राजीव देशपांडे -
२० ऑगस्ट २०२३ शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा दहावा स्मृतिदिन! धर्म, जात, रूढी, परंपरा यांचा जबरदस्त प्रभाव, प्रचंड विषमतेने ग्रासलेल्या, अज्ञान, अंधश्रद्धा यांनी पिचलेल्या अशा समाजात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणे मुळातच अतिशय अवघड. त्यात देव, श्रद्धा, धर्म अशा अतिशय संवेदनशील विषयाशी निगडीत काम, चार्वाक, बुद्धापासून फुले, आंबेडकरांसारख्या महामानवांनी याविरोधात संघर्ष करूनही पुरून उरलेले हे काम. अशा या परिस्थितीत डॉ. दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाची संघटना उभारली, चळवळीची तात्विक मांडणी केली. सतत प्रबोधन, संघर्ष, विधायक उपक्रम यातून चळवळ वाहती ठेवली, चर्चेत ठेवली. जात, धर्म, वर्ग विसरून काम करणारे विवेकी कार्यकर्ते घडविले. प्रत्येक घटनेला वैज्ञानिक चिकित्सेचा आग्रह धरला त्यात धर्मचिकित्साही आलीच. देव, धर्म या संकल्पना आणि विज्ञानही शोषणाचे साधन बनता कामा नये हा आपल्या मांडणीचा गाभा ठेवत देव, धर्म, वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबतच्या प्रचलित मांडणीच्यापेक्षा वेगळी मांडणी केली. त्यासाठी भरपूर लिखाण केले, व्याख्याने दिली. अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ केवळ भूत, भानामती, बुवाबाजीविरोधापुरती नसून ती स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही या मूल्यांच्यासाठी संघर्ष करणारी संघटना आहे, ते म्हणत ही मूल्य परिवर्तनाच्यासाठी कृतिशील संवाद साधणारी संघटना आहे. आणि हेच सनातन्याना आव्हान ठरले, त्यांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, जातीय हितसंबंधाना बाधा आणणारे ठरले. त्यांना धर्मविरोधी ठरवत सनातन्यानी त्यांचा खून केला. सनातनी वैदिकांच्या उच्चवर्गीय, उच्चवर्णीय हितसंबंधाना बाधा आणणार्या पुरोगामी अवैदिकांच्या अशा खुनांची परंपरा तर आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे. चार्वाक, चक्रधर, बसवणा ते थेट अगदी डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, गौरी लंकेश, प्रा. कलबुर्गी पर्यंत.
डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतरचे हे दशक अनेक सामाजिक, राजकीय, आर्थिक घटनांनी ढवळून निघाले. मनुस्मृतीला आपला आदर्श मानणारे, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही या मूलभूत घटनात्मक मूल्यांनाच आव्हान देणारे आज सत्तेत बसलेले आहेत. महागाई, बेरोजगारी, अन्याय, अत्याचार या विरोधात सत्ताधार्यांवर केल्या गेलेल्या सौम्यशा टीकेला राजद्रोहासारख्या गुन्ह्यात अडकविले जात आहे आणि बलात्कारासारख्या गुन्ह्यात सजा झालेल्याना तुरुंगातून सोडले जात आहे, रामरहीम सारख्या गुन्हेगारांना वारंवार पॅरोल मिळत आहे. धर्मातील अनिष्ट चाली रीती, रूढी, परंपरा, कर्मकांडे यांच्या आधारावर होत असलेल्या अन्याय, शोषण या विरोधात लढत असाल तर तुम्हाला धर्मद्रोही ठरवले जात आहे. सत्ताधारी वर्गाकडूनच सण समारंभांच्या कर्मकांडी, अंधश्रद्धाळू, पर्यावरणविरोधी, भपकेबाज, बाजारू स्वरूपाला प्रोत्साहन दिले जात आहे. जे धर्मा-धर्मातील, जाती-जातीला, द्वेषाला खतपाणीच घालत आहे. आजच्या सत्ताधार्यांकडून विज्ञानविरोधी वातावरण पद्धतशीरपणे निर्माण करण्याचे काम केले जात आहे. चिल्लर बुवा, बाबांना राज्यमान्यता मिळत आहे. सत्ताधारी वर्गांकडून अंधश्रद्धांचे समर्थन करणारी, देशासाठी सर्वस्व देणार्यां महान व्यक्तिमत्वासंदर्भातील बेताल वक्तव्ये व त्यांना मिळणारे संरक्षण, शालेय अभ्यासक्रमातून महत्वाचे सामाजिक, वैज्ञानिक सिद्धांत वगळत व भ्रामक विज्ञान, भ्रामक इतिहास अभ्यासक्रमात घुसडले जात आहेत. या सगळ्यातून एक चिकीत्सेला नकार देणारे जनमानस निर्माण होत आहे. ज्यातून अफवांच्या जाळ्यात ते अडकत आहे व त्यातून देशभर एक भीतीचे, दहशतीचे, एकमेकांमधील द्वेषाचे वातावरण निर्माण होत आहे ज्याची अनेक उदाहरणे रोजच्या रोज अनुभवत आहोत.
खून होऊन दहा वर्षे झाली आहेत. खुनाचा खटला चालूच आहे. मारेकर्यांना शिक्षा होईलही. पण या खुनामागची जी खरी सूत्रधार आहे ती सनातनी धर्मांध मनोवृत्ती जी आज मोकाटपणे पसरत चालली आहे. त्या धर्मांध शक्तीना रोखण्यासाठी पुढील काळात डाव्या, पुरोगामी, विवेकवादी चळवळींची साथ घेत अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला डॉ. दाभोलकर जिला समाजातील ‘सज्जन शक्ती’ म्हणायचे त्या सर्वसामान्याच्या शक्तीला विज्ञान, निर्भयता व नीतीच्या आधाराने संघटित करीत संघर्ष करणे हीच शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना त्यांच्या दहाव्या स्मृतिदिनी खरीखुरी आदरांजली ठरेल..!