नैतिकतेसाठी परमेश्वर हवाच का? एक सर्वेक्षण

प्रभाकर नानावटी -

परमेश्वर ही संकल्पना अजूनही टिकून आहे. यामागे कदाचित परमेश्वरप्रणीत धर्मामुळे नैतिक मूल्ये रुजविले जातील, ही मानसिकता अजूनही मूळ धरून आहे. आधुनिक काळात सत्ता व धर्म यांची फारकत केल्यास कल्याणकारी राज्यव्यवस्था चालविणे शक्य होईल, असे वाटल्यामुळे जगभरातील अनेक लोकशाही राष्ट्रांनी धर्मनिरपेक्षतेला अग्रक्रम दिल्याने चांगले परिणामही दिसू लागले. पुरोगामी विचारवंतांनी तार्किकरित्या धार्मिक मूल्ये व नैतिक मूल्ये यांचा अर्थाअर्थी एकमेकांशी काही संबंध नाही, असे सिद्ध केले, तरीही धार्मिक मूल्ये मात्र अजूनही आपला हेकेखोरपणा सोडण्यास तयार नाहीत. काही वेळा जनसामान्य परमेश्वरधर्म इत्यादींची कास सोडून स्वतंत्रपणे जगत आहेत, असेही वाटत असते. याचा पडताळा घेण्यासाठी देवाधर्माविषयी सर्वेक्षण घेतले जाते. त्यातून नेमकी काय स्थिती आहे ते कळू शकते. अशाच प्रकारच्या एक व्यापक सर्वेक्षणातील अहवालातील निष्कर्ष वाचकांसमोर ठेवण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न

माणूस हा एक विचित्र प्राणी आहे. या प्राण्याला नाविन्याची फार हौस आहे. त्याच्यात सर्जनशीलतेची क्षमता आहे. गुंतागुंतीच्या समस्यांना योग्य उत्तरं शोधण्याची हातोटी आहे. त्यानं केलेल्या तंत्रज्ञानातील अफाट प्रगतीमुळे मानवी जीवन सुसह्य होत चालले आहे. स्वत:च्या आरोग्य स्थितीवर संशोधन करत तो आता जास्तीत जास्त वर्षेजगण्याचा प्रयत्न करत आहे. दुर्धर समजलेल्या रोगांवर औषधोपचार शोधल्यामुळे निरोगी आयुष्य जगणे त्याला आता शक्य होत आहे. परंतु एवढे करूनसुद्धा अजूनही तो अविचारांना, चुकीच्या विचारांना बळी पडतोच आहे. याचा एक अत्युत्तम पुरावा म्हणून अजूनही जनसामान्यांच्या मनात परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल असलेल्या श्रद्धेचा उल्लेख करता येईल. एकदा आपण परमेश्वराच्या अस्तित्वाला मान्यता दिल्यास त्या अनुषंगाने येणारे धर्म, धार्मिक व्यवहार, कर्मकांड, पूजा-प्रार्थना, सण-उत्सव, जन्मापासून मृत्यूपर्यंतचे विविध प्रकारचे विधी, गंडे-दोरे, तावीज, पाप-पुण्य, पवित्र-अपवित्र या संकल्पना, भव्य-दिव्य पूजास्थानांची उभारणी, धर्मस्थळांची सहल, दैव-नशीब, इत्यादी आपसुकच येणार याची खात्री असावी. या गोष्टी कमी-अधिक प्रमाणात जगभर सापडतील. परंतु त्यांचे समूळ उच्चाटन झाले नाही. तंत्रज्ञानाची घोडदौडही त्यांना रोखू शकली नाही.

परमेश्वर ही संकल्पना अजूनही टिकून आहे. यामागे कदाचित परमेश्वरप्रणीत धर्मामुळे नैतिक मूल्ये रुजविले जातील, ही मानसिकता अजूनही मूळ धरून आहे. आधुनिक काळात सत्ता व धर्म यांची फारकत केल्यास कल्याणकारी राज्यव्यवस्था चालविणे शक्य होईल, असे वाटल्यामुळे जगभरातील अनेक लोकशाही राष्ट्रांनी धर्मनिरपेक्षतेला अग्रक्रम दिल्याने चांगले परिणामही दिसू लागले. पुरोगामी विचारवंतांनी तार्किकरित्या धार्मिक मूल्ये व नैतिक मूल्ये यांचा अर्थाअर्थी एकमेकांशी काही संबंध नाही, असे सिद्ध केले, तरीही धार्मिक मूल्ये मात्र अजूनही आपला हेकेखोरपणा सोडण्यास तयार नाहीत. काही वेळा जनसामान्य परमेश्वर-धर्म इत्यादींची कास सोडून स्वतंत्रपणे जगत आहेत, असेही वाटत असते. याचा पडताळा घेण्यासाठी देवा-धर्माविषयी सर्वेक्षण घेतले जाते. त्यातून नेमकी काय स्थिती आहे ते कळू शकते. अशाच प्रकारच्या एक व्यापक सर्वेक्षणातील अहवालातील निष्कर्ष वाचकांसमोर ठेवण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न…

प्यू रिसर्च सेंटर या जागतिक स्तरावर काम करणार्‍या संशोधक संस्थेने धर्म, परमेश्वर व नैतिकता आणि धर्माचरणात पूजा-प्रार्थना इत्यादींचे महत्त्व याबद्दलची मतं जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले असून त्यांनी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या सर्वेक्षणात युरोप व पूर्वीच्या सोव्हिएत युनियनच्या देशात परमेश्वराला महत्त्व देण्याची ही संकल्पना कशी उत्क्रांत होत गेली, याचे विश्लेषण करण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे.

या अहवालासाठी 13 मे ते 2 ऑक्टोबर 2019 च्या दरम्यान 34 देशांतील 38 हजार 426 प्रतिसादकांची प्रतिक्रिया नोंदविली. आफ्रिका-लॅटिन अमेरिका-मध्य-पूर्व एशिया येथील राष्ट्रांत प्रत्यक्ष भेटीतून, तर अमेरिका व कॅनडा येथे फोनवरून माहिती मिळवली; तसेच भारत, इंडोनेशिया, फिलिपाइन्समध्येसुद्धा प्रत्यक्ष भेटीवर भर दिला. परंतु फ्रान्स, जर्मनी, दि नेदरलँड्स, स्पेन, स्वीडन येथून फोनवरून सर्वेक्षण करण्यात आले. मात्र बल्गेरिया, झेक रिपब्लिक, ग्रीस, हंगेरी, इटली, लुथेनिया, पोलंड, रशिया, स्लोव्हाकिया, युक्रेन येथे प्रत्यक्ष संदर्शनातून माहिती मिळविली.

सर्वेक्षणाची पद्धत

या केंद्राने भारतातील सर्वेक्षणासाठी 276 प्राथमिक चाचणी नमुन्यांच्या गटामार्फत (Primary sampling units) कोलकत्ता, व मुंबई या मेट्रो शहरांबरोबर अहमदाबाद व काही इतर शहरं आणि अनेक छोट्या-मोठ्या खेड्यांत प्रत्यक्ष घरोघरी जाऊन यादृच्छिक पद्धतीने प्रतिसादकांची निवड केली. परमेश्वर, धर्म व नैतिकता यासंबंधी एक प्रश्नावली तयार केली व या प्रश्नांच्या उत्तरांच्या स्वरुपात प्रतिसादकांकडून माहिती मिळविली. प्रतिसादकांची निवड करताना प्रतिसादक त्या-त्या देशातील भाषिक, भौगोलिक, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय इत्यादी सर्व स्तरांतील समुदायांचे प्रतिनिधित्व करतील, याची काळजी घेतली होती. या उपक्रमासाठी संगणकांची मदत घेतली गेली. 18 वर्षांच्या वरील हे प्रतिसादक वेगवेगळ्या उत्पन्न समूहातील, वेगवेगळ्या वयोगटातील व उच्च-निम्न जाती व उत्पन्न गटातील स्त्री-पुरुष होते. जास्तीत जास्त तीनदा भेटी देऊन अपेक्षित असलेली प्रश्नावली भरून घेतली होती. हीच पद्धत इतर देशांतील प्रतिसादकांकडून प्रत्यक्ष भेटीतून व/वा फोनवरून माहिती मिळवून अहवाल तयार केला आहे.

देशादेशातील टक्केवारी

नीती व चांगली मूल्ये टिकविण्यासाठी परमेश्वरावर श्रद्धा हवी, असे म्हणणार्‍यांची सर्वेक्षण केलेल्या देशातील टक्केवारी खालीलप्रमाणे आहेः

नीती व चांगली मूल्ये टिकविण्यासाठी परमेश्वरावर श्रद्धा हवी, असे ठामपणे म्हणणार्‍या सहा खंडांत पसरलेल्या 34 देशांतील प्रतिसादकांची सरासरी टक्केवारी 45 आहे. परंतु या प्रश्नांचे असे ठामपणे उत्तर देणार्‍यांच्यात देशागणिक वेगवेगळ्या प्रमाणात टक्केवारी आहे, हे वरील चित्रातून स्पष्ट होईल.

आर्थिकरित्या विकासाच्या मार्गावर असलेल्या देशांतील नागरिक पूर्ण विकसित झालेल्या देशातील नागरिकांपेक्षा तुलनेने जास्त धार्मिक आहेत, असे या सर्वेक्षणात आढळले आहे. आर्थिकरित्या मागासलेल्या या देशांतील लोकांमध्ये आपल्या आयुष्यात धर्माला महत्त्व देणार्‍यांची संख्या मोठी असून ही संख्या आर्थिकरित्या पूर्ण विकसित झालेल्या देशांपेक्षा जास्त आहे. नैतिकतेसाठी परमेश्वर हवाच, यावर श्रद्धा असणारे या देशात बहुसंख्य आहेत. त्याचप्रमाणे या देशात या मताच्या विरोधात विचार मांडणारेसुद्धा आहेत. नैतिक असण्यासाठी परमेश्वरावर श्रद्धा हवी, असे त्यांना वाटत नाही.

परमेश्वर, प्रार्थना, धर्म

काही प्रमाणात व्यत्यास असला तरी सर्वेक्षणात जगभरातील देशांत सरासरी 62 टक्के प्रतिसादकांनी आयुष्यात परमेश्वराचे स्थान अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, असे आढळते. 53 टक्के प्रतिसादकांना प्रार्थनेची गरज भासते. 1991 नंतर रशिया व युक्रेनमध्ये ही संख्या वाढलेली आहे. तुलनेने पश्चिमेतील युरोपियन देशात ही संख्या कमी होत आहे.

सर्वेक्षण केलेल्या पश्चिमेतील आठ युरोपियन राष्ट्रांमध्ये नैतिकतेसाठी परमेश्वराची गरज आहे, असे म्हणणार्‍यांची सरासरी 22 टक्के आहे व पूर्वेतील सहा युरोपियन राष्ट्रांत ही संख्या 33 टक्के आहे. युरोप खंडातील राष्ट्रे जास्त प्रमाणात धर्मनिरपेक्ष (secular) आहेत. परंतु या राष्ट्रामध्ये अल्पसंख्याकांकडे व त्यांच्या धर्माकडे बघण्याच्या दृष्टिकोनात फार मोठा फरक जाणवतो, हेही या सर्वेक्षणातून लक्षात येते.

परमेश्वर व नैतिकता

चांगली मूल्ये रुजविण्यासाठी परमेश्वरावर श्रद्धा हवी, असे म्हणणार्‍यांची मते देशा-देशागणिक बदलत आहेत.

परमेश्वर व नैतिकता यांच्यात घनिष्ठ नाते आहे, यावर विश्वास ठेवणार्‍या युरोपियन युनियनमधील 13 देशांपैकी ग्रीकमध्ये 53, बल्गेरियामध्ये 50 व स्लोव्हाकियामध्ये 45 टक्के आहेत. मात्र याच युरोपियन युनियनमधील स्वीडनमध्ये फक्त 9, झेक रिपब्लिकमध्ये 14 व फ्रान्समध्ये 15 टक्के प्रतिसादकांना परमेश्वर व नैतिकता यांच्यात एकमेकांशी काही संबंध आहे असे वाटते. अमेरिका व कॅनडा येथे अनुक्रमे 26 व 44 ही टक्केवारी आहे. कदाचित या देशांतील राजकीय ध्रुवीकरणामुळे या आकडेवारीवर परिणाम झाला असावा.

मध्य-पूर्वेतील व आफ्रिकेतील देशांमध्ये दहापैकी सात जणांना परमेश्वर व नैतिकता यांच्यात घनिष्ठ नाते आहे असे वाटते. लेबनानमध्ये 72, टर्कीत 75 व ट्युनिशियामध्ये 84 टक्के लोकांना चांगल्या मूल्यांसाठी परमेश्वराची गरज आहे असे वाटते. इस्रायलमध्ये मात्र याविषयी लोकं अर्ध्यावर (48 टक्के) विभागले गेले आहेत.

इंडोनेशिया व फिलिपाइन्समध्ये ही संख्या प्रत्येकी 96, तर भारतात 79 टक्के आहे. परंतु पूर्व आशियातील दक्षिण कोरियामध्ये 53 टक्के गरज आहे व 46 टक्के गरज नाही, असे कौल देतात. जपानमध्ये 39 व ऑस्ट्रेलियामध्ये 19 टक्के लोकांना परमेश्वर व नैतिकता यात संबंध आहे असे वाटते.

आफ्रिकेतील केनिया व नायजेरिया या देशात ही टक्केवारी अनुक्रमे 95 व 93 टक्के आहे. दक्षिण आफ्रिकेतही परमेश्वर व नैतिकता यांच्यात संबंध आहे, असे म्हणणार्‍यांची संख्या 84 टक्के आहे. लॅटिन अमेरिकन देशातील ब्राझिलमध्ये 84 टक्के प्रतिसादकांचा नैतिकतेसाठी परमेश्वर हवा यावर भर आहे. परंतु मेक्सिको व अर्जेंटिनामध्ये हे प्रमाण 44 टक्के आहे. बायबल या धर्मग्रंथावर विश्वास ठेवणार्‍या बहुसंख्य रोमन कॅथोलिक्सच्या या तिन्ही देशांत माणूस नैतिक असण्यासाठी परमेश्वरी कृपा हवी, याबद्दल त्यांच्या मनात संशय नाही.

20022019च्या सर्वेक्षणांची तुलना

याच संस्थेने 2002 साली अशाच प्रकारचे एक सर्वेक्षण केले होते. 2019 च्या सर्वेक्षणातील आकडेवारींशी यापूर्वीच्या आकडेवारीची तुलना केल्यास काही देशांमध्ये परमेश्वरावरील श्रद्धेबद्दलच्या मतात फरक झालेला जाणवतो. ऱशियामध्ये 11 टक्के वाढ झाली असून युक्रेनमध्ये 11 टक्के कमी झाली आहे. त्याचप्रमाणे बल्गेरिया व जपान या दोन्ही देशांत वाढ झालेली असून उलट अमेरिकेत 14 टक्के कमी झाली आहे. त्याचप्रमाणे मेक्सिको, टर्की, दक्षिण कोरियातही नैतिकतेसाठी परमेश्वराची गरज आहे, असे म्हणणार्‍यांची आकडेवारी कमी झाली आहे.

सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP)

सामान्यपणे सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) किती आहे, यावरून देशाची आर्थिक स्थिती मोजली जाते. आपल्या देशाची 2018 साली GDP 2.72 लाख कोटी डॉलर्स (USD) होती. (अमेरिका – 20.54 लाख कोटी डॉलर्स, केनिया – 8,790.83 लाख कोटी डॉलर्स, स्वीडन – 55,608.6 लाख कोटी डॉलर्स) परंतु केवळ GDP देशाची खरी आर्थिक स्थिती दाखवू शकत नाही. त्याच्याबरोबर त्या देशाची लोकसंख्या किती आहे, हेही महत्त्वाचे असते. प्रतिमाणसी किती GDP आहे, यावरून खरी आर्थिक स्थिती कळू शकेल. भारताची प्रतिमाणसी GDP 2010 डॉलर्स एवढी आहे. हे निर्देशांक त्या देशातील लोकांच्या क्रयशक्तीवर (Purchasing Power Parity – PPP) अवलंबून असते. प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणात परमेश्वरावरील श्रद्धा व नैतिकता यांचा प्रतिमाणसी GDPवर अवलंबून आहे, असे आढळले. स्थूलमानाने प्रतिमाणसी GDP व परमेश्वरावरील श्रद्धा व नैतिकता याबद्दलची टक्केवारी हे एकमेकांशी व्यस्त प्रमाणात आहेत, असे म्हणता येईल.

उदाहरणार्थ केनिया येथील प्रतिमाणसी GDP सर्वेक्षण केलेल्या 34 देशांत सर्वांत कमी प्रतिमाणसी GDP आहे व 95 टक्के प्रतिसादकांचा, परमेश्वरावरील श्रद्धेमुळे नैतिकता टिकून राहते, यावर विश्वास आहे. तद्विरुद्ध स्वीडनची प्रतिमाणसी GDP सर्वांत जास्त (55 हजार 815) असून परमेश्वर व नैतिकता यांच्यातील संबंधाविषयी फक्त 9 टक्के प्रतिसादक विश्वास ठेवतात. सामान्यपणे युरोपियन राष्ट्रे कमी प्रमाणात धार्मिक आहेत.

वयोमान

परमेश्वराची पाठराखण करणार्‍यांचे सर्वेक्षण करत असताना वयोमानाप्रमाणेसुद्धा श्रद्धेत फरक पडतो, हे लक्षात येते. पिढ्यान्पिढ्यांमधील अंतरामुळेसुद्धा परमेश्वर व नैतिकता यांच्या संबंधातील मतामध्ये फरक जाणवतो. 18 ते 29 या वयोगटातील प्रतिसादक 50 च्या पुढच्या वयातील प्रतिसादकांपेक्षा कमी प्रमाणात परमेश्वरावरील श्रद्धेमुळे नैतिकता येते, यावर विश्वास ठेवणारे आहेत. यापूर्वीच्या सर्वेक्षणातसुद्धा ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली होती.

दक्षिण कोरियातील 64 टक्के ज्येष्ठ नागरिकांना परमेश्वर व नैतिकता यांच्यात संबंध आहे, असे वाटते. परंतु 18-29 वयोगटातील केवळ 20 टक्के युवकांना परमेश्वर व नैतिकता यांच्याशी संबंध जोडता येईल असे वाटते. हाच प्रकार ग्रीस, अर्जेंटिना, अमेरिका, मेक्सिको, जपान, पोलंड, हंगेरी या देशातही आढळतो. परंतु ब्राझील, नायजेरिया व भारत या देशात तरुण व वृद्ध पिढीत फार फरक जाणवत नाही.

व्यक्तिगत पातळीवरील उत्पन्न

व्यक्तिगत पातळीवरील उत्पन्नाच्या प्रमाणातसुद्धा हाच प्रकार दिसून येईल. ज्यांचे उत्पन्न जास्त आहे, त्यांची परमेश्वरावरील श्रद्धा कमी आहे, हे काही देशांतील सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून कळून येईल.

शिक्षण

प्रतिसादकांची शैक्षणिक पातळीसुद्धा परमेश्वरावरील श्रद्धेबद्दलचा एक निकष होऊ शकतो. अमेरिका व युरोपमधील सर्वेक्षणात जास्त शिक्षण घेतलेल्यांमध्ये नैतिकतेसाठी परमेश्वर हवा, याबद्दलचा विश्वास कमी आहे, हे लक्षात येते. शिक्षण व उत्पन्न यातही परस्परसंबंध असून शिक्षणानुसार हा विश्वास कमी-जास्त होतो, हे सर्वेक्षणात स्पष्ट होत आहे.

34 पैकी 24 देशांतील उच्च शिक्षित प्रतिसादक परमेश्वराचा नैतिकतेशी संबंध आहे, याबद्दल कमी विश्वास ठेवत होते. परंतु इतर 10 देशांत मात्र शिक्षणामुळे त्यांच्या विश्वासात काही फरक आढळला नाही. 15 देशांतील प्रतिसादकांचे याबद्दलचे मत त्यांच्या राजकीय विचारांशी निगडित होते. जरी उजवी व डावी विचारपद्धती देशानुसार बदलत असली, तरी सामान्यपणे उजव्या विचारगटांतील प्रतिसादकांना नैतिकता व चांगुलपणासाठी परमेश्वरावरील श्रद्धा आवश्यक आहे असे वाटते. अमेरिका, ग्रीस, इस्रायलमधील उजव्या गटांबरोबर डाव्या गटांतील अर्ध्यापेक्षा जास्त प्रतिसादकांना परमेश्वरावरील श्रद्धेमुळे माणूस नीतिवान होतो, यावर विश्वास आहे. अमेरिका, पोलंड व ग्रीसमध्ये ही दरी 30 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. स्वीडनमध्ये उजव्या गटातील 10 टक्के प्रतिसादकसुद्धा नैतिकतेसाठी परमेश्वरावरील श्रद्धेची पाठराखण करत आहेत. 2 टक्के डाव्यांनासुद्धा असेच वाटत आहे. हंगेरी, स्पेन, कॅनडा, जर्मनी, इस्रायल, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, ब्रिटन, दि नेदरलँड्स व स्वीडनमधील बहुतेक उजव्या गटांना परमेश्वर व नैतिकता यांच्यात संबंध आहे, याबद्दल अजिबात संशय नाही.

धर्माचे महत्त्व

या सर्वेक्षणात (संघटित) धर्माविषयी प्रश्न विचारण्यात आले होते. तुमच्या आयुष्यात धर्माला आपण किती महत्त्व देता, याविषयी अतिमहत्त्वाचे, कमी महत्त्वाचे, थोडे-फार महत्त्वाचे वा बिन महत्त्वाचे अशी वर्गवारी करणारा प्रश्न विचारला होता. इतर राष्ट्रांच्या तुलनेत युरोपियन राष्ट्रांनी धर्माला महत्त्व नाही असे उत्तर दिले. 34 पैकी 23 राष्ट्रांना धर्म ही बाब अत्यंत महत्त्वाची वाटते. इंडोनेशिया, नायजेरिया, ट्युनिशिया, दि फिलिपाइन्स, केनिया, भारत, दक्षिण आफ्रिका, ब्राझील व लेबनान या राष्ट्रांतील 90 टक्के प्रतिसादकांना धर्म अत्यत महत्वाचे वाटते.

यातील अनेक राष्ट्रांमधील जनतेची त्यांच्या आयुष्यात धर्माविषयीची बांधिलकी जास्त प्रमाणात आहे. आकडेवारीप्रमाणे इंडोनेशिया (98), नायजेरिया (93), दि फिलिपाइन्स (92), केनिया (92), ट्युनिशिया (91), दक्षिण आफ्रिका (86), ब्राझील (84), भारत (77) व लेबनान (70 टक्के) यांचा धर्माविषयीच्या बांधिलकीबद्दल क्रमांक लावता येईल. युरोपमधील राष्ट्रं मात्र धर्माला जास्त महत्त्व देत नाहीत. धर्माला महत्त्व देण्याचे प्रमाण स्वीडनमध्ये 22, झेक रिपब्लिकमध्ये 23, फ्रान्समध्ये 33 व दि नेदरलँड्स व हंगेरीमध्ये 39 टक्के आहे.बहुसांस्कृतिक युरोपमध्ये आयुष्यात पूर्णपणे धर्माला नाकारणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे. झेक रिपब्लिक, फ्रान्स, दि नेदरलँड्स, स्वीडन, ब्रिटन या देशातील तरुण वर्ग इतर कुठल्याही ऑप्शनपेक्षा धर्म नको असेच म्हणत आहे.

त्याच वेळी ग्रीस, पोलंड, इटली येथील दहापैकी सहा प्रतिसादकांना थोड्या-फार प्रमाणात धर्म हवा असे वाटते. ग्रीसमधील 80 टक्के प्रतिसादकांना थोड्या-फार प्रमाणात धर्म हवासा वाटतो. जर्मनी, स्लोव्हाकिया, लिथुयानिया या युरोपियन देशांतील 55 टक्के प्रतिसादकांना थोड्या-फार प्रमाणात धर्म हवासा वाटतो. बल्गेरियात ही संख्या 59 टक्के आहे.

प्रार्थना

सर्वेक्षणातील एक प्रश्न प्रार्थनेविषयी होता. परमेश्वर जास्त महत्त्वाचा की त्याची प्रार्थना? या प्रश्नाला अर्ध्यापेक्षा जास्त देशांनी दोन्ही तितकेच महत्त्वाचे आहेत, असे मत नोंदविले. 34 देशांत 61 टक्के प्रतिसादकांना परमेश्वर महत्त्वाचा वाटतो व 53 टक्के प्रतिसादकांना प्रार्थना महत्त्वाची वाटते.

आर्थिकदृष्ट्या विकसित असलेल्या देशांतील प्रतिसादक परमेश्वराला नाकारल्याप्रमाणे प्रार्थनेलाही ते त्यांच्या आयुष्यात महत्त्व देत नाहीत. मात्र विकसनशील देश पूर्ण विकसित देशापेक्षा दुपटीने प्रार्थनेच्या उपयुक्ततेवर भर देत आहेत. दहापैकी नऊ विकसनशील देश परमेश्वराला त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे, यावर श्रद्धा ठेवून आहेत; अपवाद फक्त युक्रेनचा. त्या तुलनेने 11 विकसित देशांत अर्ध्यापेक्षा कमी प्रतिसादक परमेश्वराला महत्त्व देत आहेत. विकसित देशांतील सरासरी 41 टक्के जणांना प्रार्थनेची उपयुक्तता आहे, असे वाटते. परंतु हीच टक्केवारी विकसनशील देशात 96 टक्के आहे.

काही देशांतील प्रतिसादकांना आयुष्यात प्रार्थनेपेक्षा परमेश्वरच जास्त महत्त्वाचा आहे, असे वाटते. इस्रायलमधील 71 टक्के प्रतिसादकांना प्रार्थनेपेक्षा परमेश्वर महत्त्वाचा वाटतो; तर 54 टक्के प्रतिसादकांना प्रार्थना महत्त्वाची वाटते. इस्रायलमधील मुस्लिम समुदायातील 96 टक्के जणांना व तेथील ज्यू समुदायातील 66 टक्के जणांना परमेश्वर महत्त्वाचा वाटतो; परंतु 81 टक्के मुस्लिम व 50 टक्के ज्यू प्रार्थनेला महत्त्व देत आहेत. आयुष्यात परमेश्वराला महत्त्वाचे स्थान आहे, याबद्दलचे मत हे प्रतिसादक कुठल्या धर्माचे आहेत, यावर अवलंबून आहे, असे म्हणता येईल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बहुतेक देशांतील धर्म न मानणार्‍यांमध्ये परमेश्वराला मानणारेसुद्धा आहेत. अमेरिका व अर्जेंटिनामध्ये सुमारे 30 टक्के निधर्मिकांचा परमेश्वराच्या अस्तित्वावर विश्वास आहे. मेक्सिकोमधील धर्मावर विश्वास न ठेवणारे बहुसंख्य जण त्यांच्या आयुष्यात परमेश्वराला महत्त्व देत आहेत.

ब्राझील, केनिया व दि फिलिपाइन्समधील बहुतेक धार्मिक त्यांच्या आयुष्यात परमेश्वराला जास्त महत्त्व देत आहेत. त्याचप्रमाणे नायजेरियन, मुस्लिम व ख्रिश्चन धार्मिकसुद्धा परमेश्वराला महत्त्वाचे स्थान देत आहेत.

सोव्हिएत युनियनच्या अस्तानंतर

1991 नंतरच्या पश्चिम युरोपमधील देशात ख्रिश्चन धर्माला उतरती कळा लागल्याचे स्पष्ट संकेत अनेक अहवालामध्ये नमूद केलेले आहेत. धर्माकडे बघण्याच्या दृष्टिकोनात स्पेन, इटली व पोलंड या कट्टर समजल्या जाणार्‍या देशांत 2019 च्या सर्वेक्षणात अनुक्रमे 26, 21 व 14 टक्के बदल झाला आहे. लुथियानियासकट बहुतेक युरोपियन राष्ट्रांमध्ये हाच ट्रेंड अधोरेखित होत आहे. पूर्वीच्या सोविएत संघातील या राष्ट्रात चक्क 12 टक्के फरक झालेला जाणवतो.

सोविएत संघराज्यात धर्मावर बंदी होती. परंतु सोविएतच्या अस्तानंतर रशिया व युक्रेनमधील धार्मिकांची संख्या वाढत आहे. बल्गेरियामध्ये 1991 मध्ये धार्मिकांची संख्या 41 टक्क् होती. ती 2019 मध्ये 55 टक्के झाली.

हाच ट्रेंड प्रार्थनेच्या बाबतीतसुद्धा दिसून येत आहे.

धर्म, परमेश्वर, प्रार्थना इत्यादीच्या बाबतीतील हे सर्वेक्षण जगभरातील जनसमुदायांच्या वैचारिक क्षमतेवर प्रकाश टाकत आहे. यावरून पुरोगामी, नास्तिक व अंधश्रद्धा निर्मूलन करणारे कार्यकर्तेइत्यादींचे कार्य किती कठीण आहे, याची नक्कीच कल्पना येईल. वैचारिक क्षमतेवर पसरलेली श्रद्धेची गडद छाया लवकर काढता येणार नाही, हे मात्र निश्चित.

लेखक संपर्क pkn.ans@gmail.com


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]