वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व

डॉ. अतिश दाभोलकर -

डॉ.अतिश दाभोलकर हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ असून अब्दुस सलाम इंटरनॅशनल सेंटर फॉर थिओरॅटिकल फिजिक्स (आय सी टी पी) या संस्थेचे ते संचालक आहेत. स्ट्रिंग थियरी, कृष्णविवरे, पुंजकीय गुरुत्व हे त्यांच्या अभ्यासाचे व संशोधनाचे विषय आहेत.

२०१३ साली जादूटोणाविरोधी कायदा पारित व्हावा यासाठी प्रयत्नचालू असताना त्यामध्ये सहभागी होण्यासाठी डॉ. अतीश त्यांच्या व्यस्त आयुष्यातून वेळ काढून तीन आठवडे भारतात आले होते. कायदा मंजुरीला व्यापक पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी स्वतः एक वेबसाइट तयार केली. या वेबसाईटच्या माध्यमातून तीन हजार वैज्ञानिक आणि जवळपास एक लाख नागरिकांनी या कायद्याला पाठिंबा दिला होता.त्यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अनेक कार्यकर्त्यांशी त्यांचा परिचय झाला. नुकतेच अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या २०२३ च्या वार्षिक विशेषांकाचे ऑनलाईन प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावरील त्यांचे चिंतन श्रोत्यांसमोर मांडले.

‘वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व’या विषयावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते व हितचिंतक यांच्याबरोबर संवादासाठी आमंत्रित केल्याबद्दल आभार.

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हे माझे काका होते म्हणून केवळ नव्हे तर एक वैज्ञानिक म्हणून आणि पुरोगामी महाराष्ट्रीय वारशाचा अभिमान ठेवणारी एक व्यक्ती म्हणून मला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य महत्त्वाचे वाटते. वैज्ञानिक दृष्टिकोन समाजामध्ये रुजविणे, हे महत्त्वाचे काम आहे आणि अलीकडच्या काळामध्ये त्यासमोर बरीच गंभीर आव्हाने उभी राहिली आहेत. भारताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व व त्यावरील टीका या क्षेत्रात काम करणार्‍या सर्व कार्यकर्त्यांनी नीट समजावून घेतली पाहिजे. या टीकेचा प्रतिवाद करणारे योग्य युक्तिवाद आपल्याकडे असले पाहिजेत.

वैचारिक आणि राजकीय दृष्टीने सध्या वैज्ञानिक दृष्टिकोनावर तीन आघाड्यांवर हल्ला होत आहे असे म्हणता येईल. आणि फक्त भारतातच नव्हे तर युरोपमध्ये देखील हे थोड्या वेगळ्या स्वरुपात बघायला मिळते पण भारताच्या पार्श्वभूमीवर त्यांचे काही विशेष संदर्भ आहेत. त्या हल्ल्यांमागील भूमिका आपण नीट समजून घेतली पाहिजे, त्यात काही तथ्य आहे किंवा नाही याचा शोध घेऊन आपण स्वतःची भूमिका निश्चित केली पाहिजे.

एक वैज्ञानिक म्हणून मी असे निश्चित म्हणू शकेन की विज्ञान हा मानवी संस्कृतीचा एक अत्यंत अमूल्य असा वारसा आहे. म्हटलं तर आपण माकडापासून उत्क्रांत झालेले जीव आहोत. पण निरीक्षण, तर्क आणि प्रयोग यांच्या माध्यमातून आपण निसर्ग नियम समजावून घेऊ शकू हा विश्वास बाळगून, प्रयोगशाळेमध्ये बसून किंवा समीकरणांच्या आधारे, आपण अणूची संरचना यापासून विश्वाची संरचना यापर्यंत सखोल ज्ञान मिळवू शकलो आहोत. ही खरोखर थक्क करून सोडणारी गोष्ट आहे. आपले हे जे संभाषण आता ‘झूम’ द्वारे चालू आहे त्यामागेही केवढे मोठे विज्ञान आहे त्याची बर्‍याच वेळा आपल्याला कल्पना असत नाही. क्वांटम सिद्धांतापासून विद्युत-चुंबकीय लहरींचे गमन कसे होत याविषयीचे हे विज्ञान जवळजवळ दीडशे वर्षांपासून अनेक वैज्ञानिकांच्या अभ्यासातून निश्चित झाले आहे. त्याचा परिपाक म्हणून आपण सेमीकंडक्टर सारख्या तंत्रज्ञानावर आधारित हे आत्ताचे संभाषण घडवून आणू शकतो. विज्ञानाची ही नेत्रदीपक प्रगती आणि त्यामुळे निर्माण झालेल्या दैदीप्यमान तंत्रज्ञानाकडे पाहता कोणीही सामान्य माणूस विज्ञानाचे महत्त्व प्रश्नांकित करेल, असे वाटणार नाही. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, एका बाजूने विज्ञानाच्या या फलितांचा उपभोग घेत असताना विज्ञानाच्या पद्धतीविषयीच एक मोठी शंका निर्माण करणारे काही विचारप्रवाह अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेले आहेत.

भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेतील एक महत्त्वाचे कलम असे की “वैज्ञानिक चित्तवृत्ती (सायंटिफिक टेंपर), मानवतावाद, पृच्छा करणारी चौकस वृत्ती आणि त्यातून सुधार घडवून आणणारी कृती यांचा विकास आणि संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.” या कलमाचे श्रेय पंडित नेहरू आणि डॉ. आंबेडकर यांना जाते. आपल्याला खर्‍या अर्थाने लोकशाही रुजवायची असेल, तर देशामध्ये ज्याप्रमाणे संसदीय संस्था आणि न्यायव्यवस्था उभी केली पाहिजे त्याचप्रमाणे आपण सर्व नागरिकांमध्ये वैज्ञानिक चित्तवृत्ती जोपासली गेली पाहिजे यांची नेहरू आणि आंबेडकर यांना पूर्ण जाणीव होती.

वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करणे किती गरजेचे आहे हे त्यांनी नक्की ओळखले होते. या विचारांचा थोडा ऐतिहासिक संदर्भात विचार केला तर युरोपमधल्या प्रबोधन काळापर्यंत आपल्याला त्याची मुळे सापडतील. विज्ञानाच्या मार्गाने ज्ञान संपादन करणे, त्याची उपासना करणे, त्यातून काही वैश्विक आणि सर्वंकष सत्य मिळू शकते, असा विश्वास बाळगणे आणि त्याच वेळेला धर्म आणि राजकारण यांची फारकत करणे, पोथीनिष्ठपणा सोडून देणे, कुठल्यातरी एका धर्मग्रंथांमध्ये लिहिलेले आहे ते न मानता जे निरीक्षणावर आधारित आहे त्यावर विश्वास ठेवणे, व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि त्यावर आधारित असलेल्या संसदेसारख्या लोकशाही संस्थांची उभारणी करणे, या सगळ्या गोष्टी युरोपच्या प्रबोधन काळात साधारण एकाच वेळेला समोर आल्या. कारण त्या एकमेकांशी निकटपणे जोडलेल्या आहेत.

सोळाव्या-सतराव्या शतकात जी वैचारिक खळबळ युरोपमध्ये घडून आली ती भारतामध्ये घडून आल्याशिवाय आणि मुळापासून या गोष्टींवर विचार झाल्याशिवाय आपण खर्‍या अर्थाने प्रबोधनाची मूल्ये आत्मसात करू शकू असे मला वाटत नाही. म्हणूनच भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने लक्षात घेता मला ‘अंनिस’चे काम विशेष महत्त्वाचे वाटते. विज्ञानाची मूलभूत तत्त्वे ही एका अर्थाने म्हटलं तर सामान्यज्ञानासारखी आहेत. जितका पुरावा असेल तितकाच तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. कोणत्या गोष्टीवर तुम्ही किती खात्रीने पैज लावू शकता यावरती तुम्ही त्यावर किती विश्वास ठेवाल ते ठरवलं पाहिजे. या गोष्टी म्हटल्या तर एका अर्थाने सहज पटणार्‍या आहेत. विज्ञानामध्ये शंभर टक्के खात्रीने आपण कुठलीच गोष्ट सांगू शकत नाही. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की उदाहरणार्थ जर मलेरियावरचे ‘क्विनाईन’ हे औषध घेतलं तर हजारातले नऊशे नव्व्याणव लोक बरे होतात म्हणजे एकास हजार या पटीने आपण त्याच्यावरती पैज लावू शकतो. मात्र अशा प्रकारचा संख्याशास्त्रीय विचार करणे बर्‍याचवेळा मानवी मेंदूला सहजपणे शक्य होत नाही. त्यामुळे आपण स्वतःहून मुद्दाम विचार करून रुजवल्या शिवाय असा संख्याशास्त्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करणे अवघड ठरू शकते. अलीकडेच आपण याची उदाहरणे बघितली आहेत. कोविडच्या सुरुवातीच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की, आपल्याला औषधांविषयी किंवा उपचारांविषयी पक्की खात्री होतीच असे नव्हे; पण जसजसा आपला त्या औषधांवरचा विश्वास वाढत गेला त्या प्रमाणातच पुढेपुढे त्या औषधांचा वापर सुरू झाला. या प्रक्रियेविषयी जर नागरिकांमध्ये पूर्ण समज नसेल तर विज्ञानाविषयी गैरसमज निर्माण होऊ शकतात — “काल मला या डॉक्टरांनी हे सांगितलं आणि तीन महिन्यानंतर वेगळं सांगितलं असं का झालं?” कारण नवीन पुरावा आल्यानंतर आपण आपले निष्कर्ष बदलू शकतो ही विज्ञानाच्या पद्धतीतील मूलभूत गोष्ट आहे. विज्ञानाची ही कार्य पद्धती जर चांगल्या रीतीने आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकलो नाही, तर त्यातून विज्ञानविरोधी विचारांना चालना मिळू शकते.

वैज्ञानिक चित्तवृत्तीविषयीचे हे आकलन इथल्या श्रोत्यांना पुन्हा सांगण्याची गरज नाही पण या कार्यप्रणालीवर हल्ला करणारे तीन विचारप्रवाह आहेत त्यांचा मी या ठिकाणी थोडासा खोलात जाऊन विचार करेन त्यासाठी ही पार्श्वभूमी.

विज्ञानावरील एक पहिला मोठा टीकाप्रवाह ‘उत्तर आधुनिकवाद’ या विचारप्रणालीतून येतो.

उत्तर-आधुनिक वादाची भूमिका साधारणपणे पुढीलप्रमाणे आहे: “प्रबोधन काळातील वर नमूद केलेले विज्ञानाविषयीचे विचार आता खूप जुने झालेत. वैज्ञानिक संशोधनाचे कार्य जे इतर कुठल्याही मानवी कार्याप्रमाणे सामाजिक व आर्थिक संदर्भांनी व हितसंबंधांनी निश्चित होते. त्यामुळे खरे म्हणजे विज्ञानामध्ये वास्तवाविषयी काही सर्वंकष सत्य असते असे मानायला काही जागा नाही.” याच विचारांचा एक पुढचा टप्पा म्हणजे सामाजिक सापेक्षतावाद ज्यानुसार “विज्ञानाचे ज्ञान हे एक वास्तवाविषयीचे ज्ञान नसून एक‘सामाजिक रचित’ म्हणजे ‘सोशल कन्स्ट्रक्ट’ आहे.” या विचारधारेतेल मीमांसा किती हास्यास्पद पातळीपर्यंत जाऊ शकते त्याचे एक उदाहरण देतो. ब्रूनो लातूर हे या विचारधारेचे एक मान्यताप्राप्त विचारवंत आहेत.

रामसेस-२ हा इजिप्तमधला एका फारोह (Pharaoh, प्राचीन इजिप्तमधील राजा). त्याच्या ‘ममी’रुपी शवाचे विश्लेषण केल्यावर त्याचा मृत्यू क्षय रोगामुळे झाला असेल अशी शक्यता वर्तवली गेली. तर या विचारवंत महोदयांचे त्यावर म्हणणे असे की, हे असे होऊच शकत नाही.

१८८२ साली शोधल्या गेलेल्या विषाणूमुळे दोन हजार वर्षांपूर्वी कुणाचा मृत्यू झाला असे म्हणणे हे मशीनगनच्या गोळीने त्याचा मृत्यू झाला, असे म्हणण्याइतके अर्थहीन आहे. कारण जणू त्यांचा शोध लागेपर्यंत त्या विषाणूंना अस्तित्वच नव्हते. थोडक्यात, लातूर यांच्या मते, क्षयरोग किंवा त्याचे विषाणू हे काही वैज्ञानिक वास्तव मानता येत नाही तर ते एक वैज्ञानिकांनी आपापसात विचार करून ठरवलेले सामाजिक रचित आहे. हे अर्थात उत्तर-आधुनिक वादाचे एक टोकाचे रूप आहे आणि या विचारसरणीच्या अनेक कमी जास्त छटा आहेत.

पण वैज्ञानिक वास्तव एका मूलभूत पातळीवर नाकारणारा,ठासून मांडला जाणारा, पॅरिस आणि कोलंबिया सारख्या मोठ्या विद्यापीठांमध्ये लोकप्रिय झालेला हा वैज्ञानिक दृष्टिकोनावरचा एक मोठा हल्ला आहे हे लक्षात घेतले पाहिजे (सोकाल व ब्रिकमॉन्टया दोन लेखकांनी त्यांच्या ‘फॅशनेबल नॉन्सेन्स’ या पुस्तकात या विचारधारेतील अनेक लेखकांची यथोचित छाननी केलेली आहे ती वाचनीय आहे). विज्ञानाचे सामाजिक व आर्थिक संदर्भ समजावून घेतले पाहिजेत हे उत्तर-आधुनिकवादाचे मत आपण सहज स्वीकारू शकतो. मात्र उत्तर-आधुनिक वाद वैज्ञानिक सत्य ही संकल्पनाच ज्या रीतीने प्रश्नांकित करू इच्छिते त्याला काही सबळ अधिष्ठान दिसत नाही.

भारतात आढळून येणार्‍या विज्ञानविरोधी दुसर्‍या टीका प्रवाहाविषयी बोलताना मी आशिष नंदी यांचे उदाहरण घेऊ शकेन. या विचारांच्या प्रेरणा काहीशा नवगांधी वादातून येतात. मला आठवते की, १९८० च्या सुमारास जेव्हा मी आयआयटीमध्ये विद्यार्थी होतो, तेव्हा जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एका परिषदेनंतर काही प्राध्यापकांनी एक ‘स्टेटमेंट ऑन सायंटिफिक टेम्पर’ प्रसिद्ध केले होते. त्याला प्रत्युत्तर अशा स्वरूपाचे ‘काउंटर स्टेटमेंट ऑन ह्युमॅनिस्टिक टेम्पर’ आशिष नंदी यांनी प्रसिद्ध केले. खरे बघाल तर आपल्या संविधानामध्ये सायंटिफिक टेम्पर आणि ह्युमॅनिझम हे एकत्र बांधले गेलेले आहेत.

नेहरू आणि आंबेडकरांच्या कल्पने प्रमाणे सायंटिफिक टेंपर आणि ह्युमॅनिझम हे घट्ट निगडित आहेत. नेहरूंनी तर म्हटले होते की, ‘scientific temper is the temper of the free man.’ इथे आशिष नंदी यांनी मात्र अशी भूमिका घेतलेली आहे की, सायंटिफिक टेम्पर किंवा वैज्ञानिक चित्तवृत्ती ही मानवतावादी चित्तवृत्ती किंवा ह्युमॅनिस्टिक टेंपरपेक्षा काहीतरी खूप वेगळी आहे.इथूनच त्यांची सुरुवात होते आणि पुढे तर अजूनच आक्रमक मांडणी आहे. उदाहरणार्थ, त्यांच्या मते “वैज्ञानिक चित्तवृत्तीचा अंतिम तर्क म्हणजे सामान्य माणसाविषयी प्रतीत होणारी अर्वाच्य तुच्छता” (The ultimate logic of the scientific temper is the vulgar contempt for the common man it exudes).

आता हे विधान एवढे आक्रमक आहे की या विचाराचे अनेक पाठीराखे कसे काय असू शकतात आणि अशा प्रकारचा विचार भारतामध्ये कसा काय रुजू शकतो हा प्रश्न आपल्या समोर उभा राहील.

ते पुढे असेही म्हणतात की, विज्ञान हे इतर कोणत्याही मानवी प्रयत्नांप्रमाणेच संस्कृती आणि समाज यांनी निश्चित झाले आहे. इथे आपल्याला उत्तर-आधुनिकवादी विचारांचे पडसाद स्पष्ट दिसतात. एका बाजूने एक अती डाव्या विचारांचा, म्हणजे‘मोअर रॅडिकल दॅन दाऊ’असे दाखवणारा पाश्चिमात्य उत्तर आधुनिक वाद. या विचारधारांच्या पूर्वसुरींमध्ये कुन्ह (Kuhn) किंवा फेयराबेंड (Feyerabend) यांसारख्या विचारवंतांचीही गणना करता येईल. तर दुसर्‍या बाजूने आपण पददलितांच्या बाजूने उभे आहोत असा अभिनिवेश दाखवणारा, गांधींच्या वारशाचा दावा करणारा त्याचा भारतीय अवतार. पर्यायी विज्ञान (अल्टरनेटिव्ह सायन्स) या नावाखाली भारतामध्ये त्याला खूप पाठिंबा आहे. त्यामुळे हे आव्हान देखील आपण समजावून घेतलं पाहिजे.

तुम्ही बघाल तर या दोन्ही भूमिकांची मुळं खूप वेगळी आहेत. उत्तरआधुनिकवाद हा पश्चिमेतल्या विचारवंतांनी पश्चिमेतल्या विज्ञानवादाविरुद्ध केलेला एक विचार आहे. त्याची भारतीय आवृत्ती अशी की, आधुनिक विज्ञान ही बाहेरून आलेली एक उच्चभ्रू वसाहतवादी कल्पना आहे जी भारतातल्या परंपरेशी जोडलेली नाही; पण या दोन्हींना जोडणारा समान मुद्दा म्हणजे वैज्ञानिक सत्य या संकल्पनेलाच नकार.

वैज्ञानिक विचारावरती जे तिसरे आक्रमण केले जात आहे ते स्वदेशी आणि हिंदुत्ववादी लोकांच्याकडून होणारे आहे. उदाहरणार्थ भारताच्या पंतप्रधानांनी इंडियन सायन्स काँग्रेस सारख्या मोठ्या परिषदेमध्ये गांभीर्याने केलेले विधान म्हणजे, गणपतीचं डोकं आपण चिकटवले याचा अर्थ भारतामध्ये प्लास्टिक सर्जरी पूर्वीपासूनच होती. जर अशा मोठ्या परिषदेमध्ये आपल्या पंतप्रधानांकडून अशा प्रकारचे विधान होऊ शकतं तर या मागची भूमिका काय आहे?

आशिष नंदी आणि हिंदुत्ववादी विचार यांच्यामध्ये म्हटलं तर खूप अंतर आहे. पण या ठिकाणी त्यांच्यामध्ये स्वदेशीवाद किंवा नेटीविजमच्या नावाखाली एक अभद्र युती आहे असं लक्षात येते. भारतामध्ये जे नवीन विज्ञान येत आहे ते म्हणजे एक वसाहतवादी आक्रमण आहे.आमच्या ज्या आयुर्वेदातल्या किंवा पुराणातल्या कल्पना आहेत किंवा भारतामध्ये जे पूर्वीचे ज्ञान होते ते आधुनिक ज्ञानाइतकेच ग्राह्य आहे. गांधींनी त्या वसाहतवादी आक्रमणाचा ज्या रीतीने विरोध केला त्या रीतीने आपण सामान्य माणसाच्या वतीने त्याचा विरोध करणार आहोत.

या परकीय विज्ञानाला नाकारून आमच्याकडे जे काही होतं ते तितकेच खरे विज्ञान होतं, असा एक अभिनिवेश ठेवणारी आक्रमक भूमिका हिंदुत्ववादी दृष्टिकोनातून घेतली गेली आणि म्हटलं तर नव-गांधीवादी विचारातूनही घेतली गेली. आपल्या सर्व सहकार्‍यांनी या तिन्ही टीका प्रवाहांमधील मधलं तथ्य काय आहे आणि मिथ्य काय आहे, हे समजावून घेण्याची गरज आहे. ज्या लोकांनी ‘स्टेटमेंट ऑनसायंटिफिक टेम्पर’ प्रसिद्ध केले त्यांची भूमिका खरेतर ‘अंनिस’च्या भूमिकाशी अगदी जुळती आहे: वैज्ञानिक विवेकवाद सामाजिक न्यायासाठी वापरला जाणे आणि नागरिकांमध्ये त्याचा प्रसार करणे ‘अंनिस’ सारख्या संघटनांचे हे महत्त्वाचे ठोस कार्य आहे. आणि अशा संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संदेह निर्माण करणारी ही वैचारिक भूमिका या तीन अगदी वेगळ्या ठिकाणांहून येत आहे.

या विषयावर अधिक खोलात जाणारे मीरा नंदा यांचे “उफराटे प्रेषित” (प्रोफेट्स फेसिंग बॅकवर्डस) हे एक महत्त्वाचे पुस्तक आहे.

(क्रमशः)


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]