मीना चव्हाण - 9764147483
अंधश्रद्धांची दुनिया, चमत्कारांची किमया व संहिता चमत्कार सादरीकरणाची
बुवा समाजात का तयार होतो? जनमानसाचा त्याच्यावर विश्वास का बसतो, याला अनेक कारणे आहेत. त्यातील एक महत्त्वाचे आहे, चमत्कार. पुढे दाभोलकर लिहितात, पुस्तकातील या प्रयोगांना विज्ञानाचे सूत्र आहे; परंतु ते केवळ शास्त्राचे प्रयोग नाहीत. त्यांना मनोरंजनाचे मूल्य आहे; पण ती जादूची कला नाही. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या लढ्यात बुवाबाजीविरुद्ध लढताना तथाकथित चमत्कारांचे भांडाफोड करण्याचे हत्यार यादृष्टीने या पुस्तकाकडे आम्ही बघतो.
समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाची वाढ व्हावी म्हणून ‘अंनिस’ने विविध उपक्रम हाती घेतले. चमत्कारांचा भांडाफोड करणारी सप्रयोग व्याख्याने हा त्यातीलच एक उपक्रम. एके काळी गावागावांत गल्ली-बोळात बारीक-सारीक चमत्कार करणारे बुवा-बाबा पाहायला मिळत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही अनेक बुवा आपले चमत्कारी वलय टिकवून होते. त्यांच्या चमत्कारामागील भोंदूगिरी, हातचलाखी, रासायनिक प्रयोग बी. प्रेमानंद यांनी उघड केले आणि ते सांगण्यासाठी काही राज्यांतून दौरा काढला. महाराष्ट्रात त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यकर्ते सप्रयोग व्याख्याने करू लागले. पण ते पाहून आणि ऐकून लक्षात राहिले होते, तेवढेच. त्याला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सुसंघटित स्वरूप दिले. समितीचे कार्यकर्ते चमत्कार करणार्या भोंदू बुवाला उघडे पाडत. त्याचबरोबर गावागावांत जाऊन सप्रयोग व्याख्याने करत. प्रत्येक वेळी श्रोते भिन्न असत. प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, ग्रामीण नागरिक, शेतकरी, गावचे पुढारी, मेळाव्यात जमलेले कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, तरुण मंडळाचे कार्यकर्ते असे विविध स्तरातील श्रोते जिज्ञासू वृत्तीने पाहत, व्याख्यान ऐकत आणि शंका विचारत. ‘’
विज्ञानातले प्रयोग लीलया करत असतानाच वक्ता प्रबोधनही करे; किंबहूना प्रबोधन करणे, हाच या व्याख्यानामागचा मुख्य उद्देश असे.
वक्त्यांनी प्रयोग कधी इतरांच्या व्याख्यानातून पाहिलेले असत, तर कधी शिबिरांमधून अभ्यासलेले. चमत्कारांची माहिती एकत्रित मिळावी, प्रयोगासाठी लागणारे साहित्य प्रत्येक वेळी आठवावे लागू नये, अशा उद्देशाने ‘अंनिस’ने ‘अंधश्रद्धांची दुनिया चमत्कारांची किमया’ हे पुस्तक प्रसिद्ध केले.त्याचे लेखक होते प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे, कुमार मंडपे आणि पां. नि. निपाणीकर. तिघांनीही यापूर्वी हजारो व्याख्याने दिली होती. मुंडे सर ‘अंनिस’चे वाङ्मय समाजापर्यंत नेण्याचे मुख्य काम करत. ‘वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प’ नियोजनपूर्वक आणि चिकाटीने चालवल्यामुळे हजारो विद्यार्थी आणि शिक्षक ‘अंनिस’ला जोडले गेले. या प्रकल्पाचे प्रमुख होते कुमार मंडपे सर. निपाणीकर सरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे विचार सांगणारी गाणी सोप्या भाषेत व उडत्या चालीत लिहिली. त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळा-कॉलेजपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाचा सूत्रबद्ध विचार पोचला.
‘अंधश्रद्धांची दुनिया चमत्कारांची किमया’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती डिसेंबर 1994 मध्ये प्रसिद्ध झाली. हे ‘अंनिस’चे पहिले पुस्तक. अर्वाचीन महाराष्ट्रात बुवाबाजीविरुद्ध ज्यांनी प्रथम झुंज दिली, त्या शंतनुराव किर्लोस्कर यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये पुस्तक प्रकाशित झाले. याची 13 वी आवृत्ती 2002 मध्ये प्रसिद्ध झाली. त्याला प्रस्तावना लिहिताना डॉ. दाभोलकर म्हणतात – बाबालोकांचे अनेक प्रकार आहेत, कोणी चमत्कार करणारे, तर कोणी तो न करताही लोकांना भुलवणारे. आकर्षक व्यक्तिमत्त्व, सफाईदार जडजंबाल भाषा ही काही जणांची खासियत; तर काहीजण तथाकथित अध्यात्माचे घाऊक ठेकेदार. काहीजण भलतेच हुशार. अध्यात्माची तथाकथित विज्ञानाशी सांगड घालून जणू काही नवे तत्त्वज्ञानच निर्माण केल्याचा टेंभा मिरवणारे. विज्ञानाची भाषा वापरून फसवणूक करणारेही कमी नाहीत. काही बाबा तर चक्क पागल. ‘बुवा तेथे बाया’ची प्रचिती देणारे बाबाही कमी नाहीत. या सर्व बुवाबाजीविरुद्ध महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जमेल तेवढी लढत आहेच; परंतु चमत्कार करणार्या बाबालोकांच्या विरुद्ध या पुस्तकाचा रोख आहे.
बुवा समाजात का तयार होतो? जनमानसाचा त्याच्यावर विश्वास का बसतो, याला अनेक कारणे आहेत. त्यातील एक महत्त्वाचे आहे, चमत्कार.
पुढे ते लिहितात, पुस्तकातील या प्रयोगांना विज्ञानाचे सूत्र आहे; परंतु ते केवळ शास्त्राचे प्रयोग नाहीत. त्यांना मनोरंजनाचे मूल्य आहे; पण ती जादूची कला नाही. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या लढ्यात बुवाबाजीविरुद्ध लढताना तथाकथित चमत्कारांचे भांडाफोड करण्याचे हत्यार यादृष्टीने या पुस्तकाकडे आम्ही बघतो.
पुस्तकाची भूमिका मिलिंद जोशी यांनी ‘मागे वळून पाहताना’ शीर्षकाखाली मांडली आहे. त्यामध्ये 1935 मध्ये किर्लोस्कर मासिकाच्या संपादकानी लिहिलेले विचार पुन्हा सांगितले आहेत; ते आजही जसेच्या तसे लागू पडतात. बुवांचा प्रतिकार कसा करावा, याबाबतीत ते स्पष्टपणे सांगतात की, कोणी बुवाशी अगर त्याच्या शिष्याशी अतिप्रसंग करू नये. कारण बुवाबाजीला जितके बुवा, तितकेच लोकही कारण असतात. ‘मागणी तसा पुरवठा’ हा न्याय तेथे दिसून येतो. लोकांच्या मतांमध्ये फरक पडून आला, म्हणजे आपोआपच बुवाशाहीचे बंड मोडेल. एवढ्यासाठी बुवा अगर त्याचे शिष्य, आपली छाप पाडण्यासाठी ज्या युक्या-प्रयुक्त्या लढवत असतात, त्या उजेडात आणून लोकांना सुशिक्षित करणे हा सर्वांत उत्तम मार्ग. तथापि, एखादा बुवा पक्का टग्या असल्यास कायद्याचे उल्लंघन न करता ज्या सनदशीर मार्गाने त्याचा प्रतिकार करता येईल, त्याचे अवलंबन करावे. वरील उतारा वाचल्यावर प्रस्तुत पुस्तकाचा उद्देश वेगळ्याने सांगण्याची आवश्यकता नाही.
या पुस्तकाचा भाग एक प्रसिद्ध झाल्यानंतर भाग दोन आणि तीन प्रसिद्ध करण्यात आले.
यातील प्रयोगांना कथांचे रूप देण्यात आले आहे. ‘नजरेची फिरकी-उदबत्तीची गिरकी’ या पहिल्या प्रयोगाचे वर्णन करताना शाळेतील वर्गाचे वर्णन आले आहे…
वृषाली जडत्वाचा नियम सांगते -‘एखाद्या वस्तूवर जोपर्यंत बाह्यप्रेरणा कार्य करत नाही, तोपर्यंत वस्तू स्थिर राहते आणि गतिमान वस्तू एकसमान गतीत राहते.’
पण मध्येच सचिन उठतो आणि म्हणतो- आमचे बाबा म्हणतात, विज्ञानाच्या पलिकडे अध्यात्म आहे. आध्यात्मिक लोक नुसत्या नजरेने वस्तू हलवतात, तुम्ही खात्री करून घेण्यासाठी घरी या.
आणि मग घरच्या प्रसंगात यामागील रहस्य शिक्षक स्पष्ट करतात.
अशा प्रकारे प्रयोगामागील विज्ञान, प्रयोगाला लागणारे साहित्य, प्रयोग पद्धती आणि घ्यावयाची दक्षता, या गोष्टी उलगडत जातात. अशा कथा तिन्ही भागांमध्ये आहेत.
या पुस्तकाने हजारो कार्यकर्त्यांना शहाणे केले, शेकडो शिबिरे घेतली.
पुढे, यापेक्षा अधिक विस्तारित पुस्तकाची गरज पडली. नवीन शिबिरार्थींना व्याख्यानाचा आणि प्रयोगाचाही सराव नसे. त्यामुळे आपल्या भाषणातून ते, काही गोष्टी उलट्या-पालट्या करत. काही बाबी विसरत. म्हणून ‘व्याख्यानाची स्क्रीप्ट’ अशा स्वरुपात
‘सहिता चमत्कार सादरीकरणाची’ –
हे पुस्तक कुमार मंडपे आणि प्रशांत पोतदार यांनी लिहिले. त्याचे मुखपृष्ठ मिलिंद जोशी यांचे असून साधना प्रकाशनने ते प्रसिद्ध केले. पुस्तकाच्या सुरुवातीला चमत्कार सादरीकरणाबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यामध्ये – सराव करा, विनोद, टाळीची वाक्ये, उत्कंठा वाढविणारा भाग यांचे योग्य क्रमाने सादरीकरण करा.
समोरच्याला विनाकारण दुःख होणारे शब्द टाळा, वैचारिक माहिती द्या. ध्वनिक्षेपकाचा वापर करा. टेबलावर प्रयोगाच्या साहित्याची आकर्षक मांडणी करा, प्रयोगाची क्रमाने यादी करा, चूक झाली तर विनोदी स्पष्टीकरण द्या. प्रयोगाचे साहित्य स्वतःचे ठेवा, रासायनिक प्रयोग कमी करा, भाषणापूर्वी प्रयोग करून पाहा, नियोजनपूर्वक प्रेक्षकांना सहभाग द्या, अशा विविध सूचनांचा समावेश आहे.
पुस्तकांमध्ये सादरीकरणाच्या स्क्रीप्टबरोबर गरज असेल, तेव्हा वैज्ञानिक स्पष्टीकरण, आकृत्या, घ्यावयाची काळजी आणि अनेक गीतांचा समावेश करण्यात आला आहे. दोन नंबरच्या मलपृष्ठावर डॉ. लल्लन यांचे सुप्रसिद्ध गीत दिले आहे –
हम लोग है ऐसे दिवाने!
दुनिया को बदलकर मानेंगे!
पुढे ते म्हणतात-
जब जुल्म किसी का चलता है!
जुल्मका सूरज हर शाम को लेकिन ढलता है!
दोन्ही पुस्तकांमधील हा संदेश महत्त्वाचा आहे.
वरील दोन्ही पुस्तके प्रत्येक कार्यकर्त्याने संग्रही ठेवली पाहिजेत, अशी आहेत. या पुस्तकांना डॉ. संजय लड्डा, डॉ. मनीषा लड्डा व डॉ. रवींद्र सोमानी यांनी आर्थिक सहाय्य केले.
1) अंधश्रद्धांची दुनिया चमत्कारांची किमया
लेखक – प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे, पां. न. निपाणीकर व कुमार मंडपे.
किंमत भाग 1- 80 रुपये, भाग दोन- बारा रुपये, भाग तीन- 15 रुपये
2) संहिता चमत्कार सादरीकरणाची
किंमत – शंभर रुपये.
लेखक – कुमार मंडपे व प्रशांत पोतदार.