प्रा. प. रा. आर्डे -

मानवाने आजवर साधलेली प्रगती आपोआप, कोणत्याही दैवी, अमानवी शक्तीच्या आधारे नव्हे, तर मानवी बुद्धीच्या बळावर आहे. परंतु ही बुद्धी वापरण्यासाठी, विकसित करण्यासाठी बुध्दिवादी मानवाला अगदी मानवी जन्मापासून ते थेट आजतागायत मानवी विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रचंड संघर्षाला तोंड द्यावे लागले आहे. त्यातील आधुनिक विज्ञानाच्या टप्प्यात सॉक्रेटिस ते दाभोलकर या बुद्धिवाद्यांनी केलेल्या संघर्षाचा इतिहास या ‘बुद्धिवाद्यांचा संघर्ष’ या सदरातून सांगत आहेत, ‘अंनिवा’चे माजी संपादक प्रा. प्र. रा.आर्डे.
मानवी संस्कृतीत निसर्गाबद्दल आणि मानवी परस्परसंबंधाबद्दल जेव्हा विचार सुरू झाला, तेव्हापासून एक मोठा संघर्ष चालू आहे. हा संघर्ष अनेकदा मानवी समूहात लढाईद्वारे व्यक्त झाला आहे. तलवारी, भाले; पुढे बंदुका, तोफा, रणगाडे आणि विमाने यांचा वापर होऊन झालेल्या क्रूर लढाया मानवी समाजाने अनुभवल्या आहेत; पण या लढाया आपल्या समूहाचा स्वार्थ, राजे-रजवाडे आणि विविध राष्ट्रांनी सत्तेसाठी आणि संपत्तीसाठी लढलेल्या लढाया होत. हा या लेखाचा विषय नाही. प्रख्यात इतिहासकार विल ड्यूरंट याच्या मते, मानवी संस्कृतीचा इतिहास तलवारी-रणगाड्यांच्या लढायांतील क्रूरता व मूर्खता एवढाच नाही; पण रानटीपणाकडून संस्कृतीकडे आणि विवेकाकडे मानवी समूहाची वाटचाल कशी झाली, हे इतिहासाच्या समोर आले पाहिजे.
मानवी संस्कृतीमध्ये दोन विचारसरणींच्यात संघर्ष सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी; म्हणजे ग्रीक-रोमन कालापासून सुरू झाला आहे. श्रद्धावाद आणि विवेकवाद यांच्यातील लढाई अजून संपलेली नाही. याचे अलिकडच्या काळातील उदाहरण म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या विवेकवादी विचारवंतांची धर्मांधांनी केलेली हत्या. ‘इस्लाम धर्म बुडवणारी बाई,’ अशी आरोळी देऊन बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांना मुस्लिम धर्मांधांनी ठार मारण्याची धमकी दिली. त्या एका अज्ञातवासात जीवन कंठीत आहेत. सॉक्रेटिसपासून पुढे विविध काळाच्या आतापर्यंतच्या विवेक आणि श्रद्धा यांच्यामधील लढाईत ज्या थोर विचारवंतांनी योगदान दिले, त्यांचा परिचय करून घेऊया.
धर्मांधता व अंधविश्वासाला जन्म देणारा श्रद्धावाद व विवेकवाद यांच्यात संघर्ष होण्याचे कारण काय, याचे उत्तर शोधण्यापूर्वी श्रद्धावाद आणि विवेकवाद या विचारसरणीतला भेद समजून घ्यायला हवा. श्रद्धेला चिकित्सा मान्य नाही. धर्मग्रंथात किंवा कोणीतरी गुरूंनी सांगितलेलं वचन यावर शंका न घेता ते जसेच्या तसे स्वीकारणे म्हणजे श्रद्धा. श्रद्धेत बुद्धीला थारा नाही; महत्त्व असते भावनेला. श्रद्धा म्हणजे अढळ विश्वास. विरुद्ध पुरावा मिळाला, तरी श्रद्धाळू आपले मन बदलण्यास राजी नसतो. जगातील सर्व धर्म अशा श्रद्धेवर आधारित आहेत. हे विश्व कधी निर्माण झाले, कोणी निर्माण केले; तसेच ते कशाचे बनलेले आहे, याची उत्तरं धर्मग्रंथ देतात. याच बरोबर विश्वात मानवाचे स्थान काय? मानवाचा आणि विश्वाचा परस्परसंबंध काय, याचीही उत्तरे धर्मग्रंथ देतात. श्रद्धेतून निर्माण झालेल्या विविध धर्मांचा आजही जगावर प्रभाव आहे.
श्रद्धा आणि धार्मिकता याला आव्हान देणारी विचारसरणी म्हणजे विवेकवाद. विविध लेखकांनी बुद्धीला प्रमाण मानणार्या या विचारसरणीला बुद्धिवाद किंवा बुद्धिप्रामाण्यवाद किंवा विवेकवाद या नावाने संबोधले आहे. ही तीनही नावे इंग्रजीतील ‘रॅशनॅलिझम’ (Rationalism) या शब्दाशी समानार्थी आहेत. Rationalism हा शब्द Reason या अर्थाचा आहे. Reason म्हणजे ‘तर्कबुद्धी.’ मराठीमध्ये ‘बुद्धी’ या शब्दाला वेगवेगळे आशय आहेत. बुद्धिमान म्हणजे हुशार, हजरजबाबी, माहितीचा प्रचंड साठा असलेला, युक्तिवादाने दुसर्याच्या विचारांवर मात करणारा असा माणूस अशी ही समजूत आहे. यापेक्षा ‘विवेक’ हा शब्द विशेष असा अर्थ सूचित करतो.
विवेकवादाची संकल्पना ग्रीक कालापासून ते आजतागायत उत्क्रांत होत गेली आहे. हे समजून घ्यायचे असेल, तर श्रद्धावाद, बुद्धिप्रामाण्यवाद आणि अनुभववाद (Faith, Rationalism, Empiricism) या संकल्पना तपासायला हव्यात. श्रद्धावादाबद्दलचे विवरण या लेखाच्या सुरुवातीला दिलेच आहे. 17 व्या शतकात रेने देकार्त, लायब्नीज आणि स्पिनोझा या तत्त्वज्ञांनी ‘रॅशनॅलिझम’ ही संकल्पना साकार केली. भोवतालच्या जगाचे किंवा सत्याचे विश्वसनीय ज्ञान केवळ तर्कानेच कळते, असा त्यांचा दावा होता. स्वयंसिद्ध काही मूळ तत्त्वापासून तर्काने; म्हणजेच लॉजिकने निष्कर्ष काढत नवीन सिद्धांत मिळवणे म्हणजे ‘रॅशनॅलिझम.’ भूमितीमध्ये काही मूळ स्वयंसिद्ध वाक्यांपासून पुढील सर्व प्रमेये बुद्धीने म्हणजे तर्काने सिद्ध करता येतात. हीच रीत कोणत्याही प्रश्नाबाबत सत्यशोधनासाठी वापरावयास हवी, असा त्यांचा दावा होता. ज्ञानेंद्रियांना अनुभवाला येणारे जग हे विश्वसनीय नाही. हे जग म्हणजे माया आणि तर्काधिष्ठित जग म्हणजे ब्रह्म. ‘ब्रह्मं सत्यं जगन्मिथ्या’ अशी विचारसरणी.
बुद्धिप्रधान ‘रॅशनॅलिझम’ला तत्त्वज्ञ जॉन लॉक यांनी आव्हान दिले. त्याच्या मते, इंद्रियानुभव हाच ज्ञानाचा खरा उगम आहे. माणसाचे मन हे जन्मत: कोर्या पाटीसारखे असते. ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने मिळालेल्या अनुभवातून आपले विचार बनत जातात. या विचारसरणीला ‘एम्पिरिझम’ असे म्हणतात. पुढे इमॅन्युअल कांट आणि जॉन मिलर याने ‘रॅशनॅलिझम’ आणि ‘एम्पिरिझम’ यांच्यात समन्वय साधत बुद्धीला अनुभवाची जोड देऊनच सत्याचे आकलन होते, असा विचार मांडला.
तर्काला अनुभवाची जोड देण्याचा यशस्वी प्रयत्न विज्ञानाच्या क्षेत्रात गॅलिलिओ, न्यूटनप्रणीत वैज्ञानिक पद्धतीत झाला. सत्य आकलनाची वैज्ञानिक पद्धत म्हणजे तर्कबुद्धी आणि अनुभवाद्वारे पडताळा, यांचे सुंदर एकत्रिकरण आहे. विज्ञानात प्रतिभावान एखादे गृहीत तत्त्व मांडतो. त्यावरून तर्काधिष्ठित निगमन (Deduction) पद्धतीने काही निष्कर्ष मिळतात. हे निष्कर्ष अनुभवाद्वारे, प्रयोगाद्वारे पडताळून पाहावे लागतात. पडताळणीत ते सिद्ध झाले की, मूळ गृहिताची सत्यता सिद्ध होते आणि त्याला सिद्धांताचा दर्जा मिळतो.
17 व्या-18 व्या शतकात विज्ञानाच्या या विचारसरणीला आणि राजकीय आणि सामाजिक तत्त्वज्ञानात तर्काबरोबरच अनुभवाला महत्त्व दिले पाहिजे, ही विचारधारा प्रभावी झाली आणि युरोप खंडात विवेकवादाचे नवे स्वरूप आकाराला आले. केवळ तर्क सत्याच्या आकलनासाठी अपुरा आहे. तो महत्त्वाचा आहेच; पण तर्काने काढलेले निष्कर्ष अनुभवाच्या कसोटीवर सिद्ध व्हायला हवेत. हा ‘रॅशनॅलिझम’चा अर्थ होय. फ्रान्समध्ये व्हॉल्टेअर, डिरॉट आदी विचारवंतांनी, इंग्लंडमध्ये जॉन लॉक यांनी; तसेच जॉन स्टुअर्ट मिल, स्पेन्सर आदी विचारवंतांनी विवेकवादाचा हा आशय स्पष्ट केला.
या नवीन विवेकवादाने (Rationalism) श्रद्धेची तपासणी सुरू करता आली. विश्वाचे स्वरूप, विश्वाची निर्मिती, त्यातील मानवाचे स्थान याबाबत धर्मश्रद्धांनी मांडलेल्या विचारांची चिकित्सा सुरू झाली. या चिकित्सेचे साधन म्हणजे वैज्ञानिक पद्धती. सूर्य, चंद्र, तारे यांच्याकडे रोखलेल्या दुर्बिणीमधून आणि कोपर्निकस, केपलर, गॅलिलिओ प्रणित वैज्ञानिक संशोधनातून श्रद्धेला जबरदस्त हादरे बसू लागले. पुढे तर धर्मग्रंथातील वचनांची चिकित्साही सुरू झाली. धर्मग्रंथातील पुरावा मिळत नाही, असा विचार निर्भयपणे समाजात मांडला जाऊ लागला. परिणामी धर्मसत्तेला हादरे बसू लागले. राजा हा देवाचा अवतार आहे, हे अमान्य होऊ लागले आणि माणूस हा ‘सुप्रीम’ आहे, तो स्वायत्त आहे, अशी मानवतावादी मूल्ये युरोपात प्रस्थापित होऊ लागली. याचे श्रेय विवेकवादाच्या नव्या विचारसरणीला द्यावे लागेल. या विचारसरणीचा इंग्लंड आणि इतर युरोपीय राष्ट्रांत जोरदार प्रचार सुरू झाला. ‘रॅशनॅलिस्ट प्रेस असोसिएशन;’ जिचे पुढे ‘रॅशनॅलिस्ट असोसिएशन ऑफ इंग्लंड’ या नावात रूपांतर झाले, या संघटनेने नव्या विवेकवादी विचारांचा जोरदार प्रचार सुरू केला. या संघटनेने ‘रॅशनॅलिझम’ची खालील समर्पक व्याख्या दिली आहे.
“Rationalism is A mental attitude which unreservedly accept the Supremacy of Reason and aims of establishing a system of Philosophy and ethics verifiable by exprience indepedent of arbitary assumptions of authority“ “विवेकवाद ही एक विचाराची पद्धती किंवा दृष्टिकोन आहे; जीमध्ये तर्कबुद्धीला सर्वोच्च मानले जाते. विवेकवादाचा हेतू तत्त्वज्ञान आणि नैतिकता यांची अशी व्यवस्था प्रस्थापित करावयाची, जी अनुभवाच्या कसोटीवर सिद्ध झालेली असेल. अधिकारी, साक्षात्कारी व्यक्तींची वचने चिकित्सेविना स्वीकारीत नाही. विवेकवाद श्रद्धा नाकारतो.”
विवेकवादाने धर्मचिकित्सेचा मार्ग खुला केला. महाराष्ट्रात आगरकरांनी ‘रॅशनॅलिझम’च्या मदतीनेच कठोर धर्मचिकित्सा केली आणि अंधश्रद्धेवर प्रहार केले. बुद्धिवाद किंवा बुद्धिप्रामाण्यवाद आणि विवेकवाद या तीनही शब्दांनी ‘रॅशनॅलिझम’ व्यक्त होत असला, तरी ‘बुद्धी’ या शब्दाला असलेले आणखी वेगळे अर्थ असल्याने हल्लीच्या साहित्यात ‘रॅशनॅलिझम’ला ‘विवेकवाद’ हाच शब्द वापरला जातो. हा शब्द मराठीत प्रथम आगरकरांनी रूढ केला. तोच शब्द प्रख्यात तत्त्वज्ञ दि. य. देशपांडे यांनी तत्त्वज्ञानात रूढ केला आहे. पुढील विवरणात हाच शब्द ‘रॅशनॅलिझम’ला प्रतिशब्द म्हणून आणि ‘रॅशनॅलिझम’ची नवीन व्याख्या लक्षात घेऊन वापरण्यात आला आहे.
सुमारे 2500 वर्षांपूर्वी ग्रीक संस्कृतीत विवेकवादाचा उष:काल झाला. अनुभव घेणे किंवा पडताळा पाहणे, ही विवेकवादाची वैशिष्ट्ये ग्रीक कालातील विचारवंतांत रुजलेली नव्हती; याला अपवाद होता अॅरिस्टॉटलचा. अॅरिस्टॉटलने जीवशास्त्रात काही निरीक्षणे नोंदवली होती. पण थेल्स ऑफ, मिलेट्सपासून ते सॉक्रेटिस, प्लेटो, अॅरिस्टॉटल आणि त्यांची पुढे गेलेली विचारधारा यात तर्कमहात्म्य हेच मुख्यत: प्रभावी होते; पण ग्रीकांचे कौतुक यासाठी की, त्यांनी विश्वाच्या आणि मानवाच्या प्रश्नांबाबत श्रद्धेला स्थान दिलेले नाही. भौतिक सृष्टीच्या रचनेबाबत ग्रीक विचारवंतांनी तर्कबुद्धीने वेगवेगळ्या कल्पना मांडल्या. एकाने मांडलेल्या कल्पनेपेक्षा दुसर्याच्या कल्पना भिन्न होत्या; पण सहिष्णू, बुद्धिप्रधान विचारधारेला ग्रीक संस्कृतीत असलेल्या महत्त्वामुळे त्यांची प्रज्ञा बहराला आली होती. ग्रीक संस्कृतीमध्ये ख्रिस्ती धर्मासारखा एखादा धर्म निर्माण झाला असता, तर ग्रीक बुद्धिवंतांना त्या धर्माने देहांताच्या शिक्षा दिल्या असत्या.
सुमारे 200 वर्षांपूर्वी युरोपमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रभाव सुरू झाला आणि धर्माचा वर्चस्ववाद वाढू लागला. आपण जे सांगू किंवा जे लिहू त्याच्यापेक्षा वेगळं मानायचं नाही. त्यासाठी; प्रसंगी तलवार हाती घ्यायची, असा प्रकार सुरू झाला. प्लेटोच्या बुद्धिवादी तत्त्वज्ञानाचा प्रसार करणार्या हायपेशिया या विद्वान स्त्रीला एका ख्रिस्ती बिशपने आपल्या गुंडांकरवी ठार केले. ख्रिस्ती धर्माची ही आक्रमकता रोमन सम्राटाने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केल्यावर अधिकच वाढली आणि युरोप खंडात ख्रिस्ती धर्माचा झपाट्याने प्रसार झाला. धर्माच्या नावाखाली पुरोहितशाही वाढू लागली. बुद्धी पांगुळली आणि अंधश्रद्धा फोफावली. 13 व्या शतकापर्यंत सुमारे 1000 वर्षे युरोप खंडात धार्मिक अविवेकाचे साम्राज्य पसरले होते. विवेक पांगुळला होता.
11 व्या शतकापासून ख्रिश्चन, ज्यू आणि मुस्लिम धर्म यांच्यात वर्चस्वासाठी संघर्ष सुरू झाला. या धर्मांत जवळपास 11 धर्मयुद्धे केवळ दोन वर्षांत झाली. धर्माच्या नावाखाली चाललेल्या संहारात स्त्रिया आणि मुलेही सुटली नाहीत. धर्मावर टीका करणार्या किंवा धर्माला विरोध करणार्यांना पाखंडी ठरवून ख्रिस्ती धर्म त्यांचा अनन्वित छळ करून देहदंड देई. याला ‘इनक्विझिशन’ असे नाव आहे. पण माणसाच्या मनातील बुद्धिवादी विवेकाची आस निमाली नाही. समाजातील बुद्धिवादी लोक नव्याने विचार करू लागले आणि युरोपमध्ये ‘प्रबोधनाची पहाट’ झाली. इ. स. 1490 मध्ये नवी शिल्पे, नवी चित्रकला, समुद्रप्रवास, खगोलाचा अभ्यास आणि ख्रिस्ती धर्मातील चुकीच्या कल्पनांना विरोध करणार्या ‘प्रोटेस्टेट’ पंथाचा उदय झाला. 14 व्या, 15 व्या आणि 16 व्या शतकात नव्या विचारांचे वारे युरोपमध्ये सुरू झाले, तरीदेखील धर्माची अरेरावी चालू होतीच. 17 व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रुनो आणि गॅलिलिओ हे बायबलपेक्षा वेगळे विचार मांडताहेत म्हणून ख्रिस्ती धर्मपीठाने त्यांना शिक्षा दिली. बु्रनोला जिवंत जाळले गेले, तर गॅलिलिओला आजन्म तुरुंगवास देण्यात आला. पण प्रबोधनाचा परिणाम म्हणून 17 व्या आणि 18 व्या शतकात विवेकवादाच्या तत्त्वज्ञानाला सामर्थ्य आल्यामुळे सामान्य लोक धर्मसत्तेबाबत निर्भयपणे विचार करू लागले, तरीसुद्धा स्पिनोझा या तत्त्वज्ञाला ख्रिस्ती धर्माने वाळीत टाकले होते. पण अखेरीस विवेकाने अज्ञानमूलक आणि अहंकारी धर्मसत्तेला आव्हान चालूच ठेवले. युरोप आणि अमेरिकेमध्ये धर्म आणि राजसत्ता यांची फारकत झाली आणि व्यक्तिस्वातंत्र्याला महत्त्व आले. यालाच ‘ज्ञानोदय’ म्हणतात. लोकशाही राज्यव्यवस्था सुरू झाल्या. व्यक्तिस्वातंत्र्याची आणि लोकशाही मूल्यांची सुरुवात अठराव्या शतकात व्हॉल्टेअर आणि समविचारी विचारवंतांनी केली. परिणामी विवेकावर आधारित वैज्ञानिक संशोधन आणि सामाजिक स्वातंत्र्याचं युग युरोप-अमेरिकेत सुरू झालं. अमेरिकेत जेफरसन आणि बेंजामिन फ्रँकलिन यांनी उदारमतवादाची प्रस्थापना केली आणि विचारस्वातंत्र्याला घटनेत स्थान दिले. अलिकडच्या दोन शतकांत अमेरिकेमध्ये विवेकवादी चळवळीला पॉल कूर्टझ, जेम्स रँडी आणि त्यांचे समविचारी विवेकवादी यांनी धर्मनिरपेक्ष, मानवतावाद, वैज्ञानिक दृष्टिकोन, अंधश्रद्धा आणि छद्मविज्ञानाविरोधात प्रबोधन अशी जोरदार मोहीम सुरू केली. त्यांच्या ‘स्केप्टिकल’ विचारधारेच्या शाखा जगभर पसरल्या आहेत. इकडे, इंग्लंडमध्ये रिचर्ड डॉकिन्स, बर्ट्रांड रसेल आदी विवेकवादी विचारवंतांनी निसर्ग आणि मानव यांच्याबाबतीत विवेकवादानं दिलेला संदेश पोचवण्याचे महान कार्य केले.
भारतात विवेकवादाचा विचार इंग्रजी सत्तेच्या काळातच सुरू झालेला होता. महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी युरोपीय संस्कृतीत विकसित झालेला विवेकवाद स्वीकारून भारतीय समाजात धर्मचिकित्सा आणि सामाजिक समता, मानवता या मूल्यांच्या पेरणीचे काम केले. पंडित जवाहरलाल नेहरू हे विवेकवादी होते. विज्ञान आणि मानवता या मूल्यांवर आधारित भारतीय राज्यघटना आपल्या पंतप्रधान कार्याच्या कारकिर्दीत बाबासाहेब आंबेडकरांना बरोबर घेऊन बनवली आणि भारताच्या धर्मनिरपेक्ष, समाजवादी, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याकरिता बळ देणारी विवेकवादी विचारसरणी रूढ केली.
एकविसाव्या शतकात भारतात अन्यत्रही विवेकवादाच्या चळवळी सुरू झाल्या होत्या. तमिळनाडूमध्ये पेरियार, केरळमध्ये बी. प्रेमानंद, कर्नाटकमध्ये नरसिंहय्या, आंध्रमध्ये गोरा, पंजाबमध्ये भगतसिंग या विवेकवाद्यांनी भारतीय समाजात विवेकवादी विचारांची घुसळण केली. र. धों. कर्वे, डॉ. श्रीराम लागू, डॉ. नरेंद्र दाभोलकर आदी अलिकडच्या विचारवंतांनी ही विवेकाची चळवळ पुढे चालविली.
17 व्या – 18 व्या शतकात विवेकवादाने सुरू केलेले ‘विचारजागरण’ आता जगात सर्वत्र पसरले आहे. विवेकाला धर्माने केलेला विरोध पाश्चात्य राष्ट्रांत जवळपास ओसरला आहे. बहुतेक पाश्चिमात्य राष्ट्रं ही राजकीय आणि मानसिकदृष्ट्याही ‘सेक्युलर’ बनत चालली आहेत. मात्र आशिया खंडात भारत आणि शेजारील राष्ट्रे अजूनही धार्मिक प्रभावाच्या अधिपत्याखाली आहेत. तालिबान्यांनी अफगाणिस्तानात धार्मिक सत्ता आणली आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशात तीच स्थिती आहे. भारत धर्मनिरपेक्ष असला, तरी भारतीय जनमानस अजूनही पूर्णपणे विवेकवादी नाही. धर्म, जात, वर्ण आणि लिंग यामधील अविवेकी भेदाभेद वाढताना दिसतात. धर्मांध धर्माच्या नावाखाली विचारवंतांच्या हत्या करीत आहेत. हे कधी थांबणार?
ग्रीक कालापासून ते विसाव्या शतकापर्यंत विवेकवादाच्या तत्त्वज्ञानासाठी कृतिशील राहून ज्यांनी देहदंड सोसला, तुरुंगवास पत्करला; प्रसंगी बलिदान दिले, अशा विवेकवादी शूर लढवय्यांचा परिचय महत्त्वाचा आहे. सामाजिक विकास आणि नवसमाजरचना ही सुखासुखी होत नाही, त्यासाठी थोर माणसांना बलिदान द्यावे लागते, हे वाचून वेदना होतात; पण वास्तव हेच आहे.
भारतात राज्यघटना विवेकवादी; पण सामाजिक व्यवहार अविवेकी दिसतो. इंग्लंड व इतर युरोपीय राष्ट्रांत प्रबोधन आणि जनजागरण यांनी मानवी विकास साधला आहे. आपल्याकडे मात्र हे नवजागरण वेग घेत असताना राजसत्ता व धर्मसत्ता यांच्या युतीतून विवेकाला आव्हान मिळू लागले आहे. त्याचा जोरदार मुकाबला व्हावा. सॉक्रेटिस ते दाभोलकर ही विवेकाची लढाई अधिक तेज व्हायला हवी.
(‘विवेकाची लढाई’ या आगामी ग्रंथाची प्रस्तावना)
लेखक संपर्क : 98226 79546