मोहसिन शेख -
दि. ९ जानेवारी २०२३ पुसेगाव येथे पारधी समाजाकडून जातपंचायत बसणार आहे याची बातमी काल रात्री उशिरा समजली. मग आज दुपारी बारा वाजले पासून जातपंचायत बरखास्त करायचे आणि संबंधित पंचायतीतील प्रमुख पंचांवर कार्यवाही करायची मोहीम सुरू झाली.
बारा वाजता जेव्हा आम्ही पुसेगावमध्ये पोचलो, तेव्हा सर्वप्रथम पुसेगाव पोलीस स्टेशनला जाऊन संबंधित प्रकार घडणार आहे याची खबर दिली. तद्नंतर आम्ही ज्या ठिकाणी पंचायत भरली त्या ठिकाणी हजर राहिलो आणि त्याचे पुरावे गोळा केले. जातपंचायत जेव्हा बसली त्या वेळेस फिर्याददार माधुरी धनु भोसले यांच्या परिवाराकडे सुमारे १ लाख ८० हजार रुपयांची मागणी पंचायतीमार्फत करण्यात आली होती, माधुरी भोसले यांचे कुटुंब सदर रक्कम भरण्यास सक्षम नसल्याने त्यांनी जातपंचायतीमध्ये ‘आम्ही ही रक्कम भरणार नाही’, असे सांगितले. हे ऐकताच त्या पंचायतीतील लोकांनी माधुरी भोसले आणि त्यांच्या मुलावर धारदार चाकूने वार केले. सदर घटनेचा पाठपुरावा करून पुराव्यासहित आम्ही पुसेगाव पोलीस स्टेशनला हजर राहून गुन्हा दाखल केला. पारधी समाजात जातपंचायतीला अजूनही खूप महत्त्व दिले जाते आणि याचे पालन ते काटेकोरपणे करत असतात, पण आजच्या आपण केलेल्या कार्यामुळे नक्कीच या अशा घडणार्या दुष्कृत्यांवर निर्बंध लागतील, अशी आशा माधुरी भोसले यांनी व्यक्त केली.
आजच्या पारधी समाजाच्या जातपंचायत येथील अत्याचार झालेले भोसले कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोलकर, शंकर कणसे, मोहसीन शेख, प्रशांत जाधव यांच्या प्रयत्नांमुळे हा गुन्हा दाखल झाला. पुसेगाव पोलीस स्टेशनचे एपीआय संदीप शितोळे, पोलीस नाईक गीता काटकर, पोलीस नाईक अश्विनी नलवडे, पोलीस नाईक विजय खाडे यांनी भरपूर सहकार्य केले तसेच पोलीस नाईक सचिन जगताप यांचे विशेष सहकार्य लाभले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांमुळे आज नवीन सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा शिकायला मिळाला असेही जगताप म्हणाले आणि त्यांनी आपल्या संघटनेचे आभारही मानले.
– मोहसिन शेख, रहिमतपूर