प्रा. प. रा आर्डे -
‘एकटा’ हे रघुनाथ धोंडो कर्वे या प्रख्यात बुद्धिप्रामाण्यवादी समाजसुधारकाचे चरित्र नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. उमेश मुरलीधर सूर्यवंशी या कोल्हापूर येथील तरुण लेखकाने हा ग्रंथ लिहिला आहे. रघुनाथ धोंडो कर्वे हे प्रख्यात समाजसुधारक धोंडो केशव कर्वेयांचे चिरंजीव. उच्च शिक्षण घेतलेल्या रघुनाथरावांना प्राध्यापकी करून सुखाने आपले जीवन घालविता आले असते; पण त्यांना एका सामाजिक प्रश्नाने अस्वस्थ केले आणि या प्रश्नावर आधारित लोकप्रबोधन करण्याचा मार्ग त्यांनी निवडला. कुटुंबनियोजनाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. लोकसंख्या नियंत्रणासाठी संततिनियमन आणि त्यासाठी संततिप्रतिबंधक साधनांचा उपयोग, याचा प्रचार त्यांनी सुरू केला; पण त्यांच्या काळातील समाजाला त्यांचे हे विचार मानवले नाहीत. धार्मिक संघटनांनी रघुनाथरावांच्या विरोधात खटले भरले, तरी देखील ते घाबरले नाहीत. त्यांचा हा लढा एकाकी होता म्हणून लेखकाने या ग्रंथाचे शीर्षक ‘एकटा’ असे निवडले. ते सार्थच आहे.
शतकापूर्वी होऊन गेलेल्या एका विचारवंताची तळमळ आणि आपल्या कार्यावरची त्यांची निष्ठा लेखकाला भावली आणि त्यांनी भारावलेल्या अवस्थेत हे पुस्तक लिहिले आहे.
र. धों. कर्वे यांचा जीवनपरिचय यापूर्वी डॉ. य. दि. फडके आणि डॉ. आनंद देशमुख यांनी ग्रंथरुपाने करून दिला आहे; पण त्यांच्या पुस्तकापेक्षा उमेश सूर्यवंशी यांचे हे पुस्तक वेगळ्या शैलीत लिहिले आहे. छोट्या-छोट्या लेखांमधून रघुनाथरावांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू लेखकांनी स्पष्ट केले आहेत.
गणिताची उच्च पदवी मिळाल्यावर रघुनाथरावांनी प्राध्यापक म्हणून काम करायला सुरुवात केली; पण त्यांच्या स्वाभिमानाला धक्का देणार्या प्रसंगांनी त्यांनी प्राध्यापक पदाचा तात्काळ राजीनामा दिला. थेट प्राचार्याला त्यांनी तोंडावर सांगितले –
“गणित शिकवायला तुम्हाला हजारो शिक्षक मिळतील; पण जे मी करू इच्छितो, त्या कामाकरिता माझ्याशिवाय दुसरा माणूस भेटणे कठीण.” संतती नियमनाच्या त्यांच्या प्रचाराला महाविद्यालयातील इतरांनी आक्षेप घेतला. स्वाभिमानी रघुनाथरावांनी कार्याप्रती असलेल्या निष्ठेला महत्त्वाचे मानले. पुढे, संतती नियमनाचा प्रचार करणारे ते समाजशिक्षक बनले. हा प्रसंग ‘शिक्षक ते समाजशिक्षक’ या प्रकरणातून मुळातूनच वाचण्यासारखा आहे.
संतती नियमनाबरोबर रघुनाथरावांनी या विषयाशी पूरक अशा इतरही शास्त्रीय गोष्टींवर भर दिला आहे. ‘आहारशास्त्र’ हे त्यांचे एक प्रसिद्ध पुस्तक. कामवासनेपेक्षा अन्नसुद्धा अधिक महत्त्वाचे असा विवेकी विचार ते आपल्या पुस्तकात मांडतात. त्याचबरोबर शरीरस्वच्छता आणि इतर संबंधित विषयांवर रघुनाथरावांनी लेखन केले, त्याचा परिचय या ग्रंथात लेखकांनी करून दिला आहे.
सामाजिक किंवा कोणतेही काम करत असताना ‘बुद्धी की भावना’ या द्वद्वांत बुद्धिप्रामाण्याचे महत्त्व र. धों.च्या विचारांचं वैशिष्ट्य आहे. शास्त्रीय आधाराचा उपयोग महत्त्वाचा आहे. बुद्धिवादाचे महत्त्व त्यांनी ‘रिझन’ या मासिकात स्पष्ट केले आहे. ‘बुद्धी की भावना;’ तसेच ‘श्रद्धा की बुद्धी’ असा प्रश्न जेव्हा उभा राहतो, तेव्हा बुद्धिवादाचे महत्त्व जाणायला हवे, असे विचार रघुनाथराव आपल्या लेखांमधून मांडत. धर्म हा श्रद्धेवर आधारलेला असतो, तेव्हा ‘धर्म की विज्ञान’ याही प्रश्नाचे उत्तर द्यावे लागते. रघुनाथराव हे बुद्धिनिष्ठ नास्तिक होते. नास्तिकत्वाचे त्यांनी समर्थन केले आहे. बुद्धिवादाबद्दलची त्यांची भूमिका या पुस्तकात विविध लेखांद्वारे त्यांनी मांडली आहे. ‘बुद्धी की भावना’, ‘श्रद्धाविरोधी बुद्धी’,‘शास्त्रीय आधार सर्वोच्च’, ‘संस्कृत व बुद्धिवाद’, ‘अंधश्रद्धा विनाशाय’, ‘नास्तिकता’ अशा विविध लेखांबाबत रघुनाथरावांचा बुद्धिप्रामाण्यवाद लेखक सूर्यवंशी यांनी सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोचवला आहे.
बुद्धिप्रामाण्यवाद आणि धर्म यांच्यातील वाद प्राचीन काळापासून चालत आला आहे. बुद्धिप्रामाण्यवादातून मिळालेलं सत्य धर्मविरोधी असेल, तर धर्मवादी त्यावर तुटून पडतात. बुद्धिप्रामाण्यवादाचा स्वीकार करताना धर्माची चिकित्सा अटळ आहे आणि ती केलीच पाहिजे, हे रघुनाथरावांचे मत होते. संततिनियमनाच्या कार्यात खरंतर सामाजिक हिताचा विचार करता बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोनातून काहीही गैर नव्हते; पण धार्मिकांनी त्याला विरोध केला. तो विरोध रघुनाथरावांना मान्य नव्हता, म्हणून त्यांनी एकूणच धार्मिक कल्पनांवर आसूड उगारला. धर्मचिकित्सेवर ‘धर्मगुरूंची लबाडबाजी’, ‘विचारवंतांचा धार्मिक मूर्खपणा’, ‘धर्मवाद्यांच्या घातक उणिवा’, ‘अंधश्रद्धा विनाशाय’ अशा शीर्षकांचे विविध लेख लेखकांनी या ग्रंथात समाविष्ट केले आहेत. त्यातून र. धों.च्या कणखर बुद्धिवादाचा आणि धर्मचिकित्सेचा विचार लेखकांनी योग्य शब्दांत मांडला आहे. हे लेख मुळातूनच वाचण्यासारखे आहेत. र. धों.चे सगळ्यात महत्त्वाचे ऐतिहासिक कार्य म्हणजे संतती नियमनाचा त्यांचा विचार आणि आचार. यासंदर्भात लैंगिक शिक्षणाची गरज रघुनाथरावांनी ‘वसंत’ या मासिकाच्या दिवाळी अंकात लेख लिहून व्यक्त केली आहे. आपली लैंगिक शिक्षण, संततिनियमन आणि त्यातून समाजस्वास्थ्य या विषयांवरील भूमिका रघुनाथरावांनी ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकातून मांडायला सुरुवात केली. या मासिकावर 1931 मध्ये पहिला खटला भरला गेला. दुसरा खटला 1933 मध्ये झाला, हे खटले रघुनाथराव जिद्दीने लढले; त्यात त्यांना अपयश आले, तरी आपले सामाजिक कार्य त्यांनी सोडले नाही.
गोपाळ गणेश आगरकर यांच्यानंतर त्यांच्याइतकाच प्रखर बुद्धिवाद निर्भयपणे मांडणारी एकमेव व्यक्ती म्हणजे रघुनाथ धोंडो कर्वे. वादळी, तत्त्वनिष्ठ विचार मांडणार्या आणि जगणार्या रघुनाथरावांनी आपल्या ध्येयापासून कधीच फारकत घेतली नाही. बुद्धीच्या कसोटीवर न पटणार्या सर्व धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धांशी, रुढींशी संघर्ष करणारा आणि लोकांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सहिष्णुता रुजवणार्या या थोर पुरुषाला लढाई एकाकीपणे लढण्याची वेळ यावी, या विचाराने अस्वस्थ व्हायला होते आणि ‘Great Spirits have always encountered violent opposition by mediocre minds;’ म्हणजेच सामान्य कुवतीच्या लोकांनी श्रेष्ठ विचारवंतांचा नेहमीच तीव्र विरोध केला आहे.
या वचनाप्रमाणे रघुनाथरावांना देखील सामान्य कुवतीच्या माणसांचा विरोध सहन करावा लागला आहे; पण उशिरा का होईना त्यांच्या विचारांना आज समाजमान्यता आणि राजमान्यता मिळाली. विचार मारले जात नाहीत, याचा पुरावा म्हणजे रघुनाथरावांचे कर्तृत्व.
रघुनाथरावांचं वैचारिक थोरपण लेखकाने या पुस्तकात प्रभावी रीतीने मांडले आहे. त्यांच्या एकाकी प्रवासाची हृदयस्पर्शी ओळख लेखकाने विविध लेखांतून मांडली आहे. र. धों. किती थोर आणि द्रष्टे होते आणि प्रवाहाविरुद्ध पोहणारे कसे निर्भय, बुद्धिवादी व्यक्तिमत्त्व होते, हे समजून घेण्यासाठी ‘एकटा’ हे पुस्तक मुळातूनच वाचायला हवे. बुद्धिवादाचे समर्थन करणारे एक छान पुस्तक लिहिल्याबद्दल लेखकाचे मन:पूर्वक आभार..!
पुस्तकाचे नाव : एकटा
लेखक : उमेश मुरलीधर सुर्यवंशी
मो. : 9922784065
प्रकाशकाचे नाव : प्रयास पब्लिकेशन, कोल्हापूर
पृष्ठे : 180
मूल्य : रूपये 200