विक्रम श्रीपाल ललवाणी -
मला अजूनही तो प्रसंग आठवतो. मी सात/आठ वर्षांचा असेन. मी माझ्या आत्याकडे गेलो होतो. ते एक छोटेसे गाव होते. आत्याचे ऐसपैस घर व मागे शेती होती. तिथे एक पाण्याचा हौद होता. आम्ही मुलं तिथे खेळत होतो. अचानक एक मुलगा ओरडला, साप साप! मुलं सगळी घाबरून पळाली. मी पाहिले, एक छोटेसे सापाचे पिल्लू वळवळत होते. मी पटकन त्याच्या तोंडाजवळ पकडून त्याला उचलले. तोपर्यंत आजूबाजूची मंडळी धावत तेथे आली. शेतावरचा एक गडी म्हणाला, टाक त्याला खाली, या दगडाने त्याला मारून टाकू. बहुतेकांचे तेच म्हणणे होते. मी आणि माझी बहीण मात्र सांगत होतो, त्याला मारू नका. त्याला लांब सोडा. माझ्या आत्यानेही तेच सांगितल्यावर त्या सापाच्या पिल्लाला लांब झाडीत सोडण्यात आले. दिसला साप की मारा असे न करता सापाला त्याच्या अधिवासात सोडले पाहिजे हा विवेकी विचार माझ्यात कोठून आला? मला जसे समजते तसे माझे पप्पा अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत आहेत. यासंबंधी घडलेल्या घटना, मिटींगमध्ये झालेला विचारविनिमय याची ते कायम घरात चर्चा करत. यातून माझी वैचारिक जडणघडण झाली. लहानपणीच श्रद्धा-अंधश्रद्धा या गोष्टी समजू लागल्या. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पगडा विचारांवर बसला. विवेकाने केवळ विचार करायचे नाहीत तर आचरणही करायचे हे मनावर ठसले. तसे असे आचरण करणे हे सोपे नव्हते, एक प्रकारे ते प्रवाहाविरुद्ध पोहणेच होते! आजूबाजूला बहुतेक नातेवाईक, मित्रपरिवार हा बर्यापैकी अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला होता, पण घरात असलेली डॉ. नरेंद्र दाभोलकरांची पुस्तके वाचून विचार पके होत गेले. वेळप्रसंगी वादविवादही होत असे. पुढच्याने कितीही वाद घातला, दबाव आणला तरी मी माझे विचार सोडले नाही. पप्पांचे उदाहरण समोर होतेच. आत्ताही आमचा शालेय मित्रांचा व्हॉटस्अॅप ग्रुप आहे. बहुतेक सनातनी विचारांचे आहेत. आम्ही दोघं-तिघेजणच पुरोगामी विचारांचे आहोत. पण कोणत्याही गोष्टीवर वाद झाला की पुढच्यांना निरुत्तर करतो. काहीजणांना पटते, मात्र काहीजण विरोधासाठी विरोध करतात. अशा वेळी वाद न घालता गप्प बसायचे हे अनुभवातून शिकलो. वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारल्यामुळे आमच्या घरात कधीही मंत्रतंत्र, बुवाकडे जाणे, ज्योतिष पाहणे, नवससायास करणे या गोष्टी होत नाही, कितीही प्रखर समस्या असली, तरी विवेकाने विचार करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. माझी पत्नीही सुरुवातीला पारंपरिक विचारांची होती, पण तिलाही आता हे विचार पटतात. जेवढे जमेल तेवढे ती पप्पांना त्यांच्या कामात सहकार्य करते. पूर्वी काही नातेवाईक मंत्रतंत्र करण्यासाठी मला आग्रहाने सांगत. आत्ता त्यांनाही कळून चुकले की आम्ही आमच्या विचारांवर ठाम आहोत. उलट असे काहीही न करता आमची प्रगती झाली, हे ते मान्य करतात. अंधश्रद्धा निर्मूलनाबरोबरच स्त्री-पुरुष समानतेचेही विचार पकेझाले. बहिणीला, पत्नीला कधीच दुय्यम वागणूक दिली नाही. आईचे विचार काहीसे वेगळे असले तरी तेही समजून घेण्याचा आणि त्याचा आदर करण्याचा प्रयत्न केला. अं.नि.स.चा आणखी एक विचार साधेपणानं राहणे, कमी खर्चात कुठलाही कार्यक्रम करणे हे मात्र तितकेसे जमत नाही. Simple living high thinking यापेक्षा आमची पिढी High living, high thinking वर अधिक विश्वास ठेवते. अं.नि.स.च्या विचारांमुळे सामाजिक बांधिलकीने वागायचे मनावर ठसले. माझ्या पत्नीने जेव्हा व्यवसायात उतरायचे ठरवले तेव्हा व्यवसाय हा फक्त आणि फक्त नफ्यासाठी न करता त्यातून काही Social Cause कसा Serve करता येईल ह्याचे भान ठेवणे आम्हा कुटुंबीयांना महत्त्वाचे वाटले, त्यास कारण चळवळीतील सामाजिक बांधिलकी जपण्याचा विवेकी विचार होय. एकंदर समाजातले अंधश्रद्धेचे प्रमाण किती प्रचंड आहे, अनिष्ट रूढींमुळे समाजाचे किती नुकसान होत आहे, आधुनिक बुवाबाजीचे (छद्म विज्ञान) वाढते प्रमाण पाहून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य किती महत्त्वाचे व समाजोपयोगी आहे, हे लक्षात येते. पुढील पिढीतही हे विचार रुजवतच आहे. अर्थार्जन व उपजीविकेतून मोकळा झाल्यावर या कामासाठी वेळ देण्याचा मानस आहे.
(विक्रम ललवाणी हे पुणे येथे चार्टर्ड अकौंटंट आहेत.)