उल्हासनगर येथे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कवितांचा गजर

प्रवीण देशमुख -

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे जिल्ह्याच्या वतीने ‘काव्यविवेक’ या अंधश्रद्धा विषयावरील कवितेच्या पुस्तकाचे प्रकाशन आणि यात सहभागी झालेल्या कवींच्या कवितांचे काव्य संमेलन उल्हासनगर येथील एस. आर. अभंग मेमोरिअल कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात पार पडले.

जनजागृतीच्या विचाराने प्रेरित होऊन अंधश्रद्धा या एका विषयावर संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक कवींना लिहिण्यास उद्युक्त करणे व त्यांना या माध्यमातून चळवळीशी जोडून घेणे, हा या काव्यसंमेलनाच्या आयोजनामागचा उद्देश असल्याचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक वानखडे यांनी आपल्या मनोगतात मांडले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य प्रा. प्रवीण देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हे काव्य संमेलन व प्रकाशन सोहळा पार पडला. लेखक, समीक्षक व चित्रपट कलावंत सुधीर वसईकर व ख्यातनाम रंगकर्मी सुधाकर चित्ते, महाराष्ट्र साहित्य परिषद उल्हासनगर शाखेचे प्रल्हाद कोलते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र, ट्रस्टचे विश्वस्त गणेश चिंचोले आवर्जून उपस्थित होते. कवी आणि शायर असलेले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष श्री. अशोक वानखडे यांच्या कल्पनेतून साकारलेला हा कार्यक्रम नियमितपणे राबविला गेला, तर अनेक नवनवीन प्रेरणादायी प्रबोधनात्मक कविता, गाणी चळवळीला मिळतील. त्याचबरोबर कविमनाचे अनेक पुरोगामी साथी चळवळीशी जोडले जातील, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त करून या उपक्रमाचे कौतुक केले.

संपूर्ण महाराष्ट्रातून ७५ कवींनी या कार्यक्रमामध्ये अंधश्रद्धा या विषयावर कविता लिहून सहभाग नोंदवला. त्यातील २२ पेक्षा जास्त कवी कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजर होते. यामध्ये ठाणे आणि मुंबई जिल्ह्यातील कवी तर होतेच; त्याचबरोबर रायगड, चाळीसगाव, नांदेड आणि पुणे येथून काही कवी केवळ या कार्यक्रमासाठी आले होते, हेच या कार्यक्रमाचे यश म्हणता येईल.

उपस्थित असलेल्या सर्वच कवींना त्यांची कविता सादर करण्याची संधी मिळाली. असे कवितेला समर्पित असलेले कवी ‘अंनिस’च्या चळवळीशी जोडले गेले, तर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार आणखी मोठ्या जोमाने होईल, ही बाब या कार्यक्रमाच्या माध्यमातून ठळकपणे अधोरेखित झाली.

सर्वच कवींना या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे जिल्ह्याच्या वतीने प्रमाणपत्र देऊन, तर उत्कृष्ट ठरलेल्या तीन कवितांच्या कवींना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व पुरोगामी विचारांच्या पुस्तकांचा संच उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या, मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उल्हासनगर शाखेचे सचिव बबन सोनवणे सर, कार्याध्यक्ष बबन नागले सर, अध्यक्षा मायाताई डोळस यांनी खूप मेहनत घेतली.

ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. किसन वराडे सर, राज्य विभाग सदस्य श्री. राजू कोळी, ख्यातनाम शाहीर आकाश पवार यांची चांगली साथ लाभली.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनेकांनी आपापल्या भूमिका योग्य पद्धतीने पार पाडल्या. यामध्येे डोंबिवली शाखेचे कार्याध्यक्ष उदय देशमुख सर, संध्या देशमुख, बदलापूर शाखेचे प्रदीप बर्जे, तसेच श्री. अशोक वानखडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहकुटुंब सहभागी झाले होते.

‘माणूस मारता येतो, विचार मारता येत नाहीत’ या विषयावर आधारित श्री. उदय देशमुख यांनी रेखाटलेल्या शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्यासह अनेक समाजसुधारकांच्या चित्रांचे चित्र- प्रदर्शन या संमेलनाच्या निमित्ताने भरविण्यात आले होते.

८० पेक्षा जास्त सामाजिक कार्यकर्त्यांनी व काव्य रसिकांनी या संमेलनाला प्रतिसाद दिला. प्रबोधनपर भाषणांबरोबरच, कविता ही समाज प्रबोधनाची अतिशय सशक्त माध्यम ठरू शकते, अशा भावना सर्वच सहभागी साथींनी व्यक्त केल्या.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]