सुजाता म्हेत्रे -
श्रमिक प्रतिष्ठान कोल्हापूरद्वारे प्रकाशित केलेले व प्रा. डॉ. विलास रणसुभे यांचे संपादन असलेले अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते कॉ. के. डी. खुर्द यांच्यावरील “विवेकदीप” हे पुस्तक, १३ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रकाशित झाले.
प्रा. डॉ. रणसुभे सरांनी आपल्या संपादकीयामध्ये ‘श्रमिक प्रतिष्ठान’ने यापूर्वी कोल्हापूरमधील कर्तृत्ववान व चळवळीतील अनेक व्यक्तींना प्रकाशात आणले आहे’, असे सांगितले आहे. त्या कोल्हापूर घडवणार्या व्यक्तींमध्ये खुर्द सरांचा उल्लेख होतो आहे. खुर्द सरांच्या कार्याला महाराष्ट्रापुरते मर्यादित न ठेवता ते राष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी हे पुस्तक इंग्रजी व हिंदीमधून भाषांतरित करण्याचा मानस ‘संपादकीय’मध्ये रणसुभे सरांनी व्यक्त केला आहे, तोही लवकरच पूर्णत्वास जाईल ही अपेक्षा!
कोल्हापूरमधील अनेक चळवळींशी खुर्द सरांचा जवळून संबंध आला. चळवळींना अनेक प्रकारे त्यांचे मार्गदर्शन लाभले. सरांचा हा स्मृतिग्रंथ तयार होत असताना या चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करणारे लेख पुस्तकासाठी दिले आहेत. एकूण २५ लेख या पुस्तकामध्ये वाचायला मिळतील. खुर्द सरांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून दिला गेलेला पहिला जीवनगौरव पुरस्कार मिळाला त्या वेळी गौरव ग्रंथासाठी लिहिलेला कॉम्रेड पानसरे यांचा लेख ‘सामाजिक भान असलेला कार्यकर्ता’ या पहिल्या लेखातून खुर्द सरांच्या बालपणीपासून त्यांची जडणघडण व जीवनकार्य उलगडले आहे. ‘माझ्यावर नितांत प्रेम करणारा माणूस,’ हा डॉक्टर आ. ह. साळुंखे सरांचा लेख. यामध्ये खुर्द सरांची वृत्तपत्रामधील वाचकांची पत्रे याचा उल्लेख करत त्यातूनच या हृदयापासून त्या हृदयापर्यंत जोडलेले एक भावस्पर्शी नाते डॉ. साळुंखे सरांनी उलगडले आहे.
शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्रमुख डॉ. अशोक चौसाळकर, ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांनी ‘समाजसेवक’ आणि ‘विज्ञाननिष्ठ समाजशिक्षक’ असा सरांचा गौरव केला आहे. डॉ. श्रीराम पवार यांनी ‘विवेक वाटेवरचा पथिक’ म्हणून सरांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पत्रकार विश्वास पाटील, पर्यावरणवादी कार्यकर्ते उदय गायकवाड, खुर्द सरांचे परममित्र कॉ. दिलीप पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते, मित्र यांचे लेख वाचत असताना अनेक अंगानी खुर्द सरांचे जीवन आणि त्यांच्यातील समाजसेवक, कार्यकर्ता उलगडत जातो. ‘के. डी. खुर्द – दाभोलकर, पानसरे यांचा सच्चा सैनिक,’ या लेखातून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी त्यांची विचारांचे पाईक असण्याची वाटचाल लिहिली आहे.
‘परिवर्तनाची शाळा’ या लेखातून लेखक उमेश सूर्यवंशी यांनी, ‘समाजशिक्षक’ म्हणून मिलिंद यादव यांनी लिहिलेला लेख, तर सुजाता म्हेत्रे यांनी ‘समाज शिक्षणातील नंदादीप’ या लेखातून शिक्षक आणि शिक्षणाप्रति खुर्द सरांची असलेली समाजपरिवर्तनाची जाणीव दिसून येते. रमेश वडणगेेकर, सीमा पाटील यांनीही नवीन कार्यकर्त्यांना जोडून घेणारे आणि योग्य मार्गदर्शनासह प्रेमाने बांधून ठेवणारे खुर्द सर यांचे कौशल्य भावनिकपणे मांडले आहे.
दाभोलकरांच्या विचाराने प्रेरित झालेला आणि त्यांच्याच मुळे पण त्यांच्यापूर्वी खुर्द सरांना भेटणारा एक कार्यकर्ता हर्षद लवंगारे ‘माझे प्रति दाभोलकर’ असा त्यांचा उल्लेख करतो. ‘निवृत्ती न स्वीकारणारे खुर्द सर,’ या प्रसाद कुलकर्णी यांच्या लेखातून तहहयात अथक कार्यरत असणारे खुर्द सर वाचायला मिळतात.
‘कुटुंबवत्सल तात्या’ या अंगाने खुर्द सरांचे व्याही चंद्रकांत भस्मे, डॉ. स्वाती पाटसकर, त्यांच्या स्नुषा वीणा खुर्द आणि चिरंजीव संजीव खुर्द यांनीही प्रेमळ पण तत्त्वनिष्ठ असणारे खुर्द सर भावपूर्णपणे दाखवून दिले आहेत.
मुखपृष्ठावर ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे’ ज्येष्ठ कार्यकर्ते कॉम्रेड के. डी. खुर्द सरांचा ठळक बोलका फोटो आहे. निग्रही, निर्भय आणि मृदुभाषी असणार्या सरांचा फोटोही तसाच बोलका आहे. मुखपृष्ठावर खुर्द सरांच्या शिक्षणविस्तार अधिकारी म्हणून असणार्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि समाजासाठी दिलेल्या अनेक महत्त्वाच्या उपक्रमांची छायाचित्रे आहेत. यामध्ये शाळेतील विद्यार्थिनींचे जटा निर्मूलन होत असतानाचे, गणपती विसर्जनामध्ये निर्माल्य दान उपक्रमाचे तसेच गणपती विसर्जनामधीलच विसर्जित ‘गणपती दान करा’ मोहिमेतील मान्यवरांच्या व विद्यार्थी स्वयंसेवकांसोबतची छायाचित्रे आहेत. कोल्हापूरमधील भोंदू महाराज – तोडकर महाराजविरोधी आंदोलनाचे एक छायाचित्रही यामध्ये समाविष्ट आहे. प्रवाहाच्या विरोधी काम करत असताना प्रचंड मित्रपरिवार असणारे आणि कुटुंबवत्सल खुर्द सरांची काही छायाचित्रे मलपृष्ठाच्या आतील पृष्ठावर छापलेली दिसतात. डॉ. दाभोलकर यांच्यासोबतचे छायाचित्रही येथे समाविष्ट आहे.
चळवळीतील सर्वच कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरणारे हे पुस्तक प्रत्येक कार्यकर्त्यांच्या संग्रही असावे, हे प्रेमाचे आणि आग्रहाचे आवाहन!
– सुजाता म्हेत्रे
कार्यकर्ता, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती.
विवेकदीप
किंमत : 100 रुपये
प्रकाशक :- श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर.
संपर्क :- आनंदराव परुळेकर मो. 9423264939
(दहा पुस्तके खरेदीवर ३०% सूट)
