-
शाखा : वर्धा
मित्रांनो ‘द’ दारूचा नव्हे, तर दुधाचा!
व्यसन करणारा कधीही श्रीमंत बनला नाही, तर तो दरिद्री, गरीब बनून राहिला, तर मद्य विकणारे मात्र श्रीमंत बनले. त्यामुळे कोणीही व्यसन करू नये. यामुळे आर्थिक, सामाजिक, मानसिक, शैक्षणिक नुकसान होऊन अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली, व्यसन हे हानिकारक आहे. त्यामुळे दारू विकत घेऊन पिऊ नका. त्या बदल्यात दूध प्या, पौष्टिक सुका मेवा खा, मुलांना पत्नीला आवश्यक चांगले कपडे घ्या, असे प्रतिपादन वर्धा येथील मेडिकोज लायन्स क्लबचे संस्थाध्यक्ष डॉ. प्रवीण धाकटे यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे दरवर्षी ३१ डिसेंबर हा दिवस व्यसन मुतिदिन म्हणून साजरा करतो. ‘चला व्यसनाला बदनाम करू या’, ‘द दारूचा नव्हे, दुधाचा’ या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन दयालनगर, कामगार चौक येथे नावीन्यपूर्ण उपक्रमातून दूध वाटून करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेडिकोज लायन्स क्लब संस्थाध्यक्ष डॉ. प्रवीण धाकटे, तर प्रमुख अतिथी म्हणून जवादी कामगार संघटनेचे अध्यक्ष महेश दुबे, म. अंनिसचे जिल्हाध्यक्ष नरेंद्रकुमार कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश रंगारी, राजेंद्र बुरबुरे, विलास नागदेवते, तालुका कार्याध्यक्ष शीतल बनसोड, चंद्रप्रभा बुरबरे, जानराव नागमोते, चंद्रप्रकाश बनसोड, अॅड. पूजा जाधव, प्रियदर्शना भेले, अनिल भोंगाडे, जोत्स्ना वासनिक, उषा कांबळे आदींची उपस्थिती होती.
शाखा : पेण
दि. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (शाखा पेण) तर्फे ‘द दारूचा नव्हे, द दुधाचा’ हा उपक्रम नगरपालिका इमारतीसमोर पेण (जि. रायगड) येथे घेण्यात आला.
३१ डिसेंबर रोजी अनेक जण दारूचा पहिला प्याला हातात घेतात आणि नंतर व्यसनाच्या विळख्यात अडकतात. ते टाळण्यासाठी पहिला दारूचा प्याला हातात घेऊ नका, त्या ऐवजी दूध प्या असा संदेश महाराष्ट्र अंनिसतर्फे देण्यात आला. घोषणा देण्यात आल्या. दारूच्या बाटलीच्या पोस्टरला जोडे मारून व्यसनाला बदनाम करा असे आवाहन उपस्थितांना करण्यात आले. तसेच संजय पाटील व राजेंद्र पाटील या शरीरसौष्ठवपटूंनी दारूचे घातक परिणाम याबद्दल उपस्थित सर्वांना माहिती दिली.
अनेकांनी तिथे असलेल्या Alcoholic anonymous ह्या संस्थेशी संपर्क करण्याचा संकल्प केला. या उपक्रमाला येणार्या खर्चासाठी डॉ. सावनी गोडबोले यांनी आर्थिक मदत केली.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पेण शाखेतर्फे संकल्प, संचिता व संदेश गायकवाड, मीना व सनय मोरे, अश्विनी म्हात्रे, प्रा. सतीश पोरे, जगदीश डांगर, एन. जे. पाटील, पांडुरंग घरत, नितीन निकम, आदेश पाटील, चंद्रहास पाटील, सूर्यकांत पाटील, सावनी गोडबोले हे कार्यकर्ते, तसेच लंडनस्थित हितचिंतक मधुरा व अभिजित आगटे उपस्थित होते. यांचं स्वागत सावनी गोडबोले यांनी महा. अंनिसच्या विचारांची पुस्तकांचं सेट देऊन केलं. सावनी गोडबोले यांनी सदर कार्यक्रमाची प्रस्तावना केली, तर अॅड. संकल्प गायकवाड यांनी आभार मानले.
शाखा : पिंपरी चिंचवड
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पिंपरी चिंचवड, देहूगाव व निगडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेली अकरा वर्षे हा उपक्रम शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रेरणेने दरवर्षी ३१ डिसेंबरला पिंपरी चिंचवड परिसरात संपन्न होत असतो. या वर्षी भक्ती-शक्ती उद्यानासमोर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने नागरिकांना मोफत दुधाचे वाटप करून प्रबोधनाची गाणी सादर केली गेली. त्याचप्रमाणे व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी प्रबोधन केले गेले. महिलांनी दारूच्या प्रतीकात्मक बाटलीला जोडे मारून आपला निषेध व्यक्त केला. अनेक नागरिक या उपक्रमात सहभागी झाले होते, अत्यंत स्त्युत्य असा हा उपक्रम असून सर्व स्तरांपर्यंत असे उपक्रम राबवण्याची गरज आहे असे मत अनेकांनी व्यक्त केले. देहूगाव शाखेचे अध्यक्ष भारत विठ्ठलदास यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले.
नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईत प्रचंड उत्साह असतो. मात्र, काही तरुण दारू प्राशन करून धिंगाणा घालतात. यामुळे वादविवाद होऊन वातावरण कलुषित होते, तसेच दारू प्राशन करून वाहन चालविल्याने अपघात घडतात, अशा घटना घडू नये यासाठी दारू नव्हे, तर शरीराला लाभादायी दूध पिऊन नववर्षाचे स्वागत करा. कोणत्याही अमली पदार्थांचे व्यसन वाईटच असते. अलीकडे तरुण पिढी दारूच्या आहारी जाऊन आपले जीवन उद्घाटन करीत असल्याचे मत या ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष सोळंकी सर यांनी व्यक्त केले.
या उपक्रमासाठी राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष श्रीराम नलावडे, पिंपरी चिंचवड शाखेचे विजय सुर्वे, अंजली इंगळे, सुधीर मुरुडकर, सुरेश व सीमा बावनकर, राजू जाधव, रविंद्र व राधिका बोर्लिकर, अशोक जाधव, स्नेहा देशमुख यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. निगडी शाखेचे अध्यक्ष प्रदीप तासगावकर व अभिजित नलावडे यांनी दुधासाठी सहकार्य केले. तीनशेच्या वर सर्व वयोगटातील नागरिकांनी दुधाचा आस्वाद घेतला. या वेळेस परिसरातील स्वछता करण्यात आली.
तसेच वाचकांना वार्षिक अंक देऊन पुढील वर्षाची वार्तापत्र सभासद नोंदणी करण्यात आली. सर्व नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
शाखा : डोंबिवली
नो दारू, नो वाईन; प्या दूध, राहा फाईन
डोंबिवली येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ३१ डिसेंबरच्या सायंकाळी नागरिकांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करताना दारूऐवजी मसाला दुधाचे वाटप करून अनोख्या पद्धतीने २०२३ या सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला. नागरिकांना दारूच्या व्यसनांपासून दूर राहणेबद्दल आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या आयोजनात उदय देशमुख व गणेश चिंचोले यांनी पुढाकार घेतला. डोंबिवली येथील राजाजी पथला रामनगर पोलीस स्टेशन जवळील अवधूत चिंतन सोसायटीतील श्री. सुशील सामंत ह्यांच्या कार्यालयात हा उपक्रम राबविण्यात आला. ह्या कामासाठी सुशील सामंत व रोहित सामंत ह्या उभय सामंत बंधूंचे खूप मोलाचे सहकार्य आम्हास लाभले. महाराष्ट्र अंनिसचे उदय देशमुख, अंनिसचे विश्वस्त गणेश चिंचोले, सुशील सामंत, रोहीत सामंत व मा. नगरसेवक नंदू मालवणकर, अश्विनी आडे व संदीप पवार यांच्यासह इतर समविचारी संघटनांचे अनेक पदाधिकारी यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. सायंकाळी सहा ते रात्री आठपर्यंत शेकडो नागरिकांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिला. सुशील सामंत, रोहित सामंत हे दोघेही बंधू महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व उपक्रमांमध्ये सर्वच प्रकारे मदत करत असतात, याबद्दल गणेश चिंचोले यांनी त्यांचे आभार मानले.
शाखा : गडहिंग्लज
‘चला व्यसनाला बदनाम करू या’ गडहिंग्लज तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समिती व समविचारी संघटनांच्या वतीने ३१ डिसेंबर २०२३ ‘द नाही दारूचा द आहे दुधाचा’ हा उपक्रम राबविण्यात आला. दारूच्या प्रतीकात्मक बाटलीला जोडे मारून समाजातील लोकांना दूध वाटप करण्यात आले. जिल्हा समितीचे कार्याध्यक्ष बाळासाहेब मुल्ला, तालुका समितीचे अध्यक्ष पी. डी. पाटील, कार्याध्यक्ष आप्पासाहेब कमलाकर, तानाजी कुरळे, सुरेश वडाळे, मा. दावणे, उज्ज्वला दळवी, अरुणा शिंदे, हेमंत बेलदार, शारदा आजोळकर, सरोजनी कदम, सुमन सावंत, माननीय कांबळे सर, गणपतराव पाटोळे, साताप्पा कांबळे यासह विविध समविचारी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शाखा : बिलोली
बिलोली (जि. नांदेड) येथील तहसील कार्यालयासमोर मागील दहा वर्षांपासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ‘द दारूचा नव्हे तर द दुधाचा’ थर्टी फर्स्ट म्हणजे जुन्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. बहुतांश लोक या दिवशी केवळ मौज-मजा म्हणून दारूचे व्यसन करतात आणि पुढे त्याच्याच आहारी जातात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिस व अभंग प्रतिष्ठानच्या वतीने ‘परिवर्तन व व्यसनमुक्ती व चला व्यसनाला बदनाम करू या’ हे व्यसनविरोधी मोहीम राबविण्यात आले.
या निमित्ताने बिलोली तहसील कार्यालयासमोर चळवळीतील कार्यकर्त्यांच्यावतीने मोफत दूध वाटप करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे हे उपस्थित होते व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. मनोहर येरकलवार हे उपस्थित होते. महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा प्रधान सचिव कमलाकर जमदाडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. या वेळी व्यसनमुक्तीचे पोस्टर प्रदर्शन करण्यात आले. या वेळी बिलोली शाखेचे सायलू कारमोड, मोहन जाधव, पांडुरंग मामीडवार, गौतम भालेराव, शंकर गायकवाड, वल्लीउद्दीन फारूखी, गौतम लंके, सुरेश कुडकेकर, राजू भद्रे, साहेबराव मिर्झापुरे, यादव लोकडे, गौतम वाघमारे यांच्यासह पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते व अंनिसचे पदाधिकारी उपस्थित होते.
शाखा : बार्शी
अंनिस शाखा बार्शी तर्फे ३१ डिसेंबर २०२३ रोजी चला व्यसनाला बदनाम करू या या उपक्रमांतर्गत ‘द दुधाचा दारूचा नव्हे’ हा कार्यक्रम राबविण्यात आला. नेचर डिलाईट डेअरी, मु. पो. कळस, ता. इंदापूर, जि. पुणे यांच्या सौजन्याने दूध वाटपाचा हा कार्यक्रम झाला.
शाखा : जालना
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जालनातर्फे अंबड चौफुली येथे चला व्यसनाला बदनाम करू या, हा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारातून आलेला उपक्रम राबविण्यात आला. दरवर्षी अनेक तरुण थर्टी फर्स्टला नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पार्टीमध्ये दारू पिऊन सुरुवात करतात आणि अनेक तरुण व्यसनाच्या आहारी जातात. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ‘द.. दारूचा नव्हे, द .. दुधाचा’ हा उपक्रम घेण्यात आला.
नव्या वर्षाची सुरुवात चांगल्या सवयीने करा, असा संदेश नागरिकांना देण्यात आला. या प्रसंगी अंबड चौफुली येथे जमलेल्या अनेक तरुण, नागरिक आणि महिला यांना दूध वाटप करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गिराम, जिल्हा प्रधान सचिव मधुकर गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष शंकर बोर्डे, जिल्हा पदाधिकारी मनोहर सरोदे, संजय हेरकर, अच्युत मोरे, संतोष मोरे, सुभाष कांबळे, माया गायकवाड, अनुराधाताई हेरकर, गौतम भालेराव, सुरेखा भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाखा : सोलापूर
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सोलापूर शहर शाखा आयोजित खास नववर्षानिमित्त ‘द दारूचा नव्हे, द दुधाचा’ हा कार्यक्रम सोलापूर येथील सात रस्ता परिसरात आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र सिंह क्षीरसागर (सदर बाजार पोलीस स्टेशन, सोलापूर) हे मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित या कार्यक्रमांमध्ये सोलापूर शहर शाखेतील कार्यकर्त्यांनी नवीन वर्षाचे स्वागत दारू पिऊन न करता दूध पिऊन करू या आणि व्यसनाला दूर ठेवू या हा संदेश उपस्थित अनेक नागरिकांना देत दुधाच्या पाकिटाचे वाटप केले. परिसरातील सर्व नागरिकांना, वाहनचालकांना, रिक्षा बसचालकांना दुधाची पाकिटे देत हा संदेश देण्यात आल्याने सर्वच नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत झाले. सर्व जण एकमेकांना ‘नो वाईन नो बियर, हॅपी न्यू इयर – हॅप्पी न्यू इयर’ अशा शुभेच्छा देत होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र सिंह क्षीरसागर हे म्हणाले की, अनेक गुन्ह्यांमध्ये दिसून येते की गुन्हेगार हा विविध व्यसनांच्या आहारी गेलेला असतो. आणि त्यामुळे त्याचे शारीरिक, मानसिक नुकसान झालेले असते. यामुळे सामाजिक दुष्परिणामसुद्धा दिसून येतात. समाजविघातक कृत्य घडून येतात आणि म्हणूनच आपण नवीन वर्षाचे स्वागत हे दारू पिऊन न करता दूध पिऊन केले पाहिजे. व्यसनाधीनता ही खूप मोठी सामाजिक समस्या बनली आहे. हा उपक्रम अत्यंत समाजोपयोगी आहे.
कार्याध्यक्ष डॉ. अस्मिता बालगावकर यांनी या विषयावर कविता सादर करून लोकांचे प्रबोधन केले. अंनिस शहर शाखेचे सचिव ब्रह्मानंद धडके, कुंडलिक मोरे, व्ही. डी. गायकवाड, उषा शहा, निशा भोसले, विजय जाधव, यशवंत फडतरे, निनाद शहा, उषा धडके, किरण गायकवाड, पुष्पा गायकवाड, विमल काळे, धनाजी राऊत, निलेश गुरव, गोरख गडसिंग, सुभाष तीर्थ, सुरेखा गडसिंग इ. कार्यकर्ते उपस्थित होते. तरुणाईकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शाखा : सातारा जिल्हा
परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था, सातारा व वाठार पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम आयोजित केले होते.
‘व्यसनाचा विळखा वेळीच ओळखा’ या नावाने अभियान राबवले गेले. २७ डिसें. रोजी मा. कृ. माने कनिष्ठ महाविद्यालय, देऊर येथे अभियानाचा प्रारंभ झाला. त्यामध्ये एका मुलाभोवती व्यसनाच्या नावे लिहिलेला कार्डशिटचा सापाचा विळखा घातला होता तो मान्यवरांनी सोडवला.
या वेळी पोलीस उपनिरीक्षक श्री. संदीप बनकर यांनी आपल्या करिअरमध्ये व्यसनामुळे अडचणी येऊ शकतात. हे सांगताना म्हणाले की, व्यसन केल्याने कोणता तरी छोटा मोठा गुन्हा घडू शकतो आणि पोलीस केस झाली तर नोकरीच्या वेळी पोलिसांकडून मिळणारे प्रमाणपत्रावर त्याची नोंद होते आणि त्यामुळे अडचण येते म्हणून व्यसनापासून दूर राहा, असे आवाहन त्यांनी केले.
उदय चव्हाण यांनी तरुणपणात व्यसन कसे लागू शकते व त्यात आपण कसे अडकू नये यासाठीचे मार्गदर्शन केले. २८ डिसेंबरला वागदेव विद्यालय व जुनिअर कॉलेज येथे अभियानाचा दुसरा कार्यक्रम झाला. तेथे उदय चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. त्या वेळी ज्यू विभागाचे तेजनकर सर, लोंढे मॅडम, ‘अंनिस’च्या वाठार शाखेचे डॉक्टर खिलारे उपस्थित होते. २९ डिसें. रोजी मा. शंकरराव जगताप महाविद्यालय वाघोली येथे अभियानाची सांगता झाली. तेथे उदय चव्हाण यांनी मुलींना व्यसनी जोडीदार नको ग बाई या विषयावर मार्गदर्शन केले.
यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज, सातारा येथे सरत्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर ३० डिसेंबर रोजी ‘रयत वाणी’ या वाहिनीवर उदय चव्हाण यांची प्रकट मुलाखत झाली. तसेच त्याच कॉलेजमधील कीटकशास्त्र विभागात प्राचार्य बी. टी. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बाटलीला ‘मारा जोडा व्यसनाची प्रतिष्ठा तोडा’ हा कार्यक्रम झाला. त्यात उदय चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
३१ डिसेंबर रोजी सातारा शहरातील राजवाडा येथे सायंकाळी ‘दारू नको दूध प्या’ हा उपक्रम झाला. त्याला सातारकरांनी चांगला प्रतिसाद दिला.
कमी वयात व्यसन लागल्यानंतर अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत राहतात. काही वेळेस नकळतपणे आपल्या हातून छोट्या-मोठ्या स्वरूपाचे गुन्हेही होतात आणि त्यामुळे पुढे आपल्या ध्येयामध्ये अनेक अडसर निर्माण होतात. नोकरीच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसल्याचे प्रमाणपत्र लागतेच. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका, असे आवाहन वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर यांनी केले.
परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था सातारा, वाठार स्टेशन पोलीस ठाणे आणि श्री. मा. कृ. माने कनिष्ठ महाविद्यालय, देऊर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘व्यसनाचा विळखा वेळीच ओळखा’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रमुख मार्गदर्शक परिवर्तन संस्थेचे समावेशक श्री. उदय चव्हाण यांनी सांगितले की, ३१ डिसेंबरला बहुतेक तरुण व्यसनाचा पहिला अनुभव घेतात. मग पुढे व्यसनाची शिडी टप्प्याटप्प्याने चढत जातात. पण ती शिडी खाली पडल्यानंतर आयुष्याची वाट लागते. व्यसन हा मनोकायिक आजार असल्याने तो लवकर बरा होत नाही. किंबहुना, तो पुन्हा पुन्हा उद्भवतो. पट्टीचा पोहणारा असला तरी सुद्धा तो भोवर्यामध्ये जाण्याचे धाडस करणार नाही. तशाच पद्धतीने व्यसनाच्या आहारी तुम्ही जाऊ नका. आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी करण्यासारखे आहेत. व्यसनाला ठामपणे नाही म्हणा, मित्रांचा दबाव वेळीच झुगारून टाकला तर व्यसनाच्या विळख्यात जाण्यापासून वाचाल. त्यातूनही काही अडचण आलीच तर योग्य व्यक्तींची मदत घ्या, असे पुढे त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगितले.
प्राचार्य महामूलकर सर यांनी ‘आपल्याला स्वयंशिस्त असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतात’. सर्व विद्यार्थी हे अमलात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. जीवनात व्यसनाला थारा देऊ नका, मन आणि मेंदू बळकट केल्यास आयुष्यामध्ये निश्चितपणे तुम्ही चांगली उभारी घ्याल, असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त श्री. सर्जेराव कदम दादा यांनी मुलांना ज्येष्ठ या नात्याने सांगितले की, चांगल्या गोष्टी अंगीकारा, व्यसनाने शरीराची बरबादी होते. त्याच्याऐवजी दूध प्या, शरीर कमवा आणि निरोगी जीवन जगा.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस एका मुलाभोवती व्यसनी पदार्थांची नावे लिहिलेला एका कागदी सापाचे वेटोळे केले होते. ते मान्यवरांच्या हस्ते वेटोळे काढून, म्हणजेच व्यसनाच्या विळख्यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध आहोत, असा संदेश त्यातून दिला गेला.
शाखा : पुणे शहर
युवकांनी नवीन वर्षाचे स्वागत करताना कोणत्याही अंमली पदार्थाच्या नशेच्या वाटेवर जाण्यापेक्षा समाजोपयोगी विधायक पाऊल उपक्रम राबवून नव्या वैयक्तिक आणि सामूहिक विवेकी कर्तृत्वाच्या दिशेने वाटचाल करावी, या उद्देशाने महाराष्ट्र अंनिस प्रतिवर्षी ‘व्यसनाला बदनाम करू या’ हा उपक्रम राबवित असते. अंनिसच्या पुणे शहर शाखेने दि. ३१/१२/२०२३ रोजी सायं. ६ वाजता रास्ता पेठेत ताराचंद हॉस्पिटलजवळ ‘दारू नको, दूध प्या’ असा प्रबोधनात्मक संदेश देण्यासाठी दूध वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यास नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देऊन समाधान व्यक्त केले. कार्यकर्त्यांनी ‘नो व्हिस्की, नो बिअर,’ ‘हॅप्पी न्यू इअर हॅप्पी न्यू इअर खाणार नाही गुटखा पिणार नाही बिअर’ अशा घोषणा देत सुमारे २०० नागरिकांना १० लिटर दुधाचे वाटप केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यात श्रीपाल ललवाणी, वसंत कदम, बाळकृष्ण लोंढे, नवनाथ लोंढे, अनिल वेल्हाळ, सुरेश सपकाळ, नागेश कवडे, इंद्रजित देसाई, आनंद कांबळे, चंद्रकांत कदम या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
शाखा : मोहोने
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मोहोने जि. ठाणे यांच्या विद्यमाने ३१ डिसेंबर २०२३ रोजी सायं.६.३० वाजता ‘द दारूचा नव्हे, द दुधाचा’ हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात चळवळीच्या गीताने झाली. या वेळी दारू पिण्यामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम व दूध शरीरासाठी किती उपायकारक हे सांगण्यात आले व नव्या वर्षाची सुरुवात व्यसनाला बदनाम करून दारू न पिता दूध पिऊन करावी, असे आवाहन करण्यात आले.
‘नो दारू नो बिअर, हॅपी न्यू इअर’, ‘द दारूचा नव्हे, द दुधाचा’, ‘नो दारू, नो वाईन- प्या दूध व्हा फाईन’, ‘विवेकाचा आवाज बुलंद करू या’, ‘फुले, शाहू, आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर’
अशा घोषणांनी बाबासाहेब स्मारक परिसर दणाणून गेला. सदरचा रस्ता हा स्टेशन रस्ता असल्याने या उपक्रमास अनेक नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. शेवटी अंनिसचे सभासद व अंनिस वार्तापत्राचे वर्गणीदार होण्याचे सर्वांना आवाहन करण्यात आले.
सदर प्रसंगी डी. जे. वाघमारे, अविंदा वाघमारे, अश्विनी माने, मधुकर कांबळे, गौतम मोरे, श्रीधर रोकडे, राजू कोळी, मधुकर पवार, के. पी. गायकवाड, डी. के. भादवे, प्रदीप उपदेशे, सुप्रिया अहिरे, मिलिंद अहिरे, उज्ज्वला वाघमारे, शाहीर आकाश पवार, ऐश्वर्या पवार, पौर्णिमा वाघमारे, तुषार पवार इ. साथी उपस्थित होते.
शाखा : कोल्हापूर
शनिवार दिनांक ३० रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर यांच्यातर्फे उभा मारुती चौक शिवाजी पेठ येथे “चला व्यसनाला बदनाम करूया” हा उपक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सहसंपादक अनिल चव्हाण होते. प्रास्ताविकात कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी दारू गुटख्यामुळे तरुणांच्या होणार्या नुकसानावर बोट ठेवले. जयंत मिठारी म्हणाले, “गुटख्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता मोठी असते. परिणामी अल्पवयातच तरुण उद्ध्वस्त होतात म्हणून शासनाने गुटख्यावर प्रामाणिकपणे बंदी आणली पाहिजे तसेच काही सेलिब्रिटी पान मसाल्याची जाहिरात करतात त्यांनी अशा कामापासून परावृत्त व्हावे. “आनंदराव चौगुले म्हणाले, “लहान वयातच मुलांना गुटखा तंबाखू दारू यांची सवय काही समाजकंटक उद्योगपती त्यांच्या भरमसाठ नफ्याची तरतूद करून ठेवतात पण यामुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होत आहेत! ती वाचवणे आवश्यक आहे.
अध्यक्ष अनिल चव्हाण म्हणाले, ” देशात ब्रिटिशांनी दारूचा प्रचार वाढवला तेव्हा महात्मा फुलेंनी त्या विरोधात पहिला अर्ज केला त्यानंतर लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्या काळातही दारू बंदीसाठी आंदोलने करण्यात आली. ” ब्रिटिश शासन दारू दोन कारणासाठी पाजते”; असे महात्मा गांधी म्हणत, ” एक कारण म्हणजे शासनाला प्रचंड अबकारी कर मिळतो आणि दुसरे कारण म्हणजे नागरिकांना दारूच्या नशेत ठेवल्यास त्यांचे अन्यायाकडे लक्ष जात नाही.” आजही व्यसनांचा प्रचार करण्यामागे हीच दोन कारणे आहेत, शासनाला प्रचंड अबकारी मिळतो आणि वाढती महागाई, बेरोजगारी ,अन्याय, अत्याचार भ्रष्टाचार याकडे लोकांचे लक्ष जात नाही. म्हणजेच दारूचा प्रचार हा भ्रष्टाचार्यांना वाचवण्याचा राजकीय कार्यक्रम आहे.
आभार प्रदर्शन संजय सिंह साळोखे यांनी केले. त्यानंतर सर्वांनी दारू बाटलीच्या चित्राला चप्पल मारा आंदोलन केले. कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग नोंदवला, हा उपक्रम यशस्वी व्हावा म्हणून वेदांत तुफान कांबळे प्रतिभा पाटील सौ. वेळापुरे, सीमा कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, शोभा पाटील मीना चव्हाण, सर्जेराव विभूते अजित चव्हाण, प्रशांत निकम, सुनंदा चव्हाण, संभाजी इंगवले, कॉ. अनिल चव्हाण, वेला लिल्ले किरण गवळी, आनंदराव चौगुले, कॉ चंद्रकांत यादव, राजेंद्र खद्रे, जयंत मिठारी, रवींद्र चव्हाण, संजयसिंह साळोखे, रमेश वडणगेकर, गीता हसुरकर, ओंकार सुतार, नारायण शिंदे अशोक बन्ने, नीता पडळकर पडळकर सविता पाटील, इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
शाखा : रोहा
महा. अंनिस शाखा रोहा यांचेवतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी ‘द-दारूचा नव्हे, तर द-दुधाचा’ हा व्यसनमुक्तीवर आधारित उपक्रम राबविण्यात आला. त्याला रोहेकरांनी छान प्रतिसाद दिला.
या वेळी उद्घाटक म्हणून डॉ. फरीद चिमावकर सर (ज्येष्ठ समाजसेवक), मोहन भोईर सर (रा. जि. कार्याध्यक्ष अंनिस), रावकर मॅडम – नागोठणे शाखा सदस्य, रोहा पोलीस स्टेशनचे वायंगणकर साहेब (पो. उपनिरीक्षक), मदने साहेब (पो. कर्मचारी), सुनील सपकाळ (पो. कॉन्स्टेबल) आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सत्कारमूर्ती म्हणून सुजित मेहतर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिकेत पाडसे, प्रमोद खांडेकर, नंदकिशोर राक्षे, दिनेश शिर्के, नीरज म्हात्रे आदी रोहा शाखेच्या सदस्यांनी मेहनत घेतली.
शाखा : गोंदिया
चला व्यसनाला बदनाम करू या
नववर्षाच्या अखेरीला महाविद्यालयीन युवकांना गोंदिया ‘अंनिस’तर्फे जनजागृती पर संदेश देण्यासाठी स्थानिक एम. जी. पॅरामेडिकल महाविद्यालय मुर्री, गोंदिया येथे शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत व्यसनाधीनतेमुळे उद्भवणारे विविध दुष्परिणाम विशद करण्यात आले. समाजसेविका मा. सविताताई बेदरकर यांनी आपल्या अमोघ वाणीतून उपस्थित सर्व विद्यार्थी व नागरिकांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. व्यसनी व्यक्तीच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून त्याची धिंड काढण्यात आली. या फेरी दरम्यान परिसरात उपस्थित सर्व नागरिकांना नववर्षाचे स्वागत दारू नाही तर दूध पिऊन करा असे सांगून दूध वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता पुतळ्याचे दहन व विद्यार्थ्यांना दूध वाटप करून करण्यात आली. या प्रसंगी ‘अंनिस गोंदिया’चे अनिल गोंडाने, प्राचार्य अनुसया लिल्हारे, प्रा. प्रीती वैद्य, प्रा. ललित डबले, प्रा. रामेश्वरी पटले, प्रा.छाया राणा, प्रा. आरती राऊत, प्रा. मनीष चौधरी, राजू रहांगडाले, सौरभ बघेले, राजा उंदिरवाडे हे उपस्थित होते.
शाखा : चाकण
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, चाकण यांनी चला व्यसनाला बदनाम करु या कार्यक्रमअंतर्गत ‘द’ दारूचा नव्हे तर ‘द’ दुधाचा हा कार्यक्रम महात्मा फुले चौक, रूपसागर समोर येथे घेण्यात आला. या वेळी कलाविष्कार मंचचे अध्यक्ष विशाल बारवकर, शाम राक्षे, नारायण करपे सर, मयूर शेवकरी, असाबे सर, रत्नेश शेवकरी उपस्थित होते. या उपक्रमास ४० लिटर दूध नगरसेवक महेश शेवकरी व गणेश हॉटेलचे मालक गणेश गोरे यांनी दुधासाठी सहकार्य केले. कलाविष्कार मंच, वसुंधरा बहुउद्देशीय संस्था, आमदार स्व. सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ सर्वांनी उपस्थित राहून ‘चला व्यसनाला बदनाम करू’ या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
शाखा : नागपूर
चला व्यसनाला बदनाम करु या अंतर्गत ‘द’-दारूचा नव्हे, तर ‘द’ दुधाचा हा कार्यक्रम प्रज्ञा बुद्धविहार, मानेवाड़ा रोडसमोर आज सकाळी ११ ते १ वाजता घेण्यात आला. डॉ. सुनील भगत, देवयानी भगत, डॉ. विकास होले, विजया श्रीखंडे, सविता मेंढे, मंगला गणार, माही मोहिले, पिल्लैवन ताई, दिवे ताई, सोमकुवर ताई, कल्पना गाईमुखे व इतर सर्वांनी उपस्थित राहून दूध वाटप केले व दारूचे तोटे विशद केले.
शाखा : फलटण
अंनिस फलटण शाखतर्फे, ‘चला व्यसनाला बदनाम करू’ हा उपक्रम घेण्यात आला. ‘दारू नको, दूध प्या, नवीन वर्षाचे स्वागत करू या’ या उपक्रमात सहभागी कार्यकर्ते देशमुख सर, डॉक्टर शेंडे सर, सोनवणे सर व शिंगाडे सर, तसेच मोहिनी मॅडम, मंदाकिनी गायकवाड, भोंगळे सर उपस्थित होते.
शाखा : सातारा
परिवर्तन संस्था, सातारा व महा. अंनिस, सातारा आयोजित ‘द-दारूचा नव्हे, द दुधाचा – चला व्यसनाला बदनाम करू या’ हा प्रबोधनात्मक कार्यक्रम राजवाडा गोल बाग येथे पार पडला. डॉ. हमीद दाभोलकर, प्रमोदिनी मंडपे, वंदना माने, शशिकांत सुतार, उदय चव्हाण व कार्यकर्ते उपस्थित होते.