अनिल अवचट -

आयुष्याच्या एका टप्प्यावर नरेंद्र अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करू लागला आणि थोड्याच काळात तेच त्याचं जीवितकार्य झालं. या ‘गुन्ह्या’त माझाही थोडा सहभाग आहे. कोल्हापूरला आमचं कसलं तरी शिबिर होतं. रात्री सगळे गप्पा मारत बसलो होतो. कुणीतरी कल्पना काढली की, आपण या कामाकडे कसे वळलो, ते प्रत्येकाने सांगायचं. मी खरा कसा वळलो, ते आठवू लागलो… सिनेमाआधी इंडियन न्यूज दाखवतात तशी बिहारच्या दुष्काळावरती डॉक्युमेंट्री पाहिली आणि जीवनच बदलून गेलं. ती फिल्म सुखदेव यांनी केल्याचं नंतर कळलं. नरेंद्रने काय सांगावं? ‘अनिल, त्या वेळी ‘मनोहर’ साप्ताहिकात (ते त्या वेळचं लोकप्रिय साप्ताहिक) बुवाबाजी, अंधश्रद्धेविरुद्ध लेख लिहायचा. ते वाचून वाटलं, या क्षेत्रात काम करावं.’ मी अगदी मोहरून गेलो. लेखकाचं म्हणण्यापेक्षा, लेखनाचं हे केवढं भाग्य!
त्याला चळवळ करायची होती, गोष्टी घडवून आणायच्या होत्या. मी त्यातला नव्हतो, तरीही आमचं खूप सख्य होतं. त्यानं माझ्या पडेल भूमिकेवर कधी टीका केली नाही, की कधी-कधी भाषणबाजीमध्ये ढोबळ होण्यावर आक्षेप घेतला नाही. मी मनाच्या लहरीप्रमाणे वागणारा, लिहिणारा; तर तो कर्तव्यभावनेच्या निष्ठेने लढणारा. त्यानं तो जादूटोणाविरोधी कायदा व्हावा म्हणून ध्यास घेतला, लावून धरलं. राजकारण्यांच्या अस्थिर भूमिकेपुढे नामोहरम झाला नाही. हे सगळं अचाट आहे. दुसर्या बाजूला ‘साधना’ साप्ताहिक हाती घेणं आणि त्याला कुठल्या कुठे नेऊन ठेवणं… हेही तसंच अचाट काम.
नरेंद्र गेला. त्याचा धक्का ओसरला. अजून संताप, दु:ख मनात रेंगाळत आहेच. तेही कधीतरी जातील. तेव्हा मला हा खराखुरा, आपला नरेंद्र दिसू लागेल. आत्ताच पुसटसा दिसू लागलाय. मला तो मुडात असेल तर ‘अनिलोत्तम’ म्हणायचा. आता ‘काय, अनिलोत्तमऽ’ अशी हाक मारलेला त्याचा आवाज अस्पष्टसा ऐकू येतोय. त्याची मला चढवायची एक रीत होती.
“तू काय बाबा, मराठीतला ख्यातनाम लेखक!” असं तो मला म्हणे.
त्यावर एकदा मी रस्त्यातल्या एका माणसाला थांबवलं आणि विचारलं, “तुम्हाला अनिल अवचट माहीत आहेत का?”
तो माणूस बघतच राहिला. मी मग मुद्दाम त्याला “हिंट दिली- ते प्रसिद्ध लेखक?”
तो माणूस नकारार्थी मान हलवत म्हणाला, “नाही बुवा, मी या वस्तीत नवा आहे.’
आम्ही दोघं नंतर खूप हसलो. ‘ख्यातनाम’ हा कुठला जुनापुराणा शब्द त्याने कुठून शोधून काढला होता, कुणास ठाऊक.
नरेंद्र हा माझा चाळीस-पंचेचाळीस वर्षांचा मित्र; पण आमच्यात फरक एवढा की, आश्चर्य वाटावं. तो काटेकोर, संघटक, हाती घ्याल ते तडीस न्या टाईपचा. माझं सगळंच काम ढिसाळ, ढेपाळलेलं. मनात आलं तरच करणार, असा लहरीपणा. नरेंद्र म्हणजे ‘टास्क मास्टर.’ आला की, त्याची मला चढवाचढवी सुरू व्हायची. की मी ओळखायचो – साहेब काही तरी काम गळ्यात घालणार. मीही प्रतिकाराच्या तयारीत. मग तो काम सांगयचाच, ‘तुझंच तो ऐकेल, बाकी कुणाचं ऐकणार नाही.’ किंवा ‘तुलाच त्यातलं कळतं. तू बरोब्बर ते काम करशील.’ मी तेल लावलेल्या पैलवानाप्रमाणे त्याच्या पकडीतून सहीसलामत निसटत असे. मग तो माघार जरा घेई. परत जरा वेळानं म्हणायचा, ‘बरं, ते काम नको करूस. त्या अमक्याला भेटून तमकं काम करायचं. हे तर सोप्पं काम आहे; सहज करशील.’ असं दोन-तीनदा त्याच्या पकडीतून सुटल्यावर एखादं काम मी कबूल करायचो. पण तिथंच तो थांबायचा नाही. म्हणणार, ‘मग हे काम करणारच ना तू, मग जाता-जाता हेही काम कर.’ म्हणून मग दुसरं काम गळ्यात घालायचा. तो जायला निघायच्या आत एका कामचुकवू माणसाच्या गळ्यात पाच-सहा कामं घातलेली असायची त्याने.
त्याने बरीच तात्त्विक मांडणी केली असली, अनेक पुस्तकं लिहिली असली; तरी मला त्याचं खरं, प्रमुख व्यक्तिमत्त्व संघटकाचंच वाटायचं. अडुसष्ट की सत्तर सालच्या सुमारास त्याच्या कबड्डी मंडळासमोर त्याने मला गप्पा मारायला बोलावलं होतं. ‘तो’ अर्धवट अंधार. त्यात ती तरुण मुलं जमत होती. भेटताना, निरोप घेताना ‘जय शिवराय’ म्हणायची. मला आश्चर्य वाटलं. नरेंद्रची ती नुसती कबड्डी टीम नव्हती; ती संघटित टीम (खरं तर टोळी) होती. त्यांनी त्यांचं ‘जय शिवराय’च्या रुपाने वैशिष्ट्य तयार केलेलं. मला मनात येत होतं- हे कशाला? ‘जय शिवराय’ असं म्हणून शिवाजीविषयी प्रेम थोडंच व्यक्त होणार आहे की शिवाजीविषयी समज वाढणार आहे? पण ‘त्या’ पोरांच्या टीमने महाराष्ट्रात चांगलेच विजय मिळवले होते खरे आणि आपला नरेंद्र (त्याला सातारकर सहकारी ‘नरूभाऊ’ म्हणायचे.) चांगलाच खेळाडू होता. तो राष्ट्रीय पातळीवरचा खेळाडू ‘कबड्डी…कबड्डी…’ करत दुसर्या पार्टीत शिरला आणि सगळ्यांनी त्याला घेरलं, तरी तो त्यांच्या डोक्यावरून उडी मारून सुटका करवून घ्यायचा. त्या उडीला ‘स्टार्ट’ घ्यायला जागाच नसायची, की लांब श्वास घेऊन छाती भरून घ्यायची सोय नसायची. असेल तिथून पाच-सहा फूट उंच उडी मारायची आणि तिकडेही धडपडून पाय मोडून घ्यायचा नाही. ‘लँडिंग’ बरोबर दोन पायांवर, मधल्या पाटीवर.
एकदा विद्यापीठाच्या मैदानात आम्ही फिरत होतो. मी त्याला त्या उडीविषयी विचारलं आणि म्हटलं, ‘ती उडी मारून दाखव ना.’ म्हणाला, ‘आता नाही तशी येणार. त्याला खूप वर्षं झाली.’ मी आग्रहच धरला, ‘थोडीशी दाखव ना- कल्पना तरी येईल.’ तिथं अंदाजे चार फूट उंचीचा ओटा होता. समोर जाऊन उभा राहिला आणि एक पाऊल पुढं टाकून थेट वर गेला आणि उभा राहिला. मी थक्क झालो. खरंच, माझा आग्रह म्हणजे केवढा आततायीपणा होता. पायाला चांगलंच लागू शकलं असतं. मुका मार तर नक्कीच. पण त्याने माझा हट्ट पुरवला.
त्यांची त्या काळात सातार्यात ‘सयुद’ (समाजवादी युवक दल) ही संघटना होती. लक्ष्मण माने, पार्थ पोळके, किशोर बेडकिहाळ…. अशा आठ-दहा कार्यकर्त्यांचा चांगला संच होता. त्यांच्या जोरदार चर्चा चालत. ते नरेंद्र ऊर्फ नरुभाऊला चांगलेच धारेवर धरत. दोन प्रसंग आठवताहेत. एकदा नरेंद्रने घरी छताला लावतात तो पंखा बसवून घेतला. त्याबरोबर सहकार्यांची टीका. तू ‘डी-क्लास’ (पत्करलेली गरिबी) व्हायचं सोडून चैनीच्या मागे काय लागलास? आता या चर्चेचं हसू येतं. पण तेव्हा यांना समजावता-समजावता आणि पंख्याला परवानगी काढता-काढता नाकी नऊ आले होते. एकदा सातार्यात गणेश विसर्जनाची मिरवणूक चालली होती. नरेंद्र ती पाहत उभा होता. त्याचे पूर्वीचे कबड्डीवाले मित्र गुलाल खेळत नाचत होते. नरेंद्रला पाहून त्यांनी त्यालाही ओढले आणि गुलालाने भिजवून टाकले. यावर ‘सयुद’मध्ये केवढी घनघोर चर्चा. नरुभाऊंनी असे करूच कसे दिले वगैरे…
वास्तविक, नरेंद्रने हा सगळा उपक्रम सुरू केलेला. तोच त्याचा खरं तर मुख्य; पण सहकार्यांची टीका सगळी ऐकून घ्यायचा. उलट उत्तरे दिली नाहीत की त्यांना गप्प करत बसला नाही. तो शांतपणे सोसत राहिला. तो कल्पक संघटक होता. सतत काहीतरी नवा कार्यक्रम घ्यायचा. त्या काळात बाबा आढावांची ‘एक गाव-एक पाणवठा’ मोहीम सुरू झालेली. मी, नरेंद्र जमेल तसे बाबांबरोबर असायचो. त्याच्या लक्षात आलं- सातारजवळच्या त्रिपुटी इथल्या मंदिराजवळच्या तळ्यातलं पाणी दलित घेऊ शकत नाहीत. आधी सामोपचार, चर्चा असं करून यश येईना, तसं त्यानं आणि त्याच्या सहकार्यांनी त्याविरुद्ध सत्याग्रह करायचं ठरवलं. सत्याग्रह कसा झाला, त्याला यश कसं मिळालं हे फार सांगत नाही; पण नरेंद्रचं नियोजनकौशल्य आठवतंय, ते सांगतो.
बाहेरून आलेल्या आम्हा सगळ्या मित्रांची राहण्याची व्यवस्था त्याच्या घरी तो करू शकला असता. पण त्याच्या एकेका कार्यकर्त्याच्या घरी आम्हा एकेकाची राहण्याची व्यवस्था त्याने केली. आमचा सहवास त्याच्या कार्यकर्त्यांना मिळावा, ही त्याची कल्पना. माझी व्यवस्था लक्ष्मण माने या तेव्हा पोरगेलसा असणार्या कार्यकर्त्याकडे. त्याची छोटी शेडवजा खोली. जेवताना मी त्याला त्याची लहानपणापासूनची हकिगत विचारत होतो. रात्रभर संवाद चाललेला. मला भटक्यांच्या जगाचं नवंच दालन खुलं होत चाललेलं. सकाळी मी त्याला म्हटलं, ‘लक्ष्मण, हे सगळं तू लिहून काढ.’ तो म्हणाला, ‘तूच काढ. मला काय लिहायला येतंय?’ पण मी पुढं महिनाभर रोज एक कार्ड लक्ष्मणला पाठवत राहिलो. मग तो लिहायला बसला. त्यातनं त्याचं ‘उपरा’ पुस्तक लिहून झालं. नरेंद्रनं माझी सोय लक्ष्मणच्या घरी केली नसती, तर काय झालं असतं; कोण जाणे! एका कार्यक्रमाच्या वेळी त्याने माझी सोय एका देशमुख मुलाकडे केली. त्यामुळं मला पंचकुळी, शहाण्णव कुळी देशमुखांच्या जीवनाचं प्रभावी, आश्चर्यकारक तितकंच दाहक दर्शन झालं. घरोघर आम्हा कार्यकर्त्यांना उतरवण्याच्या उपक्रमामुळे जसा लक्ष्मणचा फायदा झाला, तसा या दुसर्या मुलाच्या बाबतीत- मला देशमुख समाजाचं अंतरंग कळलं, हा माझाही एक प्रकारे फायदाच झाला, हे विशेष.
इतक्या वर्षांच्या आमच्या मैत्रीत कधी दुरावा आला नाही. तो कधी रुष्ट झाला नाही. मी त्याच्या अनेक खोड्या काढत असे. तरुण, ग्रामीण कार्यकर्त्यांध्ये सतत वावरल्याने जशी त्यांनी नरेंद्रची भाषा उचलली होती, तसंच नरेंद्रनंही काही उचललं होतंच. ‘च्यायला, तिच्यायला’ हे शब्द सहजपणे त्याच्या तोंडी येत. तो काही तो शब्द शिवी म्हणून वापरत नसे. आपल्या बोलण्यात असे निरर्थक शब्द असतातच. पण मी त्याला म्हणायचो, ‘ही आईचा उल्लेख असलेली शिवी आहे.’ तो शेवटी हताश होऊन म्हणायचा, ‘बरं बाबा, चुकलं माझं.’ मग मी त्याने परत तसे शब्द तोंडून काढले की, त्याच्यावर दहा रुपये दंड बसवला. एकदा तो बोलताना तो शब्द आलाच. मी त्याला अडवून म्हटलं, ‘काढ दहा रुपये.’ तो हसून म्हणाला, ‘तिच्यायला, कळलंच नाही कसं तोंडात आलं ते!’ मी म्हणालो, ‘आता वीस रुपये.’ एकदा तर कुणाच्या गाडीने चालला होता. गाडी थांबवून माझ्या हातात त्यानं वीस रुपये ठेवले. म्हणाला, ‘तू नसताना ते तोंडात आलं, त्याचे.’
पुण्यात तो आमच्या घरचा पाहुणा असायचा. पण आधी कळवणं नाही; जेवायला येतोय, हे सांगणं नाही. त्या काळात रात्रीही आमचं दार नुसतं ढकललेलं. तो असा बॅग घेऊन हजर व्हायचा. तो भुकेला आहे, हे कळायचंच लगेच. मी घरातलं सगळं असेल ते त्याच्या समोर ठेवायचो. तोही मिटक्या मारीत खायचा. (तीही त्याची एक सवय.) सगळी भांडी पुसून घ्यायचा. नंतर नळाखाली धुऊनही टाकायचा. मग तो मुडात यायचा. तो येरझार्या घालायचा. वळताना एका पावलावर गर्रकन वळायचा की समजायचं की आज स्वारी खूष आहे. कधी तो सुरेश भटांची गझल गुणगुणायचा. त्यांच्या अनेक कविता, गझला नरेंद्रला पाठ होत्या. गाणं म्हणायला मात्र त्याला आवाज नव्हता. त्यानं त्याचा दाभोलकरी खर्ज लावला, की गाण्याचा नाजूकपणा, तरलपणा पळून जात असे. मग मी मधे पडत असे. गाणं म्हणता येवो न येवो; त्याला ते आवडत असे, हे विशेष. कधी तर ‘मालवून टाक दीप’सारखं रोमँटिक गाणंही. सुरेश भटांची ‘करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची. रणात आहेत झुजणारे अजून काही’ ही गझलही मोठमोठ्यानं म्हणायला त्याला आवडे.
पुढं त्याचं माझं गूळपीठ आमच्या कुटुंबपातळीवरही जमलं, ते बरंच झालं. त्याची बायको शैला आणि सुनंदा एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी झाल्या. मुक्ता, यशो, हमीद आणि मुक्ता यांचंही सख्य असंच. कधी सातार्याला जाऊन आम्ही सगळे महाबळेश्वरलाही गेल्याचं आठवतंय. तसंच कास तलाव, बामणोलीपर्यंत आलेलं कोयनेचं पाणी… अशी काही ठिकाणंही आठवताहेत. ती सगळी मंडळी साधी होती. शैला आणि सुनंदात एक साम्य असं की, दोघींनी त्यांच्या नवर्यांना आर्थिक जबाबदार्यांतून मुक्त केलं होतं आणि दोघींचे नवरे त्या स्वातंत्र्याचा ‘बरा’ उपयोग करत होते. त्यांनी मुलाचं नाव हमीद ठेवलं, कारण त्या आधी मुस्लिम सुधारक हमीद दलवाई यांचं निधन झालं होतं. लहानग्या हमीदची मला एक आठवण आहे. डिलिव्हरीसाठी केस आली की आई (शैला) हॉस्पिटलमध्ये जायची. हमीदला आई कधी घरी येतेय याची उत्सुकता असायची. तो फोन करायचा. तिकडे सिस्टर फोन घ्यायची. हा विचारायचा. ‘ऑस (गर्भाशयाचे तोंड) डायलेट (मोठा) झाला का?’ त्यावरून त्याला अजून डिलिव्हरीला किती वेळ आहे, ते कळायचं. उत्तर ‘हो’ असलं की याचा पुढचा प्रश्न, ‘किती फिंगर्स?’ एक बोट जाईल एवढी की दोन, तीन? तसं असेल तर आई लवकर येणार. आईची मेडिकल परिभाषा त्याला त्या वयात अवगत झाली होती. त्या वेळचा अवखळ हमीद आता केवढा शांत (सायकियाट्रिस्ट) झाला आहे आणि बुजरी मुक्ता आता टीव्हीसमोर कशी तडातडा बोलत होती.
तर, नरेंद्रविषयी सांगत होतो. बाहेर एवढी भाषणं देणारा नरेंद्र घरी शांत असे. घरातली कामं करत असे. त्याचे कपडे पूर्ण खादीचे. खादी त्याच्याकडे बहुधा दादांकडून (देवदत्त) आली असावी. कधी छानछोकी नाही, कधी सिनेमा-नाटक नाही. तो सदासर्वकाळ समर्पित कार्यकर्ता होता. त्यावरून मी त्याला चिडवायचो, थट्टा करायचो. तो म्हणायचा, ‘मला तिथं झोप येते.’ खरोखर तो खूप थकत असणार. पण त्याला थकलेला मी कधी पाहिला नाही. आजारीही पडलेला पाहिला नाही. आम्हा बरोबरच्यांची (माझी, लक्ष्मणची) अनेक ऑपरेशन्स झाली, आजारपणं झाली; पण हा असाच्या असा. त्याची ती कबड्डीतली उडी मारून परत पायांवर उभा, तसा! कुणाला पटवायचं कसं, हे त्याच्याकडून शिकावं.
पु. ल. देशपांडे, सुनीताबाई सामाजिक संस्थांना दर वर्षी देणग्या देत. मला विचारत, ‘या वर्षी कुणाला द्यावी?’ मी नरेंद्रचं नाव सुचवलं. कारण त्या सगळ्यांनी एक छोटंसं दलित वसतिगृह बांधलं होतं. त्यात सुधारणा करायच्या होत्या. छोटं वाचनालय तयार करायचं होतं. वाचनालयाची कल्पना दोघांनाही आवडली. पुलंनी सांगितलं, ‘नरेंद्रला बोलावून घे.’ नरेंद्रची ही त्यांची पहिलीच भेट असावी. सुनीताबाईंनी सांगितलं, ‘आमची पाच हजारांची देणगी असेल. त्यात काय बसेल, ते बघा.’ नरेंद्रने त्याच्या घुरूघुरू आवाजात त्या दोघांना असं काही गुंडाळलं की बस्स! ‘दहा हजार मिळाले तर त्यात एक खोली वाढवू. जास्त मुलांची सोय होईल.’ त्याला ती दोघं तयार होताहेत तोवर नरेंद्रने घोडं आणखी पुढे दामटलं, “मग तुम्ही पंचवीस हजार द्या, आम्ही तितकेच आणखी जमवतो. पन्नास हजारांवर आहे त्या खोल्यांवर मजला चढवू आणि हॉल करू. ती अभ्यासिका होईल.’ वगैरे वगैरे.
इतक्या फटकळ, तडकफडक, व्यवहारचतुर सुनीताबाई… त्यांनाही नरेंद्रने गुंडाळलं की! त्या तयार झाल्या. पाच हजार देणार, त्या पंचवीस हजार द्यायला तयार झाल्या. मी अनेक कार्यकर्त्यांना यापूर्वी पुलंकडे घेऊन गेलो होतो. ते इतके दबून जायचे की, त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नसे. पण पुढची मजा तर औरच होती, ती ऐका. चेक घेऊन आम्ही खाली आलो, तर तो चेक चक्क पंचाहत्तर हजारांचा. नरेंद्रचा चेक धरलेला हात थरथर कापत होता. पुढे त्याने छान हॉल बांधला. त्याला ‘मुक्तांगण’ हे नाव दिलं. आता सातार्याच्या सार्वजनिक जीवनात तो मिसळून गेला आहे.
त्याचं ‘देणं’ही तसंच. लक्ष्मण माने कोल्हापूरहून (पळूनच) आला. तिथं आंतरजातीय लग्न करून तो शशीला घेऊन आला. कुठेतरी राहिला. नरेंद्रकडे आला. नरेंद्रला समजलं की, त्याच्या घरात काहीच नाही; तेव्हा एकेक डबा काढून तांदूळ, गहू, सगळी पिठं, सगळं सगळं घरातलं पिशव्यांमध्ये ओतत होता आणि म्हणत होता, ‘हे राहू दे तुला. हे घरात असलं की बरं.’ वगैरे. लक्ष्मण मला सांगत होता- ‘नरूभाऊंना त्या दिवशी काय झालं होतं कुणाला ठाऊक. सगळं घरातलं होतं-नव्हतं ते मला दिलं. मी गहिवरलोच.’ तेव्हा लक्ष्मण कोण होता? साधा पळून आलेला कैकाड्याचा काटकुळा पोर. त्या अवस्थेत त्याचा आपल्याला काही फायदा, हा विचारही येणं अशक्य. अशा वेळी ही मदत? तीही आतून आलेली? त्याच्या वरकरणी रुक्षपणाच्या आत हा ओलावा होता. म्हणूनच तो एवढं संघटन करू शकला असेल? त्याचं संघटनकौशल्य पणाला लागलेलं पाहिलं, ते ‘लग्नाची बेडी’ या नाटकाच्या दौर्यात.
कार्यकर्त्यांना मदत करण्यासाठी आम्ही ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ हा ट्रस्ट काढला होता. डॉ. लागू त्याचे अध्यक्ष. त्यांनी निळू फुले, तनुजा, रोहिणी हट्टंगडी, सुधीर जोशी वगैरेंना घेऊन ते नाटक बसवलं. महाराष्ट्रभर दौरा करून त्यातून पैसे उभे करायचे आणि ट्रस्टमार्फत पन्नास कार्यकर्त्यांना मदत करायची- अशी ती कल्पना. त्याचं नियोजन नरेंद्रनं केलं होतं. आधी जिथं प्रयोग होणार, तिथं जाऊन त्याने स्वागत समित्या स्थापन केल्या. हॉलची व्यवस्था, उतरण्याची व्यवस्था- असं सगळं केलं. प्रत्यक्ष दौर्यात मी होतो. एका ठिकाणी पोचल्यावर तिथूनच फोन करून पुढच्या प्रयोगाच्या व्यवस्थेच्या सूचना देणं, तिथूनच तिसर्या ठिकाणची काय काय व्यवस्था झालीय ते पाहणं… बा…बा…बा…बा… मी तर थक्क व्हायचो. नुसते प्रयोग नाहीत, तर त्या आधी दुपारी चारला प्रेस कॉन्फरन्स. नंतर देणगीदारांबरोबर चहापान. प्रयोग वेळेत सुरू. बसमध्ये मी डॉ. लागूंशेजारी बसायचो. (हाही नरेंद्रच्या व्यवस्थेला एक भाग. डॉ. लागूंना हवं-नको बघण्याचं काम माझ्यावर.) ते नरेंद्रची ही लगबग- गडबड, धावपळ पाहून म्हणायचे, ‘काय माणूस आहे हा!’ त्याची नियोजनाची वही त्याच्या हातात कायम असे. ते पाहून डॉ. लागू एकदा म्हणाले, ‘आम्ही सर्व नाट्य व्यावसायिकांनी दाभोलकरांच्या या वहीचा अभ्यास केला पाहिजे. नियोजन कसं करावं, हे त्यांच्या पायाशी बसून शिकलं पाहिजे.’
तो असा टास्क मास्टर, संघटक होता; तरी हेकट नव्हता. आपण सांगायचं आणि दुसर्यानं ऐकायचं, अशी सवय अशा तर्हेच्या माणसांना होऊन जाते. पण नरेंद्र तसा नव्हता. त्याची शिकण्याचीही तयारी असे. मी नेहमी त्याच्याकडून शिकत आलेलो. तरी त्याच्या मनात (खरं तर शैलाच्या) सातार्याला व्यसनमुक्ती केंद्र काढायचं आलं. तेव्हा तो पट्कन आमचा (मुक्तांगण परिवाराचा) शिष्यही झाला. एरव्ही न केलेल्या कामांमुळे कानपिळीचा अधिकार त्याच्याकडे. पण आता केंद्र सरकारला अर्ज कसे करायचे, बरोबर कुठले कुठले कागद जोडायचे, हे मी सांगितलं आणि ‘त्या’ निमूट विद्यार्थ्याने ते सगळं लिहून घेतलं. ‘मुक्तांगण’मधल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये तो आणि त्याचे सहकारी येऊन बसायचे. तिथं कुणाचा बडेजाव नव्हता, की स्पेशल फॅसिलिटी नव्हत्या. विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी.
नंतर त्याने परिवर्तन नावाची अतिशय अप्रतिम संस्था उभी केली. शैला, सायकियाट्रिस्ट पुतण्या प्रसन्न अशी समर्पित तज्ज्ञ माणसं असल्यावर काय होणार? दर वेळी मला, आम्हाला कुणी विचारलं- चांगलं केंद्र बघायचंय; तर आम्ही नि:शंकपणे ‘परिवर्तन’कडे बोट दाखवतो. नंतर तर तो या चळवळीचा जसा प्रवक्ताच झाला होता. तो आणि अभय बंग हे दोघं सरकारच्या धोरणावर टीका करतात. दारूचा वाढता खूप आणि त्यातनं सरकारला मिळणारा कोट्यवधी रुपयांचा टॅक्स… वगैरे आकडेवार्या त्यांना कशा कळतात, कुणास ठाऊक. मी व्यसनी माणसांना व्यसनातून दूर काढायच्या केंद्रांशी जोडला गेलेलो. त्यापुढे जाऊन सभा घेऊन लोकांना या व्यसनांचे तोटे सांगणं वगैरे जाणीवजागृतीचं कामही करतो. आमच्या केंद्रातली मुलं पथनाट्यंही करतात. ते सहज जमणारं, सोपं वाटतं. पण कायद्याचा, नियमांचा, धोरणांचा अभ्यास करणं महाअवघड. परत ते सारखे बदलत असतात. त्यांचा पाठलाग कसा करायचा? नरेंद्रच्या अगदी जिभेवर आकडेवारी. मला कुणी याबाबत म्हणजे सरकारी धोरण वगैरे- प्रश्न विचारला; तर मी सांगतो, याबाबतीत आमचा लीडर म्हणजे नरेंद्र दाभोलकर. त्याला भेटा. म्हणजे बघा- आधी ‘परिवर्तन’ काढताना तो आमचा शिष्य झाला होता आणि याबाबतीत बघता-बघता तो आम्हा सगळ्यांचा गुरू कधी झाला, ते समजलंच नाही.
आयुष्याच्या एका टप्प्यावर नरेंद्र अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करू लागला आणि थोड्याच काळात तेच त्याचं जीवितकार्य झालं. या ‘गुन्ह्या’त माझाही थोडा सहभाग आहे. कोल्हापूरला आमचं कसलं तरी शिबिर होतं. रात्री सगळे गप्पा मारत बसलो होतो. कुणी तरी कल्पना काढली की, आपण या कामाकडे कसे वळलो, ते प्रत्येकाने सांगायचं. मी खरा कसा वळलो, ते आठवू लागलो. सिनेमांआधी इंडियन न्यूज दाखवतात, तशी बिहारच्या दुष्काळावरती डॉक्युमेंट्री पाहिली आणि जीवनच बदलून गेलं. ती फिल्म सुखदेव यांनी केल्याचं नंतर कळलं. नरेंद्रने काय सांगावं? ‘अनिल त्या वेळी मनोहर साप्ताहिकात (ते त्या वेळचं लोकप्रिय साप्ताहिक) बुवाबाजी, अंधश्रद्धेविरुद्ध लेख लिहायचा. ते वाचून वाटलं, या क्षेत्रात काम करावं.’ मी अगदी मोहरून गेलो. लेखकाचं म्हणण्यापेक्षा, लेखनाचं हे केवढं भाग्य! मी चळवळीत आलो, पण ते निमित्तापुरतंच. त्यानं मात्र ती चळवळ अशी काही पुढं रेटलीय, की कुठल्या कुठं जाऊन पोेचलीय.
त्याला केरळचे बी. प्रेमानंद भेटले. (अब्राहम कोवूर भेटले की नाही, ते माहीत नाही.) त्यांनी बुवाबाजीचा पर्दाफाश करायच्या युक्त्या शिकवल्या. हातातून अंगारा कसा काढायचा, वगैरे. सभेत कोणी बाबा बनून येणार, हे चमत्कार करून दाखवणार, काही मुलं विरोधी घोषणा देणार, मग हा बाबा भगवी वस्त्रं काढून टाकून त्या चमत्कारांमागचं रहस्य समजावून सांगणार… असा तो प्रयोग असे. त्याचे कार्यकर्ते या प्रयोगात तरबेज झाले. गावोगावी प्रयोग करू लागले. फसवणार्या भोंदू बाबांचा पर्दाफाश करू लागले. सगळ्या महाराष्ट्रात हलकल्लोळ. सामाजिक प्रबोधनाच्या चळवळी थंडावत चालल्या असताना ही चळवळ फोफावली अगदी खेड्यापाड्यांपर्यंत पोेचली. त्या चळवळीत शक्य होईल तिथं त्यानं मला गोवलंच. मी त्याच्यासारखा तडाखेबंद भाषण करणार्यांमधला नव्हतो. आत्मगत, मुळमुळीत वाटेल असं माझं भाषण. तुम्ही काय करावं, हे सांगायला जीभच रेटत नाही. पण तरी नरेंद्रनं ते चालवून घेतलं.
एकदा ‘भुताचा शोध’ ही शोधयात्रा काढली. खुद्द कोकणात. तिथं म्हणे- पारापारावर, फांद्याफांद्यांवर भुतं बसलेली असतात. खूप लोकांनी त्यांना अडवलं, वाद घातले. याचे कार्यकर्ते म्हणत, ‘भूत कुठे आहे ते दाखवा.’ की तिकडून लोक म्हणत. ‘अमक्या नदीच्या पुलावर रात्री बाराला भूत येतं.’ ही मुलं तिथं जाऊन दाखवत. लोकांच्या रूढ कल्पनांशी टक्कर घेणं, हे काम महाराष्ट्रात कित्येक वर्षांत झालेलंच नव्हतं. त्या यात्रेच्या समारोपाला मला बोलावलं. वेंगुर्ला इथे रात्री सभा होती. तिथंही माझा, नरेंद्रचा पिंड किती वेगळा आहे, हे दिसलं. माझं भाषण सुरू झालं.
मी म्हणालो, ‘एकाही माणसानं सभेत गडबड केली, तर मी खाली बसेन. कुणावरही मला माझं भाषण लादायचं नाही.’
काही वेळानं एक माणूस काही तरी बडबडला. झालं, मी खाली बसलो. नरेंद्रने मग सभा हाती घेतली आणि असं ठणकावून भाषण केलं, की बस्स! कुठं गडबड नाही, की गोंधळ नाही. सभेनंतर लोक माझ्याभोवती जमले.
म्हणाले, “तुम्ही पहिल्यांदाच वेंगुर्ल्यात येताय. तुमचं भाषण ऐकायला आम्ही सगळे उत्सुकतेनं आलो होतो. तुम्ही का थांबलात? बोलायचा तसंच.”
मी म्हणालो, “तुम्हाला ऐकायचं होतं ना; मग त्या गडबड करणार्या माणसाला गप्प करण्याची जबाबदारी तुमची नाही का? मी त्याला गप्पा कसा बसवतोय, ही मजा बघायला तुम्ही जमला होतात?”
हा नरेंद्र आणि माझ्यातला फरक. त्याला चळवळ करायची होती, गोष्टी घडवून आणायच्या होत्या. मी त्यातला नव्हतो. तरीही आमचं खूप सख्य होतं. त्यानं माझ्या पडेल भूमिकेवर कधी टीका केली नाही, की कधी-कधी भाषणबाजीमध्ये ढोबळ होण्यावर मी आक्षेप घेतला नाही. मी मनाच्या लहरीप्रमाणे वागणारा, लिहिणारा; तर तो कर्तव्यभावनेच्या निष्ठेने लढणारा. त्यानं तो जादूटोणाविरोधी कायदा व्हावा म्हणून ध्यास घेतला, लावून धरलं. राजकारण्यांच्या अस्थिर भूमिकेपुढे नामोहरम झाला नाही. हे सगळं अचाट आहे. दुसर्या बाजूला ‘साधना’ साप्ताहिक हाती घेणं आणि त्याला कुठल्या कुठे नेऊन ठेवणं… हेही तसंच अचाट काम. तुलना करायलाही काही साम्य असावं लागतं. तेवढंही त्याच्या-माझ्यात नाही. तरीही त्याला मी मित्र म्हणावं? मी त्याच्या आयुष्याकडे, स्वभावाकडे जो-जो बघावं, तो- तो आश्चर्यात बुडायला होतं. स्वत:च्या मर्यादांची खंतही वाटते.
या अंधश्रद्धेविरुद्धच्या कामांमुळे बुवाबाजी करणार्यांच्या भक्तांनी त्याच्यावर खटले भरले. कुठं तरी तो म्हणाल्याचं आठवलं, त्याच्यावर दोनशे खटले चालू आहेत. ऐकण्यातली चूक असेल, दोनशेऐवजी वीस असतील. माझ्यावर दोन खटले होते, तेही वीस वर्षांच्या अंतराने; तरी मी किती बेजार होतो! नरेंद्रने या खटल्यांचा उल्लेखही कधी केला नाही. भारतातल्या निरनिराळ्या शहरांत असलेले खटले कसे लढवत असेल- किती शांतपणे! तसाच आणखी एक दुर्धर प्रसंग. त्याच्या मित्रानेच त्याच्यावर संस्थेच्या संदर्भात खटला भरला. हे दोघंही माझे मित्रच. पण नरेंद्र कधी म्हणाला नाही की, तू जरा सांग त्याला, आपण बसून मिटवून टाकू वगैरे. तो खटला लढत राहिला. तो त्याने जिंकलाही. पण त्याचा त्याने जल्लोष केला नाही, की कशी जिरवली अशी फुशारकी मारली नाही. त्या खटल्यांमध्ये त्याला मन:स्ताप झाला नसेल का? माणसाला असा मन:स्ताप कुठे तरी बोलून मोकळं व्हायला हवं असतं. पण कुणाशी तो हे बोलल्याचं ऐकिवात नाही. का तो हे सगळं सोसत राहिला? ही त्याची कर्तव्यकठोरता म्हणावी की, या सगळ्याकडे समदृष्टीने पाहण्याची योग्याची वृत्ती? त्याला योगी म्हणावंसं वाटतं. कारण तो कधीही, कुणाविषयीही वाईट बोलल्याचं मला आठवत नाही.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये जन्मल्या-जन्मल्याच फूट पडली आणि शाम मानव वेगळा झाला. यानं त्याच्यावर कसले आरोप केले नाहीत, की टीका. हा संघटनेचं काम शांतपणे करत राहिला. ही संघटना एका दिवसात फोफावली नाही; विटेवर वीट ठेवावी, अशा प्रकारे ती बांधली गेलीय. मला प्रश्न पडलाय- इतक्या वर्षांच्या, इतक्या निकट सहवासानंतर मी त्याच्याकडून काय उचललं? काय शिकलो? एवढंच शिकलो की, तो आणि मी वेगळी व्यक्तिमत्त्वं आहोत. वेगळे स्वभाव घेऊन जन्माला आलोत. तरीही अशांमध्ये मैत्री होऊ शकते? मग तो गेल्याचं कळल्यावर, छातीत कळ का उठली? डोकं तीन-चार दिवस का दुखलं? रात्रंदिवस? कुठल्याही औषधाने न थांबणारं? आपल्या जिवाचा कुणी तरी लचका तोडलाय, असं उणेपण अजून का व्यापून राहिलंय? ‘अनिलोत्तम’ अशी ऐकू न येणारी हाक कानांवर का सारखी पडते आहे?
माणूस कधी जाणार, हे आधी कळत नाही. मला त्याच्या धावपळीकडे पाहून अनेकदा वाटत असे- त्याला घेऊन मुळशीच्या जंगलातल्या एखाद्या फार्महाऊसवर जावं. त्याच्याकडून सुरेश भटांच्या गझला ऐकाव्यात. त्याला मी दाभोलकरी खर्जातली गाणी मनसोक्त म्हणू द्यावीत. जमल्यास बासरीचा मनात थेट उतरणारा सूर तरी त्याला ऐकवावा… मी त्याच्यासारखा नसलो, जरी त्या झंझावाती जीवनात विसावा तरी नक्की होऊ शकलो असतो. आज तो गेल्याला महिना उलटून गेला. पोलिसांना अजून खुनी सापडला नाही. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होते आहे. यावर पत्रकार, टीव्ही चॅनेलवाले हाच प्रश्न उभा करून प्रतिक्रिया विचारतात.
पोलिस त्यांचं काम करतील. मला त्याची फार उत्सुकता नाही. नरेंद्र गेला, म्हणजे गेलाच; तो काही परत दिसणार नाही. अगदी गुन्हेगाराला पकडून त्याला फाशी दिलं, तरीही नरेंद्र परत दिसणार नाही. मला ‘खुनी कोण’पेक्षा नरेंद्रच्या संघटनेचे कार्यकर्ते काय करताहेत, याची उत्सुकता जास्त आहे. कोण कोण टिकून राहणार आहे? कोण भावनिक आक्रोशानंतर कामातून बाजूला होणार आहे? धर्माच्या नावाखाली सामान्य जनांना कुणी फसवत असेल, तर त्याविरुद्ध दंड थोपटून निधड्या छातीने कोण उभा राहणार आहे? कारण नरेंद्र असता, तर त्यानेही हेच केलं असतं!
(साभार साप्ता. साधना)