सत्यशोधक जनाबाई रोकडे : जे. पी.

डॉ. छाया पोवार - 9850928612

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील सत्यशोधक, ब्राह्मणेतर चळवळीतील एक अत्यंत कर्तृत्ववान महिला म्हणून श्रीमती जनाबाई रोकडे यांचा उल्लेख करावा लागेल. ‘माधवराव रोकडे मोफत शाळा’, ‘अहल्याबाई मोफत सूतिकागृह’, ‘धर्माजीराव रोकडे मोफत वाचनालय’ यामार्फत लोकशिक्षणाचे, लोकसेवेचे कितीतरी मोठे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. ‘मराठा ऐक्येच्छु सभा’, ‘मराठा प्रॉव्हिडंट फंड’, ‘अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद’ आदी संस्थांच्या कार्यकारिणीवर त्यांनी काम केले. जनाबाई रोकडे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल सरकारने त्यांना ‘केसर-ई-हिंद’ आणि ‘जस्टिस-ऑफ-दि-पीस’ या पदव्या देऊन त्यांचा गौरव केला. या पदव्या मिळविणार्‍या बहुजन समाजातील त्या पहिल्या महिला असाव्यात.

जनाबाई रोकडे या सत्यशोधक माधवराव रोकडे यांच्या कन्या. माधवराव रोकडे मोठे विद्वान, उत्तम शिक्षक आणि उत्तम वक्ते होते. ‘बॉम्बे मिल हॅन्डस् असोसिएशन’च्या वतीने होणार्‍या कामगारांच्या सभा ते गाजवीत असत. इ. स. 1893 च्या हिंदू-मुस्लिम दंग्याच्यावेळी मदनपुर्‍यासारख्या मुसलमान वस्तीत आपल्या अस्खलित उर्दू भाषणाने त्यांनी शांतता प्रस्थापित करण्यास मोठे सहाय्य केले. माधवरावांनी वृत्तपत्रांमध्ये वैचारिक लेखन करून मागासलेल्या वर्गाच्या समस्यांना वाचा फोडली. ‘दीनबंधू’, ‘शेतकर्‍यांचा कैवारी’, ‘ज्ञानप्रकाश’ व ‘प्रभाकर’मधील त्यांचे लेख खूपच गाजले. माधवराव रोकडे यांनी प्रथम घराच्या ओट्यावर शाळा सुरू केली. पुढे मुंबईतील रघुनाथबाबांच्या समाधीच्या जागी त्यांची शाळा होती. माधवरावांची शाळा नावाजलेली आणि लोकप्रिय होती.

जनाबाई रोकडे यांचा जन्म इ. स. 1888 मध्ये मुंबईतील मांडवी-कोळीवाडा येथे रघुनाथबाबांच्या समाधीच्या जागी झाला. त्यावेळी माधवराव रोकडे यांची शाळा आणि बिर्‍हाड त्या समाधीच्या जागीच होते. मात्र माधवरावांच्या शाळेत शिक्षण घेण्याची संधी जनाबाईंना फारशी लाभली नाही. कारण जनाबाईंच्या वयाच्या आठव्या वर्षीच माधवरावांचे अपघाती निधन झाले. जनाबाईंचे पालनपोषण त्यांचे ज्येष्ठ बंधू धर्माजीराव यांनी केले. त्यांचे शिक्षण मराठी चौथीपर्यंत झाले. सन 1902 मध्ये त्यांचा विवाह एका श्रीमंत घराण्यातील मुलाशी झाला. विवाह होण्यापूर्वी त्या शाळेत अध्यापन करत. त्यांच्या अध्यापनाविषयी एज्युकेशनल इन्स्पेक्टर यांनी उत्कृष्ट अभिप्राय दिला होता. जनाबाईंना सासरी फारसे विवाहसौख्य लाभले नाही. विवाहानंतर लवकरच त्यांच्या सासर्‍यांचे निधन झाले. सर्व संपत्तीची मालकी त्यांच्या पतीकडे आली. पती तरुण आणि हातात मुबलक पैसा, आणि अनेक वाईट व्यसने जडलेली. वडिलोपार्जित संपत्तीची उधळपट्टी करून ते अगदी कफल्लक बनले. जनाबाईंचा सासरी छळ होऊ लागला. त्या माहेरी आल्या. पुढे त्यांनी कामा हॉस्पिटलमध्ये रुग्णशुश्रुषा आणि सूतिकाक्रिया याचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला. तीन वर्षांत हा अभ्यासक्रम त्यांनी उत्तम प्रकारे पूर्ण केला. रुग्णालयाच्या अटींनुसार मोठमोठ्या, श्रीमंत खानदानी कुटुंबातील स्त्रियांची बाळंतपणे त्यांनी केली. गुजरातसारख्या परक्या प्रांतात जाऊन तेथे त्यांनी आपली कामगिरी उत्तमप्रकारे पार पाडली. नंतर मात्र नोकरी सोडून त्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. सुईणीच्या कामामध्ये त्यांनी मोठा लौकिक मिळविला. जनाबाईंच्या मनमिळाऊ आणि लाघवी स्वभावामुळे अनेक स्त्रिया जनाबाईंवरच विश्वास ठेवत आणि त्यांच्याकडूनच उपचार करवून घेत.

माधवराव रोकडे यांनी सतत तीस वर्षे खपून आपल्या अज्ञानी व गरीब बांधवांना साक्षर करण्याचे काम केले. माधवरावांच्या मागे त्यांची शाळा चालू राहते की नाही, इकडे लोकांचे डोळे लागून राहिले होते. जनाबाईंचे ज्येष्ठ बंधू धर्माजीराव रोकडे हे अनेक अडचणी सोसून वडिलांची शाळा चालवित होते. या कार्यामध्ये जनाबाई आणि अहल्याबाई या दोन्ही बहिणींची खूपच मदत झाली. श्रीमती अहल्याबाई यांना सासरी त्रास होत असल्यामुळे त्यांना नाईलाजाने सासर सोडून माहेरी यावे लागले होते. अहल्याबाई या वडिलांप्रमाणे उत्तम शिक्षिका होत्या. त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ असल्यामुळे सगळी लहान मुले त्यांच्यावर अतिशय प्रेम करत. त्यांच्या या अमोल गुणांमुळे शाळा फारच लोकप्रिय झाली होती. सुरुवातीपासूनच शाळा समाधीच्या जागी असल्याने जागेचे भाडे नव्हते. पुढे माधवराव रोकडे यांचे निधन झाल्यावर त्यांना शाळा दुसरीकडे भाड्याच्या जागेत न्यावी लागली. जनाबाईंची कमाई शाळेसाठी उपलब्ध झाल्यामुळे शाळा सुरळीत चालू लागली. विरोधकांनी अनेक अडथळे आणले. आर्थिक अडचणी आणि विरोधकांचे अडथळे यांना धैर्याने तोंड देत शाळा चालू झाली. मुलांची संख्या वाढू लागली. धर्माजीरावांनी आपल्या शाळेत पुढील वर्ग वाढवले; तसेच धंदे शिक्षणाची सोयही केली. तेव्हा मुंबईत मोफत शिक्षण देणार्‍या एक-दोनच शाळा होत्या. रोकड्यांची शाळा इतर सगळ्या प्राथमिक शाळांहून श्रेष्ठ मानली जाई.

सर्व प्रकारच्या दानापेक्षा विद्यादान हे अत्यंत श्रेष्ठ आहे. अन्न, वस्त्र, द्रव्य यांच्या दानाने गरिबांची चिंता थोडा वेळ दूर होते. परंतु विद्यादानामुळे मनुष्य आपला चरितार्थ आपणच चालविण्यास समर्थ होतो आणि एकदा त्याच्या कुटुंबातून अज्ञान, निरक्षरता दूर झाले म्हणजे पुढच्या पिढीतही ज्ञानाचा वारसा पोचतो आणि पर्यायाने समाजाची आणि देशाची सुधारणा होते. म्हणूनच गोरगरिबांना साक्षर करण्याच्या कामी जे सहाय्य करतात, तेच खरे परोपकारी होत. माधवराव रोकडे यांनी तीस वर्षे खपून आपल्या अज्ञानी गरीब बांधवांना साक्षर करण्याचे काम केले होते. त्यांच्या मागे धर्माजीराव, अहल्याबाई आणि जनाबाई या त्यांच्या मुलांनी आणि सर्वच कुटुंबाने शाळेसाठी जीवापाड परिश्रम घेतले. अहल्याबाईंनी आयुष्यभर शाळेमध्ये विनावेतन काम केले. जनाबाई आपली सर्व कमाई धर्माजीरावांकडेच आणून देत. चरितार्थासाठी आवश्यक तेवढाच खर्च करून धर्माजीराव बाकीची रक्कम शाळेसाठी खर्च करत. इ. स. 1918 च्या एन्फ्लुएंझाच्या साथीत धर्माजीराव रोकडे यांचे निधन झाले. त्यापूर्वीच काही वर्षे अहल्याबाईंचेही निधन झाले होते. शाळेबाबतची सर्व जबाबदारी जनाबाईंच्यावर आली. धर्माजीरावांनी वडिलांच्यामागे बावीस वर्षे शाळा कायमपणे चालविली होती. मुलांची संख्या वाढत होती. स्वतंत्र इमारत बांधून शाळेला स्थिर स्वरूप मिळणे आवश्यक होते. जनाबाईंनी इमारत फंड म्हणून जमा केलेला 25,100 रुपये हा निधी म्युनिसिपल स्कूल कमिटीकडे देऊन आपली शाळा स्कूल कमिटीच्या स्वाधीन केली. म्युनिसिपालिटीने शाळा ताब्यात घेऊन ‘माधवराव रोकडे मोफत शाळा’ असे नाव दिले. जनाबाई वडिलांचे नाव, कीर्ती कायम राखण्यात यशस्वी झाल्या.

आयुष्यभर शाळेत विनावेतन काम करणार्‍या आपल्या भगिनीचे – अहल्याबाईंचे – काहीतरी स्मारक उभारावे, असे जनाबाईंना वाटले. सुईणीच्या व्यवसायामुळे त्यांचा सर्व स्तरांतील कुटुंबाशी संबंध येत असे. गरीब कुटुंबातील स्त्रियांना बाळंतपणात किती हालअपेष्टा सहन कराव्या लागतात, याची त्यांना माहिती होती. गोरगरीब स्त्रियांसाठी लहानसे मोफत सूतिकागृह सुरू करावे, असे त्यांच्या मनात फार दिवस येत असे. पूर्वी ज्या जागी शाळा होती, त्याच जागेत त्यांनी इम्प्रुव्हमेंट ट्रस्टच्या परवानगीने एक मोफत सूतिकागृह सुरू केले. त्याला ‘श्रीमती अहल्याबाई मोफत सूतिकागृह’ असे नाव दिले. जनाबाई स्वत: त्या सूतिकागृहाजवळच राहत असत. त्यामुळे वेळी-अवेळी येणार्‍या स्त्रियांच्या बाळंतपणाची सोय होत होती; शिवाय जनाबाईंच्या कुटुंबातील सगळी माणसे अशा स्त्रियांच्या सेवेसाठी तयार असत. एक परिचारिकाही पगार देऊन नेमलेली होती. या संस्थेच्या व्यवस्थेसाठी त्यांनी दोन कमिट्या स्थापन केल्या. एका कमिटीने संस्थेची सर्वसाधारण व्यवस्था पाहावी आणि दुसरी कमिटी निव्वळ डॉक्टरांची होती; प्रसंगी बाळंतपणात स्त्रियांना काही औषधोपचाराची मदत लागली तर ती मोफत करावी, अशी सोय केली. त्यामुळे त्या ठिकाणी येणार्‍या गोरगरीब स्त्रियांना मोफत औषधोपचार मिळत असे. या सूतिकागृहाला भेट देणारी तज्ज्ञ माणसे देखील व्यवस्था पाहून समाधान व्यक्त करत.

जनाबाईंनी आपले बंधू धर्माजीराव रोकडे यांच्या नावे एक सार्वजनिक मोफत वाचनालय सुरू केले. त्यासाठी आपले सर्व ग्रंथ दिले. पैशांची मदत केली; तसेच ओळखीच्या कित्येक माणसांच्याकडून ग्रंथ आणि द्रव्याची मदत मिळवून दिली. 1927 मध्ये या वाचनालयात पंचवीस हजार ग्रंथ होते. म्युनिसिपल स्कूल कमिटीने माधवराव रोकडे यांची शाळा ज्या इमारतीमध्ये आहे, त्याच इमारतीत वाचनालयासाठी प्रशस्त जागा उपलब्ध करून दिली. ‘धर्माजीराव रोकडे मोफत वाचनालय’, हे त्यांचे योग्य स्मारक झाले.

1 डिसेंबर 1927 रोजी माधवराव रोकडे शाळेचा हीरकमहोत्सव समारंभ मोठ्या थाटाने साजरा करण्यात आला. हा समारंभ माधवराव रोकडे शाळेच्या भव्य पटांगणावर मोठ्या थाटाने पार पडला. याप्रसंगी गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकरांच्या लेखणीतून उतरलेल्या ‘माधवराव रोकडे’ चरित्राचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाच्या प्रती समारंभाच्या दिवशी वाटण्यात आल्या. माधवराव रोकडे यांनी अपंगत्वावर मात करून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा इतिहास केळुसकरांनी चरित्ररूपाने शब्दबद्ध केला आहे. या चरित्रामुळेच माधवराव रोकडे यांच्या कार्याची काही माहिती आपल्याला उपलब्ध होत आहे. गरीब मराठा कुटुंबातील बुद्धिमान मुलगा अपंगत्वावर मात करून अखंड ज्ञानसाधना करीत गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी आयुष्यभर झटतो आणि त्यांचे जीवन प्रकाशमान करतो, हे त्यांचे विधायक कार्य या चरित्रातून साकार झालेले आहे. माधवरावांच्या पश्चात धर्माजीराव रोकडे यांनी हा ज्ञानयज्ञ अखंडपणे चालू ठेवला. अहल्याबाई आणि जनाबाई यांच्या कर्तृत्वातून बहुजन समाजातील स्त्रियांची एक कर्तृत्ववान परंपरा साकार झालेली दिसते. माधवरावांच्या मृत्यूनंतर रोकडे कुटुंबाने केलेले प्रयत्न, केलेला संघर्ष यांचे हृदयस्पर्शी वर्णन केळुसकरांनी केले आहे. श्रीमती जनाबाई रोकडे यांचा जीवनसंघर्ष, त्यांचे सामाजिक, शैक्षणिक कार्य जगासमोर येणे आवश्यक आहे, असे वाटल्यामुळे कृष्णराव अर्जुन केळुसकर यांनी ‘श्रीमती जनाबाई रोकडे जे. पी.’ हे त्यांचे संक्षिप्त चरित्र लिहिले आणि ‘इंदूप्रकाश’ छापखान्यातून 15 डिसेंबर 1929 रोजी प्रसिद्ध केले. माधवराव रोकडे हे कृष्णराव अर्जुन केळुसकरांचे मित्र. त्यांच्या सोबत सत्यशोधक चळवळ, कामगार चळवळीमध्ये सहभागी असत. माधवरावांच्या लोकशिक्षणाच्या वेडापायी कुटुंबाची होणारी आर्थिक फरफट त्यांनी पाहिली होती. आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य एखाद्या तपस्व्याप्रमाणे करणार्‍या ‘माधवराव राघोजी रोकडे’ आणि त्यांचा ज्ञानदानाचा लोकसेवेचा वसा पुढे चालू ठेवणार्‍या धर्माजीराव, अहल्याबाई, जनाबाई यांचे कार्य समाजापुढे येणे आवश्यक आहे, असे वाटल्यामुळे त्यांनी ही चरित्रे लिहिली आहेत, ती आजही प्रेरणादायक आहेत. व्यक्तिगत अनुभवामुळे प्रस्तुत चरित्राला विश्वसनीयता प्राप्त झाली आहे.

जनाबाईंच्या जीवनावर वडिलांच्या कार्याचा प्रभाव आहे. त्यामधून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले. वरील तीन संस्थांपुरतीच जनाबाईंच्या कार्याची मर्यादा सीमित नाही. जनाबाई नेहमी आपल्या घरी तीन-चार पोरक्या निराश्रित मुलांना ठेवून घेत. त्यांच्या शिक्षणाची सोय करत असत. मागासलेल्या वर्गातल्या मुलांच्या शिक्षणासाठी कोणी संस्था किंवा फंड काढला तर त्यांना मदत करत. ‘मराठा ऐक्येच्छु सभा’, ‘मराठा प्रॉव्हिडंट फंड’, ‘अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद’ आदी संस्थांच्या कार्यकारिणीवर त्यांनी काम केले. सातवी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद 28 डिसेंबर 1913 रोजी नाशिक हायस्कूलच्या मैदानावर उदाजीराव महाराज पवार, धार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जनाबाई रोकडे यांनी 29 डिसेंबर 1913 रोजी निबंध सत्रात ‘स्त्रीशिक्षण’ याविषयी निबंधाचे वाचन केले. मराठा शिक्षण परिषदेच्या अधिवेशनास उपस्थित राहून त्या स्त्रियांची बाजू मांडत. स्त्रीशिक्षण प्रसारासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करत. शिक्षणप्रसाराविषयी आस्था आणि स्पष्टोक्तीमुळे मोठमोठ्या संस्थांचे पदाधिकारीही त्यांचा आदर करत.

पुण्यातील ‘स्टुडंट्स ब्रदरहूड’या संस्थेच्या वार्षिक संमेलनाचे अध्यक्षस्थान स्वीकारून त्यांनी विद्यार्थीवर्गास मार्गदर्शन केले. या संस्थेस देणगी दिली. बडोद्याहून निघणार्‍या ‘जागृती’ पत्रासही त्या वेळोवेळी मदत करीत असत.

जनाबाई रोकडे यांची सर्वच क्षेत्रांतील कामगिरी लक्षणीय अशी होती. सत्यशोधक संस्कारांमुळे त्यांच्या कार्याला कोणत्याही प्रकारच्या मर्यादा जाणवल्या नाहीत. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेऊन सरकारने प्रथम ‘केसर-ई-हिंद’ हे रौप्यपदक देऊन त्यांचा गौरव केला. जनाबाईंच्या अनुभवाचा लोककल्याणासाठी निर्माण झालेल्या संस्थांना चांगला उपयोग होईल, हे जाणून सार्वजनिक रुग्णालयाची देखरेख करण्यासाठी सरकार नियुक्त बोर्डावर त्यांची नेमणूक झाली. हा मान केवळ अपूर्व होय. या अ‍ॅडव्हायसरी बोर्डाच्या प्रत्येक फेरीत जनाबाई नेमाने हजर असतात आणि आपले नेमलेले काम मोठ्या दक्षतेने व कळवळ्याने करीत असल्याचा उल्लेख त्यांच्या चरित्रात केला आहे. जनाबाईंना मराठी, गुजराती आणि उर्दू या भाषा चांगल्या येत असत. त्यामुळे आजारी महिलेने कोणत्याही भाषेत सांगितलेली तक्रार त्या समजू शकत. सत्यशोधक जनाबाई रोकडे यांच्या समाजऋणातून उतराई व्हावे म्हणून सरकारने त्यांना ‘जस्टिस ऑफ दि पीस (जे.पी.)’ हा बहुमानाचा किताब बहाल केला. यापूर्वी हा किताब गुजराती, मुसलमान, ख्रिश्चन व पारसी महिलांनाच मिळाला होता व बहुजन समाजातील स्त्रियांमध्ये हा सन्मान फक्त दोघींनाच मिळाला. त्यातच जनाबाईंचाही समावेश आहे, ही खरोखरच अभिमानास्पद गोष्ट होय. जे. पी. हा सन्मान मिळालेल्या व्यक्ती उच्चभ्रू, श्रीमंत वर्गातील असल्यामुळे त्यांचा जनसामान्यांशी फारसा संबंध येत नव्हता. पण जनाबाई रोकडे यांचा गरीब, दीन-दलित, कामगार यांच्याशी कायम संबंध येत असे. या सर्व कारणांमुळे त्यांचे सरकार दरबारीही वजन वाढले होते आणि गोरगरिबांनाही मदतीसाठी त्यांचे दार सतत उघडे असे, त्यांच्या समस्यांची सोडवणूक त्वरित होत असे.

धर्माजीराव, अहल्याबाई आणि जनाबाई यांना संतती नव्हती. धर्माजीराव आणि अहल्याबाई निर्वतल्यानंतर जनाबाई रोकडे यांची शेती भाचे मारुतराव बोराडे हेच पाहत असत. निरगुडेजवळील शेतावर धर्माजीरावांनी इ. स. 1902 मध्ये घर बांधले. पुढे 1935 मध्ये जनाबाईंनी या घराला ‘धर्माजीरावां’चे नाव दिले. निरगुडे गावाच्या उत्तरेकडील रस्त्याच्या कडेला असलेले ‘धर्माजी भुवन’ आजही सुस्थितीत आहे. अहल्याबाईंच्या स्मरणार्थ जनाबाईंनी मुंबई येथे जे मोफत सूतिकागृह सुरू केले होते, ते सूतिकागृह पुढे जुन्नर येथे स्थलांतरित करण्यात आले. जुन्नर येथे अद्ययावत इमारत बांधण्यात आली. पुढे हे सूतिकागृह इ. स. 1939 ला नगरपालिकेकडे हस्तांतरित केले. या दवाखान्याच्या आवारात 24 मार्च, 1946 रोजी जनाबाईंचा अर्धपुतळा स्थापून त्यांचे चिरंतन स्मारक उभे करण्यात आले. सोंडूर संस्थानच्या राणीसाहेब सुशीलादेवी घोरपडे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आणि महाराणींच्या हस्ते श्रीमती जनाबाईंचा हृद्य सत्कार करण्यात आला. आज ही दगडी इमारत सुस्थितीत असून तेथे 30 कॉटचा दवाखाना सुरू आहे.

समाजसेवेचे कंकण हाती बांधलेल्या विदुषीचे 2 एप्रिल 1956 रोजी दु:खद निधन झाले. तथापि त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्यातून जनाबाई अमर झाल्या आहेत. मुंबईसारख्या शहरात समाजसेवेचे मूलभूत कार्य करत राहून स्वत:चे स्वतंत्र स्थान त्यांनी निर्माण केले. सत्यशोधक जनाबाई रोकडे यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे.

संदर्भ :
1. कृष्णराव अर्जुन केळुसकर – श्रीमती जनाबाई रोकडे जे. पी. यांचे संक्षिप्त चरित्र इंदूप्रकाश छापखाना – 15 डिसेंबर 1929.
2. जी. ए. उगळे – सत्यशोधकांचे अंतरंग, म. रा. सा. सं. मंडळ, मुंबई, 2017
3. कृष्णराव अर्जुन केळुसकर – माधवराव राघोजी रोकडे यांचे संक्षिप्त चरित्र, 1927.

संपर्क : 9850928612


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ]