प्रा. परेश शहा -
बरोबर सव्वीस वर्षांपूर्वी ता. 15 डिसेंबर, 1993 रोजी महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक – कार्याध्यक्ष शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांसोबत विवेक जागरासाठी ‘वाद – संवाद’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. लागू शिंदखेड्यात आले होते.
आजच्या सारखे प्रगत आणि सोयी-सुविधा त्या काळी उपलब्ध नव्हत्या. शिंदखेड्याच्या वरपाडे रोडवरील मराठी शाळेच्या पटांगणात मंडप घालून हा कार्यक्रम झाला होता; पण पंचक्रोशीतून अलोट गर्दी या कार्यक्रमाला लोटली होती. साध्या नीळ आणि गेरूच्या रंगाने रंगविलेला कापडी बॅनर, साधे; प्रसंगी कृष्णधवल फोटो. मला आठवते, कॉर्डलेस माईक देखील माहीत नव्हता. खास त्या कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टिमवाल्याला बजावून – बजावून तो इंदोरहून मागविला होता. खर्चाला पैसे नव्हते, हस्ती बँकेने प्रायोजक म्हणून पंचवीसशे रुपये मदत दिली होती.
खानदेशात विविध ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमाच्या दौरा संयोजनाच्या जबाबदारीतील प्रमुखांपैकी मी एक होतो. पण प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणे महत्त्वाचे, ही माझी तेव्हापासूनची भूमिका होती. संपूर्ण कार्यक्रमात मी मंचावर देखील गेलो नाही. डॉ. लागू आणि डॉ. दाभोलकरांसोबत एक फोटो सुद्धा काढला नाही.
धुळे जिल्ह्यात धुळे, शिंदखेडा आणि दोंडाईचात हा कार्यक्रम झाला होता. शिंदखेड्यात दोघांची मुलाखत माझे मित्र प्रा. दीपक माळी व अनिल पाटील यांनी घेतली होती. दोंडाईचाला ही मुलाखत साहित्यिक, अभ्यासू संपादक, माजी मंत्री हेमंत देशमुख यांनी घेतली होती. नानासाहेब देशमुखांनी घेतलेली ही मुलाखत महाराष्ट्रभर झालेल्या ‘वाद – संवाद’ कार्यक्रमातील सर्वोत्कृष्ट मुलाखत होती. कार्यक्रमानंतर कितीतरी महिने त्या मुलाखतीच्या ऑडिओ केसेट ठिकठिकाणी लोक हौसेने ऐकत. त्या आधी बरोबर एक वर्षापूर्वी डिसेंबर 1992 ला ‘बाबरी’ चे पतन आणि त्यानंतर देशभर धार्मिक दंगली झाल्या होत्या. डॉ. लागू अतिशय संवेदनशील होते. या पार्श्वभूमीवर त्यांना आणि डॉ. दाभोलकरांना हिंदू – मुस्लिम ऐक्याचे विशेष अगत्य होते, म्हणून सायंकाळी शिंदखेड्यातील हैदरअली चौकात ‘जातीय सलोखा मेळाव्या’चे आयोजन केले होते. तो मेळावा शिंदखेडकर नागरिकांना सदैव स्मरणात राहील. एका सर्वार्थाने अशा मोठ्या माणसाला विनम्र अभिवादन!