-

रामासामी पेरियार हे एक बुद्धिप्रामाण्यावादी विचारवंत होते. ते नेहमीच आपल्या भाषणातून अंधश्रद्धेवर प्रहर करत. प्राचीन काळापासून मनुष्याला आपल्या भविष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यामुळे माणूस ज्योतिषाकडे जात असतो आणि परिणामतः आपले आर्थिक व मानसिक नुकसान करून घेतो. पेरियार यांनी फार पूर्वी म्हणजेच १९३० साली ‘कुडी अरासु’ या मुखपत्रात या थोतांडावर जळजळीत भाष्य केले आहे.
ते म्हणतात की, ‘आपला समाज एक सुसंस्कृत समाज आहे ज्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कशुद्ध विचारसरणीमध्ये आधुनिक काळात खूप मोठी प्रगती झाली आहे, परंतु तरीही बहुतेक लोक ज्योतिष, हस्तरेखा, कुंडली, सूर्य आणि चंद्र चिन्हे, ग्रहांचे प्रभाव, तारे, शुभ वेळ आणि अशुभ वेळ यासारख्या अनेक प्रकारच्या छद्म विज्ञानाला चिकटून राहतात. आपल्याला अशा भोळ्या लोकांना अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढायला हवे.’
तर्कशक्ती व चिकित्सा
फक्त मानवांना नैसर्गिकरीत्या तर्क करण्याची क्षमता दिली आहे. ही शक्ती आपल्याला प्राण्यांपासून वेगळे करते. आपल्याला चुकीच्या समजुती, अंधश्रद्धा आणि चुकीच्या धारणा दूर करण्यासाठी याचा विवेकाने वापर करायला हवा. ज्योतिषावर विश्वास ठेवणे आपल्याला पूर्णपणे तर्कहीन बनवते.
आपल्या भोवतीचे ज्योतिषी लोकांना विविध प्रकारे फसवतात. ते जन्माचा महिना, दिवस, तारीख आणि वेळ तपासतात आणि विविध भाकिते करतात. जन्माची वेळ कशी अचूक असू शकते? याचा अर्थ गर्भात जीवन निर्माण झाले तेव्हा किंवा त्याच्या जन्माच्या वेळी? हे अचूकपणे कसे ठरवता येईल? नर्सने अचूक वेळ नोंद करण्यात उशीर केला असेल तर? जन्माची वेळ नोंदवण्यात त्रुटी होण्याची इतर कारणे असू शकतात. जेव्हा अशी अनिश्चितता असते, तेव्हा रुग्णालयाने नोंदवलेल्या वेळेवर अवलंबून ज्योतिषी नवजात बाळाबद्दल काहीही भाकीत कसे करू शकतो? हे पूर्णपणे हास्यास्पद नाही का वाटत?
ज्योतिषी आपली तुंबडी भरण्यासाठी अनेक युक्त्या वापरतात. ते नवजात बालकाबद्दल काहीतरी सांगण्यासाठी पालक आणि नातेवाईकांच्या कुंडल्यादेखील बघतात. हे हास्यास्पद नाही का वाटत? काही ज्योतिषी लोकांना एक संख्या किंवा फुलाचे नाव विचारून भविष्यवाणी करतात. काहीजण कुंडलीत काही अशुभ आढळल्याचे भासवतात आणि ते दुरुस्त करण्यासाठी उपाय सुचवतात. दोष दुरुस्त केले गेले तर कुंडलीच खोटी असावी, नाही का? शिवाय, लोक या फसवणूक करणार्यांनी सुचवलेल्या विधींचे पालन करून मोठ्या प्रमाणात पैसे वाया घालवतात. हे खरोखरच चकित करणारे आहे. रामासामी पेरियार यांनी त्या काळातील मुलाच्या जन्मदरावरून ज्योतिषाचा पोलखोल केला आहे.
पेरियार या लेखात पुढे म्हणतात, भारतात विविध ठिकाणी आणि विविध शहरांमध्ये दर मिनिटाला ३३ बाळांचा जन्म होतो, जेव्हा ही ३३ बाळे मोठी होतील, तेव्हा त्यांचे जीवन सारखे असेल का? १२६ मिनिटांत ४१५८ मुलांचा जन्म होतो; त्यापैकी बहुतेक ग्रह, तारे आणि राशींच्या समान स्थितीत जन्मले असतील, तर या ४१५८ व्यक्तींचे जीवन मोठे झाल्यावर समान असेल का? अनुभवांती हे सिद्ध झाले आहे की, एकाच राशीच्या प्रभावाखाली जन्मलेल्या दोन व्यक्तींचे स्वभाव, आवडी-निवडी एकसारखे नसतात.
जगात एका विशिष्ट वेळी जन्मलेल्या हजारो लोकांचे जीवन एकाच प्रकारच्या मनोवृत्ती आणि दृष्टिकोनासह एकसारखे कसे असू शकते? हे खरोखरच गोंधळात टाकणारे आहे. त्यांच्या सर्व जीवनातील घटना आणि अनुभव सारखे असतील का? दोष आपल्यात असतात; पण आपण निसर्गातील तार्यांना आणि ग्रहांना दोष देत राहतो. याचाच अर्थ आपले लोक तर्क करण्याची क्षमता वापरण्यात अपयशी ठरतात. हे त्यांच्या तर्कहीन वर्तनाचे मूळ कारण आहे, असे पेरियार म्हणत असत.
लग्न मुहूर्त : एक थोतांड
पेरियार यांनी लग्न मुहूर्तावरसुद्धा त्या काळी खूप जळजळीत भाष्य केले होते. ते म्हणतात भारतात सर्रास कुटुंबातीलच जाणते आपल्या मुलामुलीची लग्ने ठरवतात आणि तीही मुहूर्त पाहूनच. मुहूर्त नसेल तर अनेक लग्न पुढे ढकलली जातात. जर मुलीची कुंडली मुलाच्या कुंडलीशी जुळत नसेल तर अनेक लग्ने रद्द केली जातात. जन्मकुंडलीत मंगळ असलेल्या मुलीने फक्त मंगळ असलेल्या मुलाशीच लग्न करावे अशी अपेक्षा असते. या हास्यास्पद जुळवणी प्रक्रियेमुळे अनेक मुली अविवाहित राहतात. पेरियार म्हणत, ‘कुंडल्या म्हणजे खरं तर भयकुंडल्या आहेत.’ त्या जीवन उद्ध्वस्त करतात आणि लग्नांना अडथळा आणतात. तथापि काही लोकांकडे कुंडली नसते. आपण त्यांना आनंदी आणि शांततामय जीवन जगताना पाहिले आहे. त्याउलट कुंडली जुळवून केलेली लग्ने अपयशी ठरताना पाहिली आहेत. लग्न मोडण्याची किंवा घटस्फोट होण्याची दुसरी कारणे असतात, मात्र ज्योतिषी कुंडलीकडे बोट दाखवतो हे अत्यंत हास्यास्पद आहे. म्हणूनच पेरियार यांनी स्वाभिमानी लग्ने ‘सेल्फ रिस्पेक्ट मॅरेज’ पद्धत चालू केली. आत्तापर्यंत लाखो लोकांची लग्ने या पद्धतींनी झाली आहेत.
ज्योतिषी लोकांना अनेक वेळा अशुभ मुहूर्त दाखवून धमकावतात आणि कुटुंबीय कार्यक्रम शुभ मुहूर्तावर सुरू करण्याचा सल्ला देतात. हा आणखी एक भ्रम आहे. मला वाटते की, आपल्या जीवनातील प्रत्येक सेकंद कोणत्याही गोष्टीसाठी चांगला आहे. चांगले किंवा वाईट असे काही नाही. आपल्यापैकी बहुतेक लोक दरवर्षी अशुभ मुहूर्ताच्या भीतीमुळे निष्क्रिय राहून अनेक दिवस वाया घालवतात. या अंधश्रद्धेमुळे उत्पादक कामात अडथळा येतो. तरुण पिढीतील वाचकांनी अशा भीतीपासून मुक्त व्हावे. काही वेळा डॉक्टरसुद्धा मुलाच्या जन्माची वेळ आणि तारीख अनुकूल होईपर्यंत बाळंतपण पुढे ढकलण्याची विनंती करतात. हे आई आणि मुलाचे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. या मागे फक्त अशुभ मुहूर्ताची भीती असते आणि ज्योतिषी याचाच गैरफायदा घेतात.
हस्तरेखाशास्त्र आणि इतर विकृती
आपल्या हातांवरील रेषा निसर्गाची कृती आहेत. त्या आपल्या जीवनाचा मार्ग कसा ठरवू शकतात? काही ज्योतिषी भविष्यवाणी करण्यासाठी पोपटांचा वापर करतात. लोक ज्योतिषाच्या भविष्यवाणीवर अवलंबून आनंदी किंवा दुःखी होतात. लोक त्यांच्या कुंडलीतील त्रुटी दूर करण्यासाठी निरर्थक विधी व उपाय करतात. पेरियार यांच्या मते निरर्थक विधींनी किंवा उपायांनी जर संभाव्य दुःख टाळता येत असेल तर, याचा अर्थ कुंडलीच अपूर्ण आहे. अपूर्ण कुंडलीवर विश्वास ठेवून आपण एकमेकांना दोष का द्यावा? पेरियार यांच्या मते ज्योतिषाच्या थोतांडावर वैज्ञानिक दृष्टिकोन हाच एक उपाय आहे.
–रुपाली आर्डे-कौरवार, राहुल थोरात, प्रा. डॉ. अशोक कदम