ब्रुनो ते दाभोलकर

प्रा. प. रा. आर्डे -

20 ऑगस्ट हा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन. महाराष्ट्रात धर्मचिकित्सा, विचारस्वातंत्र्य आणि बुद्धिप्रामाण्य यांचा जोरदार पुरस्कार दाभोलकरांनी केला. भारतात सध्याच्या काळात जर युरोपमधल्या विज्ञानपूर्व काळातील धर्मपीठासारखी ताकद अस्तित्वात असती, तर या आंधळ्या धर्मवाद्यांनी दाभोलकरांनासुद्धा धर्मपीठासमोर खटला भरून मृत्युदंड दिला असता. संविधानाद्वारे भारतातील प्रत्येक नागरिकाला विचारस्वातंत्र्याचा अधिकार मिळाला. याच विचारस्वातंत्र्याचा उपयोग दाभोलकर समाजातील धार्मिक आणि अघोरी अंधश्रद्धा यांच्या विरोधात करत होते. म्हणूनच समोर लढता येत नाही किंवा कायदेशीर मार्गांनी दाभोलकरांना निष्प्रभ करता येत नाही म्हणून धर्मांधांनी छुप्या पद्धतीने दाभोलकरांना पाठीमागून गोळ्या घातल्या, म्हणजे अजूनही छुप्या पद्धतीने धर्माची दहशत चालूच आहे.

रानटी अवस्थेतून बाहेर पडत असताना आणि टोळीयुद्धाला पर्याय म्हणून माणसानं हळूहळू नद्यांकाठी स्थिर होण्याचा प्रयत्न केला. रानटी अवस्थेतील हिंसाचाराच्या अतिरेकाने शांततामय जीवनाची ओढ माणसाला लागणे स्वाभाविक आहे. यासाठी जगाच्या पाठीवर विविध धर्मांची निर्मिती झाली. धर्मप्रेषितांनी आपापल्या समाजाला शांतीचा व नैतिक आचरणाचा संदेश दिला. धर्माचा प्रसार करण्यासाठी पुरोहितशाही नावाचा वर्ग उदयाला आला. पुरोहितशाहीने धर्माचा उपयोग सामाजिक जीवनाचे नियमन करण्यासाठी केला; पण आपला प्रभाव आणि वचक समाजावर अबाधित राहावा म्हणून विविध प्रकारच्या धार्मिक गैरसमजुती आणि अंधश्रद्धा निर्माण केल्या. युरोपमध्ये इटली देशात रोम येथे धर्मपीठ स्थापन झाले. त्यांचा धर्मगुरू म्हणजे पोप. पोप आणि त्याच्या हातचलाखी धर्माज्ञांचे नियमन करणारी शक्ती युरोप खंडात निर्माण झाली आणि यातूनच अनर्थ घडत गेले. युरोप खंडात या अनार्थाचा बळी ठरला लिओनार्दो ब्रुनो. त्याच्यानंतर गॅलिलिओ हा सुद्धा धर्मपीठाचा बळी ठरला. ब्रुनोला खांबाला बांधून जाळण्याची क्रूर शिक्षा धर्मपीठाने दिली, तर गॅलिलिओला पाखंडी म्हणून आजन्म कारावासात राहण्याची शिक्षा धर्मपीठाने दिली. या शिक्षा त्यांना देण्याचं कारण काय होतं? कारण होतं, त्यांचं विचारस्वातंत्र्य आणि बुद्धिप्रामाण्यवाद! धर्माने मान्य केलेल्या विश्वरचनेच्या कल्पनांबद्दल बु्रनोने आणि गॅलिलिओने शंका उपस्थित केल्या म्हणून त्यांना पाखंडी ठरविण्यात आले.

20 ऑगस्ट हा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन. महाराष्ट्रात धर्मचिकित्सा, विचारस्वातंत्र्य आणि बुद्धिप्रामाण्य यांचा जोरदार पुरस्कार दाभोलकरांनी केला. भारतात सध्याच्या काळात जर युरोपमधल्या विज्ञानपूर्व काळातील धर्मपीठासारखी ताकद अस्तित्वात असती, तर या आंधळ्या धर्मवाद्यांनी दाभोलकरांना सुद्धा धर्मपीठासमोर खटला भरून मृत्युदंड दिला असता. संविधानाद्वारे भारतातील प्रत्येक नागरिकाला विचारस्वातंत्र्याचा अधिकार मिळाला. याच विचारस्वातंत्र्याचा उपयोग दाभोलकर समाजातील धार्मिक आणि अघोरी अंधश्रद्धा यांच्या विरोधात करत होते. म्हणूनच समोर लढता येत नाही किंवा कायदेशीर मार्गांनी दाभोलकरांना निष्प्रभ करता येत नाही म्हणून धर्मांधांनी छुप्या पद्धतीने दाभोलकरांना पाठीमागून गोळ्या घातल्या, म्हणजे अजूनही छुप्या पद्धतीने धर्माची दहशत चालूच आहे.

श्रद्धेला प्रश्न विचारूनच मानवी संस्कृती प्रगत होत गेली. अनेक गैरसमजुती गळून पडल्या. राजेशाही, हुकुमशाही अशा राज्यसत्तांतील तोटे लक्षात येऊन बहुतेक ठिकाणी जगामध्ये लोकशाही राज्यपद्धती अस्तित्वात आली. याची सुरुवात 1789 साली फ्रेंच राज्यक्रांतीने झाली. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये मानणार्‍या राजसत्ता अस्तित्वात आल्या. अशा उदारमतवादी विचारसरणीतून जगाच्या पाठीवरील बहुतेक देशांत अंधारातून प्रकाशाकडे सामाजिक वाटचाल सुरू होती. भारतातही स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा, लोकशाही प्रणालीचा स्वीकार झाला आहे; पण वास्तव काय आहे?

मध्य-पूर्वेत धार्मिक अतिरेकी संघटनांनी हैदोस घातला आहे. धर्माच्या नावावर विविध गटांमध्ये संघर्ष सुरू आहे. तालिबान, अल् कायदा आणि आयसिस अशा धार्मिक अतिरेकी संघटना प्रबळ होत चालल्या आहेत. धार्मिक वर्चस्वाचे पुनरुज्जीवन अशा संघटनांच्या माध्यमातून सुरू झालं आहे. भारत घटनेनुसार धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. पण गेल्या काही वर्षांत भारत हे धर्मराष्ट्र करण्याचा प्रयत्न हिंदुत्ववादी मंडळींनी चालवला आहे. प्रकाशाकडून अंधाराकडे वाटचाल सुरू आहे की काय, अशी शंका येते. धर्माच्या आणि जातीच्या नावावर सामाजिक अन्यायाच्या घटना आपल्या देशात घडू लागल्या आहेत. संस्कृतिस्वातंत्र्याचे प्राणपणाने रक्षण व्हायला हवे. म्हणूनच दाभोलकरांच्या स्मरणदिनानिमित्त विचारस्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या आणि धर्माच्या सामर्थ्याविरुद्ध उभ्या ठाकलेल्या ब्रुनो आणि गॅलिलिओ यांच्या कार्याचा परिचय करून घेणे उचित होईल.

ब्रुनोचे हौतात्म्य

ब्रुनो हा एका सैनिकाचा मुलगा. इटलीमधील नोलेनो या नेपल्स शहराजवळील गावात तो 1548 साली जन्मला. 1562 मध्ये ब्रुनो नेपल्सला गेला. तेथे त्याला मानव्यशास्त्र, तर्कशास्त्र आणि डायलेक्टिक्स (युक्तिवादशास्त्र) याचा अभ्यास करायचा होता. 1565 मध्ये नेपल्समधील धार्मिक शिक्षण देणार्‍या एका कॅथॉलिक संस्थेमध्ये तो दाखल झाला; पण तेथे तो आपली स्वतंत्र धार्मिक मते व्यक्त करी. हा काही वेगळंच बोलतो म्हणून त्याच्यावर पाखंडीपणाचाही संशय घेण्यात आला होता, तरीसुद्धा 1572 मध्ये त्याला धर्मगुरूचे पद देण्यात आले. धार्मिक शिक्षणासाठी त्याला कॉन्व्हेंटमध्ये पाठवण्यात आले. तीन वर्षांचा कोर्स पूर्ण केल्यावर ब्रुनो आपली धार्मिक मते उलट निर्भयपणे मांडू लागला. येशू ख्रिस्ताच्या दैवी स्वरुपाबद्दल तो उघडपणे बोलू लागला. तेव्हा त्याच्या विरुद्ध पाखंडी म्हणून खटला भरण्याचा प्रयत्न झाला. वेळीच सावधान होऊन बु्रनो रोमला गेला. इथून पुढे त्याचा वनवास सुरू झाला. पाखंडी ठरवण्याच्या भीतीने तो उत्तर इटलीत जीनिव्हाला गेला. तेथे त्याने प्रूफरीडिंगचे काम करून चरितार्थ चालवला. ब्रुनोचं वैशिष्ट्य असं की, आपल्याला न पटलेल्या विचारांच्या बाबतीत तो निर्भयपणे आपले मत व्यक्त करी. खरंतर त्याला धर्मगुरू केल्यावर प्रचलित कॅथॉलिक धर्माचा उदो-उदो करीत त्याला मानाने जीवन जगता आले असते; पण बुद्धीला जे पटत नाही, त्याचा स्वीकार न करता तो सत्याचा पुरस्कर्ता राहिला. जीनिव्हामध्ये त्याने प्रोटेस्टंट पंथाच्या लोकांशी जवळीक केली; पण ही मंडळीसुद्धा कॅथॉलिक विचारसरणीपेक्षा फारशी वेगळी नव्हती; पण प्रोटेस्टंट प्राध्यापकाच्या विरोधात भाष्य केल्यामुळे ब्रुनोला अटक झाली आणि त्याला जीनिव्हा सोडण्याचा हुकूम मिळाला.

ब्रुनो आता फ्रान्समध्ये गेला. फ्रान्समध्ये राजा तिसरा हेन्री याच्याशी त्याने जुळवून घेतले. हेन्रीने त्याला रॉयल लेक्चरर म्हणून नेमणूक दिली. या काळात त्याने वास्तवसृष्टीचे सखोल ज्ञान कसे मिळवता येईल, यावर ग्रंथ प्रसिद्ध केला. त्याचबरोबर त्या काळच्या समाजात असणार्‍या नैतिक आणि सामाजिक भ्रष्टाचारावरही जोरदार टीका करणारे पुस्तक लिहिले. 1573 मध्ये ब्रुनो लंडनला गेला. हेन्रीनेच त्याला लंडनला पाठविले. इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात त्याने कोपर्निकसच्या सूर्यकेंद्री सिद्धांताचे समर्थन केले; पण ऑक्सफर्डमधील विचारवंतांशी न जुळल्यामुळे तो परत लंडनला गेला आणि फ्रान्सच्या राजदूताची मदत घेऊन त्याने पहिल्या एलिझाबेथच्या दरबारात प्रवेश मिळवला.

विश्वरचनेची कल्पना

लंडनमध्ये असतानाच बु्रनोने त्याच्या तत्त्वज्ञानाची रचना केली. त्यातील तीन रचना विश्वाच्या स्वरुपाबद्दल, तर राहिलेल्या तीन नैतिक विषयावर आहेत. बु्रनोने आपल्या या नव्या संशोधनाद्वारे कोपर्निकसच्या सूर्यकेंद्री सिद्धांताला मान्यता दिली. एवढंच नव्हे, तर त्याने विश्व हे अमर्याद आहे आणि त्यात आपल्या सूर्यमालेसारख्या अनेक रचना अस्तित्वात आहेत, अशी क्रांतिकारी कल्पना मांडली. त्याचा समकालीन गॅलिलिओच्या मताप्रमाणे खगोलाची रचना मान्य केली पाहिजे; बायबलप्रमाणे नव्हे. ‘बायबलनुसार नैतिक शिकवण मान्य करायला हरकत नाही,’ असं त्याचं मत होतं. अ‍ॅरिस्टॉटलच्या खगोलविचारानुसार रचना आणि पदार्थाचे स्वरूप यावर ब्रुनोने जोरदार टीका केली आणि विश्वरचना आणि पदार्थ याबद्दल आपली स्वतंत्र मते व्यक्त केली.

नैतिक प्रश्नाबाबत लिहिलेल्या पहिल्या ग्रंथात बु्रनोने त्याकाळी प्रचलित असलेल्या अंधश्रद्धा आणि वर्तनदोष यावर उपरोधिक भाषेत जोरदार टीका केली आहे. त्याला ख्रिश्चन नीतिशास्त्र मान्यच नव्हते.

1585 मध्ये ब्रुनो पॅरिसला परतला. त्यावेळी राजकीय वातावरण बदलले होते. पॅरिसमध्ये कॅथॉलिक विचारांवर हल्ला चढवित अ‍ॅरिस्टॉटलवर तो उघडपणे टीका करू लागला; पण पॅरिसमधील नव्या राज्यकर्त्यांनी त्याला दोषी ठरवत पॅरिस सोडण्यास भाग पाडले. ब्रुनो जर्मनीत गेला आणि जर्मनीतील विविध विद्यापीठांतून तो आपले विचार मांडू लागला. आपल्या व्याख्यानातून त्याने स्वत:ची धर्मकल्पना मांडली. वादसंवाद आणि परस्परांना समजून घेणे यावर आधारित सर्व धर्मांतील लोकांनी शांततामय सहजीवन जगले पाहिजे, असा त्याचा धर्मविचार होता; पण हा विचार चर्चला कसा मान्य होणार?

1591 मध्ये ब्रुनो इटलीला परतला. व्हेनिस शहरात तो राहू लागला. व्हेनिसमधील अमीर-उमरावांच्या बरोबर आपले नवे तत्त्वज्ञान आणि विचार याची चर्चा करीत असतानाच त्याचे धर्मविषयक आणि अ‍ॅरिस्टॉटलविषयक विचार न पटल्याने ब्रुनोला पाखंडी म्हणून घोषित करण्यात आले. मे 1592 मध्ये व्हेनिसच्या धार्मिक कोर्टापुढे त्याला खेचण्यात आले. त्याला अटक करून खटला चालवण्यात आला. खटल्याचा पुढचा भाग म्हणून रोम येथील धर्मपीठाच्या तुरुंगामध्ये त्याला हलविण्यात आले. आपल्या बचावाच्या युक्तिवादात ब्रुनोने, ‘आपणास धार्मिक गोष्टींविषयी अजिबात रस नाही; पण तत्त्वज्ञानात्मक माझ्या विचारावर मी ठाम आहे,’ असा प्रतिवाद केला; पण धर्मपीठाच्या कोर्टाला त्याचा युक्तिवाद अमान्य झाला. कोर्टाने त्याने मांडलेले सर्व विचार आणि तत्त्वज्ञान मागे घ्यावेत, असा हुकूम दिला. ब्रुनोने यावर आपले विचार ख्रिश्चन देवकल्पना आणि विश्वनिर्मिती याच्याशी विसंगत नाहीत, असा युक्तिवाद केला. धर्मपीठाने त्याचा सगळा युक्तिवाद अमान्य केला आणि माघार घेण्याची विनंती केली. ‘पण मी माघार घेण्यासारखं काहीही केलेलं नाही,’ असा ब्रुनोने प्रतिवाद केल्यावर पोपने त्याला शिक्षापात्र पाखंडी म्हणून घोषित केले. 8 फेबु्रवारी 1600 मध्ये त्याचे मृत्युविधान जेव्हा त्याला वाचून दाखविण्यात आले, तेव्हा न्यायाधीशाकडे पाहून ब्रुनो उद्गारला, “ही शिक्षा स्वीकारताना मला जेवढी भीती वाटेल, त्यापेक्षा ही शिक्षा देताना तुम्ही जास्त घाबरला असाल!” यानंतर लगेचच त्याला वधस्थानी नेण्यात आले आणि त्याच्या तोंडात बोळा कोंबून त्याला खांबाला बांधून जिवंत जाळण्यात आले.

ब्रुनोच्या विचारांचा सामाजिक प्रभाव

बु्रनोने मांडलेल्या विचारांचा आणि तत्त्वज्ञानाचा 17 व्या शतकातील वैज्ञानिक आणि तत्त्वज्ञ यांच्यावर मोठा प्रभाव झाला. 18 व्या शतकातील आधुनिक तत्त्वज्ञांनी त्याच्या विचाराला मान्यता दिली आहे. विचारस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता म्हणून ब्रुनोमुळे 19 व्या शतकातील उदारमतवादी चळवळीला स्फूर्ती मिळाली. बु्रनोने विश्वरचनेबद्दल मांडलेले विचार आधुनिक विज्ञानाने सिद्ध केले आहेत. ‘आधुनिक मानवतावादी विचारसरणीला योग्य असे नैतिक विचार हे धार्मिक नैतिकतेपेक्षा श्रेष्ठ आहेत,’ हा ब्रुनोचा विचार आता मानवतावादी विचारवंतांना मान्य झाला आहे. धार्मिक आणि वैचारिक सहनशीलता किंवा सहिष्णुता हा ब्रुनोचा विचार उदारमतवादी विचारवंतांवर प्रभाव पाडून गेला आहे. थोडक्यात, बु्रनो हा आधुनिक सांस्कृतिक जगाचा अद्भुत उद्गाता ठरला आहे.

धार्मिक अत्याचाराचा दुसरा बळी : गॅलिलिओ

इ. स. 1600 मध्ये ब्रुनोला देहांताची शिक्षा झाली; तर गॅलिलिओला ख्रिस्ती धर्मपीठाने 1633 ला पाखंडी म्हणून नजरकैदेची शिक्षा दिली. समाजावर धर्माची निरंकुश सत्ता कायम राहावी, असा तो काळ होता. धर्मप्रेषित आणि धर्मग्रंथ यांच्या पलिकडे ज्ञान नाही, धर्मवचनाला आव्हान देणे म्हणजे धर्माशी प्रतारणा असा धाक त्या काळात प्रभावी होता; पण या धाकाला न जुमानता सत्याचा शोध घेण्याचा धाडसी प्रयत्न या दोघांनी केला. गॅलिलिओवर धर्मपीठाने खटला का भरला, हे समजून घेण्याअगोदर त्याच्या चरित्राचे आणि वैज्ञानिक संशोधनाचे सार समजून घ्यायला हवे.

गॅलिलिओचा जन्म 15 फेबु्रवारी 1564 मध्ये झाला. त्याचे वडील संगीतकार होते. वडिलांना गॅलिलिओने डॉक्टर व्हावे, असे वाटत होते; पण त्याला गणिताची आवड असल्यामुळे पदवी न घेताच त्याने विद्यापीठ सोडले आणि खाजगी शिकवण्या घेऊन तो पोट भरू लागला. एक उमराव मित्र मार्क्सिस याच्या मदतीने त्याला पिसा विद्यापीठात गणिताच्या प्राध्यापकाची नोकरी मिळाली.

पिसा येथील ‘त्या’ प्रसिद्ध मनोर्‍याचा प्रयोग गॅलिलिओने केला. या प्रयोगात जड आणि हलक्या वस्तू एकाच वेळी खाली पडतात, हे त्याने दाखवून दिले. ख्रिस्ती धर्मपीठानं ग्रीक काळात होऊन गेलेल्या प्रख्यात तत्त्वज्ञ अ‍ॅरिस्टॉटल याचे विज्ञान आणि त्याची विश्वरचनेची कल्पना यांना मान्यता दिली होती. अ‍ॅरिस्टॉटलच्या मताप्रमाणे पृथ्वी हा विश्वाचा केंद्रबिंदू आहे. हे विश्व पृथ्वीवरील माणसासाठीच देवाने निर्माण केले, ही कल्पना धर्मपीठाला सोयीची होती आणि त्यामुळे अ‍ॅरिस्टॉटलची मते त्यांनी स्वीकारली होती. अ‍ॅरिस्टॉटलच्या मते पृथ्वीवरील पदार्थ हे करप्ट आहेत; पण आकाशातील ग्रह-तारे हे पूर्ण स्वरुपाचे गुळगुळीत आणि तेजोमय आहेत. त्यांच्यात बदल होत नाही. चंद्राचा पृष्ठभाग गुळगुळीत आहे. आपल्याला आकाशात जेवढे तारे दिसतात, तेवढीच देवाची निर्मिती आहे.

विज्ञानपूर्व काळात सृष्टीरचना आणि इतर बाबतीत नवविचार मांडणार्‍या तत्त्वज्ञांना ‘आर्मचेअर फिलॉसॉफर’ असं नाव आहे. केवळ तर्काने आणि कल्पनारम्यतेने हे तत्त्वज्ञ विश्वाच्या स्वरुपाबद्दल आपले विचार मांडत. अ‍ॅरिस्टॉटल हा बुद्धिमान असला, तरी असाच ‘आर्मचेअर फिलॉसॉफर’ होता. पडताळा न घेता त्याने मांडलेल्या अनेक कल्पना चुकीच्या असू शकतात, हे पहिल्यांदा गॅलिलिओने दाखवून दिले. याबाबत बर्ट्रांड रसेल या तत्त्वज्ञाने अ‍ॅरिस्टॉटलच्या एका विधानाचे मजेशीर उदाहरण दिले आहे – पुरुषांपेक्षा बायकांना दात कमी असतात, हे अ‍ॅरिस्टॉटलचे विधान अगदी पंधराव्या शतकापर्यंत मेडिकलच्या विद्यार्थ्यांना शिकवले जात होते; पण शरीररचनाशास्त्राचा वैज्ञानिक अभ्यास आल्यावर हे विधान खोटे आहे, असे सिद्ध झाले. व्यक्ती कितीही मोठी असो, ती चुकू शकते. याचा पुरावा म्हणून गॅलिलिओने अ‍ॅरिस्टॉटलच्या मताला पहिला तडा दिला. अ‍ॅरिस्टॉटलच्या तर्कानुसार जड पदार्थ लवकर जमिनीवर पडेल, असे अनुमान निघत होते. प्रत्यक्षात हलका आणि जड पदार्थ एकाच वेळी जमिनीवर पडतात, हे गॅलिलिओने दाखवून दिले. हा प्रयोग करताना तेथे मोठ्या संख्येने लोक उभे होते. 179 फूट उंचीवरून एकाचवेळी टाकलेले कमी-जास्त वजनाचे दोन तोफेचे गोळे एकाच वेळी जमिनीवर पडले, तरी लोक त्याबद्दल बोलायला तयार झाले नाहीत. अ‍ॅरिस्टॉटल खोटा कसा असेल? प्रचलित समजुतीचा केवढा जबरदस्त प्रभाव लोकांवर असतो, याचा हा पुरावा.

पिसा विद्यापीठातील अधिकार्‍यांबरोबर झालेल्या मतभेदांमुळे आणि मनोर्‍याच्या प्रयोगामुळे त्याची गणिताच्या प्राध्यापकाची नोकरी गेली. पण एका मित्राच्या मदतीमुळे त्याला ‘पदुवा विद्यापीठा’त नोकरी मिळाली.

1604 साली गॅलिलिओला आकाशात एक नवीन तेजस्वी तारा दिसला. अ‍ॅरिस्टॉटलच्या मतानुसार आकाशातील तार्‍यांची संख्या स्थिर आहे, हे तारे अमर आहेत. नवीन तारे जन्माला येत नाहीत; मग हा तारा कुठून आला? 1609 साली गॅलिलिओने स्वत: तयार केलेल्या दुर्बिणीतून आकाशाचं निरीक्षण करताना ख्रिस्ती धर्मपीठाने स्वीकारलेल्या अ‍ॅरिस्टॉटलच्या अनेक कल्पनांना धक्के द्यायला सुरुवात केली. गॅलिलिओने या दुर्बिणीतून चंद्रावरचे डोंगर आणि खळगे बघितले. 1610 साली गुरू ग्रहाचे निरीक्षण करून त्याभोवती फिरणारे चार चंद्र शोधून काढले; म्हणजे चंद्र फक्त पृथ्वीलाच नाही, त्यामुळं पृथ्वी या विश्वात केंद्रस्थानी मानण्याचे कारण नाही, असे त्याचे मत झाले. याचबरोबर गॅलिलिओने शुक्राला कला होतात, हे दुर्बिणीतून तपासले. पृथ्वीप्रमाणेच शुक्र सूर्याभोवती फिरत असल्यामुळे हे घडते. याचा अर्थ पृथ्वी, शुक्र इत्यादी ग्रह सूर्याभोवती फिरत असावेत; म्हणजे पृथ्वी हा विश्वाचा केंद्रबिंदू नाही, तर सूर्य हा या विश्वाचे केंद्र आहे, या मताशी गॅलिलिओ आला. कोपर्निकसने मांडलेल्या सूर्यकेंद्री सिद्धांतास गॅलिलिओने पुरावा दिला.

याच्या पुढचं आयुष्य म्हणजे गॅलिलिओचा धर्मपीठाविरुद्धचा प्रदीर्घ लढाच होता. ‘कोपर्निकस बरोबर आहे,’ असं म्हटल्याबद्दल त्याला चर्चकडून अनेकदा तंबी मिळाली. गॅलिलिओचे मित्र पोपकडे समजूत काढायचे. असं बरीच वर्षं चाललं; पण शेवटी गॅलिलिओला पाखंडी ठरवण्यात आलेच. आपल्या संशोधनावर आधारित 1632 साली गॅलिलिओने ‘डायलॉग कन्सर्निंग टू दी चीफ वर्ल्ड सिस्टिम’ हे पुस्तक प्रकाशित केलं. ते ‘बेस्ट सेलर’ झालं. या पुस्तकात संवादरुपात अप्रत्यक्षपणे अ‍ॅरिस्टॉटल आणि धर्मपीठ कसे चूक आहेत, हे दाखवलं होतं. यामुळे पोप अर्थातच खवळला. गॅलिलिओला रोममध्ये बोलावण्यात आलं. सहा महिन्यांच्या खटल्यानंतर 22 जून 1633 रोजी जवळपास अंधत्व आलेल्या गॅलिलिओनं पुन्हा हार मानली. त्यानं तसं चक्क लिहून दिलं. त्यात असं म्हटलं होतं की, “मी गॅलिलिओ, 70 वर्षांचा असून आपले गुडघे टेकून आपली माफी मागतो… सूर्याभोवती पृथ्वी फिरते, हा विचार पूर्णपणे चुकीचा असून त्याचा त्याग करतो… माझ्या चुकीबद्दल मला पश्चात्ताप होत आहे.” पण न्यायालयातून बाहेर पडताना पुन्हा गॅलिलिओ तोंडातल्या तोंडात, ‘पण खरंतर पृथ्वीच फिरते,’ असं पुटपुटला. अशीही एक कथा आहे की, चर्चने त्या प्रकाशकांकडे त्या पुस्तकाच्या प्रती जप्त करण्यासाठी माणसं पाठवली; पण तोपर्यंत सगळ्या प्रती खपल्या होत्या.

आयुष्याच्या शेवटपर्यंत गॅलिलिओला नजरकैदेत राहावे लागले. शेवटी-शेवटी तो पूर्णपणे आंधळा झाला आणि 8 जानेवारी 1642 रोजी त्याचे निधन झाले. गॅलिलिओच्या मृत्यूनंतर तब्बल 320 वर्षांनी म्हणजे 1982 साली ‘सूर्य आणि पृथ्वी यांच्यापैकी कोण कुणाभोवती फिरतो,’ याविषयीची जुनी केस चर्चमध्ये पुन्हा उभी राहिली. मग त्यावर 10 वर्षे विचार, उलटसुलट वाद-प्रतिवाद झाले. शेवटी सगळे पुरावे बघून 1992 साली एकदा कुठे पोप पॉल दुसरे यांनी, ‘गॅलिलिओला चांगली वागणूक मिळाली नाही आणि पृथ्वीच सूर्याभोवती फिरते,’ हे कबूल केलं. तेव्हा ते ‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या मथळ्यावर झळकलं होतं. त्या अगोदर तीन वर्षे; म्हणजे 1989 साली झेप घेतलेलं ‘गॅलिलिओ’ नावाचं अंतराळयान 1995 साली गुरुपर्यंत पोचलं, तेव्हा गॅलिलिओला विसाव्या शतकाने केलेला तो सलामच होता! गॅलिलिओच्याच दुर्बिणीने याच गुरूभोवती फिरणारे चार चंद्र बरोबर 385 वर्षांपूर्वी टिपले होते.

धार्मिक अतिरेक अजून संपलेला नाही

विचारस्वातंत्र्य आणि बुद्धिप्रामाण्य यातून सत्यशोध होत असताना बु्रनो, गॅलिलिओ; तसेच युरोप खंडातील प्रबोधनकाळाच्या प्रभावामुळे आपले विचार मांडू पाहणारे विचारवंत आणि हटवादी धर्म यांच्यातील संघर्ष हा पुढे चालूच राहिला. ख्रिस्ती धर्माला किंवा इतर कोणत्याही धर्माला विचारस्वातंत्र्याची भीती का वाटावी? धर्माचा मूळ उद्देश समाजाला नैतिक मूल्यांची शिकवण हा होता. त्यासाठी देवाच्या निर्मितीची आणि धाकाची गरज त्यांना वाटली असावी. आपला प्रभाव वाढल्याने धर्माने एक मोठी चूक केली. ती म्हणजे नैतिक शिकवणीबरोबरच निसर्गातील घडामोडींच्या संदर्भात स्वत:ची मते समाजावर लादली. सृष्टीतील घडामोडींचं सत्यज्ञान धर्माला नसल्यामुळे या घडामोडींना देवदेवता, भुतेखेते, विविध प्रकारचे सुष्टात्मे आणि दुष्टात्मे कारण आहेत, असे धर्म सांगू लागला. माणसाला विश्वाचे केंद्र मानून आणि तोच देवाचा सर्वांत लाडका आहे, असे समजून सृष्टीची रचना त्याच्यासाठीच आहे, यावर धर्माने शिक्कामोर्तब केले. यात भर म्हणून पाप-पुण्याच्या कल्पना पुरोहितांनी निर्माण केल्या. ‘एखाद्या घरावर वीज का पडते, तर त्या घरातील लोकांनी पाप केले,’ असे धर्म सांगू लागला. ‘स्त्रियांना प्रसववेदना का होतात, तर ती देवाची आज्ञा आहे,’ असे बायबलमध्ये लिहिले आहे. थोडक्यात, ‘वीज का कडाडते तर तो देवाचा आसूड, भूकंप का होतो तर देव रागावला म्हणून, साथीचा रोग का आला, तर देवाची अवकृपा.’ थोडक्यात, धर्माने सृष्टीचा चुकीचा कार्यकारणभाव मान्य केला होता. खरंतर आधुनिक विज्ञानाने हा कार्यकारणभाव अमान्य केला आहे. सृष्टीतील घडामोडी या विशिष्ट निसर्गनियमाने घडतात, त्यांचा मानवी इच्छेशी काहीही संबंध नाही. निसर्ग हा न-नैतिक आहे, त्याच्यातील घडामोडींचा मानवी सुख-दु:खाशी काहीही संबंध नाही, हा आधुनिक विज्ञानाचा निष्कर्ष आहे. या निष्कर्षाची सुरुवात ब्रुनो आणि गॅलिलिओ यांनी केली. सूर्यमालेसारख्या अनेक सूर्यमाला विश्वात आहेत. या ब्रुनोच्या कल्पनेने माणूस या विश्वाचा केंद्रबिंदू आहे, या धार्मिक कल्पनेला धक्का बसत होता. सूर्यमालेतील पृथ्वी हा एक ग्रह आहे, या गॅलिलिओने निरीक्षणातून मांडलेल्या सिद्धांतामुळे माणसाचे महत्त्व कमी झाले, अशी धर्माची चुकीची समजूत झाली असावी. खरंतर निसर्गरचना आणि विश्वातील घडामोडी याबाबतीत धर्माने बुरसटलेले विचार टाकून द्यावयास हवे होते; पण अहंकार आणि हटवादीपणा यातून धर्म कडवाच राहिला आणि त्यातून विचारवंतांचा छळ करत राहिला.

युरोप खंडात प्रबोधनाच्या प्रभावाने आणि सत्य काय, याबाबत लोक निर्भयपणेप्रश्न विचारू लागल्याने गॅलिलिओनंतर धर्माची क्रूरता हळूहळू मावळू लागली, तरीसुद्धा बुद्धिचातुर्य आणि हटवादीपणा यातून आपला वचक समाजावर राहावा, यासाठी ख्रिस्ती धर्म कार्यरत राहिलाच. अनेक विचारवंत, ‘आम्ही धार्मिक आहोेत; पण देवाने आम्हाला बुद्धी दिल्यामुळे निसर्गाची रहस्ये शोधण्यात गैर काय?’ हा विचार सामाजिक वर्तुळात मान्यता पावला. न्यूटन स्वत:ला धार्मिक माने. ‘देवाने हे जग निर्माण केले; पण एकदा ती क्रिया पूर्ण झाल्यावर जगाच्या घडामोडीत तो हस्तक्षेप करीत नाही,’ असे न्यूटनचे विधान आहे. न्यूटनने गॅलिलिओचा सृष्टीचा खरा कार्यकारणभाव जाणून घेण्याचा, निरीक्षण, गणिताचा वापर आणि प्रयोग यांची विज्ञानाच्या पद्धतीत भर घातली. गृहित मांडायचे, त्यातून तर्काने निष्कर्ष काढायचे आणि त्या निष्कर्षांचा पडताळा घ्यायचा, ही वैज्ञानिक पद्धतीची पुढची पायरी न्यूटनने पूर्ण केली. गतीचे तीन नियम आणि गुरुत्वाकर्षणाचा नियम यांच्या मदतीने ग्रह सूर्याभोवती कसे फिरतात, चंद्राचं पृथ्वीभोवती फिरणं, सूर्याच्या आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे सागराला येणारी भरती-ओहोटी यांचं स्पष्टीकरण गणिताच्या सहाय्याने न्यूटननं दिलं. आपलं संशोधन त्यानं ‘प्रिन्सिपिया’ या प्रख्यात ग्रंथात लिहून ठेवलं आहे. गॅलिलिओने सुरू केलेली विज्ञानाची पद्धत न्यूटनने पूर्ण केली. हीच वैज्ञानिक क्रांती होय.

निसर्गाची रहस्ये शोधण्याची विज्ञानाची कळ माणसाला आता प्राप्त झाली आणि निसर्गाची अलिबाबाच्या गुहेतील सृष्टीरहस्ये मानवाला खुली झाली. विज्ञानाच्या पद्धतीचा वापर करून सृष्टीतील घडामोडींचे कार्यकारणभाव माणसाला आता कळू लागले. पदार्थाचं स्वरूप आणि पदार्थाची रुपांतरे रसायनविज्ञानाच्या मदतीने कळू लागली. व्हेसॅलियसने शरीररचनाशास्त्राचा अभ्यास केला. विल्यम हार्वेने शरीरात रक्ताभिसरण कसे होते, याचे स्पष्टीकरण दिले. चुंबकाचा शोध आणि फॅरेडेच्या संशोधनानं विजेची निर्मिती; तसेच वाफेचा शोध यातून माणसाला ऊर्जेची साधने हस्तगत झाली. पुढे, 19 व्या आणि विसाव्या शतकात रडार, रेडिओ, टेलिव्हिजन, महाकाय दुर्बिणी ही इलेक्ट्रॉनिक्सची साधने मानवाच्या सेवेला रूजू झाली. या भौतिक साधनांबरोबरच आइन्स्टाइन, व्हॉईल, नारळीकर, स्टिफन हॉकिंग यांच्या संशोधनातून विश्वाच्या रचनेची माहिती मिळू लागली. गंमत म्हणजे ब्रुनोने कल्पिलेल्या विश्वरचनेशी आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलेली विश्वरचना मिळती-जुळती आहे. ‘सत्य न मरते दळभारे’ याची प्रचीती जगाला आली. ब्रुनो आणि गॅलिलिओ यांच्या हौतात्म्याला सलाम…!

फ्रान्सच्या राज्यक्रांतीतून स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये जगाने स्वीकारली. युरोपातील सर्व राष्ट्रे आणि उत्तर अमेरिका येथे लोकशाही शासनसंस्था स्थापन झाल्या. विचारस्वातंत्र्याला महत्त्व प्राप्त झाले, तरीसुद्धा धर्माची टूरटूर चालूच होती. डार्विनच्या उत्क्रांतीवादाला धार्मिकांनी प्रखर विरोध केला होता. युरोपात डॉ. सिप्सन यांनी स्त्रियांची प्रसूतिवेदना कमी करण्यासाठी क्लोरोफॉर्मचा वापर सुरू केला. त्यालाही धर्मगुरूंनी प्रखर विरोध केला होता. व्हेसॅलियसने शरीराची चिरफाड केली, हे देवाच्या इच्छेविरुद्ध झाले म्हणून त्याला जेरूसलेमला जाऊन येशूची क्षमा मागण्याची शिक्षा करण्यात आली; पण लोकशाही मूल्यांचा प्रभाव युरोप-अमेरिकेत मान्य असल्यामुळे धर्माचा प्रभाव ओसरत चालला होता. चर्चमध्ये जाणार्‍या नागरिकांचे प्रमाण कमी होत चालले आहे.

या पार्श्वभूमीवर पूर्वेकडील आशियाई राष्ट्रांत काय परिस्थिती आहे? भारतातील परिस्थिती काय आहे? 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत सरकारचे नेतृत्व पंडित नेहरूंच्याकडे आले. पंडित जवाहरलाल नेहरू हे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे खंदे समर्थक होते. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याच्या आधारे भारताची पुढची वाटचाल चालू राहावी, हे त्यांचे स्वप्न होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य सहकार्‍यांच्या मदतीने त्यांनी भारताची राज्यघटना स्थापन केली. या राज्यघटनेद्वारे भारत ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) राष्ट्र बनले. ‘सेक्युलर’ म्हणजे भारतात कोणताही एक धर्म श्रेष्ठ नाही, प्रत्येक नागरिकाला आपापल्या धर्माप्रमाणे वागण्याचा हक्क आहे; पण सार्वजनिक शांतता आणि आरोग्य यांना धर्म धोक्यात आणत असेल, तर त्याला प्रतिबंध करण्याचा अधिकार घटनेला आहे. याचबरोबर अंधविश्वास आणि गैरसमजूत यासाठी धर्मचिकित्सा करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन हवा, ही घटनेची भूमिका आहे.

आज भारतात वास्तव काय आहे? भारताचं ‘सेक्युलर’ रूप आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याला आव्हान देणार्‍या प्रतिगामी शक्ती भारतात प्रबळ होऊ पाहत आहेत. मंदिर की मस्जिद असा प्रश्न उकरून भारतात नवं धर्मयुद्ध घडलं. दोन धर्मांत द्वेष पसरवून सत्ता हाती घेण्यात हिंदुत्ववादी शक्ती सफल झाल्या आहेत. त्यांना आपला धर्म आणि त्यातील चाली-रीती सर्वश्रेष्ठ आहेत, असा उन्माद चढला आहे. धर्मनिरपेक्ष राष्ट्रांत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करून विविध धर्मांतील गैरसमजुती आणि अंधविश्वास या विरोधात प्रबोधन करणे, यात गैर काय?

भारतीय घटनेच्या अधिकारात आणि घटनेशी प्रतारणा न करता डॉ. नरेंद्र दाभोलकर महाराष्ट्रात अंधविश्वासाच्या विरोधात कार्य करीत होते. सर्व धर्मांतील अंधश्रद्धांच्या विरोधात त्यांची लढाई चालू होती. दाभोलकरांच्या प्रभावाने महाराष्ट्रातील समाज अंधविश्वासातून मुक्त होण्याचे धोरण स्वीकारीत होता. विचार, कृती आणि संघटन या तिन्ही पातळ्यांवर दाभोलकरांनी अंधविश्वासाविरोधात जोरदार संघर्ष उभा केला होता; पण सुधारणाच नको, जुनं ते सोनं, आम्ही श्रेष्ठ या विकारानं ग्रासलेल्या कडव्या धर्मांधांनी दाभोलकरांना ठार केलं. पुन्हा एकदा बु्रनो आणि गॅलिलिओ यांच्याप्रमाणेच धर्माने घेतलेला दाभोलकरांचा हा आणखी एक बळी होय.

मध्य-पूर्वेत तालिबान, आयसिस या धर्मांध संघटना त्यांच्या समाजाला प्रकाशाकडून अंधाराकडे घेऊन चालल्या आहेत. भारतातही धर्मांध संघटना भारतीय समाजाला याच दिशेनं ओढत नेतील काय, याची भीती वाटते. हे घडायचं नसेल, तर स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही मूल्ये जपण्यासाठी दाभोलकरांनी महाराष्ट्रात प्राणाची आहुती दिली. त्यांचे स्मरण करून त्यांनी सुरू केलेली प्रबोधनाची चळवळ अधिक तेज करायला हवी.

‘आपण सर्वजण एकाच परमेश्वराची लेकरे आहोत,’ असे धर्मवचन ग्रंथातच राहिले आहे. जगातील सर्व संघटित धर्म एकमेकांच्या विरोधात संघर्ष करीत आहेत. 13 व्या शतकात ख्रिस्ती धर्म व मुस्लिम धर्म यांच्यात धर्मयुद्धे झाली. भारताच्या फाळणीच्या वेळी लाखो लोकांना हिंदू-मुस्लिम वादाचा तडाखा बसला. मध्य-पूर्वेत मुस्लिम अतिरेकी, तर भारतात हिंदू अतिरेक्यांची आपल्या धर्माची पुनर्स्थापना करण्याची स्वप्ने मोडून टाकायची असतील, तर विविध संघटित धर्मांचा त्याग करून जगात सर्वत्र एकच विज्ञानाधिष्ठित मानवता धर्म स्थापन व्हायला हवा. ब्रुनो, गॅलिलिओ ते दाभोलकर या महापुरुषांना अभिप्रेत असलेल्या मानवतावादाची पताका भविष्यात फडकावी, यासाठी जगातील उदारमतवादी स्वातंत्र्य, समता, बंधुता व विचारस्वातंत्र्य यांच्या रक्षणाचा निर्धार करूया.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]