क्रांतिवीर

गणेश कांता प्रल्हाद - 9923807980

सातवीच्या वर्गातली मुक्ता. शाळेत सुंदर भाषण करायची. तिचे भाषण सर्वांना आवडायचे. मुक्ताचे वडील आर्मीत सैनिक होते. ते कारगिलचे युद्ध लढले होते. सगळे अभिमानाने त्यांना ‘कारगिल काका’ म्हणायचे. कॉलनीत सगळे कारगिल काकांचा खूप आदर करायचे. मुक्ताच्या घरासमोर छोटेसे खेळाचे मैदान होते. कारगिल काकाने याला ‘क्रांती मैदान’ असे नाव दिले होते. मैदानात छोटे स्टेज होते. इथे कारगिल काकांनी क्रांतिवीरांचे फोटो लावले होते. विकास, प्रकाश आणि आझाद हे मुक्ताचे बेस्ट फ्रेंड. रोज सायंकाळी इथे जमायचे. गप्पा मारायचे. खेळायचे.

आज 26 जानेवारी. गणराज्य दिन. शाळेत सर्व विद्यार्थी जमले. प्रभात फेरी झाली. झेंडावंदन झाले. कवायती झाल्या. सांस्कृतिक कार्यक्रम झाले. विद्यार्थ्यांची भाषणे सुरू झाली.

मुक्ता भाषणाला उभी राहिली. सगळे एकाग्रतेने ऐकू लागले. मुक्ता बोलत होती….

“क्रांतिवीरांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. अनेक चळवळी झाल्या, आंदोलने झाली, मोर्चे निघाले, लढाया झाल्या. क्रांतिवीरांनी बलिदान दिले. त्यामुळे भारत देश स्वतंत्र झाला. हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी संविधानाने आपल्याला दिली आहे. राष्ट्रध्वजाचा आपण सन्मान केला पाहिजे. राष्ट्रध्वज, तिरंगा झेंड्याचे पावित्र्य राखणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यासाठी कटिबद्ध असणे ही आजची क्रांती आहे. समाजात झालेला कोणताही आमूलाग्र बदल म्हणजे क्रांती! चांगल्या बदलासाठी सर्वांनी झटले पाहिजे, तरच क्रांती होईल!”

मुक्ता आवेगाने बोलत होती. मध्ये-मध्ये शेर, कविता ऐकल्यानंतर जोरजोरात टाळ्या वाजत होत्या. मुक्ताच्या भाषणाचे सर्वांनी कौतुक केले. कारगिल काकांना खूप अभिमान वाटला.

मुक्ता वडिलांसोबत शाळेतून घरी निघाली. तिच्या डोक्यात अजूनही भाषणच घुमत होते. मोटारसायकल सिग्नलवर थांबली. बाजूला एक माणूस तिरंगा झेंडे विकत होता. छोट्या-मोठ्या आकाराचे प्लास्टिकचे झेंडे होते. एका आईने छोटा तिरंगा कडेवरच्या बाळाच्या हातात दिला. बाळ कौतुकाने झेंड्यासोबत खेळू लागले. बाळाने दोन्ही हातांनी ओढून झेंडा फाडला. झेंडा रस्त्यावर पडला. घाईघाईत आई पुढे निघून गेली. कुणाच्याही लक्षात आले नाही. लोक घाईत झेंड्यावर पाय देऊन जात होते. मुक्ताने वडिलांना गाडी बाजूला घ्यायला सांगितली. मुक्ताने रस्त्यावर पडलेला झेंडा उचलून घेतला. कारगिल काकाने बघितले. मुक्ताला ‘जय हिंद’ बोलून कडक सॅल्युट मारला. मुक्ताला खूपच आनंद झाला.

सायंकाळी कॉलनीतल्या क्रांती मैदानावर मुक्ता आणि तिचे मित्र जमले. मुक्ताने सिग्नलवर घडलेला प्रकार सांगितला.

मुक्ता पुढे म्हणाली, “माझ्या डोक्यात एक आयडिया आहे!”

प्रकाश, विकास आणि आझादच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह होते.

मुक्ता बोलू लागली, “आज मी भाषणात सांगितले नाही का, राष्ट्रध्वजाचा सन्मान केला पाहिजे… आणि…”

तिचे बोलणे थांबवत आझाद म्हणाला,

“…आणि राष्ट्रध्वज तिरंगा झेंड्याचे पावित्र्य राखणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे!”

“…बघ, तुझं भाषण ऐकून ऐकून आमचंही पाठ झालं!”

सगळ्यात एकच हशा पिकला.

मुक्ता सांगत होती, “आज सकाळी सर्व शाळांच्या प्रभातफेर्‍या निघाल्या. कुणाच्या हातातला झेंडा घाईत रस्त्यावर पडला असेल. लोक नकळत त्यावरून गाड्या चालवतील…”

“अरे हो, खरंच की…” विकास म्हणाला.

“आज प्रभातफेरीत माझ्या हातातला झेंडा घाईत निसटला. तेवढ्यात मागच्याने जोरात पुढे ढकलले. मला झेंडा उचलायला वेळच मिळाला नाही.”

“हो ना!” प्रकाशच्या डोक्यात ट्यूब पेटली.

काही लोक गाड्यांना पुढे झेंडे बांधतात. ते हवेने निघून रस्त्यावर पडतात. लोक गाडीवर वेगात निघून जातात.

आझाद त्याचा अनुभव सांगू लागला…

“क्रांती चौकात अनेक संघटना स्वातंत्र्य दिनी, गणतंत्र दिनी रॅली काढतात. रॅली संपल्यावर लोक निघून जातात. चौकात झेंडे तसेच पडून असतात.”

मुक्ता पुढे बोलू लागली… “तर आयडिया अशी आहे. उद्या रविवार आहे. शाळेला सुट्टी आहे. आपण सकाळी लवकर सायकलीवर निघू. शाळेपासून सुरुवात करू. पुढे प्रभातफेरी मार्गाने जाऊ. रस्त्यावर पडलेले तिरंगा झेंडे गोळा करू.”

शेवटी आझाद म्हणतो, “त्या क्रांती चौकात जाऊ. तिथले झेंडे गोळा करून या मोहिमेचा समारोप करू.” सर्वांनी मोहिमेला होकार दिला. आझादने पिशवी आणायचे ठरले.

सकाळी सायकलवर स्वारी निघाली. सर्वांत आधी शाळा गाठली, पुढे प्रभातफेरी मार्ग. झेंडे गोळा करत स्वारी क्रांती चौकात आली. ‘क्रांती चौक’ शहरातला सर्वांत मोठा चौक. खूप मोठा गोलाकार परिसर. चौकात बरेच झेंडे पडलेले होते. सायकली स्टँडवर लावल्या. झेंडे गोळा करायला सुरुवात केली. एक अंकल तिथे आले. जाडजूड काळा चष्मा. पांढरी दाढी. अंगावर खादीचा कोट. असा त्यांचा भारदस्त ‘लूक.’

अंकलनी विचारले, “इथे काय गोळा करताय तुम्ही?”

मुक्ताने सगळा वृत्तांत सविस्तर सांगितला. अंकल खूप खूष झाले. त्यांनी सगळ्यांची नावे विचारली. इयत्ता विचारली. शाळेचे नाव विचारले. पिशवीत गोळा केलेले झेंडे पाहिले. सर्वांना सायकलीसमोर उभे केले. समोर तिरंगा झेंड्यांनी भरलेली पिशवी ठेवून सुंदर फोटो काढला. सर्वांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. सगळ्यांना खूप आनंद झाला.

सर्वजण घरी आले. गोळा केलेले तिरंगा झेंडे बघून कारगिल काकांना खूप आनंद झाला.

आझाद कारगिल काकांना म्हणाला, “आम्हाला हे सर्व झेंडे अशा ठिकाणी न्यायचे आहेत, जिथे काल झेंडावंदनाच्या दिवशी तिरंगा झेंडा फडकलाच नाही.”

कारगिल काकांनी विचार केला. मुलांना गाडीत बसवले. शहरापासून काही किलोमीटर अंतरावर एका आदिवासी तांड्यावर गेले. पंचवीस-तीस घरांची वस्ती होती. जुन्या पध्दतीची लाकडी बांबूची झोपडीवजा घरे होती. गाडी बघताच छोटी-मोठी मुलं धावतच आली. कारगिल काकांनी मुलांना खाऊ वाटला. प्रत्येकाच्या हातात तिरंगा झेंडा दिला. मुले कौतुकाने हातात झेंडा घेऊन पळत होती. कारगिल काकांनी एका झोपडीच्या उंच बांबूला तिरंगा झेंडा बांधला. मुक्ता, आझाद, विकास आणि प्रकाश यांनी मुलांच्या मदतीने झोपडीवर झेंडे बांधले. तिरंगा झेंडे हवेने खूप छान फडकत होते.

एका झोपडीतून म्हातारी आजीबाई बाहेर आली. तिने या मुलांना विचारले, “ही कशाची पताका आहे?”

मुलांनी सांगितले… “हा आपल्या देशाचा ध्वज आहे.”

म्हातार्‍या आजीबाईंने तिरंगाध्वज कधीच पाहिला नव्हता. आदिवासी तांड्याच्या बाहेर तिने कधी पाय ठेवला नव्हता. देशाचा तिरंगा ध्वज तिला कसा माहीत असणार? कारण या आदिवासी तांड्यावर ना वीज, ना टीव्ही…ना शाळा…!

मुलांसोबत आजीनेही तिरंगा ध्वजाला हात जोडले. हे पाहून सर्व मुले खूप खूष झाली. आज पहिल्यांदाच आदिवासी तांडा तिरंगा झेंड्याने उजळून निघाला होता.

सोमवारी शाळा भरली. प्रार्थना झाली. पी.टी.च्या शिक्षकांनी माईकमध्ये सूचना केली. मुक्ता, विकास, प्रकाश आणि आझाद या चौघांना समोर बोलावले. कुणाला काहीच कळेना. सगळ्यांच्या चेहर्‍यावर गोंधळलेले भाव होते.

मुख्याध्यापक मॅडम बोलू लागल्या…

“आज आपण या चौघांचा सत्कार करणार आहोत. यांनी काल खूप मोठी कामगिरी बजावली आहे. आज वर्तमानपत्रात ही कामगिरी फोटोसह छापून आली आहे. आपल्या शाळेचे नाव यांनी मोठे केले आहे.”

तरीही नेमके काय झाले कुणाला काहीच कळेना! बातमी छापून आलेला पेपर मॅडमनी चौघांना दाखवला. बातमीतला फोटो चौघांनी बघितला. हा फोटो तर काल क्रांती चौकात भेटलेल्या अंकलनी काढलेला होता. ते अंकल पत्रकार होते. त्यांनी बातमी छापली होती. चौघांच्या लक्षात आले.

मुख्यध्यापक मॅडम म्हणाल्या, “यांची कामगिरी मी सांगण्यापेक्षा आपण मुक्ताच्या तोंडूनच ऐकूया!”

मुक्ताने माईकवर सर्वांना सविस्तर वृत्तांत सांगितला. चौघांचाही पुस्तकं भेट देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापक मॅडमनी गौरवोद्गार काढले… “मुक्ता, विकास, प्रकाश आणि आझादने स्वयंप्रेरणेने हे कार्य केले. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला, पावित्र्य राखले. कुठल्याही अपेक्षाविना देशकार्य करणारे हे चौघे आपल्या शाळेचे छोटे ‘क्रांतिवीर’ आहेत!”

सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून या छोट्या क्रांतिवीरांचे अभिनंदन केले!

गणेश कांता प्रल्हाद.

प्लॉट नं: आर.एक्स.-17, सरस्वती हाऊसिंग सोसायटी, गणपती मंदिराजवळ,त्रिमूर्ती चौक, (वाळूज एम.आय.डी.सी.), बजाजनगर, औरंगाबाद – 431136

Email : ghule.ganesh18@gmail.com

मो.9923807980


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]