-
‘फ्रेंड्स ऑफ दाभोलकर’ यांच्यावतीने नुकतेच मुंबई येथे डॉ. नरेंद्र दाभोलकर कला प्रदर्शन पार पडले. यातील कलाकृती जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्, मुंबई या कलासंस्थेतील विद्यार्थ्यांनी तयार केल्या होत्या. हत्या आणि तपास, दाभोलकर व्यक्तीपरिचय, चळवळ, प्रबोधन आणि परिवर्तन या पाच भागांत हे प्रदर्शन विभागलं आहे. दाभोलकरांच्या कौटुंबिक फोटोंची, हत्या झालेल्या चार विचारवंतांची हुबेहूब पोट्रेटस, डॉटरांचा तरुणपणापासूनच्या प्रवासाचं पोट्रेट, त्यांचा संपूर्ण जीवनपट उलगडणारा बायोस्कोप, तपासात होणारी दिरंगाई लाल फायलीतून आणि लयाला जात असलेल्या इम्बोसिंग कलेच्या माध्यमातून समोर येते. डॉटरांच्या सतत सोबत असलेल्या शबनमच्या पार्श्वभूमीवर ‘अंनिस’च्या प्रवासातील टप्पे, स्मशानसहलीची अनुभूती देणारे इंस्टॉलेशन, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या मुखपृष्ठाचं कोलाज प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवतात.
– संयोगिता ढमढेरे
“राज्यभरातील सामाजिक कार्यकर्ते, जन चळवळी, सामाजिक संस्था, चित्रकार, पत्रकार, कलाकार यांनी हे प्रदर्शन आपापल्या जिल्ह्यात, शहरात, गावात हे घेऊन जावे व नवीन पिढीपर्यंत पोचवावे, असे आवाहन आम्ही करतो. ”
–फ्रेंड्स ऑफ दाभोलकर
एखादा खून, अपघात किंवा घातपात कव्हर करणे, हे पत्रकारांच्या दैनंदिन कामाचा अविभाज्य अंग असते. मात्र २० ऑगस्ट २०१३ हा दिवस त्याला अपवाद होता. मॉर्निंग वॉकला निघालेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात बालगंधर्व नाट्यगृहाजवळच्या पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. राज्यभरातील सामाजिक कार्यकर्ते, विवेकवादी विचारवंत, पत्रकार, चित्रकार, कलाकार, तरुण नि:शब्द होत ‘आम्ही सारे दाभोलकर’ बनून रस्त्यावर उतरले.
डॉ. दाभोलकरांच्या हत्येला पुढच्या वर्षी, २०२३ ला दहा वर्षं पूर्ण होतील. अजून मुख्य सूत्रधार मोकाट आहे. दरम्यान, गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या आणखी तीन विचारवंतांचा बळी गेला. मधल्या काळात या हत्येचा पोलिस तपास, न्यायालयातील खटला यांच्या बातम्या येत राहिल्या, कालानुरूप मागे सरकत गेल्या. दरवर्षीचा २० ऑगस्टचा स्मृतिदिन असो, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपक्रम असोत वा विवेकाचा जागर करणार्या स्मृती व्याख्यानमाला; दाभोलकर दीड-दोन कॉलमपुरते आक्रसून गेले. नवीन पिढीपर्यंत तर ‘असा काहीतरी खून झाला होता,’ अशी अपूर्ण माहिती किंवा ‘ते धर्मविरोधी होते,’ अशी चुकीची माहिती पोचली आहे. प्रत्यक्षात अंधश्रध्दा निर्मूलनापासून सुरू झालेली डॉ. दाभोलकरांच्या कामाची व्याप्ती भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, अन्यायाविरोधात अभिव्यक्ती, पर्यावरणाचे संवर्धन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन एवढ्या व्यापक पटलावर विस्तारलेली होती.
आज पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि जबाबदार नागरिक म्हणून आपण ज्या घटनात्मक मूल्यांवर उभे आहोत, तीच मूल्यं दाभोलकरांचे विचार, व्यक्तित्व, कर्तृत्व आणि बलिदान यामागे आहेत. आज घराघरांत पोेचलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे बीज डॉ दाभोलकरांनी १९९१ मध्ये पेरले होते. २०१४ मध्ये मंजूर झालेल्या जादूटोणाविरोधी कायद्यासाठी त्यांनी ३० वर्षांपूर्वी उपोषण केले होते. शनिशिंगणापूरच्या चौथर्यावर महिलांच्या प्रवेशबंदीचा मुद्दा २०१५ मध्ये देशभर गाजला. त्या मुद्द्यावर डॉ. दाभोलकरांनी २५ वर्षांपूर्वी निदर्शन केले होते. अंधश्रद्धांचा उगम आणि व्यसनांचे मूळ कमजोर मानसिक स्थितीत होत असल्याने ‘परिवर्तन’च्या माध्यमातून मानसिक आरोग्यावर संस्थात्मक कामाचा पाया रचला. कुंडलीच्या थोतांडाला ‘जोडीदाराची विवेकी निवड’ हा सृजनशील पर्याय दिला. ‘जात ही देखील एक अंधश्रध्दाच आहे आणि इतर अंधश्रध्दांप्रमाणे इथेही अंतिम शोषण बाईचेच होते,’ ही भूमिका घेत जातपंचायतींच्या कुप्रथांच्या विरोधात ‘जातपंचायत मूठमाती अभियान’ सुरू केले.
सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार म्हणून ‘फ्रेंड्स ऑफ दाभोलकर’या सार्याचे आम्ही साक्षीदार आहोत. डॉ. दाभोलकर मानत असलेल्या लोकशाहीवादी, विज्ञानवादी, विवेकवादी, मानवतावादी दृष्टिकोनाचे वारसदार आहोत. कसोटी फक्त या चार खून खटल्यांची नाही, तर संपूर्ण लोकशाहीवादी समाजाची आहे. त्यासाठी विवेकाचा जागर सुरू राहावा, पुढल्या पिढीपर्यंत विचारांचा वारसा पोचावा, या उद्देशाने अलका धूपकर, दीप्ती राऊत, विद्या कुलकर्णी, संयोगिता ढमढेरे आणि दोन मैत्रिणींचे सामूहिक प्रयत्न आणि जे. जे. कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या साथीने हे कलाप्रदर्शन उभे राहिले आहे.
सृजनशील प्रक्रिया
परिवर्तन आणि प्रबोधन यासाठी डॉ. दाभोलकरांनी अनेकविध कल्पक माध्यमांचा अवलंब केला. तरुणांना कळेल, त्यांच्यापर्यंत पोचेल असे उपक्रम आखले. त्याच धर्तीवर त्यांचे विचार व कार्य याची माहिती नवीन पिढीपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही दृश्यकला माध्यमाची निवड केली आणि चित्रकला प्रदर्शनाची तयारी सुरू केली. डॉ. दाभोलकरांच्या कार्याशी जोडलेल्या ख्यातकीर्त कलाकारांच्या मदतीने या कलाकृती तयार करणे सोपे होते. मात्र तसे न करता, ज्यांना दाभोलकर माहीत नाहीत किंवा अत्यंत त्रोटक माहिती आहे, अशा नव्या पिढीतील विद्यार्थी कलाकारांसोबत हा निर्मितीचा प्रवास सुरू केला. दाभोलकर कोण होते, त्यांनी नेमके काय-काय काम केले, त्यांचे व्यक्तित्व कसे होते, त्याला किती आयाम होते, इथपासून त्यांच्या हत्येचा खटला कुठपर्यंत आला आहे, त्यात काय बदल होत गेले, या तांत्रिक बाबीपर्यंत या विद्यार्थी कलाकारांसोबत संवादाची प्रक्रिया प्रदीर्घ होती. प्रत्येक विद्यार्थ्याने त्याला भावलेल्या पैलूवर त्यांची पुस्तके वाचून, त्यांच्या मुलाखती ऐकून, स्वतंत्र अभ्यास करून आपापल्या कलाकृती साकारल्या आहेत.
दाभोलकर यांच्या संक्षिप्त परिचयाने या प्रदर्शनाची सुरुवात होते आणि हे प्रदर्शन त्याचं कार्य, जीवन आणि विचार उलगडत नेते. या कलाप्रदर्शनात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी विज्ञानवादी विचार आणि विवेकवादी जीवनशैलीचा प्रसार करण्यासाठी प्रात्यक्षिकं, भाषणं, लेखन, संपादन, संघटन, आंदोलनाच्या माध्यमातून चाळीसहून अधिक वर्षं केलेलं अथक कार्य, संघर्ष, कायद्यासाठी केलेला चिवट पाठपुरावा यांची आठवण आणि त्यामागचा विचार युवा कलाकारांनी त्यांच्या नजरेतून पोट्रेट, एम्बॉसिंग, इंस्टॉलेशन, टेसटाईल प्रिंटिंग, इचिंग आदी विभिन्न कलाप्रकार आणि माध्यमातील कलाकृतीतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
२० ऑगस्ट २०१३ रोजी त्यांची हत्या करण्यात आली. त्या दिवशी पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर ते पत्रकार परिषद घेणार होते. दाभोलकरांना येणार्या धमयांमुळे हल्ला झाला, तर कबड्डी खेळताना ज्या चतुराईने ते उडी मारत, तशी उडी मारून स्वत:ला वाचवू शकतील, असा त्यांना विश्वास होता. मात्र घात झाला. त्या दिवशी गोळी मागून आली.
पहिलं प्रदर्शन
२८ ऑक्टोबर रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पहिल्या प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शहा यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर आपल्या भाषणात ते म्हणाले, “सत्य बोलण्याचा गुन्हा ज्यांनी केला, ते मारले जातात. डॉ. दाभोलकर यांच्यासारखी आदर्श माणसं आहेत, जी आपल्याला प्रेरणा देतात. त्यांची स्मृती मिटण्याऐवजी आणखी खोल आणि ठळक झाली आहे. त्यानंतर नसीरुद्दीन यांनी सद्यःस्थितीवर भाष्य करणारी हरिशंकर परसाई यांची ‘भेड और भेडीये’ ही उपहासात्मक कहाणी वाचून दाखवली. उद्घाटनप्रसंगी अलका धूपकर यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या पत्नी डॉ. शैला दाभोलकर यांनी, “डॉ. दाभोलकरांच्या सहवासानं मला ‘लढणं म्हणजेच जिंकणं आहे’ हे शिकवलं. हे प्रदर्शन पाहणाराही त्यातून काही ना काही नक्कीच शिकेल, जमेल तेवढी कृती करत राहील,” असा विश्वास व्यक्त केला. दाभोलकर आणि पानसरे खून खटल्यात निर्भयपणे लढणारे वकील अभय नेवगीही यावेळी उपस्थित होते. “न्याय मिळायला कितीही वर्षं लागली, तरी ही लढाई चालू राहील. मी थांबणार नाही,” असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या कला प्रदर्शनात सहभागी झालेल्या जे. जे. कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना विशेष पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं.
‘ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क’तर्फे (एआयपीएसएन) २० ऑगस्ट हा दिवस दाभोलकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘विज्ञान जाणीवजागृती दिन’ म्हणून पाळला जातो; तर १ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिन ‘विवेक जागर दिन’ साजरा केला जातो. त्याचं औचित्य साधून २८ ऑटोबर ते १ नोव्हेबर हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ‘विचार मरतें नहीं’ आणि ‘आम्ही सारे दाभोलकर’ अशा घोषणा देऊन उद्घाटन समारंभाची सांगता झाली. त्यानंतर पाच दिवस दर्शकांची रीघ लागली होती.
महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, खासदार सुप्रिया सुळे, वरिष्ठ पत्रकार निखिल वागळे, ‘हिंदुस्थान टाइम्स’च्या संपादक मीनल बघेल, आमदार कपिल पाटील, व्यासंगी पत्रकार सुनील तांबे, लेखक अच्युत गोडबोले, प्रज्ञा दया पवार, दशमी प्रोडशनचे प्रमुख-सेवादलाचे अध्यक्ष नितीन वैद्य, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, चिन्मयी सुमित, ज्येष्ठ कार्यकर्ते विजया चौहान, नीरा आडारकर, झेलम परांजपे, सुबोध मोरे, पत्रकार प्रतिमा जोशी, संध्या नरे-पवार, प्रगती बाणखेले, पद्मभूषण देशपांडे, नीलेश खरे, आशिष जाधव, मिताली मठकर, मुकुंद कुळे, नाटकाकर-लेखक वंदना खरे, ‘हास्यजत्रा’फेम सचिन मोटे, सचिन गोस्वामी आणि समीर चौगुले, कलाकार प्रसाद खांडेकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर, काँग्रेसचे नेते सचिन सावंत, मानसोपचारतज्ज्ञ आणि लेखिका अंजली जोशी, ‘रूबरू’ या प्रेरणादायी चित्रपटाची दिग्दर्शिका स्वाती भटकळ, तरुण लेखक ध्रुव सहगल आदींनी या प्रदर्शनाला आवर्जून हजेरी लावली. कलेच्या माध्यमातून एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याचा जीवनपट मांडण्याचा हा प्रयत्न, तरुणांपर्यंत दाभोलकरांचे विचार नेण्यासाठीची धडपड आणि केवळ खुन्यांचा निषेध नव्हे, तर दाभोलकरांच्या विचारांचा जागर याला सगळ्यांनीच साथ दिली. अनेक मान्यवरांनी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला आणि पाच दिवसांच्या प्रदर्शनाला भेट दिली.
शास्त्रीय नृत्य शिकणारी आणि बॉलिवूडमध्ये तंत्रज्ञ-निर्माती म्हणून काम करणारी २८ वर्षांची कोमल जेव्हा ‘कसोटी विवेकाची’ कला प्रदर्शनाला भेट द्यायला आली, तेव्हा तिनं डॉ. नरेंद्र दाभोलकर हे नाव नुकतंच पहिल्यांदा वाचलं होतं वृत्तपत्रात. अर्धा- पाऊणतास तिनं प्रदर्शन निरखून पाहिलं. “या व्यक्तीचं काम किती जीवनांना स्पर्श करणारं होतं, हे सगळं समजून घेणं माझं जीवन समृद्ध करणारा अनुभव होता,” असं कोमल म्हणाली. कोमलसारखे विशीतले अनेक तरुण-तरुणी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यायला आले होते. परिवर्तन आणि प्रबोधनाचं काम करणार्या एखाद्या व्यक्तीला असं कसं मारून टाकलं जाऊ शकतं, हा प्रश्न या सर्वांना अस्वस्थ करणारा होता. त्यासोबतच ‘विचार मरत नाहीत,’ हा प्रेरणादायी संदेश घेऊन अनेकजण ‘आम्ही सारे दाभोलकर’ म्हणत आहेत. ‘वाचा’ आणि ‘उम्मीद’ संस्थेने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रदर्शन पाहण्यासाठी जाणीवपूर्वक आणलं. या सर्व मुलांनी प्रदर्शन पाहिलं, अनेक प्रश्न विचारले, सेल्फी काढल्या, फोटो काढले आणि पुस्तकंही विकत घेतली. ‘कोरो’ संस्था, जी मुंबईतील वस्त्यांमध्ये तरुणांसोबत काम करते, त्यांच्या एका मोठ्या टीमने प्रदर्शनाला टप्प्याटप्प्यांमध्ये भेट दिली. हे प्रदर्शन वस्तीपातळीवर घेऊन येण्याचं निमंत्रणही ‘राईट टू पी’ आणि ‘कोरो’ संस्थांनी दिलं. ‘पाणी हक्क समिती’च्या सदस्यांनीही मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट दिली.
प्रदर्शन पाहून निघताना छोट्या मुलांनी आणि अबालवृद्धांनी पोस्टकार्डवर लिहिलेल्या प्रतिक्रिया बोलक्या होत्या. अभिप्रायाच्या वहीत अनेक निमंत्रणंही या प्रदर्शनाकरिता आली आहेत. पेणहून आलेल्या ‘अंनिस’च्या कार्यकर्त्या मीना मोरे यांनी आसारामभक्त ते विवेकवादी व्यक्ती ही स्वत:च्या बदलाची कहाणी सर जे. जे. कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सांगितली. साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत काम करण्याचा दीड दशकांहून अधिक काळ असलेला अनुभव मुलांना सांगितला. डॉटर वेळ कशी पाळायचे, कामात शिस्तबद्ध; तरीही खिलाडू वृत्तीचे, मोकळ्या मनाचे; पण ध्येयाने झपाटलेले होते. हा सारा अनुभव मुलांसाठी प्रेरणादायी होता. आपापल्या क्षेत्रात नावाजलेल्या लोकांनी व्यक्त केलेले हे विचार विद्यार्थी, तरुणांसाठी दिशादर्शक होते.
लोकवर्गणीतून आम्ही साकारलेले आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून, लोकशाही मूल्यांच्या भूमिकेतून आम्ही साकारलेले कला प्रदर्शन १ नोव्हेंबरला डॉ. दाभोलकरांच्या जन्मदिनी जनतेसाठी अर्पण केले आहे.
राज्यभरातील सामाजिक कार्यकर्ते, जन चळवळी, सामाजिक संस्था, चित्रकार, पत्रकार, कलाकार यांनी हे आपापल्या जिल्ह्यात, शहरात, गावात हे घेऊन जावे व नवीन पिढीपर्यंत पोचवावे, असे आवाहन आम्ही करतो.
– फ्रेंड्स ऑफ दाभोलकर