजांचं विकृत रूप प्रस्तृत करणार्या धर्मांध व्यक्ती आणि शक्तींना सणसणीत चपराक लगावली. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे समर्थक आणि मुस्लिमांचे विरोधक होते, या अपप्रचाराला चोख प्रत्युत्तर दिलं. रयतेचं राज्य निर्माण करताना त्यांनी मोगल सत्तेशी दोन हात केले. त्याला दोन राजवटींच्या लढ्याचं स्वरूप होतं. ती दोन धर्मांतली लढाई नव्हती. दोन्ही बाजूनं दोन्ही धर्मातले लोक मोठ्या संख्येनं एकमेकांशी लढत होते, ही गोष्ट पुराव्यानिशी दाखवून दिली. महाराजांच्या व्यक्तित्वावर आणि कर्तृत्वावर वस्तुनिष्ठ प्रकाश टाकताना कॉ. पानसरे यांनी खरा शिवाजी वाचकांसमोर आणला आणि पुरंदरेप्रणित खोट्या आणि मतलबी इतिहास लेखनावर वैचारिक हल्ला चढवला. हे सर्व आता आठवायचे कारण म्हणजे, अलीकडेच संजय गायकवाड नावाच्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारानं या पुस्तकाच्या प्रकाशकांना (प्रशांत आंबी) केलेली अर्वाच्य भाषेतील शिवीगाळ आणि दमबाजी. एवढ्या वर्षांनंतरही मनुवादानं पछाडलेले तथाकथित शिवभक्त शिवाजी महाराजांना समजून घेऊ शकलेले नाहीत, याचंच हे द्योतक आहे. केंद्रातल्या आणि राज्यातल्या मदांध सत्ताधार्यांना खरे शिवाजी महाराज समजलेच नाहीत, असं म्हणण्यापेक्षा समजून घेण्याची त्यांची इच्छाही नाही आणि कुवतही नाही असं म्हणणं क्रमप्राप्त ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर ‘विवेकदीप चरित्रमाला’ या सदरात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं कॉ. अनिल चव्हाण यांनी लिहिलेल्या चार पुस्तिकांचं महत्त्व अधोरेखित केले पाहिजे. त्या चार पुस्तिकांचे २० ऑगस्ट २०२६ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतिदिनी झालेलं प्रकाशन स्वागतार्ह म्हटलं पाहिजे. कॉ. गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चारही हुतात्म्यांचा परिचय करून देत असतानाच त्यांच्या कार्याचा परामर्श घेण्याच्या हेतूने कॉ. चव्हाण यांनी लेखनाची जबाबदारी पार पाडलेली आहे. त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. याचं कारण ‘गागर में सागर’ अशा स्वरूपात त्यांनी कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय साध्या, सोप्या व सरळ शैलीत मांडलेला आहे. ‘सोपं लिहिणं अवघड असतं. अवघड लिहिणं सोपं असतं’ याची प्रचिती घडवणारं लेखन या पुस्तिकांमधून आढळतं.
पुस्तिका चार असल्या, तरी त्यातील विचार एकच आहे. या चारही शहिदांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या मारेकर्यांचे विचार एकच आहेत. याविषयीचं प्रबोधन किंवा जनजागरण करण्याच्या हेतूने लेखक प्रवृत्त झाले आणि या चारही पुस्तिका प्रकाशित झाल्या आहेत.
कोण होते कॉ. गोविंद पानसरे?
या पुस्तिकेची सुरुवात लेखकाने कॉ. पानसरे यांच्यावरील १६ फेबु्रवारी २०१५ रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या घटनेने केली आहे. त्यापूर्वी झालेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी असणारे साम्य विशद करून दोघंही राष्ट्रीय एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या भारतीय घटनेतील मूलभूत कर्तव्यांचा आग्रह धरणारे होते, हे स्पष्ट केलं आहे. दोघंही उत्तम वक्ते, निर्भीड आणि अभ्यासू नेते होते. शेवटपर्यंत समाजद्रोही आणि देशद्रोही धर्मांध शक्तींच्या विरोधात दंड थोपटत राहिले व प्राणपणाने लढत राहिले. याचं कारण विचारानं समाज बदलतो यावर त्यांचा ठाम विश्वास होता. भारतीय राज्यघटनेचे संरक्षण करणारे आणि राज्यघटना उद्ध्वस्त करणारे यांच्यातील राजकीय युद्ध असल्याचे नमूद करतानाच कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम असलेले पोलीस खुन्यांचा शोध घेऊ शकत नाहीत, याविषयी खंत आणि तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
महात्मा गांधींचा खून करणार्या नथुराम गोडसेपासून कम्युनिस्टांबद्दल विषारी प्रचार करून शिवसेनेने कॉ. कृष्णा देसाईंच्या केलेल्या खुनापर्यंतचे संदर्भ देऊन खरे खुनी सापडत नसल्याची आणि खून करणारे हात सापडले तरी त्यामागील विषारी मेंदूंचा शोध घेतला जात नाही आणि त्यांना शिक्षा होत नाही, ही बाब लेखकाने प्रकर्षानं मांडलेली आहे. वर्तमानात तर केंद्रात आणि राज्यात अशाच प्रवृत्ती सत्तेपर्यंत पोहोचल्याचं वास्तव निदर्शनास आणलं आहे.
मूळचे अहिल्यानगरच्या असलेल्या पानसरेंची कर्मभूमी कोल्हापूर ठरली. त्यांनी आपल्या संपूर्ण हयातीत कम्युनिस्ट पक्षाचे पुढारी म्हणून भोंदूबुवा आणि धर्मांध शक्तीविरोधी आंदोलन, जातीय दंगलीतील पीडितांना भरपाईचं नियोजन, आम्ही भारतीय लोक आंदोलन, शिवरायांचा खरा इतिहास समजावा म्हणून ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तिकेचं लेखन, आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह घडवून माणुसकी हाच खरा धर्म असल्याचं प्रतिपादन पक्षाच्या १०० कार्यकर्त्यांचं प्रबोधनपर चरित्र लेखनाची मोहीम, व्यसनमुक्ती-टोलमुक्ती आंदोलन, थेट पाईपलाईन आंदोलन, रस्ते खड्डेमुक्त व्हावेत म्हणून कोल्हापूर महापालिकेला रिक्षांचा घेराव घालणारं आंदोलन इत्यादी आंदोलनात नेतृत्व केलं आणि आंदोलनं यशस्वी केली.
संघटना, आंदोलनं, चळवळी, व्याख्यानं, वकिली, कार्यकर्त्यांचं प्रबोधन, राजकारण, समाजकारण, मार्क्सवादाचं आकलन व्हावं म्हणून शिबिरांचं आयोजन इत्यादी माध्यमांतून कॉ. पानसरे यांनी केलेल्या बहुमोल कार्याचा आणि लोकचळवळींचा धावता आढावा कॉ. अनिल चव्हाण यांनी घेतला आहे. समारोपात ‘जिंकणार कोण?’ असा प्रश्न उपस्थित करून “आज तरी धर्मांध सनातन्यांना तात्पुरते यश मिळाले असले, तरी विजय शेवटी भारतीय घटनेतील धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता, समाजवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याच तत्त्वांचा होणार आहे, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. भारतातले धर्मांध जातीयवादी पक्ष आणि संघटना हिटलरला आदर्श मानतात ही गोष्ट लक्षात घेऊन कॉ. पानसरे पॅस्टर मार्टिन निमोलर यांनी लिहिलेल्या कवितेचा नेहमी उल्लेख करत असल्याचे सांगून ती कविता उद्धृत केली आहे.
कोण होते डॉ. नरेंद्र दाभोलकर?
कॉ. पानसरे यांच्या पुस्तिकेप्रमाणेच याही पुस्तिकेची सुरुवात लेखकाने डॉ. दाभोलकरांवरील खुनी हल्ल्यानेच केली आहे. २० ऑगस्ट, २०१३ रोजी त्यांच्यावर हल्ला झाला व कशी खळबळ माजली याविषयीचा तपशील सांगितला आहे. सुरुवातीला डॉ. दाभोलकरांचं घराणं, कुटुंबीय, शिक्षण, बालपण, आवडीनिवडी इत्यादींविषयी सांगून त्यांच्या स्वभावातील चिकाटी, प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची मनोवृत्ती, काळाचे भान, मनाची एकाग्रता, पराभव पचवण्याची तयारी, सोशिकता, शांत स्वभाव, बंधुभाव जपण्याची मानसिकता इत्यादी वैशिष्ट्यांचा ऊहापोह केलेला आहे. खेळाची आवड हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रमुख वैशिष्ट्य होते. त्यांनी खो-खो व कबड्डीच्या अनेक स्पर्धा गाजवल्या. राष्ट्रीय स्तरावर नाव मिळवलं. सांघिक भावना जपण्याची वृत्ती त्यांच्यात निर्माण झाली, याचे मूळ खेळांच्या आवडीत दिसून येते.
मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. पदवी प्राप्त केल्यानंतर साधारण बारा वर्षे त्यांनी वैद्यकीय व्यवसाय केला. डॉ. दाभोलकरांच्या कार्याची खरी सुरुवात ‘समाजवादी युवक दल’ या संघटनेने झाली. नंतर ते बाबा आढावांच्या ‘एक गाव एक पाणवठा’ या चळवळीत सहभागी झाले. सातार्याची संपूर्ण जबाबदारी त्यांनी आपल्या शिरावर घेतली. आणीबाणीच्या काळात पत्रकं वाटणं, भिंती रंगवणे, कार्यकर्त्यांना आश्रय देणे अशा मार्गानं आणीबाणीशी प्रतिकार केला. छात्रभारती आणि राष्ट्र सेवा दल यामध्येही त्यांनी भरीव योगदान दिलं. मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीत त्यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी सातारा ते औरंगाबाद लाँग मार्च काढला. नामांतराच्या लढ्यातील त्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण राहिला.
डॉ. दाभोलकरांचं सर्वांधिक महत्त्वाचं कार्य म्हणजे, १९८९ मध्ये त्यांनी आपल्या सहकार्यांसह महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची केलेली स्थापना. यासाठी त्यांनी उभा महाराष्ट्र पिंजून काढला. गं. बा. सरदार, नरहर कुरुंदकर, सदाशिव अमरापूरकर, प्रा. एन. डी. पाटील, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू अशा डाव्या व पुरोगामी लोकांना समितीशी जोडून घेतलं. बुवा-बाबांच्या चमत्कारांचा पर्दाफाश करण्याचं काम अत्यंत जोमानं केलं. सुमारे पंचवीस वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक मोहिमा राबवल्या. त्यात विज्ञानवाहिनी, युवा एल्गार मोहीम, भानामती धडक मोहीम, शोध भुताचा-बोध मनाचा यात्रा, जटा निर्मूलन मोहीम इत्यादींचा समावेश होता. जादूटोणाविरोधी कायदा जरी त्यांच्या खुनानंतर झाला असला, तरी हा कायदा व्हावा यासाठी त्यांनी सतत १८ वर्षे त्यांच्या खुनापर्यंत अविरत प्रयत्न केले. चळवळ जनतेपर्यंत पोहोचावी म्हणून त्यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ सुरू केलं.
समाजवादी विचारांच्या प्रभावात वाढल्यामुळंच साने गुरुजींनी स्थापन केलेल्या ‘साधना’ साप्ताहिकाच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी तब्बल १५ वर्षे यशस्वीरित्या पार पाडली. राजकारण, समाजकारण, दलित साहित्य, विज्ञान कला, नाट्य अशा विविध क्षेत्रांना प्रतिनिधित्व दिलं.
डॉ. दाभोलकरांचं साहित्य विश्वातील योगदानही लक्षवेधी आहे. ‘भ्रम आणि निरास’, ‘अंधश्रद्धा विनाशाय’, ‘लढे अंधश्रद्धेचे’, ‘विचार तर कराल’, ‘श्रद्धा-अंधश्रद्धा’, ‘ऐसे कैसे झाले भोंदू’ इत्यादी बारा ग्रंथ लिहून त्यांनी समाजप्रबोधनाचा जागर घडवला. शैक्षणिक परिषदा, जातिअंतासाठी आंतरजातीय विवाह, सामाजिक कृतज्ञता निधी यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून डॉ. दाभोलकर सतत क्रियाशील राहिले. म्हणूनच प्रा. एन. डी. पाटील यांनी त्यांचं वर्णन ‘पृथ्वीमोलाचा माणूस’ असं यथार्थ शब्दांत केलं, असं म्हणता येईल.
कोण होते प्रा. एम. एम. कलबुर्गी?
कॉ. पानसरे, डॉ. दाभोलकर यांच्यानंतर धर्मांध शक्तीच्या हल्ल्याला बळी पडलेली तिसरी व्यक्ती म्हणजे. प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी. पुस्तिकेच्या सुरुवातीला त्यांचं बालपण, शिक्षण, अध्यापन आणि संशोधनात्मक कार्याचा आढावा लेखकाने घेतलेला असून लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांच्या संकल्पनेतील लिंगायत धर्माचे स्वरूप नेमक्या शब्दांत विशद केले आहे. लिंग धारण करणारे ते लिंगायत अशी साधी, सोपी व सुटसुटीत व्याख्या सांगून श्रमाला आणि श्रम करणार्यांना प्रतिष्ठा, ग्रंथप्रामाण्याला विरोध, अनुभव मंडपाची स्थापना, वचन साहित्याची निर्मिती या गोष्टी या धर्मात महत्त्वाचे मानले गेल्याचे नमूद केले आहे. स्त्री-पुरुष, सुवर्ण-अवर्ण, पंथ-उपपंथ यासारखे भेद मानू नयेत, देव देवळात नसतो, माणसात असतो, असा मूलभूत विचार मांडल्यामुळे पुरोहित आणि देवालयांचे महत्त्व कसे कमी झाले, याविषयीचे विवेचन केल्याचे लक्षात येते. याचाच परिणाम म्हणून सनातनी वैदिकांनी ही बसवक्रांती मोडून काढली. लिंगायतांवर हल्ले केले, वचन साहित्य नष्ट केले आणि एक प्रकारची प्रतिक्रांती केली. हा सर्व तपशील मांडताना लेखनाच्या ओघात आलेलं ‘समतेचा विचार घेतल्यामुळे बसवेश्वर महात्मा बनले. बसवेश्वरांचा विचार घेतल्यामुळे प्रा. कलबुर्गी महान बनले’, हे वाक्य फार मोठा आशय स्पष्ट करून जाते.
डॉ. कलबुर्गी लहानपणापासून तल्लख बुद्धीचे होते. म्हणूनच एम. ए. होताच ते धारवाड येथील कर्नाटक विश्वविद्यालयात सुरुवातीला प्राध्यापक, नंतर कन्नड विभागप्रमुख, बसवेश्वर अध्ययन पीठाचे प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘विद्यार्थी भारती’ हे त्रैमासिक सुरू करून त्यांनी विद्यार्थ्यांत आदरभाव निर्माण केला. सुमारे चाळीस वर्षे अध्यापन, संशोधन केल्यानंतर निवृत्त होताच त्यांची हंपी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून निवड करून शासनाने त्यांचा यथोचित सन्मान केला. एक समर्थ कुलगुरू म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला आणि आपली निवड सार्थ ठरवली.
शंभरहून अधिक ग्रंथांचे लेखक, अभ्यासक, संशोधक, प्रबोधक आणि समाजसेवक म्हणून डॉ. कलबुर्गी ओळखले गेले. फ. गुं. हळकट्टी यांनी संपादित केलेल्या ‘बसव वचन’ या ग्रंथाला अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहून त्यांनी बहुमोल कामगिरी बजावली आहे. ‘बसवेश्वरासंबंधीचे शिलालेख’ पासून त्यांच्या साहित्यनिर्मितीचा प्रारंभ झाला. नंतरच्या काळात त्यांनी झपाटल्याप्रमाणे लेखन केले. त्यांच्या संशोधनात्मक व विचारप्रवर्तक निबंधांचा सहा खंडांमागील संग्रह म्हणजे ‘मार्ग’, ‘इतिहास’ नावाचा त्यांचा लेखसंग्रह तर एवढा गाजला की, त्यामुळेच शासनाने सर्व वचनकारांची वचनं प्रसिद्ध करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. एकूण १४,४३६ वचनं संग्रह करून त्यांनी हे काम तडीस नेलं. याशिवाय पुरंदरदास, कनकदास यासारख्या संतांचे समग्र साहित्य गोळा करून २५ खंडांमध्ये त्यांनी प्रसिद्ध केले. लिंगायतांमधील उपजातींविषयीची माहितीपूर्ण पुस्तिका असो, अनेक संघसंस्थांची स्थापना असो, लिंगायत हा स्वतंत्र धर्म असल्याविषयीची व्याख्यानं असोत, शिलालेखांचं संशोधन असो, असं विविध प्रकारचं कार्य हिरिरीनं करणार्या डॉ. कलबुर्गींच्या कार्याचा साधार आढावा लेखकाने घेतलेला असून हत्या, वध आणि खून यातील नेमका फरक विशद करून त्याविषयीचा संभ्रम दूर केला आहे.
कोण होत्या गौरी लंकेश?
जातीय सलोखा वाढावा यासाठी सातत्याने मनुवादी प्रतिगामी शक्तींशी कडवी झुंज देणार्या गौरी लंकेश यांचा ५ सप्टेंबर २०१७ रोजी बंगळुरू येथे खून झाला. २९ जानेवारी १९६० रोजी कर्मकांडे न करणार्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. इंग्रजी माध्यमात शालेय शिक्षण पूर्ण होताच सुरुवातीला विज्ञानाचा आणि कन्नड भाषेचा अभ्यास करून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. कालांतरानं चिदानंद रायघट्टा यांच्याशी विवाह झाला; पण तो केवळ पाच वर्षे टिकला. मैत्री मात्र शेवटपर्यंत राहिली. विशेष म्हणजे, गौरीच्या खुनानंतर तिच्या पतीनं तिचं चरित्रही प्रकाशित केलं.
गौरी यांना वडिलांकडून लढाऊ वारसा लाभला. वडिलांनी ‘लंकेश पत्रिका’ चालवली. जाहिराती आणि शासकीय आश्रयाशिवाय पत्रिका चालवणं, हे त्यांचं वैशिष्ट्य. हाच वारसा गौरी यांनीही पुढे चालवला. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ आणि ‘संडे मॅगेझिन’ यासाठीही त्यांनी काम केलं. ‘लंकेश पत्रिके’चे वैशिष्ट्य म्हणजे, देशात शांतता, सलोखा नांदावा, भ्रष्टाचार नष्ट व्हावा, लोकशाही बळकट व्हावी यासाठी भूमिका घेऊन आणि आव्हान समजून वाटचाल केली. हिंदू-मुस्लीम मूलतत्त्ववाद्यांना परखड विरोध हा त्यांचा बाणा होता, त्यासाठी आक्रमक लेखन करून त्यांनी पत्रिकेची उंची वाढवली. बेनझीर भुत्तो यांचं छोटेखानी चरित्र लिहून अभ्यासू वृत्तीची झलक दाखवली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार, कृतिशील विचारवंतांचं कौतुक, लुटारू कंपन्यांना विरोध, बेंगळुरू शहराला महसुलीच्या प्रमाणात रस्ते, वीज, पाणी इत्यादी सोयी मिळण्याविषयीचा आग्रह, अन्यायाला विरोध, उडुपी मठाविरुद्ध संघर्ष याबरोबरच देशद्रोही, अतिरेकी, अर्बन नक्षल असे शब्द वापरून खोट्या केसेस घालणार्या सत्ताधार्यांविरोधात त्यांनी शेवटपर्यंत आवाज उठवला. हे सहन न झाल्यामुळेच धर्मांध शक्तींनी त्यांचा खून केला. ‘गौरी लंकेश यांचं कार्य आपण पुढं नेऊ या’ अशा शब्दांत कॉ. अनिल चव्हाण यांनी पुस्तिकेच्या समारोपात आवाहन केले आहे.
-प्राचार्य डॉ. जी. पी. माळी, कोल्हापूर
मो. ९४२०९३१२४०
