डॉ. सुधीर कुंभार - 9421214136
रयत शिक्षण संस्था ही संविधानातील तत्त्वांचा नेहमीच आदर करते आणि पालन करते. विज्ञानप्रचार आणि प्रसार आपल्या दैनंदिन कामकाजात आणला जावा, हा अट्टाहास कायम ठेवला जातो. महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार नेहमीच अग्रक्रमाने विद्यार्थी व समाजापर्यंत पोचविले जातात. धर्मनिरपेक्षता मानणारी तत्त्वप्रणाली एकदा विद्यार्थिदशेत मिळाली की, तिचा वापर केला जातो. मी रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी होतो आणि शिक्षक म्हणून वडगाव मावळ येथे काम करू लागलो. तो काळ होता, गेल्या शतकातल्या शेवटच्या दशकातला. एकविसाव्या शतकाचे आव्हान पेलण्याची ताकद विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याची जबाबदारी पार पाडताना राष्ट्रीय एकात्मता, वैज्ञानिक दृष्टिकोन, या बाबी शिकवायला लागायच्या. त्यातच गणपती उत्सवासारखे सार्वजनिक उत्सव शाळाशाळांत मोठ्याप्रमाणात साजरे करायची प्रथा आली. त्या काळात अंधश्रद्धा निर्मूलनासारखे सामाजिक कार्य करणारे, वैज्ञानिक बाबींचा विचारप्रचार करणारे शिक्षक अल्प असायचे. त्यांची गोची व्हायची, ते एकटे पडायचे. आरतीला बळेबळेच टाळ्यांच्या क्रियेत सामील व्हायचे. ते याला विरोध करत; पण त्याला दाद न देता शाळाशाळांत मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जायचा. आरत्या, विसर्जन मिरवणुका यात ठराविकांचा पुढाकार असायचा; बाकी उरले ते प्रसादापुरते असायचे. ही अतिउत्सवप्रियता थांबविणे अशक्यच होते. पण एक प्रयत्न म्हणून त्या काळात रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. एन. डी. पाटील सरांना एक पत्र लिहिले. त्यात गणेशोत्सवात होणारी बाब निदर्शनास आणून दिली – “इतर धर्मियांचे सण पण शाळेत व्हावेत किंवा एका धर्माचेच सण होऊ नयेत. कारण सर्व जाती-धर्माचे विद्यार्थी आपल्या शाळेत येतात. शाळेच्या आवारात असा कोणताही धर्म, पंथ भेदाभेद नसावा, यासाठी असणार्या मूलभूत धर्मनिरपेक्ष तत्त्वांचे व कायद्याचे उल्लंघन होत आहे. आपण यात लक्ष घालावे,” ही विनंती केली. एन. डी. सरांनी सुकुमार मंडपे व कुमुदिनी मंडपे यांनाही याबातीत वस्तुस्थिती विचारली होती. त्यानुसार त्यांनी त्या काळात ‘रयत’च्या सर्व शाखांना पत्र दिले की, सार्वजनिक ठिकाणी व ऑफिसमध्ये असे धार्मिक उत्सव साजरे करण्यात येऊ नयेत. गणपती मूर्ती बसवून गणेशोत्सव शाळेत घेऊ नयेत; तसेच सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रीय एकात्मता व धर्मनिरपेक्षता या तत्त्वांना बाधा येणार नाही, असेच कार्यक्रम व्हावेत. ही बाब समजावून घेऊन सामाजिक सुधारणेसाठी स्पष्टपणे व परखडपणे बोलणार्या आणि कृतीद्वारे विज्ञान चळवळीला पुढे नेणार्या डॉ. एन. डी.पाटील सरांना सलाम !
– डॉ. सुधीर कुंभार
संपर्क ः 94212 14136
समन्वयक, रयत विज्ञान परिषद, सातारा. महात्मा गांधी विद्यालय, कडेगाव (सांगली)