वैदिकांच्या हिंसक तत्त्वज्ञानाला अवैदिकांचे अहिंसक उत्तर

सुभाष थोरात - 9869392157

विषमतेविरुद्ध आवाज उठवणार्‍या, विद्रोह करणार्‍या कष्टकरी समूहाच्या विरोधात शोषक वर्गाकडून कायम हिंसेचा आधार घेतला गेला. ती प्रथा आजतागायत सुरू आहे; पण केवळ दमन करून विद्रोह थांबवता येत नाही, असे लक्षात आल्यानंतर त्यासाठी दमन यंत्रणेला नैतिकता पुरवणारा धर्म, तत्त्वज्ञान अस्तित्वात आले. लोकांवर ते लादले गेले. राजाकडून किंवा पुरोहित वर्गांकडून होणार्‍या हिंसेला नैतिक मानण्यात आले; तर शोषण, अन्यायाविरुद्ध होणार्‍या प्रतिहिंसेला अनैतिक ठरवण्यात आले. हिंसा सत्ताधारी वर्गाचे अभिन्न अंग आहे. सत्ताधारी वर्गाची सत्ता टिकवण्याची ती गरज आहे. राजा देवाचा अंश आहे. राजांची हत्या हे महापाप आहे; तसेच देवाच्या पुजार्‍याची हत्या महापाप आहे.

हिंसा आणि अहिंसेबद्दलची चर्चा एका अर्थाने सनातन आहे. नागरी समाज अस्तित्वात आल्यापासून यावर चर्चा सुरू आहे. एक तत्त्व म्हणून हिंसेचे कधीच नैतिक समर्थन होऊ शकत नाही आणि अहिंसा ही मानवी जीवनातील एक चिरंतन मूल्य म्हणून कायम समर्थनीय आहे. असे असले तरी आदिम समाजापासून आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाने, प्रगत विज्ञान आणि समृद्ध समाजातही हिंसेचे अस्तित्व अबाधित आहे. इतकेच नव्हे, तर ते अधिक क्रूर झाले आहे. अणुबाँबची निर्मिती हे त्याचेच निदर्शक आहे.

आदिमानव आपल्या अस्तित्व रक्षणासाठी हिंसा करत होता, तर आताचा आधुनिक मानव आपले सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक हितसंबंध रक्षण करण्यासाठी हिंसेचा आधार घेताना दिसतो, याचा अर्थ हिंसेची कारणे केवळ नैतिकतेत शोधता येत नाहीत, तर भौतिक हितसंबंधात आपल्याला शोधता येतात. उदाहरणार्थ पहिले आणि दुसरे महायुद्ध का झाले, याची जी कारणं दिली जातात, ती फार वरवरची आहेत. त्याच्या मुळाशी खरी कारणं आहेत, ती जगाची बाजारपेठ काबीज करण्यासाठी विकसित देशांमध्ये असलेली स्पर्धा. त्या स्पर्धेची परिणती आपल्याला महायुद्धामध्ये झालेली दिसून येते. आदिम समाजामध्ये प्रतिकूल निसर्गाच्या विरोधात मानवी अस्तित्व टिकवण्यासाठी मनुष्यप्राण्याला हिंसेचा आधार घ्यावा लागला, त्याच्यापेक्षा बलाढ्य असणार्‍या प्राण्यांविरुद्ध त्याला हिंसक व्हावे लागले. ही परिस्थितीने लादलेली हिंसा होती. पुढे टोळी समाजात हिंसेचा अधिक विस्तार झाला. एक टोळी दुसर्‍या टोळीला पूर्ण नष्ट करत असे. अन्नाअभावी तर नरमांस भक्षण होत असे. पुढे शेतीचा शोध लागल्यानंतर समाज एके ठिकाणी स्थिर होऊ लागला. शेतीसाठी श्रमाची गरज निर्माण झाली आणि एक टोळी दुसर्‍या टोळीला आता नष्ट न करता गुलाम म्हणून शेतीच्या कामात वापरू लागली. यातून गुलामगिरीच्या प्रथेने आकार घेतला. शेतीतून निर्माण होणार्‍या आणि समाजाला पुरून उरलेल्या वरकड संपत्तीवर अधिकार कोणाचा, हा प्रश्न त्यातून निर्माण झाला. भयप्रद निसर्गातील घटनांचा अर्थ लावण्यासाठी, निसर्गाच्या कोपाला किंवा समाजात पसरणार्‍या साथीच्या रोगांना आवरण्यासाठी जे काही निसर्गविधी अस्तित्वात आले होते आणि हे काम जे लोक करत होते, त्यांनी या संपत्तीवर अधिकार सांगायला सुरुवात केली, त्या लोकांना या विधीमुळे पावित्र्य बहाल केले जात असे. यातूनच पुरोहित वर्ग, धर्म अस्तित्वात आले आणि नंतर संपत्ती वाढवण्यासाठी आणि तिचे रक्षण करण्यासाठी म्हणून राज्यसंस्था अस्तित्वात आली. यातूनच माणसांचे माणसांकडून शोषण सुरू झाले आणि आर्थिक, सामाजिक विषमतेची बीजे रोवली गेली.

या विषमतेविरुद्ध आवाज उठवणार्‍या, विद्रोह करणार्‍या कष्टकरी समूहाच्या विरोधात शोषक वर्गाकडून कायम हिंसेचा आधार घेतला गेला. ती प्रथा आजतागायत सुरू आहे; पण केवळ दमन करून विद्रोह थांबवता येत नाही, असे लक्षात आल्यानंतर त्यासाठी दमन यंत्रणेला नैतिकता पुरवणारा धर्म, तत्त्वज्ञान अस्तित्वात आले. लोकांवर ते लादले गेले. राजाकडून किंवा पुरोहित वर्गांकडून होणार्‍या हिंसेला नैतिक मानण्यात आले; तर शोषण, अन्यायाविरुद्ध होणार्‍या प्रतिहिंसेला अनैतिक ठरवण्यात आले. हिंसा सत्ताधारी वर्गाचे अभिन्न अंग आहे. सत्ताधारी वर्गाची सत्ता टिकवण्याची ती गरज आहे. राजा देवाचा अंश आहे. राजांची हत्या हे महापाप आहे; तसेच देवाच्या पुजार्‍याची हत्या महापाप आहे.

आपल्याकडे त्यातूनच ब्रह्महत्या हे महापाप मानले गेले आहे. पेशवाईत ब्रह्महत्येला देहांत प्रायश्चित आहे, असे ठणकावून सांगणारे राम शास्त्रींचे कौतुक होताना दिसते; परंतु राम शास्त्रीच्या या दृष्टिकोनात वर्णवर्चस्वाचे मूल्य दडले आहे, हे संगितले जात नाही. भारतात एकाच वेळी अनेक सामाजिक व्यवस्था नांदताना दिसतात. आदिवासी समाजाचे अस्तित्व हे भारतीय समाजाचे वैशिष्ट्य आहे. आजही मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज भारतात टिकून आहे. भांडवलशाही आल्यानंतरही यामध्ये फरक पडलेला नाही. कारण भांडवलशाहीमध्ये विकासाचे तत्त्व हे विषम विकासाचे तत्त्व असते; शिवाय आपल्याकडे भांडवलशाही वरून लादली गेली आहे. मुंबई, कोलकत्ता, चेन्नई शहरांमध्ये जो विकास झालेला आहे किंवा या राज्यांमध्ये तो विकास झालेला आहे, तसा औद्योगिक विकास इतर राज्यांमध्ये झालेला नाही. याची कारणे भांडवलशाहीच्या विषम विकासाच्या वृत्तीमध्ये दडलेली दिसतात. जिथे भांडवलाच्या विकासाला विकसित होण्यासाठी अनुकूल परिस्थिती दिसते, अशाच ठिकाणी हा विकास होतो. त्यामुळे ईशान्य, मध्य भारत हा औद्योगिक विकासापासून पूर्ण मागासलेला राहिला आहे. या मागासलेपणाचा परिणाम अजूनही मध्ययुगीन जातिव्यवस्था प्रधानमूल्य कायम राहण्यात होतो. जातिव्यवस्थेला पुन्हा-पुन्हा जन्म देणारी आर्थिक हितसंबंधांची, जमीन संबंधांची व्यवस्थाही कायम राहते. आपल्याकडे लिखित इतिहासाचा पूर्ण अभाव आहे. सम्राट अशोकाने लुम्बिनी येथे कोरलेला शिलालेख ‘येथे शाक्यमुनी गौतमाचा जन्म झाला’ हाच काय तो पहिला लिखित पुरावा. त्यामुळे ऐतिहासिक मांडणी सुसंगत आणि सलग करण्याला मर्यादा पडतात; परंतु सनातन वैदिक धर्माचा पुरस्कार करणारी रामायण, महाभारत किंवा पुराणे आणि या सगळ्यांचा पाया असलेले वेदांताचे तत्त्वज्ञान त्यातून आपल्याला वैदिक, अवैदिक संघर्षाचा वेध घेता येतो. सनातन वैदिक संस्कृती कर्मवादावर आधारलेली आहे. या जन्मात वर्णव्यवस्थेने, जातिव्यवस्थेने कर्म सांगितले आहे, ते कर्म चांगल्या पद्धतीने पार पाडणे म्हणजे पुढील जन्म हा चांगल्या वर्णात, जातीत होतो, अशी ढोबळ मांडणी दिसून येते. जे वर्णव्यवस्था, जातिव्यवस्थेचे समर्थन करण्यासाठी हे तत्त्वज्ञान जन्माला आले आहे. यामध्ये श्रेष्ठ मानल्या जाणार्‍या जातीला शूद्र समजलेल्या जातींच्या लैंगिक शोषणापासून त्यांना ठार मारण्याचे पूर्ण अधिकार देऊन ठेवले आहेत.

पुण्यामध्ये पेशवाई, ब्रिटीश राजवट सुरू झाल्यानंतर ब्राह्मणांकडून दलिताची हत्या होते, तेव्हा ब्राह्मणांना अटक केली जाते, तेव्हा एकंदरच ब्राह्मण ज्ञातीला आश्चर्य वाटते. त्यांचा युक्तिवाद असतो की, आम्हाला आमच्या धर्माने अधिकार दिला आहे. तुमची लुडबूड, धर्मांमध्ये हस्तक्षेप आहे. याचा अर्थ हिंसेचे समर्थन हा या तत्त्वज्ञानाचा पाया आहे, जो आपल्याला रामायणातून-महाभारतातून-पुराणातून दिसून येतो, ही महाकाव्यं आणि सगळ्या पुराणांतून ब्राह्मण ज्ञातीच्या श्रेष्ठत्वाचा गौरव करणारी समाजावर त्यांचे श्रेष्ठत्व ठसवणारी आणि त्यासाठी नैतिक समर्थन करणारी मांडणी दिसून येते. अनेक असुरांच्या हत्या, रावणाची बहीण त्रुटिकाची हत्या, महाबली वालीची हत्या, त्याचे नैतिक समर्थन आपल्याला दिसून येते; तसेच महाभारतामध्ये नागवंशाचा नायनाट करण्यासाठी संपूर्ण खांडववन जाळले जाते; तसेच आपल्या नातेवाईकांची हत्या करायची की नाही, या संभ्रमात पडलेल्या अर्जुनाला हिंसेची प्रेरणा देणारे तत्त्वज्ञान मांडले जाते.

या पार्श्वभूमीवर अहिंसेचे तत्त्वज्ञान हे बुद्ध आणि महावीर आणि चार्वाकाकडून येते म्हणजे अवैदिक प्रवाहाकडून पुढे येते. इथे हे नमूद केले पाहिजे की, सनातन-वैदिक तत्त्वज्ञान एक शोषक जात-वर्गाचे तत्त्वज्ञान आहे, तर बुद्ध, महावीर, चार्वाक यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान हे शोषितांचे, शेतकरी वर्गाचे आणि एकंदरीतच कष्टकरी वर्गाचे आहे. भारतात अहिंसेचे तत्त्वज्ञान बुद्ध, महावीरांकडून पुढे येते, तेही एका विशिष्ट भौतिक परिस्थितीत. बुद्ध, महावीर हे त्यावेळच्या छोट्या-छोट्या गणराज्यांचे राजकुमार होते. ही गणराज्ये शेतीव्यवस्थेवर आधारलेली होती आणि शेतीचा विकास त्यावेळी सुरू होता. त्यासाठी बैल-वासरे हे पशुधन उपयोगाचे होते, गरजेचे होते; परंतु यज्ञसंस्कृतीमध्ये त्यांची कत्तल होत असे. या गरजेतूनच शेती व्यवसायासाठी निगडित असलेले हे राजकुमार पुढे आले आणि त्यांनी यज्ञसंस्कृतीला, वैदिक संस्कृतीला विरोध केला आणि हे अहिंसेचे तत्त्व पुढे आणले आणि जनतेने त्याला अर्थातच प्रचंड पाठिंबा दर्शवला. वेगवेगळे राजे-महाराज यांनी बौद्ध, जैन धर्म स्वीकारून यज्ञसंस्कृती आणि ब्राह्मणी वर्चस्ववादी संस्कृतीला विरोध सुरू केला. यातून श्रमशक्तीचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आणि बौद्ध काळातच भारतात विज्ञान-तंत्रज्ञान कला-शिल्पकला यांचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला. त्यानंतरच्या काळात तो कधीच झाला नाही. ज्या-ज्या वेळी सनातन वैदिक सत्तेवर आले, त्या-त्या वेळी देशाची, समाजाची पीछेहाट झाली आहे. पुरोहितांच्या ढेर्‍या वाढल्या आणि शेतकर्‍यांची पोटे कर्मकांडी शोषणामुळे खपाटीला गेली. आजच्या वर्तमानातील तेच होत आहे.

त्या काळाच्या मर्यादा, समाजविकासाच्या अवस्था लक्षात घेता बौद्ध, जैन धर्म शोषण नष्ट करू शकत नव्हते, राज्यसंस्था नष्ट करू शकत नव्हते. पुढे-पुढे हे धर्मच राजाश्रयी बनले आणि पुरोहितशाहीसारखे शोषक झाले. त्यामुळे समाजावरील त्यांचा प्रभाव ओसरत गेला आणि पुन्हा सनातन वैदिक तत्त्वज्ञानाने उचल खाल्ली. अशा कमकुवत झालेल्या बौद्ध धम्माला, बौद्ध मताला शंकराचार्यांनी हरवले, असे म्हटले जाते. याबद्दल मार्क्सवादी विचारवंत डी. डी कोसंबी यांनी म्हटले आहे की, शंकराचार्यांचे एकंदर तत्त्वज्ञान पाहता शंकराचार्यांना बौद्ध मताचा ओ की ठो माहीत नव्हता, हेच दिसून येते. ही छोटी-छोटी गणराज्ये नष्ट होण्याचा आणि महाकाय साम्राज्य उदयाला येण्याचा हा काळ आहे. त्यामुळे राज्यसंस्थेच्या शोषणाला आणि हिंसेला मान्यता देणारे तत्त्वज्ञान यांना हवे होते. शेवटचा बौद्ध राजा बृहरथ याचा खून त्याचा सेनापती पुष्यमित्र शृंग करू शकतो, यातच सर्व काही आले. नंतर दिसून येते ती हिंसा आणि हिंसाच. 84 हजार बौद्ध विहारे नष्ट केली. बौद्ध भिक्खूंच्या कत्तली केल्या. जैन मुनींचे डोके उकळत्या तेलात बुडवून त्यांना मारण्यात आले. हिंसा हे राज्यसत्तेचे अभिन्न अंग आहे आणि त्याला साथ देणारे तत्त्वज्ञान धर्म असेल, तर ते किती अमानवी होऊ शकते, हे आपण पुष्यमित्र शुंग आणि रामदेवराय या राजांच्या काळात पाहू शकतो.

कोट्यवधींच्या संख्येने कष्टकरी असणार्‍या समाजाला अस्पृश्य ठरवून त्यांचे माणूसपण नष्ट करणे हे किती हिंसक आहे, याची कल्पना करता येत नाही आणि परत ‘महान’ संस्कृती म्हणून तुम्ही मिरवू शकता. हा हिंसक मनोवृत्तीचा कळस आहे. पुढे सनातन वैदिक तत्त्वज्ञानाच्या आधारे आपल्याला वेगवेगळ्या काळामध्ये जातिव्यवस्थेला आणि ब्राह्मणी वर्चस्वाला विरोध करणार्‍या महापुरुषांची हत्या झालेले दिसून येते.

संत कबीर, चक्रधर स्वामी, बसवेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव या कोणाचाही मृत्यू नैसर्गिकरित्या झालेला नाही. सनातन वैदिक संस्कृतीला कठोरपणे विरोध करणारे हे महानुभाव आहेत. या सगळ्यांच्या मरणामागे काही चमत्कृतीपूर्ण कथा आहेत. तार्किकदृष्ट्या विचार केला, तर त्यांचे काय झाले, हे सांगायची गरज नाही. संत तुकारामांच्या काळात आपण शिवछत्रपतींच्या राजवटीकडे येतो. ते जातिभेदविरोधी होते. गुन्हा केला असेल, तर ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा ठेवतो, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. त्यांच्याही मृत्यूबद्दल असाच प्रकार आहे. नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी काही लोकांना त्याबद्दल हत्तीच्या पायाखाली दिले असे म्हटले जाते. तीच गोष्ट ब्रिटीश राजवट आल्यानंतर महात्मा फुले यांना मारण्यासाठी मारेकरी पाठवले जातात. पुढे राष्ट्रपित्याचा खून होतो. ही मालिका डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्यापर्यंत चालत येते आणि या चौघांचे मारेकरी आज सहा-सात वर्षेउलटून गेली, तरी सापडत नाहीत. गुजरातपासून दिल्लीपर्यंत झालेले दंगे आणि या सगळ्यांचे पाठीराखे सर्वांना माहीत आहेतच. वरील विवेचनावरून एक गोेष्ट स्पष्टपणे लक्षात येते, ती म्हणजे भारतामध्ये हिंसेचे समर्थन करणारी, तिचा वापर करणारी संस्कृती कोणती, तत्त्वज्ञान कोणते, याबद्दल दुमत असू नये. ज्यावेळी त्यांच्या संस्कृतीला, सत्तेला आणि तत्त्वज्ञानाला आव्हान मिळते, त्यावेळी प्रस्थापित व्यवस्था दोन पद्धतीने व्यक्त होते. एक शोषणाचा गाभा कायम ठेवून ती विरोधकांना काही तडजोडी करून सामावून घेते, उदाहरणार्थ – बुद्धाला विष्णूचा अवतार बनवते; दुसरा मार्ग म्हणजे ‘सदेह वैकुंठा’ला पाठवते.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हे प्रकृतीने ठणठणीत होते. अजून पंधरा-वीस वर्षे आरामात काम करू शकले असते आणि हेच तर धर्मांधांना नको होतं. त्यांचा धर्म धोक्यात आला होता. तीच गोेष्ट कॉम्रेड पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांची. हे खून कोणी केले, त्याला तसा अर्थ नाही. हे खून ज्या विचारसरणीतून झाले, ती विचारसरणी जर कायम टिकून असेल, तर असे खून पडतच राहतील. खरी लढाई आहे त्या धर्मांध विचारसरणीविरुद्ध. जोपर्यंत राज्यसंस्था आहे, धर्मसंस्था आहे आणि माणसाकडून माणसाचे होणारे शोषण आहे, तोपर्यंत हिंसा नष्ट होणे कदापि शक्य नाही. पिळवणुकीवर आधारलेला समाज, त्या समाजाचे समर्थन करणारी संस्कृती आणि तत्त्वज्ञान हेच हिंसेचे मूळ आहे. हिंसा असा समाज अस्तित्वात आल्यापासून सुरू झाली. त्यामुळे या पिळवणुकीवर आधारलेला, सामाजिक, आर्थिक विषमतेने पोखरलेला समाज नष्ट झाल्याशिवाय हिंसा नष्ट होणार नाही.