सत्यशोधक विद्यादेवी सावित्रीबाई रोडे

डॉ. छाया पोवार - 9850928612

सत्यशोधक चळवळीच्या सुरुवातीपासूनच समाजपरिवर्तनाचा ध्यास घेऊन ध्येयाने प्रेरित झालेल्या अनेक महिला कार्यरत असलेल्या दिसतात. ‘सावित्रीबाई तात्यासाहेब रोडे’ या त्यापैकीच एक. विसाव्या शतकाच्या पूर्वाधात, म्हणजे शंभर वर्षांपूर्वी त्या सत्यशोधक समाज, पुणे शाखेच्या सचिव म्हणून कार्य करीत होत्या. सत्यशोधक समाज उपदेशकाचेही काम त्या करत. मुलांना धार्मिक विधी स्वतः शिकवत असत. सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनात हजर राहून अभ्यासू व चटकदार निबंध सादर करत. सत्यशोधक समाजाच्या केंद्रीय कार्यकारिणीतही त्यांचा समावेश होता. दुसर्‍या बाजूला, ज्या रामोशी समाजात त्यांचा जन्म झाला, त्या अज्ञानी, निरक्षर, गुन्हेगार समजल्या गेलेल्या रामोशी समाजासाठी शिक्षण जागृतीस्तव रामोशी शिक्षण परिषद भरविण्यात पुढाकार घेत होत्या. रामोशी संघाच्या सेक्रेटरी म्हणूनही त्या कार्य करत होत्या. शिक्षणावरील त्यांची निष्ठा पाहून 1920 च्या दुसर्‍या रामोशी परिषदेत त्यांना ‘विद्यादेवी’ म्हणून गौरविण्यात आले. सावित्रीबाई तात्यासाहेब रोडे यांचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे.

सावित्रीबाई रोडे या धोंडिबा रोडे यांच्या सूनबाई होत. धोंडिबा रोडे आणि धोंडिराम नामदेव कुंभार या दोघांना सनातन्यांनी महात्मा फुले यांची हत्या करण्यासाठी पाठविले होते. रात्री-अपरात्री चोरपावलाने घरी आलेल्या या दोन्ही धोंडिबांशी महात्मा जोतिरावांनी निर्भीडपणे संवाद साधला. या चर्चेतून त्या दोघांचेही हृदयपरिवर्तन झाले. दोघेही धोंडिबा महात्मा फुले यांचे कट्टर अनुयायी झाले. धोंडिबा रोडे हे महात्मा फुले यांचे अंगरक्षक बनले. त्यांचे चिरंजीव तात्यासाहेब रोडे आणि सूनबाई सावित्रीबाई रोडे यांनी आयुष्यभर सत्यशोधक समाजाचे कार्य अतिशय निष्ठेने केले. त्याच या सावित्रीबाई रोडे, ज्यांना आपल्या सासरच्या घराकडून सत्यशोधक समाजाचा वारसा मिळाला. समाजकार्याचा हा वारसा त्यांनी अतिशय निष्ठेने जोपासला.

सावित्रीबाई तात्यासाहेब रोडे यांचा परिवार 710, भवानी पेठ, पुणे येथे वास्तव्यास होता. फुले दांपत्य आणि रोडे परिवाराचे वास्तव्य जवळच असावे. महात्मा फुले यांच्यानंतर सत्यशोधक चळवळीची पुनर्बांधणी करताना 17 एप्रिल, 1911 मध्ये भवानी पेठेतील बालीवाला थिएटरात एकदिवसीय अधिवेशन स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावारू यांच्या अध्यक्षतेखाली झाले. तेव्हापासून सत्यशोधक अधिवेशने दरवर्षी भरू लागली, सत्यशोधक चळवळीचे काम जोमाने सुरू झाले.

सत्यशोधक समाजाचे चौथे अधिवेशन मौजे सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे येथे दि. 25 व 26 एप्रिल, 1914 साली पार पडले. या अधिवेशनासाठी जमा झालेल्या फंडात सावित्रीबाई रोडे यांच्या नावे दोन रुपयांची देणगी दिल्याचा उल्लेख आहे. अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी निबंध वाचन सत्रात त्यांचा ‘शिक्षण’ या विषयावरील निबंध मिसेस गजराबाई पवार (कोलंबो) यांनी वाचून दाखविल्याचा उल्लेख येतो. सत्यशोधक समाज परिषद (प्र. 262) दुसर्‍या दिवशी सभेपुढे कोणकोणते ठराव आणावयाचे आहेत, याचा विचार करण्यासाठी सर्व प्रांतांतील प्रमुख लोकांची एक विषय नियामक कमिटीची मीटिंग आयोजित केली होती. या विषय नियमक सामितीमध्ये एकमेव महिला सदस्या म्हणून भास्करराव जाधव, डॉ. नवले, मे. पवार अशा सत्यशोधक समाजातील आघाडीच्या नेत्यांची नावे आहेत. या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बरोबर सावित्रीबाई रोडे नाव या समितीमध्ये समाविष्ट झाले आहे (स.प. 260).

दि. 11 व 12 मे, 1915 रोजी अहमदनगर येथे सत्यशोधक समाजाची पाचवी परिषद पार पडली. या परिषदेत सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरवाने उल्लेख आलेला दिसतो. “सौ. सावित्रीबाई रोडे यांनी समाजसेवा उत्तम प्रकारे बजावली आहे. त्या काही मुलांस धार्मिक विधी स्वतः शिकवीत असतात व उपदेशकाचेही काम करतात,” (स. स. प. प्र. 315) या शब्दांत सावित्रीबाई रोडे यांच्या कार्याचा गौरवाने उल्लेख खुद्द सत्यशोधक समाजाच्या सदस्यांनी केला आहे. या पाचव्या अहमदनगर अधिवेशनाला सावित्रीबाईंनी पाच रुपये देणगी दिल्याचा उल्लेख आहे. याच अधिवेशनात सावित्रीबाईंनी लिहिलेला ‘विद्या शिकल्याचे फायदे’ हा निबंध सादर झाल्याचा उल्लेख येतो. 21 जुलै, 1915 च्या ‘दीनमित्र’च्या अंकात हा निबंध प्रसिध्द केला आहे. सध्या या निबंधाचा केवळ पूर्वार्ध अभ्यासकांसाठी उपलब्ध आहे. निबंधाच्या उपलब्ध भागावरून सावित्रीबाईंचा धर्मशास्त्र, पुराणग्रंथ, संस्कृतग्रंथ आणि इंग्रजी ग्रंथांचाही अभ्यास, तर्कशुध्द विवेचन करण्याची पध्दती, यांचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. ‘सह्याद्रीखंड’, ‘स्कंदपुराण’ यांसारख्या ग्रंथांतील श्लोक व आधार देऊन त्यांनी ‘ब्रह्म जाणणारा तो ब्राह्मण’ या मताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.

सत्यशोधक समाजाचे नववे अधिवेशन 31 डिसेंबर, 1919 व 1 जानेवारी, 1920 या रोजी कराड येथे झाले. या वेळी निबंधसत्रात सावित्रीबाई रोडे यांच्या निबंधाचे वाचन रामचंद्र वडेकर यांनी केले. निबंध ‘चटकदार’ असल्याचा उत्तम शेरा ‘दीनमित्र’कारांनी दि 14 जानेवारी, 1920 च्या ‘दीनमित्र’च्या अंकात दिला आहे. (स. स. अ. प्र. 70) सावित्रीबाईंनी 1914, 1915 आणि 1920 या तीन अधिवेशनांत निबंध सादर केल्याचे उल्लेख काढळतात. प्रस्तुत निबंध ‘दीनमित्र’मधून प्रसिध्द झाले आहेत; पण याशिवाय त्यांनी इतर लेखन केले असेल तर आज ते उपलब्ध नाही.

महात्मा फुले यांचे चरित्रकार पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी महात्मा फुले चरित्र ग्रंथ लेखनाच्या वेळी माहिती गोळा करण्यासाठी 1925 मध्ये पुणे शाखेला भेट दिली. यावेळी अभिप्राय नोंदविताना त्यांनी म्हटले आहे की, “जोतिरावांनी स्थापन केलेल्या मूळ शाखेचे अध्यक्ष आज श्री. बळवंत सखाराम कोल्हे हे कॉन्ट्रॅक्टर असून ज्येष्ठ भगिनी सौ. सावित्रीबाई रोडे या सेक्रेटरी आहेत. ऑफिस भवानी पेठेत फुलेवाडी येथे असून या शाखेचे काम चांगले आहे.” (पंढरीनाथ पाटील – महात्मा फुले चरित्र, पृ 64.)

सत्यशोधक समाजाच्या बैठका, निर्णयप्रक्रिया यामध्येही सावित्रीबाई रोडे यांचा सहभाग असे. 1919 मध्ये सत्यशोधक समाजाला संघटनात्मक रूप देण्यासाठी मध्यवर्ती पातळीवर ‘सत्यशोधक समाज’ प्रतिनिधी सभा स्थापन करण्याचा प्रयत्न झाला. त्याचा मसुदा सावित्रीबाई रोडे, कमलाबाई जाधव, भास्करराव जाधव, मुकुंदराव पाटील, वालचंद कोठारी, अण्णासाहेब लठ्ठे… आदी प्रभुख सत्यशोधक नेत्यांनी जाहीरपणे प्रसिध्द केला होता (‘दीनमित्र’ एप्रिल – 1919.) राजर्षी शाहू महाराजांच्या निधनानंतर राजाराम महाराजांच्या राज्यारोहण समारंभास जे शिष्ट मंडळ उपस्थित राहिले, या शिष्टमंडळातही सावित्रीबाईंचा सहभाग होता. सत्यशोधक समाजाचा ज्युबिली उत्सव 24 सप्टेंबर, 1923 रोजी पुणे येथे सावित्रीबाईंच्या नेतृत्वाखाली साजरा झाला. मुकुंदराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या सत्यशोधक समाजाच्या चौदाव्या अधिवेशनात (दि. 9 मार्च 1930) सावित्रीबाईंच्या कार्याची दखल घेऊन त्यांना केंद्रीय कार्यकारिणीत सहभागी करून घेतले. चौदाव्या अधिवेशनानिमित्त, मुंबई शाखेने प्रसिध्द केलेल्या विनंतीपत्रात महात्मा फुले निवर्तल्यानंतर सत्यशोधक समाजाला चालना देणार्‍या महनीय सत्यशोधकांच्या नावांच्या उल्लेख केला आहे. या गौरवपूर्ण नामावलीच्या प्रारंभी राजर्षी शाहू महाराज, भास्करराव जाधव, भीमराव महामुनी, मुकुंदराव पाटील, अण्णासाहेब लठ्ठे… अशा सत्यशोधकांच्या नावांचा उल्लेख आहे. शेवटी, “सावित्रीबाई रोडे वगैरे विद्वान आणि निःपक्षपाती मंडळी मिळाल्यामुळे ‘सत्यशोधक समाज’रुपी लावलेल्या रोपट्याची पाळेमुळे हिंदुस्थानभर पसरून समाजाचा जोराने फैलाव झाला आहे,” (‘दीनमित्र’ 5 मार्च, 1930) अशा शब्दांत सत्यशोधक अनुयायांच्या कार्याची पावती दिली आहे. ‘सावित्रीबाई रोडे’ यांच्या कार्यकर्तृत्वाचा हा बहुमानच होय.

विसाव्या शतकाच्या आरंभापासूनच बहुजन समाजाच्या जागृतीसाठी विविध परिषदा भरू लागल्या. सावित्रीबाई रोडे यांना आपल्या रामोशी बांधवांच्या उन्नतीसाठी काहीतरी करावे, असे वाटणे स्वाभविक आहे. 1915 पासून त्यांनी रामोशी बांधवांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्यास प्रारंभ केला. बारा बलुतेदारांपैकी रामोशी हा एक बलुतेदार. गावरक्षणाची जबाबदारी त्याची. या मोबदल्यात शेतकरी खळ्या-दळ्याच्या प्रसंगी त्याला धान्याच्या स्वरुपात बलुते देत असे. या भटक्या जमातीच्या सात पिढ्यांना शिक्षण माहिती नव्हते. सावित्रीबाई याही रामोशी समाजात जन्मलेल्या. त्याचे चटके त्यांनाही बसलेले. तेव्हा त्यांनी रामोशी समाजाच्या उन्नतीसाठी 1915 मध्ये ‘क्षत्रिय रामोशी संघ, पुणे’ या नावाची संस्था स्थापन केली. त्यांनी रामोशी, मांग वगैरे जातींच्या हजेरी बंद करण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांच्यावर होत असलेला जुलूम समाजाच्या, सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी खूप काम केले.

बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, ही सत्यशोधकी भूमिका अनुसरून त्यांनी मंगळवार, दि. 15 एप्रिल, 1919 रोजी देवराष्ट्रे, ता. खानापूर, जि. सातारा येथे नानाभाऊ नाईक, सालरू नाईक आदींच्या सहकार्याने पहिली रामोशी शिक्षण परिषद आयोजित केली (‘दीनमित्र’ दि. 30 एप्रिल, 1919). या परिषदेसाठी स्वतः सावित्रीबाईंनी जास्तीचे श्रम घेतले, हे ‘दीनमित्र’च्या (दि. 2 एप्रिल, 1919) अंकावरून लक्षात येते. या पहिल्या रामोशी शिक्षण परिषदेचे अध्यक्ष अनाजी कुशाबा मोकाशी हे होते. त्यांचे भाषण तात्यासाहेब रोडे यांनी वाचून दाखविले. रामोशी ज्ञातीचा इतिहास, क्षत्रियत्व, कालौघात प्राप्त झालेली हीन अवस्था व ती दूर करण्यासाठी शिक्षण घेण्याची आवश्यकता यावर भर दिला. “चोरीच्या सवयीमुळे आपण नीचावस्थेत गेलो, तरी हा ‘चोरीचा’ धंदा न करता विद्या शिकावी व ती शिकल्यास आपला दुर्गुण जाईल. आपण चोर्‍या करून उपजीविका करतो. आपल्यास कोणी शिवून घेत नाहीत. मांजर, कुत्री पोपट वगैरे पशु-पक्ष्यांचा ‘सोवळ्या’ लोकांना विटाळ होत नाही. परंतु रामोशी, मांग, महार यांची नुसती सावली अंगावर पडल्यास विटाळ होतो. शिक्षणवृध्दीकडे सर्वांनी लक्ष द्या,” असे आवाहन त्यांनी केले. ही परिषद यशस्वी झाल्याबद्दल रामोशी संघटनेच्या सेक्रेटरी सावित्रीबाई रोडे आणि परिषदेचे मुख्य संयोजक नानाभाऊ नाईक यांचा सत्कार करण्यात आला.

या परिषदेनंतर सावित्रीबाईचा आत्मविश्वास दुणावला. लगेच 1920 च्या मे महिन्यात त्यांनी दुसरी प्रांतिक रामोशी शिक्षण परिषद बोलवली. चिंचवड येथील या परिषदेचे भाऊसाहेब गणपतराव चव्हाण हे अध्यक्ष, तर गंगाराम काळूजी धनवटे हे स्वागताध्यक्ष होते. (‘दीनमित्र’, 2 जून, 1920) या परिषदेत शिक्षणाचे महत्त्व आणि व्यसनांचे दूरगामी परिणाम, या बाबींवर खल झाला. परिषदेसाठी सावित्रीबाईंनी अथक परिश्रम घेतले. त्यांची शिक्षणावरील अढळ निष्ठा पाहून त्यांना या परिषदेने एकमुखाने ‘विद्यादेवी’ म्हणून गौरविले. यानंतर पुढील कालखंडातही रामोशी शिक्षण परिषदांचे आयोजन होतच राहिले. रामोशी शिक्षण संघ पुणे, जनरल सेक्रेटरी विद्यादेवी सावित्रीबाई रोडे यांच्या पुढाकाराने चौथी रामोशी शिक्षण परिषद दिनांक 18 व 19 नोव्हेंबर, 1921 मध्ये अनाजी कुशाबा मोकाशी यांच्या अध्यक्षतेखाली भरली (‘दीनमित्र’ 23 मार्च, 1921) या सभेत सावित्रीबाईंनी रामोशीसंबंधाने निबंध वाचून दाखविला. सोलापूर सातारा, पुणे अहमदनगर जिल्ह्यांतील व भोर, फलटण संस्थानांतील 400 मंडळी आणि रामोशी जमातीव्यतिरिक्त 600 मंडळी हजर होती. एकंदर, या परिषदेस एक हजारांचा जनसमुदाय हजर होता.

पाचवी परिषद पेठ, ता. वाळवे, जि. सातारा येथे 17 मे 1922 रोजी भरली. या परिषदेच्या अध्यक्षा विद्यादेवी सावित्रीबाई रोडे याच होत्या. या परिषदेत त्यांनी रामोशी जमातीचा इतिवृत्तांत आणि कामगिरी विषद केली. यानंतरची सहावी परिषद मु. रहिमतपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा येथे भरली होती.

30 डिसेंबर, 1923 रोजी एक सभा भरवून रामोशी संघाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. रामोशी संघाची स्थापना सावित्रीबाई रोडे यांनी 30 डिसेंबर, 1915 रोजी केली होती. याप्रसंगी ‘शिक्षण’ या विषयावर अनेक भाषणे झाली. सावित्रीबाई रोडे यांचेही भाषण झाले. आपल्या भाषणात त्यांनी ‘रामोशी संघ’ स्थापन करण्याचा उद्देश आणि त्याच्यापासून झालेला लाभ स्पष्ट केला. “रामोशी लोकांना ‘क्रिमिनल ट्राईब अ‍ॅक्ट’ लागू आहे व मीटरघर येथे सेटलमेंट सरकारनी ठेविले आहे. त्यामुळे रामोशी लोकांस व इतर काही लोकांस गुलामाप्रमाणे वागावे लागले.” हा त्रास दूर करण्यासाठी एकजुटीचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. तसेच सरकारने रामोशी समाजाच्या मुला-मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष पुरवावे, अशी विनंतीही त्यांनी केली. (सावित्रीबाई तात्यासाहेब रोडे, पृ 13).

सातवी रामोशी शिक्षण परिषद सातारा जिल्ह्यातील मसूर येथे झाली. सावित्रीबाईनी ‘विद्येचा प्रकाश’ हा निबंध वाचला. सावित्रीबाई या सुमारास एकीकडे सत्यशोधक समाज पुणे शाखेचे सचिवपद सांभाळत होत्या, तर दुसरीकडे रामोशी या गुन्हेगार समजल्या गेलेल्या समाजासाठी परिषदा भरवत होत्या. शिक्षणप्रसारासाठी त्या आयुष्यभर झटल्या. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांतून त्यांनी शिक्षणाबाबत आग्रही विचार मांडले होते.

1919 मध्ये पुणे नगरपालिकेच्या हद्दीतील प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यासंबंधी विचार चालू होता. “हे शिक्षण मुलांपुरतेच सक्तीचे करावे, मुलींचा इतक्यात समावेश नको,” असे मत जहाल पुढारी आणि टिळकांचे अनुयायी मांडत होते. या उलट सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर पुढारी, मवाळ पुढारी मुलींना सक्तीचे शिक्षण असावे, असे मत मांडत होते. खुद्द पुणे शहरात मुलींच्या सक्तीच्या शिक्षणाला विरोध चालू होता. विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्त्रियांची एक जंगी मिरवणूक शहरातून काढली. विविध ठिकाणी स्त्रियांच्या दररोज सभा होऊ लागल्या. 12 फेब्रुवारी, 1920 रोजी म्युनिसिपालिटीची जनरल सभा होणार होती. यावेळी अध्यक्षांना लोकमत सांगण्यासाठी एक शिष्टमंडळ श्रीमती रमाबाई रानडे यांच्या नेतृत्वाखाली गेले. या शिष्टमंडळात सावित्रीबाई रोडे यांचा समावेश होता. या घटनेवरून पुण्याच्या राजकीय, सार्वजनिक क्षेत्रातही सावित्रीबाई रोडे यांचा वावर होता; तसेच सार्वजनिक प्रश्नांबाबतही त्या किती सजग होत्या, हेही आढळून येते.

सावित्रीबाई रोडे आणि तात्यासाहेब रोडे यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची परंपरा पुढे चालविली, सत्यशोधक समाजाचे नेतृत्व केले; तसेच रामोशी शिक्षण परिषद भरवून रामोशी समाज संघटित करण्याचाही प्रयत्न आयुष्यभर केला. ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील यांनी दि. 28 जून, 1922 च्या ‘दीनमित्र’च्या अंकात ‘सारासार विचार’ या स्तंभात सावित्रीबाईंच्या कार्यकर्तृत्वाबाबात गौरवाने लिहिले आहे.

“गेल्या बारा-तेरा वर्षांपासून आमच्या भगिनी सौ. सावित्रीबाई रोडे यांनी पुणे सत्यशोधक समाजाचे काम सांभाळून, आपल्या अज्ञानमग्न रामोशी जातीची उन्नती करण्यासाठी फार-फार खटपट लाविली आहे. मोठी विद्वत्ता, जाडी श्रीमंती असली काही एक आधार नसता, केवळ शुध्द समाजसेवेच्या निजध्यासामुळे सामान्य माणसासही कसे कार्य करता येते, याचे मूर्तिमंत उदाहरण आमच्या सावित्रीबाई होत. रामोशी, मांग वगैरे जातीच्या हजेरी बंद करण्याच्या कामी व त्यांच्यावर होत असलेला जुलूम इतरांच्या लक्षात आणण्याच्या कामी बाईंनी परिणामकारक कार्य केले आहे. त्यांच्या या स्तुत्य कार्यसंबंधाने आम्ही त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.” (‘दीनमित्र’, 28 जून, 1922).

इ. स. 1890 ते 1930 हा सावित्रीबाई रोडे यांच्या कार्याचा ऐन उमेदीचा कालखंड म्हणता येईल. या काळात सर्वच भटक्या जातींना गुन्हेगार ठरविण्यात आले होते. त्यांनी गुन्हे, उपराध करावेत, अशी परिस्थिती समाजानेच त्यांच्यावर लादली होती. अशा सामाजिक स्थितीच्या तुरुंगाचे जिणे झुगारून सावित्रीबाई रोडे मुक्त झाल्या. त्यांचे सासरे आणि पती सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्तेहोते. समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. रामोशी जातीत जन्मलेल्या स्त्रीचे त्या काळातील हे कर्तृत्व नेत्रदीपक आहे. शिक्षणातून समाजपरिवर्तनाचे स्वप्न त्यांनी पाहिले आणि ते सत्यात आणण्यासाठी त्या आयुष्यभर प्रयत्नशील राहिल्या. सावित्रीबाईंचे कार्य आजही मोलाचे आहे.

  1. जी. ए. उगले- विद्यादेवी सावित्रीबाई रोडे, डिसें. 2006
  2. जी. ए. उगले- सत्यशोधक समाज – अधिवेशने, चिंतन आणि चिंता, मराठवाडा सार्वजनिक सभा, औरंगाबाद 2006
  3. गजमळ माळी- सत्यशोधक समाज परिषद अध्यक्षीय भाषणे, राजमुद्रा औरंगाबाद 2020
  4. गो. मा. पवार – विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य, लोकवाङ्मय गृह 2004
  5. गो. मा. पवार- विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य, लोकवाङ्मय गृह 2004
  6. विश्वनाथ शिंदे (संपादक)-महात्मा जोतिराव फुले यांचे वारसदार, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, 2020

चौकट :-

सावित्रीबाई रोडे आणि तात्यासाहेब रोडे यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची परंपरा पुढे चालविली, सत्यशोधक समाजाचे नेतृत्व केले; तसेच रामोशी शिक्षण परिषद भरवून रामोशी समाज संघटित करण्याचाही प्रयत्न आयुष्यभर केला. ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील यांनी दि. 28 जून, 1922 च्या ‘दीनमित्र’च्या अंकात ‘सारासार विचार’ या स्तंभात सावित्रीबाईंच्या कार्यकर्तृत्वाबाबात गौरवाने लिहिले आहे.

“गेल्या बारा-तेरा वर्षांपासून आमच्या भगिनी सौ. सावित्रीबाई रोडे यांनी पुणे सत्यशोधक समाजाचे काम सांभाळून, आपल्या अज्ञानमग्न रामोशी जातीची उन्नती करण्यासाठी फार-फार खटपट लाविली आहे.

लेखिका संपर्क : 98509 28612


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]