-
मुंबईतील आमदार राम कदम यांच्या मतदारसंघात अंगावर कंबल टाकून विकलांग व्यक्तिंवर उपचार करणार्या राजस्थानातील कंबलबाबांवर जादूटोणा विरोधी कायद्याखाली कारवाई करण्याची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मागणी केली आहे.
कंबलबाबा या नावाने ओळखला जाणारा राजस्थानातील एक भोंदू बाबा आमदार राम कदम यांच्या आधाराने त्यांच्या मतदारसंघातील विकलांग लोकांवर कंबल टाकून तथाकथित उपचार करत असल्याचे अनेक व्हिडिओ राम कदम यांच्या फेसबुक वॉलवर बघायला मिळतात. भोंदूबाबा करत असलेल्या या उपचारांच्या वेळी स्वतः आमदार राम कदम तसेच पोलिस अधिकारी देखील उपस्थित असलेले दिसतात. गेली १० वर्षे महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आहे; या कायद्यानुसार स्वतःच्या अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा करणे, चमत्कार करण्याचा दावा करणे हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे. आजवर जवळपास १००० पेक्षा अधिक भोंदू बाबांवर या कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत. वर उल्लेख केलेल्या कंबलबाबा या भोंदूबाबावर देखील पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत तत्काळ गुन्हा दाखल करावा व पीडित व्यक्तिंची ही क्रूर थट्टा थांबवावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मुक्ता दाभोलकर, अण्णा कडलास्कर, मिलिंद देशमुख, राहुल थोरात, प्रशांत पोतदार, नंदिनी जाधव यांनी केली आहे.