डॉ. शंतनु अभ्यंकर -
कोणताही दावा, कारण, कार्यकारणभाव, पुरावा तपासता येण्याजोगा असावा, हे विज्ञानाचं तत्त्व. त्याचबरोबर अशा तपासणीची तयारीही असायला हवी. जिथे तपासणीला, खात्री करण्याला, विरोध असेल तिथे काहीतरी पाणी मुरते आहे, असं बेलाशक समजावे.
जादूचे प्रयोग तुम्ही पाहिलेच असतील. जादूगार रिकाम्या टोपीतून ससा काढून दाखवतो. आमच्या गावात सोमवारच्या बाजारात एकदा एक गारुडी आला होता. सापा-मुंगसाच्या लढाईबरोबरच त्याने जादूचे अनेक प्रयोग दाखवले. आम्ही अगदी हरखून गेलो. एकदा तर त्याच्या हातातला बॉल त्यानं हा-हा म्हणता गायब करून टाकला आणि थोड्यावेळाने तो माझ्या चड्डीतून काढून दाखवला! हा चमत्कार पाहताच सगळेजण हसू लागले.
इतकंच कशाला; आमच्या शाळेच्या वसतिगृहात एकदा खरजेची साथ आली. जो-तो आपला दिवसभर खाजवतोय. अचानक, ‘जर्रा खाजवा की..’ हे गाणं आमच्या वसतिगृहात खूपच फेमस झालं. मग डॉक्टर आले, त्यांनी प्रत्येकाला लावायला मलम दिलं. तीन दिवसांत सगळेजण खरजेतून मुक्त झाले. आम्हाला तेव्हा हा मोठा चमत्कारच वाटला होता.
कित्येक बाबा, बुवा हवेतून अंगारा, सोन्याची अंगठी, असं काय-काय काढून दाखवतात. आपण असे चमत्कार करतो, याचा अर्थ आपण काही विशेष शक्ती बाळगून आहोत, असा त्यांचा दावा असतो.
चड्डीतून बॉल काढणे काय, औषधाने खरूज बरी करणे काय किंवा हवेतून विभूती काढणे काय, हे सारे वरवर पाहता चमत्कारच वाटतात आपल्याला; पण हे करणारा प्रत्येकजण काहीतरी वेगळंच सांगत असतो.
जादूगार सतत सांगत राहतो की, ही तर हातचलाखी आहे; हा काही चमत्कार नाही. मला कसलीही सिद्धी प्राप्त नाही. घटकाभर करमणूक म्हणून मज्जा घ्या आणि सोडून द्या. डॉक्टरांना विचारलं तर ते म्हणतील, ‘यात कसला चमत्कार? हे तर साधे औषधविज्ञान आहे.’ मग ते आपल्या उपचारांमागील विज्ञान सविस्तर समजावून सांगतील. जगभर कुणाही माणसाला खरूज झाली आणि हे औषध कुणीही दिलं, तरी औषध उपयोगी पडेल, असंही सांगतील. ‘खरजेचे निदान आणि उपचार’ असा एखादा भलामोठा ग्रंथराजही पुढ्यात ठेवतील. वर सांगतील, ‘एखादी गोष्ट का होते, हे जोपर्यंत आपल्याला समजलेलं नसतं, तोपर्यंत ती गोष्ट आपल्याला चमत्कार वाटत असते.’
म्हणजेच हवेतून विभूती काढायचा प्रकार चमत्कार म्हणायचा, तर तो आधी नीट तपासला पाहिजे. विभूती खरंच हवेतून आली का? की अंगरख्यात, कफनीच्या बाहीत, बोटांच्या बेचक्यात आधीच अंगार्याची गोळी लपवलेली होती, हे आधी तपासावं लागेल. मग ही हातचलाखी आहे की विशेष सिद्धी, हे सांगता येईल.
पण विशेष सिद्धी प्राप्त आहे, असं सांगणारे, ‘माझ्यात अतिनैसर्गिक शक्ती आहे असं सांगणारे,’ अशा तपासणीला तयार होत नाहीत, हा जगभरचा अनुभव आहे. अशी शक्ती असल्याचा दावा सिद्ध केल्यास सत्तर कोटी रुपायचं बक्षीस अमेरिकेतील जेम्स रँडी फाउंडेशननं लावलेलं आहे. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेदेखील असे दावे सिद्ध करणार्यास एकवीस लाख रुपयाचं बक्षीस लावलं आहे. पण आजवर कोणीही हे आव्हान स्वीकारून आपला दावा सिद्ध करू शकलेलं नाही.
विज्ञान सांगतं की हवेतून अंगारा काढणे, पाण्यावर चालणे, मंत्राने सापाचे विष उतरवणे, निव्वळ बोटाने शस्त्रक्रिया करणे वगैरे अशक्य आहे. मग हे नियम मोडल्याचा दावा करणार्याने कितीतरी भक्कम पुरावा द्यायला हवा. अचाट दावा करायचा तर लेचापेचा पुरावा कसा चालेल? जितका अचाट दावा, तितका बेफाट पुरावा हवाच की; नाही का?
लेखक संपर्क – 98220 10349