विठ्ठल

ह.भ.प. देवदत्त परुळेकर -

वारकरी संप्रदायाने आपले आराध्य दैवत म्हणून ज्या विठ्ठलाची निवड केली, ते दैवतच वैशिष्ट्यपूर्ण आहे. संतांनी विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार मानला आहे. तुकाराम महाराज म्हणतात –

द्वारकेचें केणें आलें याचि ठाया । पुढें भक्तराया चोजवीत ॥

तर एकनाथ महाराज म्हणतात –

द्वारकेहुनी जगजेठी । आला पुंडलिकाचे भेटी ।

पाऊलें सरळ गोमटी । बाळ सूर्यापरी ॥

धन्यधन्य पांडुरंग । मूर्ति सावळी सवेग ।

गाई गोप सवंगडे लाग । मिळोनि सकळांसहित ॥

मुळात श्रीकृष्ण हा भगवान विष्णूचा अवतार मानला आहे. विष्णूच्या सुप्रसिद्ध दशावतारात विठ्ठल नाही. काही पुराणग्रंथात विष्णूचे चोवीस अवतार मानले आहेत. यातही विठ्ठल नाही. विष्णुसहस्त्रनामाच्या हजार नामातही विठ्ठल नाही. म्हणून संतांनी याचा उल्लेख ‘चोवीसा वेगळा, सहस्त्रा वेगळा’ असा केला आहे. श्रीकृष्णाचा अवतारही द्वापारयुगाच्या शेवटी कित्येक वर्षापूर्वी समाप्त झाल्याचे वर्णन ‘भागवत’ पुराणात आहे. विठ्ठल मात्र अजूनही पंढरीला उभा आहे.

तुकाराम महाराजांचा एक गोड अभंग आहे –

माझी मेली बहुवरी । तू का जैसा तैसा हरी?

विठो कैसा वाचलासी । आता सांग मजपासी ॥

तुज देखतांची माझा । बाप गेला आजा पणजा ॥

आम्हा लागलेसे पाठी । बालत्व तारुण्य काठी ॥

तुज फावले ते मागे । कोणी नसता वादी लागे ॥

तुका म्हणे तुझ्या अंगी । मज देखता लागली अवघी ॥

तुकाराम महाराज म्हणतात, “हे हरी, हे विठ्ठला, माझे आतापर्यंत पुष्कळ नातेवाईक निवर्तले. परंतु तू मात्र अजून आहे तसाच आहेस, हे असे कसे? तू आजतागायत कसा काय वाचलास, याचे रहस्य तू आता मला सांग. तुझ्यादेखत माझा बाप, आजा, पणजा गेला, माझ्या तीन पिढ्या सरल्या; परंतु तुझ्यात मात्र काहीही बदल झालेला मला दिसत नाही. आमच्यापाठी वयोमानापरत्वे बालपण, तारुण्य, वृद्धत्व लागते. परंतु तू पूर्वी दिसायचा अजूनही तसाच दिसतोस.”

तुकोबाराय म्हणतात, “हे देवा, तुझे मागे बरेच फावले होते. परंतु त्यावेळी मी अडचणीत असल्याने मी तुला काहीही बोलू शकत नव्हतो. परंतु जेव्हा मला संधी मिळते आणि तुझ्या आसपास कोणीही नसते, हे पाहून मग मी तुझ्याशी वाद घालू लागतो, तुला नाही नाही ते प्रश्न विचारून भेडसावून सोडतो. ते म्हणतात, ‘माझ्यापाठी हे मनुष्यदेहाच्या सर्व अवस्था पाठी लागल्या.’ परंतु तू पूर्वी होता तसाच अजूनही निर्विकार आहेस, याचे गुपित तू आज उघड करच आणि मला एकांतात सांग.”

व्याधाचा बाण पायाला लागून कृष्णाचा अवतार समाप्त झाल्यानंतरही कृष्णाचा अवतार मानलेला विठ्ठल मात्र कलियुगात आजही पंढरीत उभाच आहे. कारण संतांनी वर्णिलेला त्यांचा हा देव काही वेगळाच आहे.

वारकरी संतांनी थेट भगवान विष्णूंना आपले दैवत म्हणून स्वीकारले नाही. भगवान विष्णूचे राम-कृष्णादी अनेक अवतार उपलब्ध असताना पुन्हा हा श्रीकृष्णाचा वेगळाच अवतार संतांनी आपले उपास्य दैवत म्हणून का स्वीकारला, याचे चिंतन करायला हवे.

आणखी एका कारणाने विठ्ठलाचा अवतार वेगळा आहे. भगवंताने आपण अवतार कशासाठी घेतो, हे भगवद्गीतेत स्पष्ट सांगितले आहे. गीतेचा तो सुप्रसिद्ध श्लोक असा –

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।

धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥

भगवान म्हणतात, “साधूंच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या विनाशाकरिता मी युगानुयुगे अवतार धारण करीत असतो. विठ्ठलाचा अवतार याला अपवाद आहे. प्रल्हादासारखे कोणत्याही भक्तावर संकट आले होते, म्हणून त्याच्या रक्षणासाठी विठ्ठलाचा अवतार झाला काय? किंवा हिरण्यकश्यपू, रावण, कंस अशा कोणत्यातरी दुष्टाच्या संहारासाठी देव विठ्ठलरुपात धावून आला काय? कोणी भक्ताने धावा केला होता काय? कुणी भक्ताने बोलावले तरी होते काय? असे कोणतेही कारण घडले नाही. विठ्ठल आला तो केवळ पुंडलिकाला भेटण्यासाठी. पुंडलिकाच्या मनातील निष्काम भक्तिभाव पाहून देव स्वतः त्याला भेटायला आला. म्हणून संत जनाबाई म्हणतात, ‘तूच तिन्ही लोकांत धन्य आहेस.’

संत जनाबाईचा अभंग असा –

भलाभला पुंडलिका । तुझ्या भावार्थाचा शिक्का ॥

भलें घालूनियां कोडें । परब्रह्म दारापुढें ॥

घाव घातला निशाणीं । ख्याति केली त्रिभुवनीं ॥

जनी म्हणे पुंडलिका । धन्य तूंचि तिहीं लोकां ॥

विठ्ठल हा देव केवळ भावाचा भुकेला आहे. जनाबाई म्हणतात –

देव भावाचा लंपट । सोडुनी आला हो वैकुंठ ॥

तर तुकोबा म्हणतात –

मनीं भाव असे कांही । तेथें देव येती पाहीं ॥

विठ्ठलाला कोणतेही कपट, दांभिकता, अहंकार खपत नाही. विठ्ठलाला प्रसन्न करून घ्यायला योग, याग, विधी, कर्मकांड, तप, उपवास अशी कोणतीही त्रासदायक साधना करावी लागत नाही. त्याला एक भाव पुरतो. तिथे पैसा खर्च करावा लागत नाही की शरीराला पिडा द्यावी लागत नाही. विठ्ठल भोळ्या भावाने प्रसन्न होतो; किंबहुना भक्ताच्या भावानेच याला नाम, रूप प्राप्त झाले नाही काय? संत निळोबा विचारतात –

भक्तांवीण देवालागी । पुसते जगी कोण दुजे? ॥ नामही नव्हते, रूपही नव्हते । कैसेनि जाणते कोण तया?

तुकोबा एका अभंगात देवालाच विचारतात –

आमुचिया भावे तुज देवपण । ते का विसरोन राहिलासी?

विठ्ठलाची आणखी काही वैशिष्ट्ये पाहू.

विठ्ठलाच्या हातात कोणतेही शस्त्र नाही. तो कुणाचाही संहार करायला अवतरला नाही. हा देव अहिंसेचा कट्टर पुरस्कर्ता आहे.

विठ्ठलाचे चरण व दृष्टी सम आहे. तुकोबा वर्णन करतात –

समचरणदृष्टी विटेवरी साजिरी ।

हा देव सर्वांकडे समतेने पाहतो. तुकोबा म्हणतात –

राव रंक तुम्हां सारिके चि जाणा ।

नाहीं थोर साना तुम्हांपासी ॥

विठ्ठल हा समतेचे प्रतीक आहे. तुकोबांचा अभंग प्रसिद्ध आहे –

उंचनीच काही नेणें भगवंत ।

तिष्ठे भावभक्ति देखोनिया ॥

उच्च-नीच जात, श्रीमंत-गरीब, स्त्री-पुरुष, पुण्यवान-पापी, सोवळे-ओवळे असा कोणताच भेदभाव विठ्ठलापाशी नाही.

आपली सर्व कामे सोडून माझी सेवा कर, असे हा विठ्ठल सांगत नाही. उलट आपल्या भक्ताच्या कष्टाच्या कामात हा सदैव सहाय्य करतो. एकनाथ महाराज वर्णन करतात –

खुर्पू लागे सावत्यांसी । न पाहे यातीसी कारण ॥

घडी मडके कुंभाराचे । चोखा मेळ्याची ढोरे ओढी ॥

सजन कसायाचे विकी मांस । दामाजीचा स्वंये होय दास ॥

एका जनार्दनी जनीसंगें । दळूकांडू लागें आपण ॥

विठ्ठल हा श्रमप्रतिष्ठेच्या मूल्याची पाठराखण करणारा देव आहे. तो श्रमिकांचा, कष्टकर्‍यांचा, शेतकर्‍यांचा देव आहे. विठ्ठल हा नवसाला पावणारा देव म्हणून प्रसिद्ध नाही; किंबहुना विठ्ठलाकडे नवस मागण्याची प्रथा नाही. देवाला नवस करणे सोडाच; देवापाशी काही मागणे, याचना करणे संतांना मंजूर नाही. भुक्ती आणि मुक्तीही त्यांना नको आहे. संत देवापाशी फक्त संतसंग आणि भक्तिप्रेम मागतात. आपण कधी विठोबा कुणाच्या अंगात संचारल्याचे पाहिले आहे काय? विठ्ठल कुणाच्या अंगात येत नाही. तुकोबा विचारतात –

अंगी दैवत संचरे । मग तेणे काय उरे?

नवसें कन्यापुत्र होती । तरि कां करणें लागे पती?

जाणे हा विचार । स्वामी तुकयाचा दातार ॥

विठ्ठलाला शोधायला आपल्याला कुठे जायची गरज नाही. जिथे भक्तिभाव असतो, जिथे त्याचे भक्त असतात, तिथे तो धावत येतो. तो संतांच्या संगतीत रमतो. त्यांच्याबरोबर कीर्तनात नाचतो. त्यांची सेवा करतो. संतांची, सद्विचारांची संगती हीच विठ्ठलाची संगती!

विठ्ठल ज्या मूल्यांची प्रतिमा आहे, ती मूल्ये आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करणे हीच विठ्ठलाची भक्ती!

लेखक संपर्क : 94220 55221


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]