नंदिनी जाधव - 9422305929
करणी काढण्याच्या आणि आजार बरे करण्याच्या बहाण्याने पुण्यातील उच्चशिक्षित महिलांचा विनयभंग करणार्या भोंदू बाबाला कोथरूड पोलिसांनी अटक केली.
भरत केमदाणे (वय 72, रा. लोणी शेंदरे, ता. कुर्डुवाडी, जि. सोलापूर) असे या भोंदू बाबाचे नाव आहे.
पुण्यातील उच्चशिक्षित दोघी बहिणींना घरात बरेच प्रॉब्लेम निर्माण झाले होते; तसेच मुलीचे आजारपण त्यामुळे घरात सतत वादविवाद होत होते. तेव्हा त्याच्या जवळच्या एका महिलेने बाहेरचे काही आहे का? ते पाहून घेण्यास सांगितले. तिने दिलेल्या मोबाईल नंबरवर भरत केमदाणे बाबाला फोन करून याबाबत विचारून घेण्यास सांगितले. भरत केमदाणे यास फोन करून घरातील प्रॉब्लेम, आजार, आर्थिक अडचण याविषयी सांगितल्यावर भरत केमदाणे यांनी पूजा करावी लागेल, असे सांगितले. त्यासाठी 7000 रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले. ती पूजा लवकरच करावी लागेल, असे सांगितल्याप्रमाणे 11 फेब्रुवारी 2020 रोजी पूजा करायचे ठरले.
भरत केमदाणे (बाबा) घरी आल्यानंतर सर्व परिस्थिती सांगितल्यावर बाबांनी सांगितले की, तुमच्यावर करणी झाली आहे. तुमच्याच घरातील लोकांनीच करणी केली आहे. त्यामुळे सर्व समस्या येत आहेत.
ती करणी काढावी लागेल, असे सांगितले. पूजा करण्याऐवजी बाबाने उतारा काढावा लागेल. तो उतारा पाण्यात टाकावा लागेल, असे सांगून दोघी बहिणींना एक-एकीला असे करून बाथरूममध्ये घेऊन गेला; तसेच या कुटुंबातील करणी काढण्यासाठी विधी करण्यासाठी त्याने या दोघींना बाथरूममध्ये लिंबूचा उतारा टाकावयाचा आहे, असे सांगून प्रथम एका महिलेस आत बोलावले व सलवार काढण्यास सांगितले. त्यांनी सलवार काढण्यास नकार दिला असता, बाबाने सांगितले, करणी उतरवयाची असेल तर कपड्यांचा स्पर्श चालत नाही. बरे व्हायचे असेल तर हे करावेच लागेल. लाजायचे नाही. माझे काम डॉक्टरसारखेच तपासण्याचे आहे. असे करून त्याने पोटाला हळदी-कुंकू लावले व छातीला, गुप्तांगाला लिंबू लावले. तेव्हा याबाबत या महिलेने विचारले असता बाबाने सांगितले की, करणी कवटाळा, अवघड जागीच धरतात.
हाच प्रकार बहिणीच्या बाबतीत केला व लिंबू हातात धरून म्हणाला की, करणी उतरली नसल्याचा कौल दिला आहे.
त्यामुळे रात्री बारानंतर परत आपल्याला उतारा काढावा लागेल. रात्री बारा वाजता पुन्हा उतारा करताना बाबाने महिलेस गादीवर झोपावयास सांगून सलवारची नाडी सोडावयास सांगितली.
उतार्याच्या बहाण्याने लिंबू छातीला व गुप्तांगाला लावला. तसाच प्रकार पुन्हा बहिणीच्या बाबतीत केला. पुन्हा बाथरूममध्ये नेऊन लिंबू टॉपमध्ये व सलवारमध्ये टाकले.नंतर ते लिंबू शरीरावरून फिरवून पाण्यात टाकले.
दोन दिवस त्या दोघी बहिणी हा कसला करणीचा प्रकार, याबाबत विचार करत होत्या. तेव्हा त्यांना त्याची करणीच्या नावाने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. हमीद दाभोलकरांना फोन करून ‘अंनिस’ कार्यकर्त्याचा मोबाईल नंबर घेतला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष,नंदिनी जाधव यांच्याशी संपर्क केला. पीडितांनी पूजेच्या करणीच्या नावाखाली कशा प्रकारे लज्जा उत्पन्न होईल, असे शोषण केल्याचे सांगितले. त्या दोघी खूप घाबरलेल्या होत्या. आमचे शोषण झाले तसे दुसर्या कोणाचे होऊ नये, म्हणून त्याची लेखी तक्रार महाराष्ट्र अंनिस पुणे जिल्हा, कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी दिली.
तक्रार अर्ज आल्यानंतर या बाबाची माहिती काढण्यासाठी नंदिनी मॅडमनी बार्शी येथील ‘अंनिस’चे कार्यकर्ते विनायक माळी यांना फोन करून बाबाची माहिती घेण्यास सांगितले असता.
हा बाबा मूल होत नसेल, तर मुलगाच होईल. करणी काढण्याच्या नावाने बर्याच महिलांची फसवणूक; तसेच शोषण केल्याचे समजल्यावर महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने कुटुंबीयांना घेऊन कोथरूड पोलीस स्टेशन गाठले. झालेल्या प्रकाराबाबत माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र चव्हाण,वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांना सांगितले. या खटल्याचे गांभीर्य ओळखून जादूटोणाविरोधी कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करून भरत केमदाणे या बाबास अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक वृषाली पाटील, शेळके सर; तसेच कोथरूड पोलीसांचे विशेष सहकार्य मिळाले.
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, माधव गांधी, मिलिंद सोनटक्के, राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख या सर्वांचे विशेष सहकार्य मिळाले.
संबंधित प्रकरणात आणखी कोणासही फसविले असल्यास त्यांनी निर्भयपणे पोलिसांना अथवा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.