प्रा. एन. डी. पाटील यांच्या संघर्षशील व कृतार्थ जीवनयात्रेला अखेरचा सलाम!

उल्का महाजन -

प्रा. एन. डी. पाटील यांच्या रुपाने महाराष्ट्रभर पोचलेले व्यासंगी, मूल्याधिष्ठित; तसेच अतिशय कणखर, अभ्यासू आणि लढाऊ नेतृत्व आता हरपले. कायम मूल्यांची, विचारांची कास धरून चालणारे असे दुर्मिळ राजकीय नेते ही त्यांची ओळख होती. आयुष्यभर राजकारण वा सत्ताकारण असो की रस्त्यावरील जनआंदोलन; त्यांनी कष्टकरी वर्गाच्या हिताला प्राधान्य दिले, आपली भूमिका कधीच पातळ होऊ दिली नाही. अन्याय-अत्याचारविरोधी कठोर भूमिका, स्पष्ट मांडणी व प्रश्न हाताळण्याचे कसब हे त्यांचे वैशिष्ट्य होते. खडा आवाज, दांडगी स्मरणशक्ती, इतिहासाची नेमकी समज, भाषेवर प्रभुत्व, तोंडपाठ किस्से, म्हणी, कविता यांमुळे त्यांची भाषणे ऐकणे ही एक पर्वणीच होती

शेतकरी, कामगार, आदिवासी, दलित, भटके-विमुक्त व महिला यांच्या प्रश्नावर ते सातत्याने लढत राहिले. लढा अन्याय्य व्यवस्थेविरोधी असला पाहिजे, याचे भान त्यांनी सतत राखले. महाराष्ट्रभरातल्या लढाऊ व प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी ते नेहमी उभे राहिले.

अभ्यास, लिखाण, कणखर भूमिका व दमदार मांडणी यामुळे ते महाराष्ट्रात लोकप्रिय नेते राहिले. आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना ते पितृतुल्य होते. त्यांच्या प्रेमळ व आश्वासक आधाराला आम्ही मुकलो आहोत. मूल्याधिष्ठित राजकारण व परिवर्तनाची चळवळ दोन्ही क्षेत्रात आज त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या प्रेमळ पित्याला, झुंजार नेतृत्वाला आणि सत्यनिष्ठ अभ्यासकाला अखेरचा सलाम आणि भावपूर्ण आदरांजली वाहताना काही निवडक आठवणींना उजाळा द्यावासा वाटतो आहे.

माझी त्यांच्याबरोबरची पहिली भेट ‘एन्रॉन’ आंदोलनात झाली. तोपर्यंत लांबून त्यांना पाहत, ऐकत आले होते. चिपळूणहून गुहागर हा प्रवास त्यांच्या गाडीतून मा. दत्ता पाटील यांच्या देखील सोबतीने करता आला. ही माझ्यासाठी पर्वणीच होती. तेव्हा जाणवली, ती त्यांच्या बोलण्यातली आपुलकी, तळमळ. ‘त्या’ भारदस्त, दरारा असलेल्या दिग्गज व्यक्तिमत्त्वाची ओळख हळूहळू उलगडत गेली.

रायगड जिल्ह्याकडे अंबानींची ‘स्पेशल इकॉनॉमिक झोन’साठी (सेझ) वक्रदृष्टी वळली आणि आमच्यासारख्या अनेक संघटनांना त्या लढ्यात उतरावेच लागले. या लढ्याला गती मिळाली, ती जागतिकीकरणविरोधी कृती समितीने हा प्रश्न लढवायचे निश्चित केल्यावर. या समितीचे अध्यक्ष होते, प्रा. एन. डी. पाटील.

मुंबईत भूपेश गुप्ता भवनला सभा झाली आणि एस. ई. झेड. विरोधी रणशिंग फुंकले गेले. पहिलाच कार्यक्रम ठरला, महाराष्ट्रभर यात्रेचा. पूर्ण राज्यात जिथे-जिथे मोठे एस. ई. झेड. येऊ घातले होते, तिथे जायचे व शेतकरी; तसेच ग्रामीण कष्टकरी वर्गात जागृती करायची ठरले. या दौर्‍यात मी, सुरेखा दळवी व संजय संगवई एन. डीं.च्या गाडीतून त्यांच्या सोबत राज्यभर फिरलो. या प्रवासात झालेल्या चर्चा, त्यांचे राज्यभरातील प्रश्नांचे विश्लेषण ऐकणे, ही समृद्ध करणारी गोष्ट होती.

नंतर रायगडचा लढा जसा तीव्र होत गेला, तशा त्यांच्या फेर्‍या रायगडमध्ये वाढत गेल्या. रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा पाया व प्रभाव आधीपासून होताचच; पण एन. डी. आता फक्त त्या पक्षाचे नेते नव्हते, तर या व्यापक विविध पक्षीय आघाडीचे नेते होते. त्यांच्या नेतृत्वावर स्थानिक शेतकर्‍यांपासून सर्वांचाच विश्वास होता.

या आंदोलनात सहभागी असणार्‍या एका वयस्कर शेतकर्‍याने एकदा प्रा. एन. डी. पाटील यांना प्रश्न विचारला, “एवढ्या मोठ्या कंपनीने आपल्या जमिनीला हात घातलाय, थांबेल का हो हे ? खरंच आपण आपली जमीन वाचवू शकू?” तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, “ते आपल्या तयारीवर अवलंबून आहे. आपली तयारी असेल तर ते थांबेलच!” अनेक आंदोलनांचं नेतृत्व केलेल्या अनुभवी नेत्याचं विधान होतं ते. त्यात कोणतंही फसवं आश्वासन नव्हतं; पण मजबूत तयारीचं आवाहन होतं.

महाकाय पर्वतावर चढून गेल्यावर जसा दृष्टीचा आवाका विस्तारतो व मोठा पल्ला उलगडतो, तशी जीवनाच्या अनेक पायर्‍या वर चढून गेलेल्या या ऋषितुल्य नेत्याची नजर होती. त्यांना खूप पुढचे दिसत असे. अनेक छोट्या-मोठ्या आव्हानांना सामोरे जाताना याची प्रचीती आली.

आणखी एक अनुभव याच लढ्यातील ‘रास्ता रोको’ आंदोलनातला. वडखळला मुंबई-गोवा नॅशनल हायवेवर ‘रास्ता रोको’ आंदोलन करायचे ठरले. तयारी सुरू झाली. मार्च महिन्यातले रणरणते ऊन. वाशी नाक्यावर जमा होऊन, सारे वडखळपर्यंत पायी पोचलो. वडखळ नाक्यावर हायवे तिन्ही बाजूंनी अडवला गेला. हजारोंच्या संख्येने शेतकरी स्त्री-पुरूष उपस्थित होते.

अनेक शेतकरी व कार्यकर्त्यांची भाषणे झाली. 80 वर्षांचे रणधुरंधर प्रा. एन. डी. पाटील बोलायला उभे राहिले. 10 मिनिटे बोलल्यानंतर कडक उन्हामुळे त्यांना भोवळ आली. बोलता-बोलताच त्यांचा तोल गेला. आजूबाजूच्या मंडळींनी आधार दिला. आम्ही सारेच घाबरलो; पण पाचच मिनिटांत पाणी घेऊन एन. डी. पाटील पुन्हा बोलू लागले. त्यांचा घणाघाती आवाज पुन्हा दुमदुमला. त्यांनी निक्षून सांगितले, “घाबरायची गरज नाही. मी जिथे लढतोय, त्याच भूमीवर मला पडावं लागलं, मरण आलं तर आनंदच होईल; पण लढा थांबता कामा नये. आपल्या जमिनीवर जो चालून येईल, त्याला आपण सांगून बघू. पण ऐकलं नाही तर सरळ बांधावर गाडायची पण तयारी ठेवू.”

त्यांनी सरकारला इशारा दिला, “आम्हाला अंबानीची 27 मजली इमारत हवी आहे. त्याच्या घराची बोली आम्ही लावतो, आम्ही सांगू त्या किमतीला. आम्हाला त्या जमिनीवर शेती करायची आहे. गुरे पाळायची आहेत, मच्छिमारी करायची आहे; ही पण देशाच्या विकासाची कामे आहेत; मग आम्हाला ती जमीन द्याल का? मग आमच्या जमिनीची बोली त्याला वाटेल त्या किमतीला लावून आमच्या जमिनीवर कब्जा करणारा अंबानी कोण? सरकारने त्याची तळी का उचलून धरावीत?” हा अतिशय मूलभूत प्रश्न होता. सरकारच्या धोरणातील विसंगती ते या मांडणीतून पुढे आणत होते; त्यात कल्पकता होती आणि विश्लेषणसुद्धा.

त्यानंतर आंदोलनाचा महत्त्वाचा टप्पा होता, जेव्हा एन. डी. पाटील यांनी स्वतःच उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. कारण जुलै 2007 मध्ये आम्ही 17 जण उपोषणाला बसलो असताना सरकारशी बोलणी करायला ते स्वतः गेले होते. मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून त्यांनी आम्हाला उपोषण मागे घ्यायला लावले होते. त्यामुळे त्यांची भावना होती की, त्यांच्या शब्दावर शेतकरी विसंबले होते. आता सरकारने त्यांना व शेतकर्‍यांना फसवले. त्यामुळे उपोषणाला बसणे ही त्यांची नैतिक जबाबदारी होती. म्हणून ज्या दिवशी 2007 मध्येे शासनाने आश्वासन दिले, त्याच 24 जुलैला बरोबर 1 वर्षानंतर 2008 मध्ये प्रा. एन. डी. पाटील उपोषणाला बसणार होते. त्यांचे तेव्हा वय होते 80 वर्षे.

शासनाकडे इशारा देणारी निवेदने गेली, वर्तमानपत्रात लेख लिहिले. राज्यभर पत्रके पाठवून माहिती देण्यात आली. जनार्दन म्हात्रे हे वयोवृद्ध शेतकरी जे गेल्या वर्षी पण उपोषणात सहभागी होते, त्यांनी देखील उपोषणाला पुन्हा बसण्याचा निर्णय घेतला.

आम्हाला प्रा. एन. डी. पाटील यांच्या या निर्णयाची काळजी वाटत होती. त्यांना रक्तदाब, मधुमेह हे आजार तर होतेच; पण त्यांची एक किडनी देखील काढलेली होती; त्यात ज्येष्ठ वय. मी आणि सुरेखा दळवी त्यांच्याशी त्याबाबत बोललो. आमची चिंता व्यक्त केली. पण ते ठाम होते. त्यांचा निर्णय झालेला होता. ते म्हणाले, “तब्येतीची एवढी काळजी करून आंदोलनात उतरता येत असतं का? काय व्हायचं ते होईल, पाहू आपण. शेतकर्‍यांच्या जमिनी वाचवण्यासाठी लढताना मरण आलं तर चांगलंच आहे की! त्यांच्या निर्धाराला तोड नव्हती. या उपोषणानंतर सरकारला सक्तीचे जमीन संपादन थांबवण्याचा निर्णय घेणे भाग पडले; फक्त एक अट सरकारने घातली, ती होती जनमत चाचणीची. त्या चाचणीला देखील आम्ही जिद्दीने सामोरे गेलो, ते एन. डी. पाटील यांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळे; आणि शेवटी जिंकलो देखील.

दरम्यान, उपोषणानंतर लगेच आमच्यात जी चर्चा झाली, त्यात आम्हाला अनेक शंका होत्या. जनमत चाचणीबाबत काळजी वाटत होती. ती मी एन. डी. पाटील यांच्याकडे बोलून दाखवली. ते अशा अनेक आंदोलनांना सामोरे जाऊन मुरलेले नेते. ते म्हणाले, “घाबरायचं कशाला? ही आणखी एक कसोटी, नाहीतरी आपल्याला अशा कसोट्यातून पार व्हायचंच आहे. सोनं खरं असेल तर प्रत्येक अग्निपरीक्षेतून ते उजळूनच निघेल. कसोटीला सामोरं जायला डगमगायचं नाही. या प्रक्रियेला आपण सार्वमत चाचणी म्हणून सामोरे जाऊ.” हे होतं, जीवनाचा पर्वत चढलेल्या अनुभवी द्रष्ट्या नेतृत्वाचं कसलेलं शहाणपण.

‘त्या’ चाचणीच्या दिवशी सकाळी निघताना आम्ही एन. डी. पाटील यांच्या पाया पडलो. ते, मी, सुरेखा दळवी आणि वैशाली पाटील असे आम्ही चौघे एकत्र निघालो. एन. डी. पाटील यांनी मायेने आम्हाला जवळ घेतले. सर्वांच्याच डोळ्यांत पाणी होते. एका मग्रुर, धनदांडग्या उद्योगसमूहाच्या ‘कर लो दुनिया मुठ्ठीमें’ अशा माजाच्या आक्रमणाविरुद्ध कुठलीही सत्ता हाती नसताना; जनमताच्या जोरावर आपले जगणे आणि लोकशाही वाचवण्यासाठी उभ्या राहिलेल्या लढ्याचे आम्ही भागीदार होतो.

एरव्ही लढणारी सारी मंडळी समानता मानतो. ज्येष्ठ, कनिष्ठ असा भेदभाव त्यात मानत नाही. पाया पडणे तर सरंजामी मानसिकतेचे मानतो. पण एन. डी. पाटील आम्हाला वडिलांप्रमाणे. परीक्षेला निघताना मोठ्यांच्या पाया पडावे, या आपसूक संस्काराने आम्ही त्यांना नमस्कार केला. ते आम्हा सर्वांचेच आधारस्तंभ होते. सत्तेच्या आवारात वावरून देखील डोळ्यांतील पाणी, मनातील सहृदयता व निर्णयातील खंबीरपणा टिकवून ठेवलेले दुर्मिळ नेतृत्व होते ते. ज्येष्ठ वय व त्यामुळे असलेल्या सर्व शारीरिक व्याधींकडे दुर्लक्ष करत ते सतत कार्यरत होते.

हे आव्हान आम्ही यशस्वीपणे पेलले आणि विजयाच्या दिशेने एक निर्णायक टप्पा गाठला. 96 टक्के शेतकर्‍यांनी ‘रिलायन्स’ला जमिनी देण्याच्या विरोधात मत नोंदवले. हा लढा ऐतिहासिक ठरला. या ऐतिहासिक विजयामागे जी अनेक कारणे होती, त्यामध्ये रायगडमधील शेतकर्‍यांची त्यांच्या जमिनीप्रती असलेली निष्ठा हे जितकं महत्त्वाचं कारण होतं, तेवढेच महत्वाचे होते एन. डी. पाटील यांचे कणखर व कधीही माघार न घेणारे व तत्त्वांशी तडजोड न करणारे नेतृत्व.

सत्तेच्या आवारात वावरूनही कायम ‘सत्यनिष्ठ’ राहिलेले एन. डी, पाटील यांची जीवनदृष्टी माझ्यासारख्या अनेकांना सतत प्रेरणा देत राहील. त्यांना हा अखेरचा सलाम करत असताना उल्लेख करायला हवा, तो त्यांच्या या कर्तृत्वात शांतपणे व तेवढ्याच खंबीरपणे साथ देणार्‍या माईंचा. एन. डी. पाटील यांच्या वाटचालीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. या झुंजार व्यक्तिमत्त्वाला अखंडपणे जळत राहणार्‍या ज्योतीच्या रुपात साथ देणार्‍या ‘त्या’ माऊलीला देखील सलाम!


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]