देशोधडीतील श्रद्धा-अंधश्रद्धा आणि भटक्या जमाती

अश्विनी आडे -

‘देशोधडी’ हे आत्मचरित्र मुंबई विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत असलेले व नाथपंथी डवरी गोसावी या भटया विमुक्त समाजातील डॉ. नारायण भोसले यांनी लिहिले आहे. डॉ. नारायण भोसले यांना अतिशय प्रतिकूल अशा भौतिक स्थितीमध्ये उपेक्षित जीवन जगत असताना कशा प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागले, प्रत्येक अडथळे पार करत ते स्वतःचे शिक्षण कसे पूर्ण करत गेले, याचे अनुभवकथनपर वर्णन त्यांच्या आत्मचरित्रातून प्रकट झाले आहे. तसेच त्यांच्या आत्मचरित्रातून भगवे वस्त्र परिधान करून, माळा घालून गायींच्या सहाय्याने भिक्षा मागणार्‍या नाथपंथी डवरी गोसावी समाजातील विविध श्रद्धा-अंधश्रद्धांचा उल्लेख आलेला आहे.

सभोवतालची भौतिक व सामाजिक स्थिती प्रतिकूल असल्यामुळे या समाजातील लोक अंधश्रद्धांना कसे बळी पडतात, हे डॉ. भोसले यांनी आपल्या ग्रंथात त्यांच्या आजींनी सांगितलेल्या आठवणींचे वर्णन करत सांगितले आहे. माण नदीला खूप मोठा पूर आला असताना, गावातील माणसे अतिशय भयभीत झालेली होती. जीविताचा अंदाज कोणालाच बांधता येईनासा झाल्यामुळे त्यावेळी सोपा उपाय म्हणून काही आया व सती पतिव्रता स्त्रियांनी; म्हणजेच सौभाग्यवती स्त्रियांनी नदीला ‘नदीमाय डहाळ दे, पाण्याला उतार दे,’ असे म्हणत ओवाळल्यास नदीचा पूर ओसरेल, अशी समजूत होती. पण स्त्रिया त्यांच्यामधील अगतिकता, मानसिक अस्वस्थता यांमुळे अशा प्रकारच्या सोप्या उपायांकडे वळताना दिसतात, असे सांगत ही समजूत अंधश्रद्धाच आहे, असेच पटवून देण्याचा प्रयत्न डॉ. भोसले यांनी आपल्या लिखाणातून केला आहे. आणखी एका प्रसंगामध्ये डॉ. भोसले यांनी त्यांच्या आजोबांवर (बलामतीचा प्रसंग) संशयाचा प्रसंग आला असता आजोबांनी त्या संकटाला कशा प्रकारे हाताळले, याचे वर्णन आले आहे. बिहार राज्यामध्ये भिक्षा मागत फिरत असताना आजोबांवर चोरी, ठग, स्त्रीशी गैरवर्तणूक करणारा, भानामती करणारा या केवळ संशयावरूनच त्यांना मारहाण करण्यात आली होती. डॉ.भोसले यांचे आजोबा हे संबंधित स्त्रीच्या संशयाचे बळी ठरले होते. गरीब, दारिद्य्राने त्रस्त असलेल्या व्यक्तीवर पुरावा नसताना संशय घेणे, हे त्यामानाने सोपे असते. या समाजातील लोकांचे अस्थिर जीवन असल्यामुळे कुटुंबातील व्यक्तींशी ताटातूट होण्याचा प्रसंगही येत असे. हरवलेली व्यक्ती कधी १० वर्षांनी, कधी ३० वर्षांनी मिळत असे; कधी मिळतही नसे, त्यांचा शोध घेणे सहज शय नव्हते म्हणून काहीतरी चमत्कार घडावा व आपला माणूस पुन्हा आपल्याला भेटावा, यासाठी हा समाज शेवटपर्यंत आशावादी राहणारा आहे. आपल्या मुलांना शिक्षण मिळावे, अशी डॉ. भोसले यांच्या वडिलांची इच्छा होती. शाळा शिकवण्यासाठी वेगवेगळी कारणे त्यांनी सांगितली होती. देशभर विविध ठिकाणी फिरताना आपल्या मुलांची फसवणूक होऊ नये, किमान लिहिता-वाचता यावे, यासाठी त्यांना शाळेत दाखल केले गेले. शिक्षणामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो, ही बाब त्यांचे वडील जाणून होते. आपण आयुष्यभर अस्थिर जीवन जगलो; पण मुलांना अशा प्रकारचे जगणे वाट्याला येऊ नये, हीच त्यांची इच्छा होती. डॉ. भोसले यांची आज्जी अतिशय सुंदर कविता म्हणत असत. त्यांच्या कवितांमधून कितीही संकटे आली तरी आशावादी राहावे, हा दृष्टिकोन व्यतीत होतो. शिक्षणाचे महत्त्व डॉ. भोसले यांच्या आजींनीही ओळखले होते –

ग्यानाचा दिवा आज पेटला|

अंधार तो पळाला ॥

सटवीचं अक्षर वाचणारा आला|

स्वतःला घडविणारा सुरव्या आला॥

या ओळींमधून केवळ शिक्षणामुळे माणूस घडतो, ही जाणीव त्यांच्या कवितांमधून व्यक्त होते. शाळा शिकत असताना डॉ. भोसले व त्यांच्या बंधूंना शाळा शिकताना जातिभेदाचा अनुभव आला नाही, असे सांगतात. परंतु शाळेतील मुले त्यांना त्यांच्या जातीवरूनच ओळखत असत. ‘डवर्‍याची पोरं’ अशा नावाने मुले त्यांना हाक मारत असत. यावरून वरवर पाहता जरी जातिभेद दिसत नसला तरी या प्रकारातून जातिभेद अस्तित्वात होता, असेच दिसते. डॉ. भोसले यांच्या घराला अचानकपणे आग लागली होती किंवा आग जाणूनबूजून लावली होती. घराला आग लागली, यासाठी शाळा अपशकुनी असते, असा अवैज्ञानिक तर्क काही जणांनी काढला होता.

‘देशोधडी’ या ग्रंथामध्ये डॉ. भोसले यांनी यांच्या आयुष्यातील अनेक कठीण प्रसंगांपैकी आणखी एक वर्णन केलेला प्रसंग म्हणजे त्यांच्या आईला लागलेली भूतबाधा होय. घराला आग लागल्याच्या घटनेनंतर त्यांच्या आईचे मन तणावाखाली होते, असे जाणवते. घराला लागलेल्या आगीत त्यांनी कष्ट करून जमवलेले दागिने, पैसे यांची राखरांगोळी होते. हा धक्का डॉ. भोसले यांच्या आईला सहन होत नाही. या तणावाचे रूपांतर मानसिक आजारामध्ये झाले होते. परंतु कुटुंबातील व्यक्तींनी त्यांना भूतबाधा झाली, असे समजून मांत्रिक-भगताकडे जाण्याचा सोपा मार्ग निवडला होता. डॉ. भोसले यांच्या आजारपणाच्या वेळी देखील हे कुटुंब एकटे पडल्यामुळे नैराश्यग्रस्त झाले होते. उपचारांसाठी पुरेसे पैसे नव्हते म्हणून त्यांच्या आईने नवस-सायास करण्यास सुरुवात केली होती. डॉ. भोसले यांच्या वडिलांनी तरीदेखील अशा कठीण परिस्थितीत दवाखान्यातील उपचार सुरूच ठेवले, त्यांच्या पत्नीने देखील त्यांचे मनोधैर्य वाढवले व याही संकटावर त्यांनी मात केली.

नाथपंथी डवरी गोसावी समाजाला ‘पतार’विधी करण्याचा मान मिळत होता, त्याचप्रमाणे नाथांच्या मंदिरसेवेनंतर गावकी मागण्याचाही अधिकार या समाजातील लोकांना होता. या प्रकारच्या विधीमध्ये जातीय विषमता आहे, असे दिसते. लग्न, मुंज, सत्यनारायण पूजा, प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी गावात ब्राह्मण बोलावण्यात येत असे. मात्र कमी सन्मानाची कामे जसे – झाटलोट करणे, मंदिरातील स्वच्छता करणे अशी कामे या समाजाला करावी लागत असत. अक्षय्य तृतीया (अखिती), जागरण, गोंधळ, नवस इत्यादी स्वरुपाच्या धार्मिक कार्यासाठी ‘पतार’विधी समाजाकडून करवून घेतला जात असे. नाथपंथी डवरी गोसावी समाज हा भटका असल्यामुळे जेवढा मानसन्मान एखाद्या ब्राह्मणाला दिला जातो, तेवढा या समाजाला दिला जात नाही, याची खंत डॉ. भोसले यांच्या लिखाणातून व्यक्त होते. डॉ. भोसले यांनीही ‘पतार’विधी शिकून घेतला होता. त्यामुळे त्यांना पोट भरून जेवण मिळत असे. ‘देशोधडी’ या ग्रंथामधील एक प्रसंग हा फलज्योतिष हे खरंच शास्त्र आहे का, या प्रश्नाकडे येऊन पोचतो. डॉ. भोसले यांच्या वडिलांच्या आकस्मिक मृत्यूची बातमी त्यांच्या कुटुंबाला समजते. कुटुंबासाठी हा फार मोठा मानसिक धक्का असतो. डॉ. भोसले यांचे बंधू सुभाष यांना एखाद्या ब्राह्मण-ज्योतिषीचा सल्ला घेण्याचे कोणीतरी सुचवते. ज्योतिषी वडिलांच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचे सांगून दक्षिणा देखील मागतो. परंतु त्यांच्या बंधूवर कोसळलेल्या दुःखाची ज्योतिषाला पर्वा नसते. वास्तविक परिस्थितीत डॉ. भोसले यांचे वडील सुखरूप असतात, त्यांच्या मृत्यूची अफवा काही जणांकडून जाणीवपूर्वक पसरवली जाते.

‘देशोधडी’ या ग्रंथामध्ये डॉ. भोसले यांचे विचार हे देखील सुरुवातीच्या संघर्षमय काळात विवेकी विचारांचे नव्हते. अगतिक परिस्थितीमुळे ते देखील अंधश्रद्धांवर विश्वास ठेवत असत. विवेकी विचारांशी त्यांची ओळख ही शिक्षणामुळे झाली; तसेच शिक्षण घेत असताना भारत पाटणकर, गेल ऑम्वेट, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, प्रदीप आवटे, संजय आवटे, पन्नालाल सुराणा, श्रीराम लागू, शरद पाटील यांचे अमूल्य मार्गदर्शन मिळाले. कॉलेजमध्ये अनेक पुरोगामी विचारांचे मित्र मिळाले. डॉ. भोसले यांच्या मनात पुरोगामी विचार हळूहळू रुजू लागले. जीवनातील अनेक कठीण प्रसंगांना तोंड देताना लेखकाने कधीही आशावाद न सोडता विवेकाने तोंड दिले आहे. वाचकांसाठी त्यांचा जीवनप्रवास हा प्रेरणादायी ठरणारा आहे.

डॉ. नारायण भोसले यांच्या ‘देशोधडी’मधील भटयांच्या समस्या, श्रध्दा-अंधश्रद्धा वाचताना भारतातील भटया- विमुक्तांचे जगण्याचे प्रश्न किती तीव्र आहेत, समाजातील विषम व्यवस्थेमुळे आणि अंधश्रद्धेमुळे पिढ्यान्पिढ्या उद्ध्वस्त झालेला भटया-विमुक्तांचा तांडा ‘माणूस’ म्हणून सन्मानाने जगण्यासाठी आजही किती संघर्ष करत आहे, हे समजून येते. भटया-विमुक्तांविषयी केवळ लिहून, मते मांडून हे प्रश्न संपणार नाहीत. विविध सामाजिक संघटनांनी भटयांच्या समस्यांबाबत जास्तीत जास्त संघटितपणे भटया-विमुक्त समाजातील सुशिक्षित वर्गाला साथीला घेत भटया-विमुक्तांच्या न्याय्य हक्कांसाठी फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचे शस्त्र हाती घेऊन स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांसाठी संघर्ष जारी ठेवला पाहिजे.

लेखिका संपर्क : ९८२१२२२५९०

पुस्तकाचे नाव – देशोधडी

लेखक – डॉ. नारायण भोसले

प्रकाशक – मनोविकास प्रकाशन, पुणे

किंमत – रूपये ३५०/-

पुस्तकासाठी संपर्क – (०२०) २९८०६६६५


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]