वडिलांच्या अंत्यविधीतील कर्मकांडांना मुलीने केला विरोध

सम्राट हाटकर -

नांदेड येथे स्थायिक व ता. मुदखेड येथे शिक्षिका असलेल्या उषा नारायण गैनवाड ‘महा. अंनिस’ शाखा मुदखेडच्या प्रधान सचिव आहेत.

25 डिसेंबर रोजी त्यांचे वडील फारच सीरियस असल्याबाबतचा वाशिम येथून त्यांच्या नातेवाईकाचा फोन आला. परंतु निरोप देणार्‍याच्या बोलण्यावरून त्यांना शंका आल्यामुळे नेमकं काय घडलं, याविषयी त्यांनी विचारणा केली असता वडिलांचं हृदयविकारानं निधन झाल्याचं कळलं. या दुःखद बातमीने त्यांना धक्का बसला. परंतु त्यांनी स्वतःला सावरले व सहकुटुंब माहेरी – वाशिमला – निघाल्या. निघण्यापूर्वी, ‘वडिलांचे निधन झाल्यामुळे मी ‘अंनिस’च्या साप्ताहिक बैठकीला हजर राहू शकत नाही,’ असा मेसेज त्यांनी मला पाठवला व मीही त्यांना ‘अंनिस’तर्फे सांत्वनपर मेसेज केला. यापूर्वी वडील आजारी असताना त्यांना भेटायला गेल्या होत्या, तेव्हा वडिलांनी सांगितलेले शब्द प्रवासात असताना त्यांना आठवले, की ‘माझ्या मृत्यूनंतर रडाय-पडायचे नाही.’ घरी पोहोचल्यावर त्या गंभीर वातावरणात वडिलांना वारा घालण्यासाठी त्यांना सांगण्यात आलं. त्यांना हे माहीत होतं की, पूर्वी प्रेताजवळ घोंगावणार्‍या माशा उठवण्यासाठी पदराने वारा घातला जायचा. परंतु आता परिस्थिती तशी नव्हती. त्यामुळे त्यांनी वारा घालण्यास स्पष्ट नकार दिला. अंत्ययात्रा निघताना काही महिलांना आरती करण्यासाठी सांगितले. ‘ठराविक महिलांनाच का? सर्व महिलांना आरतीसाठी का बोलावत नाही,’ हा प्रश्न विचारून त्यांनी सवाष्ण व विधवा महिलांबद्दल तेथे होणारा भेद थांबवला. सर्व लोकांचा आग्रह झुगारून त्यांनी आईला अंतिम यात्रेत जाऊ दिले नाही. कारण आईची तब्येत फारच खालावली होती. त्या स्वतः आईजवळ थांबल्या.

अंतिम यात्रा आटोपून आल्यानंतर सर्व समाज जमला. त्यांच्या आत्याने त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला की, ‘तू वार घातलं नाही, आईची जोडवी काढून दिली नाहीत, कुंकू पुसू दिलं नाही.’ आता पुन्हा रुढी-परंपरेच्या नावाखाली आईची जोडवी काढणेे व कुंकू पुसण्यासाठी दबाव येत होता. ‘बाईने तिचा अधिकार तिच्या नवर्‍याच्या घरी गाजवावा; माहेरी नाही,’ अशी ताकीद त्यांना देण्यात आली. यावर त्यांनी तेवढ्याच खंबीरपणे उत्तर दिलं की, ‘मुलाचा आई-वडिलांवर जेवढा अधिकार असतो, तेवढाच मुलीचा सुद्धा असतो. तसेच या रुढी-परंपरांच्या मागील तर्क काय? त्याचे चांगले-वाईट परिणाम कोणते?’ याची विचारणा केली; परंतु उत्तर मिळाले नाही. वाद वाढत चालल्यामुळे त्यांच्या मुलांनी व मुलीने आईला समजून सांगण्याबद्दल वडिलांना विनवणी केली. ‘ती जे करत आहे, ते बरोबर करत आहे. कधीतरी, कोणीतरी हे थांबवायला पाहिजे,’ असं सांगून त्यांनी मुलांना गप्प केलं. पत्नीच्या कृतीचं समर्थन करून अप्रत्यक्षरित्या तिला साथ दिली.

काही दिवसांनी, ‘दिवसा’साठी स्मशानभूमीत नेण्यासाठी वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार केले. ‘ते ताट तिथे नेऊन पुन्हा परत आणा व गरजू गरिबांना किंवा प्राण्यांना द्या,’ असे त्यांनी नातेवाईकांना सांगितले. त्या स्वतः स्मशानभूमीत जाऊ शकत नव्हत्या. कारण त्या वेळेला त्यांची ऑनलाइन मीटिंग ठरलेली होती.

या कर्मकांडांना विरोध केल्यामुळे समाजबांधव नाराज झाल्याची खंत त्यांना नाही. परंतु त्यांची मुलगी नाराज असल्याची खंत जरूर आहे. ज्यावेळी कालबाह्य रुढी-परंपरांतला फोलपणा कळेल, त्यावेळी निश्चितच तिला आपल्या आईचा अभिमान वाटेल.

ज्यावेळी त्यांना विचारलं की, ‘समाज आणि नातेवाईकांपुढं तुम्ही एवढी हिम्मत कशी केली?’ त्यावेळी त्यांनी सांगितलं की, ‘सावित्रीबाई फुले, राजाराम मोहन रॉय, संभाजी राजे, मल्हारराव होळकर यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या अंत्यविधीच्या वेळी कर्मकांडांना केलेला विरोध हीच माझी प्रेरणा आहे.’

सम्राट हाटकर, नांदेड


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]