ज्ञानेश्वर माऊलींची ‘कोपर्निकसन’ क्रांती

ह.भ.प. देवदत्त परुळेकर -

व्यक्तीच्या जीवनाला अर्थ प्राप्त होण्यासाठी जशी समाजाची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे समाज धारणेसाठी धर्म आवश्यक असतो, असे प्रतिपादन गांधीजी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांनी अनेक वेळा केलेले आहे. आजच्या या काळातही या महापुरुषांना मानवी जीवनातून धर्म वगळावा असे वाटलेले नाही. आजही धर्माची मजबूत पकड समाजमनावर आहे व पुढेही ती राहणार आहे, याचे भान या दोघांनाही होते. कोणतीही सामाजिक क्रांती करायची असेल, तर धर्मसंस्थेचा विचार करावाच लागतो. ज्ञानदेवांच्या काळात तर समाजाचे नियंत्रणच मुख्यत्वे धर्मसंस्था करीत होती. ज्ञानदेवादी संतांच्या बंडाचे स्वरूप कसे आहे? सनातन वैदिक धर्मातील तत्त्वांचाच आधार घेऊन त्यातील शोषणाच्या परंपरा मोडून काढण्याचा पराक्रम संतांनी केला व भागवत धर्माची प्रतिष्ठापना केली. ज्ञानदेवांनी याची सुरुवात केली ती ज्ञानेश्वरीतून.

धर्म समाजाची धारणा करतो, समाजाला घट्ट बांधून ठेवतो ते नीतीनियमांच्या रज्जूने. हे नियम त्या त्या धर्माच्या धर्मग्रंथात सांगितलेले असतात. त्या काळातील समाजाचे नियंत्रण करणारा धर्म म्हणजे वैदिक धर्म, या नावातच वेद ज्याचे धर्मग्रंथ आहेत तो हा धर्म असे अभिप्रेत आहे.

प्राचीन भारतीय धार्मिक आणि सामाजिक जीवनाचा वेध घेतला तर असं दिसतं की, सुरुवातीच्या काळात संस्कृत भाषा बोलण्याचा अधिकार सर्वच वर्णांना होता. मात्र वेदांचा अधिकार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तीन वर्णांपुरता मर्यादित होता. तोसुद्धा या तीन वर्णांतील पुरुषांपुरता. स्त्रिया आणि शूद्र यांच्यासाठी व्यासांनी भगवद्गीता लिहिली. त्या काळात त्यांना संस्कृत भाषा बोलण्याचा अधिकार होता आणि म्हणून संस्कृत समजतही होते. व्यासांचे हे विश्वावर मोठे उपकार झाले, असे गौरवोद्गार ज्ञानेश्वर माउलींनी काढले आहेत.

व्यासांनी हे महान कृत्य केले खरे, पण भगवद्गीतेतील प्रतिपादन पारंपरिक वैदिक चौकटीला आव्हान देऊ शकेल, हा धोका लक्षात आल्याने भाष्यकारांनी गीतेचाच अर्थसंकोच करून तिला पारंपरिक वैदिक चौकटीतच बसवण्याचा प्रयत्न केला. वेदांचा तत्त्वज्ञानात्मक भाग म्हणजेच उपनिषदे आणि ब्रह्मसूत्रं यांच्याबरोबर गीतेला घेऊन प्रस्थानत्रयीची संकल्पना पुढे आणली, ती गीतेचा अर्थसंकोच करता यावा म्हणून. कारण वेदांचाच भाग असलेल्या उपनिषदांना श्रुती मानलं गेलं. श्रुती म्हणजे असे ईश्वरी, अपौरुषेय ज्ञान की जे ऋषींनी श्रवण केलं किंवा पाहिले. ऋषी याचा अर्थ ज्याने मंत्र पाहिले असा द्रष्टा.

ब्रह्मसूत्रे ही या उपनिषदांचं सूत्ररूप सार आहे. आता भगवद्गीतेलाही या दोन ग्रंथांच्या गटात बसवून तीन ग्रंथांची, म्हणजेच प्रस्थानत्रयीची कल्पना मांडली. म्हणजे या तीन ग्रंथांत मूलभूत आणि मुख्य कोणता हा प्रश्न निर्माण होतो. परंपरेनुसार गीता हा मुख्य ग्रंथ असू शकत नाही. कारण, गीता ही श्रुती म्हणजेच वेदांप्रमाणे अपौरुषेय दिव्य किंवा ईश्वरी कृती नाही. ती व्यास नावाच्या मानवी व्यक्तीची निर्मिती आहे. म्हणून तर तिची गणना श्रुतिग्रंथांत न करता तिला स्मृती मानलं जातं. स्मृती ही पुरुषनिर्मित असल्यामुळे पुरुषबुद्धीतील दोषांचा शिरकाव तिच्यात होऊ शकतो.

जेव्हा अर्थ लावण्याचा मुद्दा येतो, तेव्हा स्मृतीचा अर्थ श्रुतीशी अनुकूल असा लावावा, श्रुती प्रधान आणि पायाभूत धरावी असा परंपरेतील अर्थनिर्णय शास्त्रातील दंडकच आहे. त्यानुसार गीता ही स्मृती असल्याने गीतेचा अर्थ लावताना तो श्रुतिरूप उपनिषदांशी सुसंगत असाच लावला पाहिजे. उलट करता कामा नये असा हा पारंपरिक प्रामाण्यविचार आहे.

स्मृतिरूप मानल्या जाणार्‍या गीतेच्या अर्थनिर्णयावर अशा प्रकारे श्रुतींच्या चौकटीचं बंधन आलं की गीतेचा अर्थसंकोच करणं सोपं होतं. ज्ञानेश्वरांनी ही अर्थसंकोचता दूर करण्यासाठी अर्थविस्तार कसा केला, या अर्थविस्तारातून समता निष्पन्न झाली हे वेगळे सांगायला नको. पण अर्थविस्तारापेक्षा अधिक महत्त्वाचा मुद्दा आहे प्रामाण्याचा. पूर्वाचार्यांनी आपल्या अर्थनिर्णय कृतीवर श्रुतींचं बंधन घालून घेतलं ते ज्ञानेश्वरांनी मोठ्या शिताफीने दूर केलं.

भगवद्गीता व्यासांनी लिहिली असली आणि या अर्थाने तिचं कर्तृत्व व्यासांकडे जात असल्याने ती पौरुषेय स्मृती ठरत असली, तरी मुळात व्यासांनी गीतेत श्लोकबद्ध केलेला आशय हा श्रीकृष्णाच्या मुखातून अर्जुनाला केला गेलेला उपदेश आहे. हा उपदेश महाभारत युद्धाच्या अगोदर कौरव आणि पांडवांच्या सैन्यामधे कुरुक्षेत्र नावाच्या रणभूमीवर झाला. श्रीकृष्ण हा परमात्म्याचा पूर्णावतार मानला जातो. त्यामुळे गीता व्यासांनी लिहिली यापेक्षा ईश्वराने सांगितली या मुद्यावर ज्ञानेश्वर भर देतात. आणि मग ईश्वराने सांगितलेल्या या गीतेची ईश्वरानेच सांगितलेल्या वेदांशी तुलना करतात.

खुद्द वेदांमधेच असा उल्लेख आहे की वेद हा परमात्म्याचा निःश्वास आहे. या वेदोक्तीचा उपयोग करून ज्ञानेश्वर निदर्शनास आणतात की ज्या परमेश्वराचा वेद हा झोपेतला निःश्वास आहे, त्याच परमेश्वराने गीता ही जागृतावस्थेत प्रत्यक्ष उपदेशिली आहे. त्यामुळे ते प्रामाण्याच्या दृष्टीने पाहिले तर गीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे. ज्ञानेश्वर माउलींची पहिल्या अध्यायातील ओवी अशी –

हा वेदार्थ सागरु| जया निद्रिताचा घोरु|

तो स्वये श्री सर्वेश्विरु| प्रत्यक्ष अनुवादला॥’

वेद हे त्या निजलेल्या भगवंताचे घोरणे आहे, तर गीता हे त्या सजग भगवंताचे प्रत्यक्ष बोलणे आहे.

ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातही माउली प्रतिपादन करतात

एवं वेदाचें मूळसूत्र | सर्वाधिकारैकपवित्र |

श्रीकृष्णें गीताशास्त्र | प्रकट केलें ॥

येथ गीता मूळ वेदां | ऐसें केवीं पां आलें बोधा |

हें म्हणाल तरी प्रसिद्धा | उपपत्ति सांगों ॥

तरी जयाच्या निःश्वासीं | जन्म झाले वेदराशी |

तो सत्यप्रतिज्ञ पैजेसीं | बोलला स्वमुखें ॥

वेदाचे सूत्ररूपाने असलेले मूळ व सर्व अधिकाराचे केवळ एकच एक पवित्र असे ठिकाण जे गीताशास्त्र ते श्रीकृष्णांनी प्रकट केले. गीता हे वेदाला मूळ कसे असे म्हणाल तर त्याचा प्रसिद्ध कार्यकारणसंबंध युक्तिपूर्वक सांगतो. वेद देवाच्या निःश्वासातून जन्माला आले, त्या सत्यप्रतिज्ञ देवांनी स्वतः आपल्या मुखांनी गीता सांगितली आहे आणि म्हणून वेदांना मूलभूत गीता आहे असे म्हणणे उचित आहे. अहो ह्या गीतेमध्ये देव पैजेचा विडा उचलून बोलत आहेत.

संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यासंदर्भात मार्मिक विवेचन करतात, ते असे –

ज्ञानेश्वरांनी प्रामाण्याच्या प्रांतात केलेल्या या उलथापालथीला धर्मक्षेत्रातील कोपर्निकसन क्रांती म्हणायला काहीच हरकत नाही. कोपर्निकस या खगोलशास्त्रज्ञाच्या पूर्वी युरोपात टॉलेमीप्रणीत ग्रहमालेचा पृथ्वीकेंद्रित सिद्धांत प्रचलित होता. त्यानुसार पृथ्वी ग्रहमालेच्या केंद्रस्थानी असून, सूर्यासह सर्व ग्रह तिच्याभोवती फिरतात. कोपर्निकसने हा सिद्धांत खोडून काढला आणि असं प्रस्थापित केलं की सूर्य हाच ग्रहमालेच्या केंद्रस्थानी असून, पृथ्वीसह सर्व ग्रह त्याच्याभोवती फिरतात.

कोपर्निकसने अगोदरच्या सिद्धांतात जे केंद्रस्थानी आणि म्हणून मुख्य होते, ते परिघावर आणून दुय्यम बनवले. हे क्रांतिकारक परिवर्तन असल्यामुळे विज्ञानेतिहासात त्याला कोपर्निकस क्रांती असं म्हणण्याचा प्रघात आहे. ज्ञानेश्वरांनी अशाच प्रकारची क्रांती ग्रंथप्रामाण्याच्या बाबतीत केली.

केंद्रस्थानी असलेल्या वेदाला स्थानभ्रष्ट करून तिथे गीतेची प्रस्थापना केली. हे करण्याचा फायदा म्हणजे वैदिक परंपरेतील अर्थनिर्णयाचे बंधन म्हणजे स्मृतीचा अर्थ श्रुतीशी सुसंगत असला पाहिजे. हा नियम पाळण्याचं आता काही कारण राहिलं नाही. हवा तसा अर्थविस्तार करण्यासाठी ज्ञानेश्वर मोकळे झाले. हे स्वातंत्र्य त्यांनी उपभोगलं ते समतेच्या समर्थनासाठीच. ज्ञानेश्वरांनी घडवून आणलेली ही एक क्रांतीच म्हणावी लागते.

गीतेच्या आधारे घेतलेल्या या भूमिकेमुळे त्यांना सर्व भूतमात्रांमधे समता आहे, असं म्हणता आलं. जे स्थान एखाद्या ब्राह्मणाचं तेच स्थान चोखोबासारख्या अंत्यजाचं ही त्याची निष्पत्ती होती. त्यामुळे धर्माच्या क्षेत्रात समता स्थापन झाली. अठरापगड जातीतल्या लोकांना धार्मिक आणि सामाजिक जीवन समतेने जगणं शक्य झालं. चोखोबांना अभंग स्फुरतात आणि अनंतभट अभ्यंग नावाचा ब्राह्मण आपल्या जातीचा अभिमान सोडून ते अभंग लिहून घेतो, असं चित्र समाजाला पाहायला मिळालं.

भगवद्गीतेच्या या धोक्याची जाणीव असल्यामुळेच कर्मठ ब्राह्मणांच्या कुटुंबात गीतेला दूर ठेवलं जाई. तुकोबांच्या शिष्या बहिणाबाई आपल्या आत्मचरित्रात लिहितात,

नामाचा विटाळ आमुचिये घरी |

गीताशास्त्र वैरी कुली आम्हा ॥’

तुकाराम महाराजांच्या पश्चात खेड इथल्या सिद्धेश्वचरभट ब्रह्मे यांच्या कुळात जन्मलेल्या कचेश्वरांना गीता वाचावी असं वाटू लागले, तेव्हा त्यासाठी त्यांना घर सोडून दुसर्‍या ठिकाणी जावं लागलं. कारण घरात गीता वाचायला बंदी होती! पण ज्ञानेश्वरांनी घडवलेलं परिवर्तन एखाद्या दुसर्‍या श्लोकाचा अर्थविस्तार करण्यापुरतं मर्यादित नव्हतं. त्यांनी त्याहीपेक्षा अधिक मूलभूत स्तरावर परिवर्तन घडवलं.

लेखक संपर्क : ९४२२०५५२२१


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]