-
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात त्याचाच एक पाईक म्हणून, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले, महामानव विश्वरत्न बोधिसत्व प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त
दि. 15 ते 18 एप्रिल या कालावधीत वर्धा, वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, मूल, गडचिरोली, ब्रह्मपुरी, नागभीड, गोंदिया, भंडारा, रामटेक व परत नागपूर अशी चार दिवसीय (प्रमुख बारा स्थळी) ‘जादूटोणाविरोधी प्रबोधन यात्रे’चे आयोजन केले होते.
ही प्रबोधन यात्रा दि. 15 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वाजता दीक्षाभूमी, नागपूर येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून निघाली. या प्रसंगी ई. झेड. खोब्रागडे (IAS, घटनातज्ज्ञ, आंबेडकरी विचारवंत, माजी सनदी अधिकारी), डॉ. सिद्धार्थ गायकवाड (उपायुक्त सामाजिक न्याय विभाग नागपूर), रमण ठवकर (जादूटोणाविरोधी प्रचार-प्रसार समिती सदस्य, महा. राज्य), रमेश राठोड (अध्यक्ष, नागपूर जिल्हा) व महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. मा. ई. झेड. खोब्रागडे यांनी प्रबोधन यात्रेच्या गाडीला हिरवा झेंडा दाखवून ‘जादूटोणाविरोधी कायदा प्रबोधन यात्रे’ला आरंभ केला. यात्रा वर्धा येथे 11.30 ला पोचली. तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माल्यार्पण करून सेवाग्राम येथील कासाबाई स्कूल ऑफ नर्सिंग येथे कार्यक्रम घेण्यात आला. पुढे, वर्धा येथे वस्तीत मोठा कार्यक्रम घेण्यात आला. तिथून यात्रा वरोर्याकडे निघाली.
सारिका सौसागडे यांच्या पुढाकाराने वरोरा येथून अगदी जवळच असलेल्या परसोडा गावात प्रबोधन यात्रा आली. संपूर्ण गावातील गावकर्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. तिथून पुढे आम्ही भद्रावतीला पोचलो. तिथे आम्ही नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिरा पोचलो. परंतु तेथील ग्रामस्थ आमची वाट बघत होते. आम्ही पोचताच तिथे कार्यक्रम सुरू झाला. पोस्टर प्रदर्शन, पुस्तकविक्री, वार्तापत्र सदस्य नोंदणी, याबरोबरच कार्यकर्ता नोंदणीला तिथे चांगलाच प्रतिसाद होता. तेथील पदाधिकारी शारदा खोब्रागडे यांनी ‘लॉर्ड बुद्धा टीव्ही’ला प्राचारण केल्यामुळे कार्यक्रमाचे ‘लाईव्ह’ प्रसारण झाले. आतासुद्धा आपण ‘लॉर्ड बुद्धा’वर (यू ट्यूब) ‘जादूटोणाविरोधी कायदा प्रबोधन यात्रा’ पाहू शकता. तिथे रात्री शारदा ताई खोब्रागडे यांचे घरी सर्वांची थांबण्याची व्यवस्था केली होती. रात्री तिथे मुक्काम झाला.
दि. 16 एप्रिलच्या प्रबोधनाकरिता सकाळी 7 वाजता सर्व सज्ज झाले व चंद्रपूरच्या दिशेने निघालो. चंद्रपुरात गंगा हस्ते यांच्याकडे नाश्ता झाला. तिथून कार्यक्रमस्थळी पोचलो. तेज ऊन असताना सुध्दा कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाला. मग मूलला पोचलो तर चक्क 1000 लोक बसू शकतील असा हॉल तेथील कार्यकर्त्यांनी आरक्षित केला होता. आपल्या संघटनेबद्दल लोकांच्या मनात असलेले प्रेम व आपुलकी बघून मी भारावून गेलो. तिथे सुद्धा जबरदस्त कार्यक्रम झाला. तिथे दुपारचे जेवण 4.30 ला घेऊन पुढे गडचिरोलीला निघालो. तिथे जवळच असलेल्या गावात कार्यक्रम घेण्यात आला. 16 एप्रिलला हनुमान जयंती असल्यामुळे एकाच वेळी दोन कार्यक्रम एका गावात कसे होतील, म्हणून तेथील सरपंच व आपल्या पदाधिकारी सुनंदा डोंगरवार यांनी आपल्या कार्यक्रमाकरिता वेगळे स्थळ ठरविले होते. तिथे आपण कार्यक्रमाला सुरुवात केली तर संपूर्ण गाव जमा झाले. एका मागून एक प्रबोधनाचे गीत, चमत्काराचे प्रयोग, ‘बाबाचा चमत्कार- सुशिक्षित महिलेवर बलात्कार’ हे नाट्य असे कार्यक्रम झाले आणि मी गावकर्यांना सूचना केली की, आपण आता इथेच कार्यक्रम थांबवूया. आपल्या गावात हनुमान जयंतीचा नियोजित कार्यक्रम करावा. परंतु सर्व गावकरी म्हणाले, ‘तो पण करू; पण आधी आपण आपला कार्यक्रम करा.’ त्यांच्या विनंतीवरून कार्यक्रमास सुरुवात केली व त्याच गावात जेवण करून गडचिरोली येथील विश्रामगृहात रात्री मुक्काम केला. डॉ. डोंगरवार व त्यांच्या पत्नी सुनंदा डोंगरवार यांनी गडचिरोलीत उत्तम व्यवस्था केली.
तिथून दि. 17 एप्रिलच्या प्रबोधनाकरिता सकाळी ब्रह्मपुरी येथे पोचलो. ‘महा. अंनिस’चे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष युवराज मेश्राम यांना भेटून तिथे कार्यक्रम झाला. नंतर नागभीड येथे निघालो. तिथे आपले नागभीडचे पदाधिकारी आनंद मेश्राम व त्यांच्या सहकार्यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली व तिथे सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळाला. ब्रह्मपुरीला जेवण घेऊन गोंदियाला निघालो. तेथील विनोद बनसोड व कार्यकर्तेसतत संपर्कात होते. त्यांनी ‘जादूटोणाविरोधी कायदा प्रबोधन यात्रे’चे जल्लोषात स्वागत केले व तिथे सुद्धा गावकर्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
तिथे रात्री मुक्काम करून सकाळी भंडारा जिल्ह्यातील पोहरा या गावात भुताने काहूर माजविलेला आहे अशी बातमी वर्तमानपत्रातून कळली होती, तिथे आम्ही पोचलो. पोलीस पाटील व प्रभावित लोकांची भेट घेतली आणि परिसराची तपासणी करून गावकर्यांची समजूत घातली. ऊन जास्त असल्यामुळे भंडारा येथील नियोजित कार्यक्रम शेडमध्ये पूर्ण केला. तिथून खातमार्गे रामटेकला निघालो. तेथील नियोजन अमित हटवार यांनी केले होते. तिथे दक्षिण शाखा, हिंगणा शाखा, उत्तर नागपूर शाखांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पूर्व विदर्भाचा चार दिवसीय दौरा करून दि. 18 एप्रिलला रात्री नागपूरला परत आलो. या प्रबोधन यात्रेमध्ये प्रत्येक स्थळी अंधश्रद्धेवरील गीते, दोन्ही महापुरुषांवरील प्रबोधनात्मक गीते, जादूटोणाविरोधी कायदा पोस्टर प्रदर्शन व मार्गदर्शन, चमत्कार सत्यशोधन व प्रबोधन (चमत्काराचा भांडाफोड), ‘बाबाचा चमत्कार – सुशिक्षित मुलीवर बलात्कार’ आणि ‘जोतिबा का संघर्ष’ ही दोन नाट्ये असा भरगच्च प्रबोधनात्मक कार्यक्रम केला गेला.
या ‘जादूटोणा विरोधी कायदा प्रबोधन यात्रे’चा प्रमुख उद्देश म्हणजे 21 ऑगस्ट 2021 ते 06 सप्टेंबर 2021 या 19 दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यात जादूटोण्याच्या संशयावरून अमानुष मारहाणीच्या चार घटना घडल्या होत्या. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा हादरून गेला होता. सदर घटनांमधील पीडित व्यक्तींसोबत चर्चा करताना असे लक्षात आले की, त्यांना जादूटोणाविरोधी कायदा आहे, हे माहीतच नाही. त्याचप्रमाणे परिसरातील लोकांना सुद्धा सदर कायद्याची माहिती नाही. तेव्हाच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ठरविले होते की, जादूटोणाविरोधी कायदा सर्वांना माहीत व्हावा याकरिता काहीतरी करावे लागेल. सरकारला दोष देण्यापेक्षा संघटना म्हणून लोकसहभागातून काहीतरी करावे लागेल. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दरवर्षी सामाजिक समता सप्ताह साजरा करते. त्याचे औचित्य साधून आम्ही ठरविले की, ज्या परिसरात जादूटोणाच्या संशयावरून अमानवीय कृत्ये होतात, ज्या परिसरात जादूटोणाविरोधी कायदा माहीत नाही, त्या परिसरात जादूटोणाविरोधी कायद्याची माहिती व्हावी म्हणून ‘जादूटोणाविरोधी कायदा प्रबोधन यात्रे’चे आयोजन करावे.
जनसामान्यांना जागृत करण्यासाठी व अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी समितीने हा संकल्प करून ‘जादूटोणाविरोधी कायद्याची जनप्रबोधन यात्रा’ पूर्ण केली. या प्रबोधन यात्रेत रामभाऊ डोंगरे (राज्य कार्यकारिणी सदस्य), चित्तरंजन चौरे (कार्याध्यक्ष, नागपूर जिल्हा), देवानंद बडगे (कार्याध्यक्ष, उत्तर नागपूर शाखा), आनंद मेश्राम प्रधान (सचिव, उत्तर नागपूर शाखा), चंद्रशेखर मेश्राम, विजयकांत पानबुळे (निवृत्त कामगार आयुक्त), रॉकी घुटके, अजय रहाटे, आशुतोष टेंभुर्णे, सम्यक मेश्राम, माधुरी मेश्राम, श्वेता पाटील, चंदा मोटघरे, निकिता बोंदाडे, प्रिया गजभिये, जान्हवी मेश्राम, शर्माजी (ड्रायव्हर) सहभागी होते.
– आयोजक समिती,
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,
नागपूर कार्यकारिणी व उत्तर नागपूर शाखा.