‘अंनिस’ सत्यशोधनाला येणार म्हणताच ‘भानामती’ने ठोकली धूम

प्रशांत पोतदार - 9421121328

5 सप्टेंबर 2020 शिक्षक दिन. सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळग्रस्त असणार्‍या एका खेड्यातून शिक्षकाचा फोन खणाणला, “सर, आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करता ना?”

मी म्हणालो, “हो….पण आपण कोण बोलताय? माझा नंबर कोठून मिळाला?”

“सर, वेबसाईटवरून वरून घेतला. आम्ही घरातील मंडळी खूप घाबरलोय, काय करावं कळत नाही…”

मी म्हणालो, “शांतपणे काय घडले ते सांगा, घाबरू नका.” “आज सकाळी अचानक काल गाठोड्यात बांधलेल्या साड्यांनी पेट घेतला. त्यातील काही साड्या, परकर गायब झाले. दुपारी बेडवरील अंथरूण, बॅग, पुस्तके यांनी अचानक पेट घेतला. घरातील मोबाईल अचानक गायब झाला, तरी आपण यावे. आम्हाला खूप भीती वाटत आहे. आम्हाला सहकार्य करावे. यामागचे खरे कारण काय आहे, ते दाखवावे आणि हे प्रकार कायमचे थांबवावेत, ही विनंती.”

मी म्हणालो, “हे कधीपासून घडतंय? घडल्या प्रकारचे काही फोटो पाठवा… आणि कुटुंबातील सर्वांची सत्यशोधन करण्याची तयारी आहे आणि ‘अंनिस’ने ती करावी, यासाठी आम्हा कुटुंबातील सर्वांची संमती आहे, असा अर्ज लिहून मला ऑनलाईन मेल अथवा ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर त्वरित पाठवा.” त्यांनी असा अर्ज लिहून काही फोटोंसह ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर लगेच पाठवला. तो वाचून मला आश्चर्यच वाटले. 29 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2020 सलग आठ दिवस वेगवेगळे प्रकार त्यांच्या घरात घडत होते. 29 ऑगस्टला प्रथम घराची चावी गायब झाली. लगेच 30 तारखेला कुलूप, टॉवेल, रिमोट, वरवंटा, चार्जर, मास्क, लाडू, कुर्‍हाड इत्यादी वस्तू घरातून गायब झाल्या. 31 तारखेला यातील काही वस्तू परत आल्या; पण कुलूप गायबच राहिले. 1 सप्टेंबरला शेळ्यांची दावण, साड्या, कॅलेंडर, मोबाईल, देवाची मूर्ती, फोटो अचानक गायब झाले. 2 सप्टेंबरला साड्या व अजून एक शेळ्यांची दावण गायब झाली. 3 सप्टेंबरला घरातील एका महिलेची साडी घरातच पेटली; तसेच दुसर्‍या महिलेची साडी अचानक जळाली. 4 सप्टेंबरला भाजी, दूध यामध्ये अचानक मीठ कालवले गेले. परकर जळाला, एक ड्रेस गायब झाला.

“गावात देवाचं पाहणार्‍याला दाखवले. तो म्हणाला, ‘करणी, भानामतीचा प्रकार दिसतोय.’ मी स्वतः शिक्षक असल्याने मला या गोष्टींवर विश्वास बसेना. म्हणून तुमचा नंबर मिळवला व लगेच फोन लावला सर.” मी सातारच्या ‘अंनिस’च्या ग्रुपवर ही घटना ‘पोस्ट’ केली; तसेच सातारा जिल्ह्याचे ज्येष्ठ कार्यकर्तेकुमार मंडपे सर व प्रा. प्रमोदिनी मंडपे यांच्याबरोबर प्रत्यक्ष बोलणे झाले. सातारा जिल्ह्याचे कार्याध्यक्ष प्रशांत जाधव व ‘शहर’चे कार्याध्यक्ष हौसेराव धुमाळ यांच्याशी प्रत्यक्ष फोनवर बोलून घटनास्थळी जाऊन सत्यशोधन करण्याचे नियोजन केले. यासाठी प्रशांत जाधवने महिला कार्यकर्ती बरोबर असावी म्हणून सातारा जिल्ह्याच्या महिला कार्यवाह अमृता जाधव व शंकर कणसे यांनाही सांगितले. याबाबत मी संबंधित शिक्षकांना फोन करून, “आम्ही आपल्याकडे भानामतीच्या प्रकारामागील सत्यशोधनासाठी रविवारी येत आहोत. आल्यानंतर आपल्या सर्व कुटुंबीयांच्या एकत्रितपणे; तसेच गरजेनुसार एकेकाच्या स्वतंत्र मुलाखती आम्ही घेऊ. घरातील जळालेल्या काही वस्तू लॅबला तपासणीसाठी पाठवण्याकामी सील करून बरोबर घेऊ.आजपर्यंतच्या अशा प्रकारांमध्ये कोणत्याही स्वरुपाची अज्ञात शक्ती नसते व कोणीतरी जवळची वा ओळखीची मानवीय शक्तीच हे घडवून आणत असते, असा समितीचा अनुभव आहे. आम्ही सत्यशोधनास येणार, याबाबत कोठेही आपण वाच्यता करू नये. आम्हीही याबाबत पूर्ण गुप्तता ठेवू. कोठेही संबंधित व्यक्तीचे नाव प्रेसला दिले जाणार नाही, याची काळजी घेऊ.” एवढे सांगितल्यावर ते तयारही झाले.

आम्ही सर्वांनी सकाळी लवकर निघण्याची पूर्ण तयारी केली. अचानक रात्री दहा वाजता त्यांचा परत फोन आला, “सर, तुम्ही व तुमची टीम उद्या लगेच येऊ नका. मी मंगळवारी तुम्हाला फोन करतो. मग या. कारण माझ्या भावजयीला मुंबईला पाठवले आहे.”

मी म्हणालो, “त्या नसल्या तरी चालेल. आम्ही सत्यशोधनासाठी येऊ.”

“नको, नको सर. मंगळवारी मी तुम्हाला फोन करतो.”

त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही जाणे रद्द केले. मंगळवारी फोनची मी वाट पाहिली; पण फोन आला नाही, म्हणून मी स्वतःच रात्री फोन केला. मी म्हणालो, “काय झाले सर, आपण फोन करणार होतात? परत काही भानामातीचा प्रकार घडला का?”

सर म्हणाले, “अजिबात नाही. आपल्याशी बोलणे झाल्यानंतर अर्ज केला. तेव्हापासून गेली तीन दिवस असा कोणताही प्रकार घडला नाही.” मी म्हणालो, “मग फारच छान झाले. परत कधी असे घडले तर जरूर सांगा. आणि हो, कोणत्याही देव पाहणार्‍या भोंदू-बाबाचा सल्ला घेऊन काही चुकीचे करू नका.” एवढे सांगून मी फोन ठेवला.

‘अंनिस’ची टीम येणार आणि सविस्तर मुलाखती घेऊन काही वस्तू तपासणीस नेणार आणि आपलं बिंग उघडे पडणार, या भावनेनेच कदाचित ही तथाकथित भानामती पळाली असणार. असो, भानामती थांबली हे महत्त्वाचे. वेदना याची आहे की, आजच्या विज्ञानयुगातही शिक्षकाच्या घरातच; आणि तेही शिक्षकदिनीच हे घडावं!

प्रशांत पोतदार, राज्य प्रधान सचिव


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]