एैसे कैसे झाले भोंदू!

-

प्रिय सिद्धीसम्राट बागेश्वर महाराज,

महाराज तुमच्या सिद्धीसोबत

आपण सारे नाचू या

गावागावातील भ्रष्टाचार

तुमच्यासोबत वाचू या

भ्रष्ट अधिकार्‍यांच्या बेडरूममधील

नोटांची बंडले सांगाल का?

लुप्त होणार्‍या निधीचा हिशोब

मीडियाच्या वेशीला टांगाल का?

रेशनच्या गाड्या कुठे होतात लुप्त?

आश्रमशाळेतील अन्न कुठे होते गुप्त?

पोलादी भिंत भ्रष्टाचाराची

तुमच्या सिद्धीने वाकवाल का?

रोजगार हमीच्या मस्टरची नावे

इथून वाचुन दाखवाल का?

ठेकेदार आणि नेत्यांच्या डिलिंग

तपशील जाहीर कराल का?

गैरहजर कर्मचार्‍यांवर

वक्रदृष्टी धराल का?

दिवसा भांडून रात्री भेटणार्‍या

नेत्यांना व्हायरल करणार का?

पक्षनिधी देणार्‍या उद्योजकांवर

दिव्य कॅमेरा धरणार का?

बॉम्बस्फोट, हत्या होणार असतात

आधीच तुम्ही का सांगत नाही?

चीनच्या कुरापती कळायला

सिद्धी तिथे का रांगत नाही?

अनेक जीव वाचतील महाराज

तुम्ही मनावर घ्या ना

सीबीआय आणि रॉ चे

प्रमुख तुम्ही व्हा ना..

आत्महत्या करणारा शेतकरी

आधीच तुम्ही ओळखून द्या

कुपोषित लेकरांचा दिव्य दृष्टीने

कॅलरी चा हिशोब सरकारला द्या

कागदावर पूर्ण झालेली कामे

दिव्यदृष्टीने वाचा यादी

भगव्या वस्त्रांचा सिद्धीने

लाल फितीच्या लागा नादी

महाराज अगदी शप्पथ सांगतो

गरिबांचे तुम्ही मसीहा व्हा

पंचतारांकित सिद्धी तुमची

आमच्या पालावर घेऊन या..

– हेरंब कुलकर्णी, अकोले

संत तुकारामांचा अपमान

बागेश्वर सरकार म्हणवून घेणारा हा बुवा आपण म्हणतो ती पूर्व अशा भ्रमामध्ये आहे. त्यातूनच त्याने आपली अक्कल पाजळली आणि संत तुकारामांबद्दल अपमानास्पद विधान केले.

गेल्या साडेतीनशे वर्षांपासून संत तुकाराम प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात पोहोचले आहेत त्यांच्याबद्दल बिनबुडाचे विधान करणार्‍या धीरज शास्त्रीबुवांचा सर्वत्र निषेध होत आहे. अशा संपत्तीच्या घाणीवर घोंगावणार्‍या बुवांचा समाचार संत तुकारामांनी अत्यंत परखड शब्दांत घेतलेला आहे.

तुकाराम महाराज म्हणतात,

जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे ॥१॥

बुका लावू नये भाळा| माळ घालू नये गळा ॥२॥

तटावृषभासी दाणा| तृण मागो नये जाणा ॥३॥

तुका म्हणे द्रव्य घेती| देती, तेही नरका जाती ॥४॥

(अ. क्र. ३०८४)

मोठी बिदागी घेऊन कीर्तन करणारे भोंदू कीर्तनकार दिसतात. काहीजण देवाचे नाव घेऊन अर्पण किंवा दक्षिणा मागतात अशा सर्वांसाठी संत तुकाराम म्हणतात, तुम्ही जिथे देवाचे नाव घेता, चांगला विचार सांगता तिथं अन्नसुद्धा खाऊ नका. ज्या काळात पैशाला पोतंभर बुक्का मिळत होता त्या काळात संत तुकाराम म्हणतात, त्यातला कणभर बुक्का सुद्धा कपाळाला लावू नका. गळ्यात माळ घालू नका. त्यांच्याकडून आपण बसून गेलेल्या गाडीच्या बैलासाठी किंवा घोड्यासाठी गवत मागू नका. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, देवाच्या नावावर जे द्रव्य घेतात आणि देवाच्या नावावर जे द्रव्य देतात ते दोघेही नरकाला जातात.

दुसर्‍या एका अभंगात संत तुकाराम म्हणतात, माते परिस थोर कथा| भाडं घेता न लाजे॥” देवाची कथा म्हणजे आई आहे. तिचं भाडं घ्यायलासुद्धा हे लोक लाजत नाहीत. देवाच्या नावावर अर्पण मागून मोठे मठ उभा करणारे लक्षाधीश, कोट्यधीश नव्हे, तर अब्जाधीश बुवा भारतात आहेत. त्यातले काही तर “गुरुपौर्णिमेला अर्पण द्या” म्हणजे हजारपट पुण्य मिळेल असे सांगतात. या पैशाचा वापर आरामात राहणे, चैन करणे, विरोधकांचे खून पाडणे यासाठी सुद्धा केला जातो.

(‘तुका झालासे कळस’ पुस्तकावरून साभार)

अनिल चव्हाण


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]