‘उद्या’ नंदा खरे यांचा भविष्यवेध

प्रभाकर नानावटी -

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हितचिंतक आणि सुप्रसिद्ध लेखक नंदा खरे, नागपूर यांना तसेच बालसाहित्यिक आबा महाजन, जळगाव यांना यावर्षी मानाचा साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळाले आहेत. त्याबद्दल त्या दोघांचे अभिनंदन..!साहित्य अकादमी प्राप्त ‘उद्या’ व ‘आबाची गोष्ट’ या दोन पुस्तकांचा परिचय वाचकांना करून देत आहोत.

नंदा खरे यांच्या उद्याया पुस्तकास साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याचे वाचून पुरोगामी व विवेकी मराठी वाचकांना आनंद वाटणे साहजिकच आहे. कारण आजकालच्या गढूळ सामाजिक व राजकीय वातावरणात डॉ. जयंत नारळीकर यांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवड करणे व नंदा खरे यांना अकादमीचे पुरस्कार मिळणे, या गोष्टी अपवादात्मकरित्या घडलेल्या घटना म्हणून नोंद कराव्या लागतील. त्यामुळे या उत्साहवर्धक घटना खरोखरच कौतुकास्पद ठरत आहेत.

जयंत नारळीकरांसारखे नंदा खरे हे ‘अंनिस’च्या चळवळीशी जोडलेले नसले तरी ‘आजचा सुधारक’ या पुरोगामी मासिकाची धुरा ते दीर्घ काळ वाहत होते, हे वार्तापत्राच्या वाचकांना स्मरत असेल. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, एकही जाहिरात नसलेले व गुणवत्तेशी कधीच तडजोड न करणारे व 25 वर्षांपेक्षा जास्त काळ चाललेले मासिक म्हणून त्याची ख्याती होती. या मासिकाने अनेक विचारवंतांना घडविले, अनेक वाचकांना लिहिते केले व वैचारिक विषयातील वैविध्यतेची जपणूक केली. त्यांच्या या यशात नंदा खरे यांचा फार मोठा वाटा आहे.

नंदा खरे यांची पुस्तकं अत्यंत वेगळ्या प्रकारची असतात व त्या पुस्तकांत कुठल्याही प्रकारचे मनोरंजन, स्वप्नरंजन वा स्मृतिरंजन हा प्रकार नसतो, हे त्यांनी लिहिलेल्या ‘बखर अंतकाळाची’, ‘संप्रति’, ‘अंताजीची बखर’, ‘जीवोत्पत्ती आणि नंतर’, ‘नांगारल्याविण भुई’, ‘दगडावर दगड विटेवर विट’, ‘वीसशे पन्नास’, ‘बखर अनंतकाळची’, ‘वाचताना पाहताना जगताना’, ‘ज्ञाताच्या कुंपणावरून’, ‘कहाणी मानवप्राण्याची’ व ‘उद्या’ ही पुस्तकं वाचताना नक्कीच लक्षात येईल. इतिहासकालीन प्रसंगांचा खुबीने वापर करून आपल्या ताटात पुढे काय वाढून ठेवले आहे, याची सतत आठवण करून देत भविष्यवेध घेण्याच्या प्रयत्नात लेखक असतात.

साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेल्या ‘उद्या’ या पुस्तकाचा आशयसुद्धा तंत्रज्ञानाच्या पूर्ण आहारी गेलेल्या उच्च शिक्षित व काहीही करून ‘मूल्यवृद्धी’ (value addition) वाढवलीच पाहिजे, या हट्टाला पेटल्यागत असणार्‍या समाजाला हलवून जागे करून या विदारक परिस्थितीशरणतेला काही पर्याय सुचविण्याचा प्रयत्न ते करत आहेत. गंमत म्हणजे आपल्यातील शहाणपणाचा वापर करत ही मूल्यवृद्धी – म्हणजेच वैयक्तिक संपत्तीतून ‘कंफर्ट झोन’मध्ये राहण्यासाठीची धडपड – नेहमीच (वैयक्तिक) संपत्तीत भर घालण्यासाठी कुठल्याही थरापर्यंत जाऊन केलेली असते.

कथेचा एक भाग आणि त्याच्या पुढे त्यातल्या संदर्भांच्या अनुषंगाने केलेले विवेचन, चिंतन, स्पष्टीकरण अशी या पुस्तकाची रचना असल्यामुळे प्रस्थापित साहित्यप्रकारांशी ती फारकत घेणारी ठरेल. इतर वाचकप्रिय, चाकोरीबद्ध कथा-कादंबर्‍यांसारखे ‘उद्या’ ही कादंबरी नाही. मुख्य कथानक, त्याला जोडलेले इतर उपकथानक व अधून-मधून लेखकाला सुचलेले विचार या अंगाने पुस्तकाचे कथानक पुढे-पुढे सरकत जाते. कादंबरीचा पट भरपूर मोठा असून नक्षलग्रस्त आदिवासी पाड्यापासून मुंबई, दिल्ली, हैदराबाद, विदर्भ, इंग्लंड, अमेरिका आदींपर्यंत त्याची पोच आहे. कथानकातील पात्रंसुद्धा गडचिरोली-चंद्रपूरच्या अरण्यातील शांत जीवन जगू इच्छिणारे चार गावचे आदिवासी व त्यांना मदत करणारे उच्चशिक्षित, मुंबईसारख्या महानगरात राहण्याचा व स्वतःची आयडेंटिटी (व आयडेंटिटी कार्ड) हरवल्यामुळे वैतागलेला व त्यासाठी गुंडांचीच भरती असलेल्या पक्षाला मदत करणारा संवेदनशील, सुशिक्षित निवेदक सुदीप जोशी, ‘फेस-रिकग्निशन’च्या तंत्रज्ञानाद्वारे समोरचा माणूस काय विचार करत असावा, याचा नेमका अंदाज बांधणारा अरुण सन्मार्गी व त्याची पत्नी अनू, कॉर्पोरेट जगातील अतिरथी-महारथी आदींची गर्दी असलेली ही एक कादंबरी आहे.

परंतु या छोट्या-मोठ्या पात्रांव्यतिरिक्त नजीकच्या भविष्यकाळातलं एक मोठं, वैश्विक पातळीवरचं कॉर्पोरेट व ते पसरत असलेल जाळं हे या कादंबरीचं मुख्य पात्र आहे, हे पुस्तक वाचताना जाणवते. या जाळ्यात जितक्या तांत्रिक सुखसोयी उपलब्ध आहेत, तितकंच ऑडिओ-व्हिज्युअल तंत्र वापरून लोकांवर पाळत ठेवली जात आहे. प्रचंड सर्व्हेलन्स आहे. सर्वत्र कॅमेरे आहेत, चेहर्‍यांवरचे बारीक हावभाव ओळखण्याचे सॉफ्टवेअर आहेत. आधार कार्डसारख्या ‘अस्तित्व कार्डा’च्या भोवती जीवनाचं, अस्तित्वाचं प्रचंड केंद्रिकरण, एकीकरण झालं आहे. जीवनातला खासगीपणा नष्ट केला जात आहे, त्याचा अवकाश संकुचित केला जात आहे व त्याबद्दल कुणालाही ‘ब्र’ शब्द उच्चारावासा वाटत नाही, उच्चारण्याचे धाडस होत नाही, हीच तर खरी शोकांतिका आहे. एकमेकांशी केलेले संवाद, संभाषण, सुख-दुखाची लेन-देन आणि एकूण सर्व व्यवहार हे सगळं सीसीटीव्हीच्या समोरच करावं लागतं. त्यामुळे प्रत्येकाचा वावर हा कायमचाच एका अव्यक्त अशा दहशतीखाली होत असतो. मग ते चुकवायचे कसे, त्यापासून लपायचे कसे, याचे आडाखे बांधले जातात. साहजिकच, उच्च अधिकारी व श्रीमंतांसाठी ‘कॅमेरा-फ्री, इंटरनेट-फ्री’ ठिकाणं मिळवणे, हे ‘एलिट’पणाचं व एकमेकांना सांभाळून घेण्याचं एक नवीन लक्षण होऊन बसलेलं आहे. सर्व्हेलन्सचे उल्लेख दैनंदिन जीवनात किती मुरलंय, याचं वर्णन कादंबरीत अनेक ठिकाणी आले आहे.

राज्यव्यवस्था आणि भांडवलदारांची म्हणावी तर स्वतंत्र वर्तुळं आणि उतरंडी आहेत; पण त्यांच्यातली रेषा धूसर आहे. लोकशाही तत्त्वाला धरून एकमेकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार केलेल्या पदांवर एकाच छोट्या, सत्ताधारी वर्तुळातली तीच- तीच माणसं आलटून-पालटून बसतात. ‘चेक्स अ‍ॅन्ड बॅलन्स’च्या नियंत्रणप्रक्रियेला ते निरर्थक ठरवतात. राजकारण्यांची सत्ता कुठे संपते आणि कॉर्पोरेशनची कुठे सुरू होते, हे सांगणं अशक्य होत आहे. तीच परिस्थिती कायदा-सुव्यवस्था आणि सर्व्हेलन्समधली होत आहे. आम जनतेला पोलिसांकडून संरक्षण कमी आणि तिच्यावर पाळत ठेवणं जास्त. जार्ज ऑर्वेलच्या ‘1984’ या कादंबरीची आठवण करून देणारी संपूर्ण व्यवस्थाच मुळात समाजाच्या वरच्या थरातील एक टक्क्यासाठी राबवली जात आहे, म्हणूनच समाज चालवण्यासाठीचे सर्व नियम, कायदे, कानून त्या ‘क्रिमीलेअर’साठी असतात. काही वेळा त्यांच्या-त्यांच्यातील विकोप वाढल्यास बंडखोरी, युद्धं होतात व सामान्य मात्र होरपळून जातात, म्हणूनच ‘नोबेल’ पुरस्कृत स्टिग्लित्झ व अमर्त्य सेन वगैरे अर्थशास्त्रज्ञ, बलवान लोक आपले मत इतरांवर लादण्यासाठी जे-जे काही केले जात असते, त्याचा गोषवारा एका वाक्यात – एक टक्क्याचे, एक टक्क्याने घडवलेले, एक टक्क्यासाठीचे (Of the 1%, by the 1%, for the 1%) अशा प्रकारे – देतात.

‘झपाट्याने वाढत असलेले नागरीकरण, बहुराष्ट्रीय कंपन्यांची जगावरची वाढती अनिर्बंध सत्ता, आपल्या खासगीपणाचे सतत होत असलेले आकुंचन, नैसर्गिक स्रोतांच्या हावेपोटी आणि त्यांच्या वाटपातल्या असमानतेपोटी होणारे संघर्ष, समता-मैत्र-अभिव्यक्ती-संवेदनशीलता या मानवी मूल्यांना पायदळी तुडवत केवळ आर्थिक मूल्यवृद्धीकडे धावत असलेला समाज आणि त्यातून येणारे वैफल्य-नैराश्य, ‘विकास’ करण्याच्या प्रलोभनातून होत असलेले संपत्तीचे आणि अधिकारांचे कमाल केंद्रिकरण, अजस्र कंपन्याचे मिंधे असलेले शास्त्रज्ञ-विचारवंत-कलाकार, कमालीचा कोरडा-विमनस्क-बोथट झालेला सामान्य माणूस, असे हे उद्याचे चित्र आहे,

अनेकांना निराशावादी, भयाण वाटू शकते; पण यातली चिंताजनक गोष्ट अशी आहे की, अनेक बाबतीत हे सध्याच्या समाजाचेच काहीसे यथार्थ चित्र आहे. हळूहळू तापणार्‍या पाण्यातल्या बेडकाप्रमाणे आपण त्याचे गांभीर्य दृष्टिआड करतो आहोत काय, असा प्रश्न लेखक उपस्थित करतात. हे अजिबात अवास्तवाकडे झुकणारे, काळेकुट्ट भविष्यवाणी करणारे चित्रण नाही, हे थोडेसे विचार केल्यास जाणवू लागते. कारण त्यातल्या महत्त्वपूर्ण बदलांची सुरुवात आज झालेलीच आहे आणि मानवजातीने आपल्या वागणुकीत काही विशेष फरक न केल्यास हे चित्र सत्य ठरण्याच्या शक्यता अतिशय दाट आहेत, अशी धोक्याची घंटा लेखक वाजवत आहेत.

लेखक एके ठिकाणी पुरुष-स्त्री या गुणोत्तराबद्दल भाष्य करत आहेत. हे गुणोत्तर वाढत गेल्यास नेमके काय होऊ शकेल, याचा अंदाज ते वर्तवत आहेत. या विषमतेकडे जात असलेल्या जीवनपद्धतीच्या भयाण स्वरुपाचे वर्णन ते मार्मिकपणे करत आहेत. तरुण मुलींचं ‘हंटिंग’ होत आहे. स्त्रियांचं प्रमाण बरंच घटलेलं आहे आणि ठिकठिकाणी श्रीमंतांना बायका-सुना-वेश्या म्हणून मुली पुरवण्यासाठी अनेक राजकीय दलं आणि अधिकारी गुंतलेले आहेत. वस्तू विकल्याप्रमाणे स्त्रियांची विक्री होत आहे व त्यास प्रशासन, कॉर्पोरेट्स साथ देत आहेत. (कदाचित सुदीप जोशी या पात्राची भाचीसुद्धा ‘हंटिंग’ची बळी ठरलेली असेल!)

पण सिस्टिमवर ‘भरोसा’ ठेवल्याशिवाय गत्यंतरही नाही, त्याशिवाय ‘विकास’ होणारच नाही, असा कन्सेन्सस आहे. आणि म्हणूनच, या विश्वातल्या सर्वांत मोठ्या कंपन्यांची नावं ‘भरोसा’ आणि ‘विकास’ अशी आहेत. वरील व्यापक चित्र विलक्षण जिवंत पात्रांतून उभं राहिलं आहे व या कॉर्पोरेट्सचे जाळे दूरपर्यंत पोचत आहे. वेगवेगळ्या प्रकरणांतून निरनिराळ्या पातळ्यांवर, खेड्यांपासून महानगरांपर्यंत, सगळेच समाजातले घटक या जाळ्यात कसे अडकले आहेत, हे लेखकांनी कमालीच्या तपशिलात मांडलं आहे; किंबहुना त्या जाळ्याचं सर्वत्र प्रचंड आकर्षण आहे, शालेय शिक्षणापासून नोकरीपर्यंत मूल्यवृद्धीच्या मोहातून हे जाळंच आपलं ध्येय आहे, असं मुला-मुलींवर ठासवलं जात आहे. या पुस्तकात टिपलेली सामाजिक वर्तुळं, त्यांच्यातील व्यक्तिसंबंध आणि वातावरण, दैनंदिन जीवनाच्या छोट्या-छोट्या बाबी लेखकांच्या बारीक निरीक्षणक्षमतेच्या द्योतक आहेत. यातील काही प्रसंग स्वतंत्र पुस्तक होण्याइतपत भरगच्च भरलेले आहेत. खरे पाहता ‘अंताजीची बखर’, ‘बखर अनंतकाळची’ व ‘उद्या’ ही तिन्ही पुस्तकं एकमेकांशी पूरक आहेत, असे जाणवते.

‘उद्या’च्या चित्रणामध्ये सरकारी निर्णयप्रक्रिया आणि ‘सप्लाय ऑफ पब्लिक गुड्स’ यावर मोठ्या-मोठ्या कॉर्पोरेशन ताबा मिळवतील, मानवी मानसिकता जाणण्याच्या संशोधनात अचूकता येईल, ही अचूकता, बलाढ्य भांडवल आणि माणसाच्या जगण्याच्या प्रत्येक क्षणाला टिपणार्‍या सर्व्हेलन्स यंत्रणेमुळे जगण्याला एका साच्यात ठेवले जाईल; म्हटलं तर लोकांच्या स्वतःच्या निवडीनं आणि म्हटलं तर बाकीचे सारे दरवाजे अप्रत्यक्षरित्या रोखून लोकांना कोंडलं जाईल.

परंतु या सर्व हलाखीच्या परिस्थितीतसुद्धा मार्ग काढणारे आहेत, याचेही अंधुक असे चित्रण लेखकाने केलेले आहे. चारगावचा हा प्रकल्प आज जरी कॉर्पोरोट व राजकीय उद्दामपणामुळे उद्ध्वस्त झालेला असला तरी उद्याच्या पिढीला मार्ग दाखवणारा आहे. चारगावात काही मंडळी आधुनिक जीवनाच्या काही सोयी आणि विज्ञान आत्मसात करूनही सहभागी तत्त्व, शेती आणि शारीरिक श्रमांवर आधारित स्वायत्त जीवन जगायचा प्रामाणिक प्रयत्न करतात. काही जण या प्रकरणाला विलक्षण रोमँटिक म्हणून हिणवतील; पण त्याचं आकर्षणच त्याच्या आशावादात, त्याच्या शक्यतेच्या दाव्यात आहे, तरीसुद्धा वाचक अस्वस्थ होतो.

अस्वस्थ होण्याचं मुख्य कारण असं की, चारगावकरांच्या बाहेरच्या जगाशी होणार्‍या दैनंदिन, किरकोळ अथवा मध्यमस्तरीय संघर्षाची कल्पना येत नाही. बाहेर शिकायला गेलेल्या मुलांनी परत न येणं, त्यावरून उठणारे वादविवाद, तंटे, जंगलातल्या जीवनाला उद्भवणारे धोके यांचा धावता उल्लेख आहे. मग लगेच थेट ‘मोन्सागिल’सारख्या जागतिक बायोटेक कंपनीशी झालेल्या संघर्षाकडे, आणि मग राज्यव्यवस्थेने ‘कम्युन’वर केलेल्या ‘ऑपरेशन’कडे झेप घेतल्यासारखं होतं. मोन्सागिल कंपनी स्थानिक प्रजातींच्या बियाणांच्या शोधात आहे, तर ‘भरोसा कॉर्प’ला तिथल्या जमिनीखालची खनिजं हवी आहेत. चारगावच्या स्वायत्ततेला त्यामुळे मूलभूत धोका आहे आणि अपेक्षित तेच होतं.

चारगावसारख्या असंख्य ग्रामीण समूहांना कमी-जास्त प्रमाणात आज सुप्त आणि सतत शहरीकरणाची ओढ असते. इंग्रजी शिक्षण हवं; मग शेती नकोशी किंवा कमीपणाची वाटणं, त्यात नफा न दिसणं, मग गाव लहान वाटणं, पुरेशा संधी नाहीत म्हणून निमशहरांत, मग मोठ्या शहरांत स्थलांतर, मग मुलांना संधी हव्यात म्हणून शहरातच राहणं. वर भारतात हवा तसा अभ्यासक्रम आणि साजेशी नोकरी नाही, म्हणून पश्चिमेकडे स्थलांतर वगैरे आहेच.

या जोरदार एकमार्गी प्रवाहाविरुद्ध चारगाव उभं आहे; प्रत्येक क्षणी त्याच्या जोराचा सामना ते कसं करतं? तिथे इलेक्ट्रॉनिक्स बनवण्यासाठी मूल्यवान खनिजं सापडली नसती, जर ‘भरोसा’चं तिथे लक्ष गेलं नसतं, तर चारगाव तसंच कितपत टिकलं असतं? मानवी समाजाच्या परिवर्तनचक्राला चारगावकरांनी कसं तोंड दिलं असतं? अशा समूहांना टिकवायला फक्त समविचारी लोक हवेत की व्यवस्थेत काही बदल हवा? असे अनेक प्रश्न यासंबंधी विचारता येऊ शकतात.

जागतिक पातळीवर झपाट्याने होत असलेल्या सामाजिक, तांत्रिक, आर्थिक बदलांबद्दल लेखकाला फार नाराजी आहे. हताश अवस्थेला पोचलेल्या या निद्रिस्त समाजाला उद्या काय-काय घडण्याची शक्यता आहे, याबद्दलचे एक दृश्यमान चित्र लेखक आपल्या डोळ्यांसमोर येथे उभे करत आहेत. त्यांनी सुचविलेले पर्याय काहींना ‘यूटोपिया’सारखे बालिश, रोमँटिक, अशक्यप्रायही वाटण्याची शक्यता आहे. परंतु करून पाहायला काय हरकत आहे, अशा निष्कर्षाप्रत येण्याची शक्यता नाकारता येत नाही कादंबरीत रेखाटलेल्या व्यापक चित्राबद्दल, त्यातील शक्यतांबद्दल सुचलेल्या व नोंदविलेल्या प्रश्नांकडे गंभीरपणे विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असे म्हणण्यास पुरेपूर वाव आहे.

एक अस्वस्थ करणारे कथानक वाचकांपर्यंत पोचविल्याबद्दल लेखकांचे धन्यवाद व अशा लेखकाची (व या पुस्तकाची) योग्य कदर केल्याबद्दल साहित्य अकादमीलासुद्धा धन्यवाद दिले पाहिजेत. (अपेक्षेप्रमाणे पुरस्कार स्वीकारू शकत नाही, हे लेखकाचे नम्रपणे केलेले निवेदन बरेच काही सांगून जाते!)

पुस्तकाचे नाव : उद्या
लेखिका : नंदा खरे
प्रकाशन : मनोविकास प्रकाशन, पुणे
किंमत : 300 रु, पृ.सं. 288


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]