प्रभाकर नानावटी -
एका सुप्रसिद्ध वैज्ञानिकाच्या मते डार्विन यांनी लिहिलेले ‘ओरिजिन ऑफ स्पीसीज’ (१८५९) हे शोधनिबंधवजा पुस्तक प्रसिद्ध होण्यापूर्वीच्या मानवाबद्दलच्या सर्व कल्पना अत्यंत चुकीच्या असून त्याबद्दल विचार न करणे इष्ट ठरेल. मानवाविषयीच्या सर्व पारंपरिक व रूढ कल्पनांना उभा छेद देणारा डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत आपण कोण आहोत, कसे आहोत, असे का आहोत, या प्रकारच्या अनेक प्रश्नांना स्पष्ट उत्तरे देणारा होता. डार्विनच्या स्पष्टीकरणात मानवाबद्दलच्या या पूर्वीच्या सर्व कल्पना, अंदाज, अनुमाने व विचारांना अव्हेरणारा व सर्वस्वी वेगळाच असा विचार होता. इतक्या वर्षांनंतरसुद्धा या विचाराची जादू अजून ओसरली नाही. डार्विनच्या सिद्धांताने त्या काळी वैचारिक विस्फोट घडवून आणला.
न्यूटनने पृथ्वी व विश्वातील ग्रहसमुदाय यांच्यात काही फरक नाही, अशी मांडणी करून विश्वकल्पनेतील यापूर्वीच्या चुकांची जाणीव करून दिली. त्याच आराखड्याचे पुढचे पाऊल म्हणून डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताचा विचार केल्यास विश्वयंत्रणेचे संपूर्ण ज्ञान होईल. मानव व इतर प्राणी यांच्यात मुळातच फरक आहे, या द्वैत सिद्धांतालाच डार्विनने उघड आव्हान दिले. परंतु केवळ ‘फरक नाही’ या विधानावरून डार्विनच्या सिद्धांताचा मोठेपणा चटकन लक्षात येणार नाही. द्वैत सिद्धांतात चैतन्याला मूलभूत पाया समजून विश्वरचनेचा विचार केला जातो. याचबरोबर मन व जाणीव या संकल्पना रूढ झाल्या. जॉन लॉक या तत्त्वज्ञाला माणूस नावाचा ‘बुद्धिमान’ प्राणी कोड्यात टाकत होता. जाणीव व प्रज्ञा असलेल्या या प्राण्यात वेगळे काही तरी असावे, असे त्याला वाटत होते. लॉकप्रमाणे हाच विचार अनेकांच्या मनात होता. त्यावरून ‘मन प्रथम’ ही संकल्पना उदयास आली. ‘मना’मुळेच बुद्धी ही संकल्पना रूढ झाली. विचार करण्याची ताकद मनामुळे व मनामध्ये आहे, असा तर्क करण्यात आला. डार्विनचा सिद्धांत मात्र ‘मन प्रथम’ या संकल्पनेलाच सुरुंग लावत असल्यामुळे द्वैत सिद्धांताचा पायाच खचला व त्यावर बांधलेला बुरुज हळूहळू ढासळू लागला. अजूनही आपण डार्विनच्या क्रांतिकाळातच वावरत आहोत. कदाचित त्यामुळेच भौतिकवादाकडे नेणारा सिद्धांत म्हणून आपल्याला त्याची भीती वाटत असावी.
डार्विनचा सिद्धांत माल्थस या जनसंख्याशास्त्रज्ञाच्या सिद्धांताशी निगडित होता. याचबरोबर त्याने आणखी दोन गृहितकांची भर घातली. आणीबाणीसदृश परिस्थितीत जेत्याला, जिंकण्यासाठी एखाद्या काडीचाही आधार मिळत असल्यास त्याचाही पुरेपूर उपयोग जेता करून घेईल. अगदी किरकोळ वाटणार्या अशा आधाराच्या वापराने संततीत वाढ होत असल्यास तो पिढीजात गुण म्हणून रुजेल. त्यात वृद्धी होत-होत हा वंश मूळ वंशापेक्षा वेगळा होईल. स्टीफन जे गूल्ड या वैज्ञानिकाने उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताचा मथितार्थ नेमक्या शब्दांत पकडला आहे –
सर्व सजीव गरजेपेक्षा जास्त संततीसाठी प्रयत्न करत असतात, संततीत थोडाफार फरक असू शकतो. संतती कधीच ‘झेरॉक्स प्रत’ नसते, संततीत होत असलेले बदल काही प्रमाणात पुढच्या पिढीत उतरतात, नैसर्गिक आपत्तीमुळे संततीचा मृत्यू अटळ असतोच आणि विशिष्ट वंशामधील सजीवांमध्ये काही बदल झालेले असल्यास सामान्यपणे बदललेल्या गुणविशेषांसकट ते जिवंत राहतात. या संततीतही आनुवंशिक गुणविशेष असल्यामुळे रंग, रूप, आकार या बाबतीत मूळ सजीवासारखीच ती दिसते.
गॅलापागोस बेटावरील ‘फिंच’ पक्ष्यांच्या निरीक्षणावरून सुचलेली कल्पना इतकी क्रांतिकारक कशी ठरली? नैसर्गिक निवडीची ही कल्पना नेमकी काय आहे? ही केवळ शब्दांची कसरत असेल का? अनेक प्रश्न यासंबंधात विचारावेसे वाटतील.
पारंपरिक विचारांनुसार विश्वकल्पनेची ईश्वरापासून सुरुवात होऊन कृमि-कीटकांसारख्या क्षुल्लक जीवजंतूंपर्यंत पोचते. सजीवांच्या या बृहत्शृंखलेच्या खालच्या पायरीवर जड वस्तू, त्यानंतर वनस्पती, सूक्ष्म जीवजंतू, कृमी, कीटक, पक्षी, प्राणी, प्रज्ञेचा अंश असलेला माणूस व शेवटी ईश्वर असा क्रम लागतो. ईश्वर हा सर्वगुणसंपन्न व परिपूर्ण आहे, अशी समजूत पारंपरिक विचारात आहे. ख्रिश्चन धर्मग्रंथात देवदूतांचेच नऊ प्रकार असून साखळीच्या एका टोकाला मानवाचा आत्मा, तर दुसर्या टोकाला ईश्वर आहे. इतर कुठल्याही सजीवापेक्षा नीतिमूल्ये व क्षमतांच्या बाबतीत मन व आत्मा सर्वश्रेष्ठ आहेत, या विचारात काही बदल घडलाच नाही. त्यातही श्रेष्ठ मन ते कनिष्ठ मन व कनिष्ठ मन ते जडवस्तू हा क्रम आखला असून त्यात किंचितही बदल घडणे किंवा उलट्या दिशेने जाणे शक्य नाही. वरिष्ठ स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत पोचणार्या निसर्गाबद्दलचा विचार करणारी ही दिशा व त्याचे स्पष्टीकरण डार्विनला स्वस्थ बसू देत नसे. त्याच्या मते, निसर्गप्रक्रिया कनिष्ठ स्तरातील जीवजंतूंपासून सुरू होऊन वरिष्ठ स्तरावरील सजीवांपर्यंत पोचते. त्यामुळेच डार्विनला आपले विचार अनेक वर्षेजाहीर न करता स्वतःपाशीच ठेवून घ्यावे लागले. खरे पाहता, त्याच्या अभूतपूर्व अशा सिद्धांतात निर्जीव वस्तूपासून सजीवांची निर्मिती किंवा प्रचलित धर्मसंकल्पनेतील विसंगती दाखवणारे असे कुठलेही विधान नव्हते, तरीही मन (आत्मा!) नसलेल्या साध्या, सरळ प्रक्रियेतून जन्माला आलेल्या क्षुद्र जीवजंतूंपासून सुरुवात करून भरपूर गुंतागुंत असलेल्या प्रक्रियेतून आलेले मानवप्राणी कुठल्याही बाह्यशक्तीविना (ईश्वराचा आशीर्वाद नसतानासुद्धा!) अस्तित्वात येऊ शकतात, हा विचारच क्रांतिकारक होता.
निसर्गातील ही गुंतागुंतीची अवस्था लाखो-करोडो वर्षांचे फलित असून त्यासाठी उद्देश नसलेल्या, जाणीव नसलेल्या, क्षुल्लक वाटणार्या अतिक्षुद्र जीवजंतूंनी हातभार लावला, हे त्या काळच्या कुठल्याही विचारवंताला मान्य होण्यासारखे नव्हते. डार्विनच्या अशा पाखंडी विचारांना संमती दर्शविणे, ही त्या काळी अशक्यातली गोष्ट होती. युरोप खंडात जवळजवळ शंभर टक्के लोक ईश्वरावर विश्वास ठेवणारे ख्रिश्चन धार्मिक होते. ख्रिश्चन धर्माची शिकवण मुळातच मूलतत्त्ववादाकडे झुकणारी असल्यामुळे बायबलमधील प्रत्येक शब्द अन् शब्द शिरसावंद्य मानला जात असे. ईश्वराने हे जग सहा दिवसांत तयार केले व सातव्या दिवशी – रविवारी – सुट्टी घेतली, यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. खरे पाहता, बायबलमध्ये जगाच्या निर्मितीविषयी एकही ओळ नाही. पोप, पाद्रींसारखे धर्मप्रचारक काहीतरी बाष्कळ गोष्टी ओढून-ताणून सांगून सर्वसामान्यांच्या भावना भडकवत असत. एकोणिसाव्या शतकात भूगर्भातील उत्खननात अनेक प्रकारचे जीवाश्म सापडले. यावरून हे जग लाखो-लाखो वर्षेपुरातन आहे, हे जाणवले. भूगर्भशास्त्राच्या अभ्यासपूर्ण निष्कर्षांनंतर मात्र पाद्य्रांच्या शब्दावरचा विश्वास उडू लागला. काही लोक तरी चिकित्सकपणाने विचार करू लागले.
मुळातच उत्क्रांतीवादाची मांडणी सहजासहजी समजण्यासारखी नव्हती. त्यातच ख्रिश्चन धर्मातील मूलतत्त्ववाद्यांच्या कडव्या विरोधामुळे व त्यांच्या काही पर्यायी, विक्षिप्त व फसव्या स्पष्टीकरणामुळे गोंधळात भर पडली. इतर धर्मांप्रमाणे ख्रिश्चन धर्मातसुद्धा परस्परविरोधी व विसंगत विचारांना सामावून घेण्याची क्षमता असली, तरी डार्विनचा विचार मात्र त्यांच्या आकलनक्षमतेच्या पलिकडचा होता. खरे पाहता, डार्विनच्या सिद्धांताला होकार देणे फार अवघड नव्हते. ईश्वरानेच जड वस्तूंपासून खालच्या स्तरातील जीवजंतूंची निर्मिती केली, हे पटवून देणेही अवघड नव्हते. परंतु डार्विनचा सिद्धांत धर्मग्रंथातील विवेचन-विश्लेषणांची रेवडी उडविणारा, चेष्टा करणारा वाटत असल्यामुळे आहे तसाच सिद्धांत स्वीकारणे धार्मिकांना नामुष्कीचे वाटले. या सिद्धांताने जगन्नियामक ईश्वरालाच हद्दपार करून टाकले. त्यामुळे डार्विनचा जीवनिर्मितीचा सिद्धांत स्वीकारल्यास त्यानंतर आणखी काय-काय पुढे वाढून ठेवले आहे. त्यातून आणखी किती व कसले फाटे फुटणार आहेत, याची त्यांना धास्ती वाटत होती.
ईश्वराशिवायची जगाची कल्पना बगळे, कासव, माकड इत्यादींच्या अभ्यासातून स्पष्ट होऊ शकते, हा विचारच त्यांना फार अस्वस्थ करणारा होता. आपल्यासारख्या शहाण्या धार्मिकांचे पूर्वज झाडा-फांद्यांवरून उड्या मारणारी. शेपट असलेली माकडे होती, ही कल्पना डार्विनच्या सिद्धांताच्या संदर्भात डॅनियल डेनेट या तत्त्वज्ञाने फार मार्मिक मांडणी केली आहे. एखाद्या वैज्ञानिकाने जगातील यच्चयावत् सर्व वस्तूंना वितळवू शकणार्या वैश्विक आम्लाचा शोध लावल्यास कुठल्याही प्रकारच्या धातू, अधातू, काच, सिरॅमिक, प्लास्टिक, माती, दगड भांड्यात साठवले तरी त्या भांड्यालाच पहिल्यांदा वितळवून टाकण्याची क्षमता या वैश्विक आम्लात असेल. अशाच प्रकारची शक्ती डार्विनच्या सिद्धांतात आहे, असे डेनेटला वाटते. डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या संपर्कात आलेली कुठलीही तात्त्विक मीमांसा आहे तशीच राहू शकणार नाही. हा सिद्धांत सर्व पारंपरिक कल्पनांना अव्हेरणारा होता. सनातनी धार्मिकांना हा आक्षेपार्ह वाटणार, यात शंका नव्हती. सजीवांच्या साखळीतील प्रत्येक सुट्या भागावरच या सिद्धांताने हल्ला चढवला. डार्विनने एका प्रकारे माणसाची अधोगतीच केली. त्याला क्षुद्र करून टाकले. एकेकाळी माणूस म्हणजे सर्व प्राणिमात्रांवर अधिकार गाजवणारा मानला जाई. एवढेच नव्हे, तर सर्व प्राणी माणसाच्या सेवेसाठीच जन्मलेले असतात, अशी समजूत होती. कदाचित माणूससुद्धा इतरांसारखाच एक प्राणी आहे, हे एक वेळ मान्य केले तरी माणसाच्या आत्म्याचे काय करायचे, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. या वैश्विक आम्लात काय-काय वितळून जाईल, याचा नेम नाही.
‘जड वस्तूंच्या काही गुणविशेषांचे फलित मानवी क्षमता आहे,’ असे विधान डार्विनचा सिद्धांत करत असल्यामुळे धार्मिकांना तो फार धोकादायक वाटत होता. जगातील घडामोडींसाठी देवदूतांची, ईश्वराची गरज भासणार नाही, हे पटण्यासारखे नव्हते. हाच माणूस जो आतापर्यंत ईश्वर, देवदूत यांच्यानंतरच्या क्रमांकावर होता, तो आता ईश्वर व देवदूत यांची हकालपट्टी करून पहिल्या क्रमांकावर जाऊन बसणार, हे सहन होणार नव्हते. चिखलात रुतलेल्या बिनडोक बगळ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आता बुद्धिजीवी माणसांपर्यंत आलेला आहे. कदाचित सर्वश्रेष्ठ माणसांपर्यंत पोचल्यानंतर संपणार आहे. आपल्यासारख्यांना हा काळ फार दूरचा वाटेल. स्वतः डार्विनसुद्धा वनस्पती, प्राणी व माणूस यापलिकडे विचार करू शकला नाही किंवा केला असला तरी चारचौघांत जाहीर करण्याइतपत धैर्य त्याच्यात नव्हते. जगातील अनेक संस्कृती व नागरिकता माणसामुळेच शक्य झाल्या, अशी प्रौढी मिरवणार्यांना मुळातच हा माणूस जड वस्तूंपासून तयार होऊन नैसर्गिक दबाव व काही योगायोगामुळे सशक्त झाला, हे विधानच आश्चर्यचकित करणारे होते. जड पदार्थात जीव ओतण्यासाठी कुठल्याही अलौकिक शक्तीची गरज नाही; जाणीव व या जाणिवेबरोबरची संस्कृती, कला, विज्ञान, तत्त्वज्ञान, नीतिमूल्ये इ. इ. गोष्टी जडत्वाच्या रचनेचे आविष्कार आहेत, नैसर्गिक निवडीनुसार अशी रचना शक्य आहे, हे डार्विनच्या सिद्धांतावरून पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवता येते. त्यामुळे पारंपरिकपणे जगाविषयी विचार करणार्यांना हा सिद्धांत फार धोकादायक वाटू लागला.
लेखक संपर्क : ९५०३३३४८९५